मंगल

Submitted by दाद on 21 July, 2009 - 22:42

माझी आणि मंगलची ओळख खूप खूप जुनी. माझ्या बाळपणी आईनं थोपटीत गोष्टी सांगण्यापासूनची.
’... मग काय... आपली मंगल आली धाव्वत. तो वाघोबा होता धष्ट-पुष्टं. पण आपल्या मंगलीनं घेतलं त्याला कोपर्‍यात...’
’बोल... देशील आमच्या बाईमावशीला त्रास परत?', वाघोबा तिच्या पाया पडला... नाही नाही म्हणाला... मग चंदूभाईच म्हणाला, मंगले, जाऊ दे ना... सोडून दे बिच्चार्‍याला. त्याने माफी मागितली ना? आता नाही करायचा तो परत’...

अशा माझ्या आजोळची बनून वहाणार्‍या गोष्टीतली मंगल ही आजोळची गाऊली, कपिला. कधी गोष्टीत तिनं कुणालातरी कोपर्‍यात घेतलेलं असतं तर कधी शिंगावर, कधी कुणाची जड पिशवी शिंगांना लावून घरी नेऊन सोडली तर कधी जत्रेत वेड्यासारखं वागून हरवलेल्या घरातल्या राजूला पाठीवर बसवून घरी आणलं.

घट्टं तांबुस रंग, ठेंगणी, काळेभोर डोळे, किंचित पुढे आलेली सुंदर शिंग, गळ्यात घुंगरू, उजव्याच पायावर गुढग्याशी आणि खुराशी किंचित पांढुरकी. अगदी कुणीही गोठ्यात आलं की, चाललेलं रवंथ थांबवून, मान वळवून, डोळे रोखून बघणारी... मंगल... मालवणी प्रेमाच्या हाकेची... मंगल्या!

पहिल्यांदा तिला प्रत्यक्षं कधी भेटले आठवतच नाही इतकी ती मुंबईतही माझ्या गोष्टींमधून, भातुकली मधून वावरली.
’... थांब हं... रडू नकोस. आत्ता मंगलीचं दूध काढून आणते... तापवते आणि देते हं तुला...’ अशी भावलीची समजूत काढल्याचं आठवतय.

मी मोठी झाल्यावर, ग्रेसच्या कवितांतून दिसत राहिली, काळ्याभोर दयार्द्र नजरेने, बघत राहिली, संध्याकाळची आर्तं हंबरत राहिली ती मंगलच.

कधीतरी एखादा मामा गावाहून येताना खरवस आणायचा. साताठ घरांत किती पुरणार? पण प्रत्येकाच्या हातावर, ’मंगलीचा... कालवड झाली’ अशी बातमी देऊन कवडीभरच ठेवला जायचा. सत्यनारायणाच्या प्रसाइतक्याच श्रद्धेनं प्रत्येकजण खायचा.

आज्जी गावी आणि मुंबईत मामाकडे अशी जाऊन येऊन असायची. आम्ही मुलं मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो. आंबे-फणस, कैर्‍या, रातांबे, करमणं, जांभळं, करवंद, काजू, शहाळी, हा रानचा मेवा तर असायचाच. शिवाय मग आवर्जून बनवलेली साठं, फणसाची गर्‍या-गोट्याची भाजी, आंब्याची रसगोळ्याची आमटी, शिरवाळे, घावण, रसातल्या खापरोळ्या... हे तर सगळं झालच... पण मंगलीचं धारोष्णं दूध हा सुद्धा आम्हा नातवंडांच्या आनंदाचा एक मोठ्ठा भाग होता.

रविवार सकाळ झालीये. बंबातली राखुंडी घेऊन पुढच्याच दातांवर बुळूबुळू बोट फिरवून चूळ भरून झालीये. आई-बियीनं विचारल्यास खोटं बोलावं लागू नये इतपतच त्या दात घासण्याचा उद्देश.
सगळी सुट्टीच चालू आहे. आज कोणता वार ह्याचा विचार करण्याची गरज नसल्याने, ’चला रे... नाष्ट्याला पटापट’ अशी, हाक येई पर्यंत ओटीवर धागडधिंगा घालणे ह्या कार्यक्रमाला सुरूवात करतो न करतो तोच... आमच्या आया-मावश्यांपैकी कुणीतरी कडु चिराइताचा टोप आणि कप घेऊन बाहेर येतं. शिवाय आम्ही ’पितोय ना’, ह्याची राखण करायला सगळ्यात मोठ्ठा मावसभाऊ, चंदूभाई समोर दैत्यासारखा उभा.
टंगळ-मंगळ, कटकट, थोडीशी सनई असल्या नाटकांनंतर, कुणीतरी लालूच दाखवतं, ’मंगलीचं दूध कोण पिणार?... आधी संपेल त्याला साखर घालून...’

पट्टापट कप रिकामे व्हायचे, कृतकृत्त्य चेहर्‍याने आया-मावशा लगालगा आत जायच्या, मनातल्या मनात मंगलला शंभर नमस्कार घालीत.

आमच्यापैकी कुणीही गोठ्यात गेलं की, मंगल चाललय ते रवंथ थांबवून इतक्या मायेच्या नजरेनं बघायची. आमच्यातला प्रत्येकजण शोधून शोधून हिरवीकंच गवतकाडी तिच्या तोंडाशी धरायचा. एखादं लहान भावंड तिच्याकडे बघण्याच्या नादात किंवा घाबरूनही काडी दुसरीकडेच धरायचं. मंगल अशी गुणी की पाऊल पुढे टाकून काडीला तोंड लावायची नाही... न जाणो, हे घरचं धाकलं घाबरलं तर?

आमच्यासारख्या भुरट्या पाहुण्यांना इतकी छान ओळख देणारी मंगल... घरातल्या काही खास माणसांसाठी कसं कसं करायची ते बघण्यासारखं असायचं.

बाईमावशी, शकूताई, संदीपदादा, ह्यांच्या नुस्त्या चाहुलीनेच झडझडून उभी रहायची. कधीकाळी सुट्टीला गावी येणार्‍या अण्णामामाला प्रेमानं ढुश्या द्यायची.

तिचं खरं लडिवाळ बघायचं तर आज्जी हवी. आज्जीसाठी तिच्याकडे खास निराळ्या तऱ्हा होत्या. आज्जी तिथे असेल तर सकाळी उन्हाला पाठ देऊन आज्जी मागच्या अंगण्यात बसलीये आणि मंगल तिची पाठ आपल्या खरखरीत जिभेने चाटतेय हे नेहमीचं दृश्य होतं. आमच्यापैकी कुणी आज्जीच्या जवळ जाऊन बसायचं.
’आज्जी, खरखरीत आहे, मंगल्याची जीभ?... दुखतं?’

मग आज्जी आपल्या हातात आमचा हात धरून मंगल्याच्या समोर धरायची. बर्रोबर कळल्यासारखं ती ही एकच जीभेचा पट्टा फिरवायची. गरम, खरखरीत पण मायेचा स्पर्शं! आम्ही दचकुन हात मागे घेत, खिदळलो की, आपलं काम झालं हे जाणून पुन्हा आज्जीच्या पाठीकडे वळायची. आज्जीची गोरीपान लिंबाच्या कांतीची पाठ लालबुंद व्हायची.

दुपारची उन्हं उतरल्यावर आज्जी बाग फिरून यायची आणि गोठ्यात शिरायची. मंगलीला माळावर सोडल्यावर जर गोठा झाडायचा राहिला असेल, तर आज्जीला कमालीचं वाईट वाटायचं. किंचित स्वत:शी पुटपुटत ती स्वत:च्या हाताने गोठा साफ करायची.

’नुस्तं दूध हवं... तिची उस्तवार नको... आत्ता येईल परत... कशी आनंदी राहील?... जनावर नाही ते बाबानो, गेल्या जन्मीचं तुमचं देणं भागवायला आलेली भल्या घरची कुणी...’
कानकोंडे होऊन आमच्यापैकी कुणी लुडबुड करीत रहायचे. आज्जीच्या बोलण्यात वारंवार, ’आत्ता येईल परत... ’ यायचं. घरी कुणी महत्वाचं पाहुणं येणार असल्यासारखं वाटायचं. मग आपसुकच, मंगलीशी आमचा व्यवहार आदराचा व्हायचा. तिच्यासमोर ठेवायचं आंबोणाचं घमेलं, छोट्या आगोतलीवरचा घास.. ठेवताना समोरची जागा जरा साफ करून ठेवलं जायचं. लग्गेच तिच्या पोवळीवरून, कपाळावरून हात फिरवून आज्जीसारखंच आम्हीही म्हणायचो, ’खा हं, मंगळे... सावकाश खा हो...’

माझी एक मामेबहीण एकदा आगोतलीवरचा घास घेऊन जाताना थांबली आणि वळून पाणी भरून फुलपात्रंही नेलन... ठसका लागला मंगळीला तर?

"गायीचं पान वाढणं" म्हणण्याची पद्धत नव्हती आजोळी. ते "मंगल्याचं पान" असे. केळीच्या पानावर वाढलेलं सगळं ती आडव्या जीभेनं खाताना बघायला इतकी मजा यायची. त्याहीपेक्षा गंमतीचं वाटायचं, पदार्थं संपले की तिचं पानही खाणं.

संदीपदादा किंवा चंदूभाई सकाळीच तिला चराण्यासाठी माळावर सोडून यायचा. मधे कधीतरी आम्ही माकडं रानमेव्याच्या लुटीला बाहेर पडलो की दिसायची, एखाद्या झाडातळी, गारव्याला बसलेली. बरेचदा आमच्याचबरोबर घरी यायची नाहीतर मग संध्याकाळी. कुणीही कितीही हाका घातल्या तरी न येणारी मंगल, संदीप किंवा चंदूभाईच्या जीभ टाळ्याला लावून काढलेल्या "ट्टॉक ट्टॉक" आवाजाला बर्रोबर कुंपणापाशी येऊन उभी रहायची. कुंपण उघडं असलं तरी, कुणीतरी स्वागत करून, पाचारण केल्यासारखं, दाव्याला धरून मागे गोठ्यात नेल्याविना हलायची नाही तिथून.

ही गुणाची गाऊली कधी कधी द्वाडही वागायची. चुकुन कुणाच्या माळावर, मळ्यात वगैरे शिरून चार काड्या फस्तावल्या की त्या दिवशी मात्रं साळसुदासारखी आपणहून गोठ्यात येऊन बसायची. एकदा तर घरी येऊन घरच्याच भाजीमळ्यात धुडगुस घालून गोठ्यात येऊन स्वस्थं बसली होती. तिचं असं शहाणं वागणं बघून घरातले सगळे, आज कोण तक्रार घेऊन येतय ह्याची वाट बघत राहिले. दुसर्‍या दिवशी परड्यात गेली तेव्हा कुठे शकूताईला हा प्रकार कळला.

तिचं अन आज्जीचं घट्टं गुळपीठ होतं. आज्जी तिच्याशी बरेचदा बोलताना दिसायची.
’मंगे, दिवाळीक येऊक जमुचा नाय, गो. अगो, अशोकाचा लगीन करूचा... बघतस काय? तुज्याच दुधार वाढलो पोर...’

किंवा, परड्यातून जऽऽऽरा खाली दिसणार्‍या पिटक्या आंब्याने गेल्या पावसाळ्यात डोकं जमिनीला टेकवायला आणलेलं. मुळं उखडून क्लांत अंगाने आडव्या झालेल्या त्या झाडाकडे बघून आज्जी जे बोलायची ते मंगलीशीच. ’वाडवडलान लावली झाडा-पेरा. तीन पिढ्यांची शेवा करून थकलो बापडो जीव... आडवो झालो. काय्येक फळ्या-बिळ्या काढु नकास म्हणान सांगान ठेवलय घरात... म्हातारा झाला आणिक पडला झाड... तरी माज्या परड्यातलो जीव तो. मेल्यावर त्याचा काय ता रितीप्रमाणे होऊक होया’

कळल्यासारखी मंगळीची मान हलायची का काय कुणास ठाऊक.

आज्जी थकली तशा तिच्या गावच्या फेर्‍या कमी व्हायला लागल्या. कधी वर्षाने तर कधी दीड-दोन वर्षांनी ती गावी जायची. दोन-तीन महिने राहून भरल्या डोळ्यांनी आणि जड मनाने परत मुंबईला यायची.
एक दृश्य माझ्या मनावर असं कोरलं गेलय... संदीपभाऊने मंगलीला नुक्तीच रानातून वळवून आणलीये. आम्ही आंबे चोखत पडवीवर बसलोय, आज्जीच्या एसटीची वाट बघत. आज्जीची एसटी येते. अंगावरच्या कपड्यांनाच मागे हात पुसत "आज्जी आऽऽऽली.. " करीत आम्ही कुंपणाशी धावतो. आज्जीची पिशवी, बॅग डोक्यावर घेऊन, उड्या मारीत सगळे पडवीशी येतात. आज्जी तिच्या नेहमीच्या पद्धतीने पडवीच्या दहाबारा पायर्‍यांपैकी खालच्या कुठच्यातरी पायरीवर बसते. आणि आपल्या खणखणीत आवाजात सगळी चौकशी सुरू करते...
मागे गोठ्यात मंगलीने दोन-तीनदा हंबरून हाक घातलेली आहे. पण कुणीच येईना म्हटल्यावर, ती दाव्यासकट गोठ्यातून बाहेर पडते. नेहमीचा घराला वळसा घालून येणारा रस्ता तिला यावेळी मान्यं नाही, तो बराच लांबचा... ती सरळ घरातूनच बाहेर येते....
मागची पडवी, स्वयंपाकघर, मधला न्हाणीचा चौक, मझघर, बैठकीची खोली हे सगळं नुस्तं चालत नाही तर अवखळ, आतूर, सखी धावत पळत यावी तशी, सारवलेल्या जमीनीचे टवके उखडीत, मागून "अगं.. हो हो" करीत धावणार्‍या संदीपभाऊला न जुमानता ओटीवर येते.
मग सावकाश एकेक पायरी टप्प टप्प करीत उतरते आणि अजून तिथेच बसून विस्फारल्या नजरेने बघणार्‍या आज्जीचे हात, मान चाटीत सुटते.

’अग्गो... अग्गो... रव बाये... येईत होतय भेटुक... एव्हढो धीर नाय तुका... आता काय म्हणू...’ घशात येणारे कढ आवरता आवरता आज्जी एव्हढच म्हणू शकते आणि तिची पोवळी खाजवीत रहाते.

आम्ही पापणी न लवता हे ओढाळ सख्यं निरखीत रहातो.

त्या रात्री, आपल्या ह्या सखीला आज्जी ऐकवत असते, ’मंगळे, आता द्वाडपणा पुरे. तुझ्या कालवडीला पोर झालं तरी तुझं पोरपण सुटत नाही...’

आज्जी खूपच थकली... मंगलही थकलीच. शेवटी गावाहून बाईमावशीची, चंदूभाईची आज्जीला पत्रं येऊ लागली.
मंगल खूपच थकली आहे, आता गोठ्यातच असते....
काही खात पीत नाही. बळे बळे पेज पाजतो. संदीप गोठ्यातच झोपतो रात्री.. लक्षं ठेऊन आहोत...
झोपून असते... बसून बसून आता खतं पडतायत... कशात जीव अडकलाय कळत नाही.... जमल्यास एकदा येऊन जा, आई.

*****************************************
मला मोठी झाल्यावर कळलेलं हे असं. आज्जीनं मंगलच्यानावे पत्रं पाठवलं. आपल्या किरट्या किरट्या अक्षरात, जमेल तसं, एका कार्डावर पुरेल तितकं...

ते असच काहिसं असणार...
मंगे, खूप झिजलीस... माझ्या घराची, पोरा-नातवंडांची, आल्यागेल्याची खूप सेवा केलीस, बाये. आमचं गेल्या जन्मीचं पुण्यं आणि तुझं देणं असल्यासारखी वावरलीस. गेल्याजन्मीची कोण्या मोठ्या घरातली समजुतदार, गुणी बाई तू... आमच्या प्रेमाखातर गरीबाघरची गवत-काडी खाल्लीस.
माजे बाई, माझ्याने येणं होत नाही आता... भेटले नाही तरी तुझी आठवण नाही असा दिस नाही...
तेव्हा, माझे राणी, सगळं भरून पावलं तुला... आता मोकळी हो... सुखाने डोळे मीट.

आज्जी मग पाय सोडून दूरवर कुठेतरी नजर लावून बसली असेल. तिला दिसलंच असणार, डोळे पुशीत, वारंवार नाक ओढीत बाईमावशीनं पत्रं गोठ्यात नेलं असणार.
हताश होऊन राजू, चन्दू उभे आहेत, सुलूताई, आशू एकमेकींना सावरीत उभ्या आहेत. शकूताईनं नुक्ताच देवापासचा अंगारा आणून तिच्या कपाळी लावलाय.
संदीप बाजूलाच बसून एका हाताने डोळे पुसतोय आणि एक हात तिच्या अंगावरून फिरवतोय...
तिच्या मस्तकाशेजारी बसत मावशीनं तिचे चिकटीनं वहाणारे काळेभोर डोळे आपल्या पदराने पुसले असतील...
म्हटलं असेल, ’मंगे.. घे बाई. वाट पहात होतीस ते आलं... आईचं पत्रं आलय... तुला सांगितलय...’

*****************************************
पुढचं कळलं ते असं. मावशीनं खरच पत्रं वाचून दाखवलं मंगीला. आणि तासाभरात मंगीनं आज्जीनं सांगितल्याप्रमाणेच केलं... कसलेही आचके न देता, हाता-पायाची झाडणी न करता... निवांत गेली.

आमच्या आजोळी आता मागच्या परड्यातही एक तुळशीकट्टा आहे... तिथे मंगलीचं पान अजून वाढलं जातं... काही वेळाने मग त्याचा "गायीचं पान" नावाचा प्रसाद होतो!

समाप्तं

गुलमोहर: 

दाद, बर्‍याच दिवसांनी !
छान लिहीलस.
आगोतलीवरचा घास म्हणजे काय?

खूप आवडली - मंगल, आजी आणि तुमची सांगण्याची शैली. शेवट वाचून डोळे भरून आले. काय ॠणानुबंध असतात एकेक!
-अनिता

प्रतिक्रिया देण्यासाठी कीबोर्ड दिसत नाहिये दाद!!

--------------
नंदिनी
--------------

परत एकदा डोळ्यातून पाणी काढलस. आणखी काय दाद देउ ?

धन्यवाद, सगळ्यांचे.
अदिती. आगोतली म्हणजे केळीचं कोवळं लूस छोटंच पान. किंवा मोठ्ठ्या पानाचा वरचाच तुकडा. अगदी छोटा नैवेद्य, एखादीच मूद वाढता येण्या इतकाच. हा खास कोकणातला शब्दं.

अप्रतिम! अजून काय प्रतिक्रिया देऊ?
आज बर्‍याच दिवसांनी दिसलीस, दाद. गेला आठवडाभर 'दाद दिसली नाही माबोवर... खूप दिवस झाले' असं म्हणतच होते मी स्वत:शी...

~~~
मावळसृष्टी (ववि २००९) च्या निमित्ताने...

दाद रडवल मंगलने. खुप आतून आलेल ललित

-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार Happy

हृदयाला स्पर्शून गेलं, खूप आवडलं. Happy

खूप भावली मंगल. अगदी गावाला जाऊन तिला आणि आणि आजीला भेटून आल्यासारखं वाटलं. राजापूर जवळच्या माझ्या गावाच्या अशाच खूप सार्‍या आठवणींनी घशाशी आवंढा आला.
फारच सुरेख
वैजयन्ती

दाद खरोखरच मन भरून आलं

****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

जनावर नाही ते बाबानो, गेल्या जन्मीचं तुमचं देणं भागवायला आलेली भल्या घरची कुणी >> मंगलच नाही तर असे अनेक जीव आयुष्यात भेटतात. पण ते जाणून घ्यायला तुमच्या आजीसारखी तरलता लागते.

बाकी लेख सुरेखच. प्रत्येक शब्दामधून दोन 'जीव'मत्वे ठाशीव होत जातात - मंगलचे आणि आजीचे!

दाद, खूप भावस्पर्शी लिहीलं आहे. मंगल आणि आजी कायमच्या लक्षात रहातील आमच्याही.

लई खास दाद..... आमची तांबू गाय आठवली.

शलाका ,फारच छान लिहील आहेस.

खुप दिवसांनी आलात मायबोलीवर .. नेहमीप्रमाणेच खूप छान...

दाद, अगदी रडवलत. खुप लळा लावतात हो हे मुके भाउ बहिणी.
..............................................................................
हलकी 'घ्या', जड 'घ्या'
दिव्याखाली 'घ्या', अंधारात 'घ्या'
'घ्या', 'घेऊ' नका
तुमचा प्रश्न आहे!

टचिंग!
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

किती छान लिहीता हो तुम्ही? तुमची आज्जी, मंगल , तुमच गावातल घर आणि गोष्ट सांगणार्‍या तुम्ही असं सगळ सगळ डोळ्यासमोर आलं. वाचुन झाल्यावर बर्‍याच वेळाने मी, ही प्रतिक्रीया लिहू शकले.
धनु.

डोळे भरुन आले. लिहायला दिसतच नाहिए काही. खुप छान.

दाद...सुरेख..अगदि..डोळे खरच वहायला लागले गं.मंगल उभी केलीस अगदी समोर...फारच छान!

*************************
हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण

दाद ... अप्रतिम गं.

दाद,
शब्द सुचत नाहियेत .... फारच अप्रतिम..

गौरी.

अप्रतिम..
वाचतांना कधी स्क्रीन धुसर झाली ते कळलेच नाही.

आशुतोष

Pages