फोन गेम

Submitted by सुनिल परचुरे on 1 August, 2009 - 03:53

फोन-गेम
एम.जे. कुलकर्णी अँड कंपनीचं ऑफीस, नुकताच लंच अवर संपलेला. सर्वजण आपापल्या खुर्च्यावर स्थिरस्थावर होत होते. त्यातलाच एक विवेक देशपांडेही, नुकताच बायकोने केलेल्या चमचमीत मटणावर ताव मारला होता. आता एक हलकीशी झोपेची गुंगी डोळ्यावर चढली होती. मान कलती ठेवून तो खुर्चीवर पडला होता.
`ट्रिंग-ट्रिंग` फोनची घंटा वाजली. नामदेव चपराशाने फोन उचलला. द़ेशपांडे साहेब ``पी.जी.`` आहे.`` तो म्हणाला.
हे ऐकल्याबरोबर देशपांडेच्या चेह-यावरचा आळस कुठल्याकुठे पळाला. पटकन खुर्ची पुढे ओढून फोन घेतला. आजूबाजूच्या टेबलावरची माणसे सुध्दा काम टवकारुन फोनवरचं बोलणं ऐकू लागली.
``हॅलो SSये SS स... सेमनंबर - व्हॉट ? कॉल फ्रॉम अहमदाबाद? येस.`` विवेक देशपांडेच्या चेह-यावर आता भलताच आनंद ओसंडायला लागला. म्हणजे साध्या हॉटेलात गेल्यावर मिळमिळीत व्हेजिटेरियन खाण्याऐवजी एकदम चमचमीत नॉन-व्हेज खायला मिळाव ना तसा. कॉल फ्रॉम अहमदाबाद काय ? तो मनाशी विचार करु लागला. म्हणजे कुणीतरी गुजराथी असणार, असू दे. आपल्याला काय गुजराथीसुध्दा येते.
``हू-हँSलू -मगनभाय छे ?`` पलिकडून आवाज आला, - ``हुं छगनभाय बोलू छूं.``
``हॅलो-मगनभाय तो नथी - हुं एमना असिस्टंट बोलू छू -मगनभाय पाच मिनटमां आवसे.`` विवेकने गुजरातीतच उत्तर ठोकून दिले.
``अरे, आल्यावर माझा एक अर्जंट निरोप सांग की ... ह्या ह्या कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत, अशी आताच मला बातमी लागली आहे. तेव्हा ते भाव वधारायच्या आत लगेच घ्यायला सांग.`` तो छगनभाई गुजरातीत फोनवर सांगत होता.
``हां-हां - विकेक मधून मधून म्हणत होतां. सर्वजण तो काय बोलतोय हे उत्सुकतेने ऐकत होते.
शिवाय माझा गेल्या वेळचा चेक द्यायचा राहिला आहे त्याची आठवण कर. मी सांगितलेले ते शेअर्सचं अर्जंट सांग हं - विसरु नकोस.``
``ओ.के.`` म्हणत विवेकने फोन ठेवला व एकदा झकासपैकी मोठयाने हसला. कोण छगनभाय आणि कोण मगनभाय.या टेलिफोनवर कधी राँग नंबर लागतील याचा भरवसा नाही - आपल्याला काय राँग नंबर लागला तर तेवढीहच जरा मजा. त्या अनोळखी माणसाशी ओळखीच्या सारखे बोलणे म्हणजे ही देखील एक कलाच आहे. थोडा टाईम पास मजेत व्हावा एवढीच यात माफक अपेक्षा.
आताचा फोन कुणाचा होता, मग मी त्या कस मामा बनवलं हे विकेक अगदी तिखटमीट लावून सर्वांना सांगत होता. सर्वजण त्याचा अभिनयं पाहात होते व हसत होते. मागे एकदा असेच फोनवर त्याने एकाला कशी उत्तर दिली ते आठवून हासत होत. तेव्हा फोन आला होता, ``हॅलो शेखर है``.
``वो तो कुवैत गया है`` विवेकने तेव्हा फोनवर अंदाजाने ठोकले.
``गया भी ? ओ.के. ! मुझे तो उससे मिलने का था!`` म्हणजे माझी मात्रा बरोबर लागू पडली. शेवटी त्या माणसाला कसं 10 मिनिटं फोनवर झुलवत ठेवले हे आठवून सर्वजण हसत होते. सर्वांचा लंचटाईम ख-या अर्थाने भरपेट झाला.
आज विवेक देशपांडेच्या लग्नाचा सहाव्या महिन्याचा वाढदिवस होता. मनाशी त्याने सगळे बेत आखले होते. सकाळी येतांना तसे तो आपल्या बायकोला-नंदाला सांगूनच बाहेर पडला होता. लवकर घरी जाऊन दोघं बाहेर चांगल्या हॉटेलात जेवणार होती व परस्पर सिनेमा बघायला जाणार होती. पिक्चरची तिकिटसुध्दा त्याने आधी काढून आणली होती. नुकताच त्याने बोरिवलीला नवीन फ्लॅटही घेतला होता. खुशीतच तो ऑफिसमधून लवकर निघून घरी आला. बिल्डिंगमध्ये येऊन पाहतो तो दाराला कुलूप, विवेकच्या कपाळावर एक बारीकशी आठी पडली. तरी हिला हज्जारदा बजावलय की मी संध्याकाळी घरी यायच्या वेळेस कुठे बाहेर जात जाऊ नकोस म्हणून. इथेच कुठे तरी शेजारी गेली असेल म्हणून 5 मिनिटे त्याने वाट बघितली. पण आजुबाजूच्या घरातून कसलाच आवाज नाही हे पाहून त्याच्या मनात काळजी निर्माण झाली.
त्याने आजुबाजूला चौकशी केली. शेजा-यांना काहीच माहिती नव्हती. जवळच त्याचा भाऊ राहात होता. एखाद्या वेळेस त्याच्या घरी गेली असेल. म्हणून तिकडे चौकशीस गेला .पण तिथेही नाही असे बघताच त्याचे हातपायच गळाले. इथे नवीन तशी कुणाशी ओळखही जास्त झालेली नाही. संध्याकाळ झालेली. त्याला आणखी भीती वाटू लागली. त्याच्या भावाने लगेच शोध केला –
सर्व नातेवाईकाकडे फोन लावले. पण कुठेच तिचा पत्ता नव्हता. विवेकच्या घशाला कोरड पडत चाचली. पण जरा विचार केल्यावर त्याला आठवलं, स्टेशनजवळ तिची शाळेतली खास बालमैत्रिण राहते. स्टेशनवर गेल्यावर एकदा सहज तिने जाताना आपल्याला घर दाखवलं होतं. तिकडे तर गेली नसेल ?
लगेच दोघेही निघाले व तिच्या घरी पोहोचले.
``अहो, किती उशीर केलात ? मी आपली तुमची वाट बघतेय केव्हापासून`` दोघांना आलेलं पाहून नंदा नाराजीनेच म्हणाली.
``अग माझी इथे वाट लागायची वेळ आली होती आणि तू " विवेक रागानेच ओरड्ला.
``थांबा, थांबा,`` नंदाच्या मैत्रिणीचे वडील म्हणाले, `अहो झालं तरी काय ?` आधी बसा बघू.``
मग विकेकने सगळी हकीकत सांगितली.
``म्हणजे - अहो, मी तुम्हाला दोनदा फोन केला. तुम्हीही सुध्दा म्हणालात, नक्की येतो म्हणालात,`` नंदा आश्चर्याने म्हणाली.
``कोण ? मी ?`` विवेक ओरडलाच, अग दिवसभर मी आज ऑफिसातच होतो. पण मला तुझा फोन आलाच नाही.``
``काय ? अहो मी सकाळी 11 च्या सुमारास फोन लावला तेव्हा तुम्ही जरा बाहेर गेलायत - अर्ध्या तासात याल म्हणून तुमच्या प्युनने फोनवर सांगितले.
मी तुम्हाला त्याला निरोप द्यायलासुध्दा सांगितला. तो निरोप देईल की नाही म्हणून परत दोन वाजता फोन लावला. तेव्हा फोनवर आवाज नीट ऐकू येत नव्हता. खरखर होत होती. फोनवर तुम्हाला मी सांगितलं की, मला सकाळीच ही मैत्रिण भेटली व आपला लग्नाचा वाढदिवस आहे म्हटल्यावर तो तिच्याच घरी साजरा केला पाहिजे म्हणून हटून बसली. म्हणून तुम्ही जेवायला घरी न जाता इकडेच या म्हणून मुद्दाम तुम्हाला फोन केला - बारीक आवाजात तुम्ही हो सुध्दा म्हणालात आणि.......
विवेकच्या डोळ्यासमोर अंधेरी आली. म्हणजे आपल्या सारखाच कुणी तरी पी.जी. म्हणजेच फोन गेम खेळला असणार, बापरे, आपण आतापर्यंत कित्येक लोकांना अशीच उत्तर दिली. त्यांचीही अवस्था आपल्या सारखीच कधी तरी झाली असली तर.... पटकन त्याने पाण्याचा तांब्या तोंडाला लावला.
दुस-या दिवशी ऑफिसात सकाळी फोनची बेल वाजली. शिपायाने फोन उचलला.
`देशपांडे साहेब पि .जी.` तो म्हणाला. सर्वजण परत टकमक त्याच्याकडे बघू लागले. आता थोडा वेळ टाईमपास होणार - राँग नंबरवाल्याची आता देशपांडे फिरकी घेणार.
`़` हॅलो SS`` देशपांडे शांत स्वरात म्हणाला.
``हॅला SS ईज ईट 2342- - - ?`` पलीकडून आवाज आला.
``नो-राँग नंबर सर` देशपांडे म्हणाला व रिसिव्हर फोनवर ठेवून दिला. सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

गुलमोहर: 

छान.
इथे मला नेहमी एका आजीबाईचा राँग नंबर फोन येतो. ती कुणा अ‍ॅलिसला शोधत असते. area code
चुकीचा लावला की फोन मला. मग मीच तिला परत एरिआ कोडची आठवण करुन देते. महिन्यातुन एकदातरी हा गोंधळ ठरलेला.

त्यातलाच एक विवेक देशपांडेही, नुकताच बायकोने केलेल्या चमचमीत मटणावर ताव मारला होता.>>>
ए बात कुछ हजम नही हुवी.
बाकी फोन गेम मस्त जमलाय.

ठीक ठीक. गोष्ट पुढे गेल्यावर शेवटाचा अंदाज आला होता.