न आकळलेलं काही...१

Submitted by श्रावण मोडक on 21 July, 2009 - 05:51

ही लेखमाला पूर्वप्रकाशित आहे. मायबोलीच्या वाचकांसाठी देतोय...

एखाद्या गोष्टीचा आणि आपला ऋणानुबंध का जुळावा हे नेहमीच सांगता येत नसतं. आवड वगैरे कारणं ठीक आहेत. पण ऋणानुबंध त्या पलीकडे असतोच. त्या गोष्टीनं नादावलं जाण्याचं, तिनं मनात घर करण्याचं कारण कोणतं असं विचारलं तर त्याचं गणिती उत्तर शक्य नसतं. सूर, रंग, रेषा, आकार या चारापैकी किमान एक तरी मिती तिथं असते आणि या चारांमधूनच स्वतःला साकारणारी आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व ठेवणारी निसर्ग नावाची एक किमया शिल्लक राहतेच; ती तर पाचवी मिती! काहींचा या चारही मितींमध्ये लीलया संचार होतो, ही मंडळी स्वर्गीय काही तरी घेऊन जन्माला आलेली असतात; त्यांचं जगणं बहुतेकदा पाचव्या मितीमध्ये होत असावं. काहींना सूर नादावतो. काहींना रंग, काहींना रेषा तर काहींना आकार. पुन्हा या प्रत्येक मितीमध्ये नादावले जाण्याचेही दोन प्रकार असतात. एक ग्रहण करण्याच्या संदर्भात किंवा मग दुसरा आविष्कार करण्याच्या संदर्भात. या दोन्हींनी जे नादावले जातात ते भाग्यवानच. अशा भाग्यवानांची संख्या तशी कमीच. मग राहतो ते तुम्ही-आम्ही. त्यातही उतरंड असतेच. त्यातल्या अगदी बालवाडीच्या पायरीवरून हे आत भिडलेले, पण न आकळलेले काही...
---
नुकताच आंघोळ करून बाहेर आलोय. माझा भ्रमणध्वनी खणखणतो. क्रमांक पाहतो. ००१२०******८५!!! पहिल्या तीन आकड्यातून कळतं की अमेरिका. घड्याळाकडं पाहतो. अकरा. म्हणजे जिथून हा कॉल आलाय तिथं मध्यरात्रीचे किमान सव्वादोन ते अडीच झालेले आहेत. माझ्या सकाळच्या आणि त्याच्या मध्यरात्रीच्या या वेळेस 'सोशल अँथ्रॉपॉलॉजी' हा काही चर्चेचा विषय असू शकत नाही. या मित्राचा अभ्यास त्या विषयातला आहे. माझ्या कपाळावरच्या रेषा किंचित ताणल्या जातात, पण इतक्या रात्री तिथून कॉल येतोय म्हणजे विषय वेगळा असणार हे नक्की. मी कॉल घेतो. एक महत्त्वाचा निरोप असतो; तो देऊन झाल्यानंतर मित्र म्हणतो, "अजून एक गोष्ट शेअर करायचीये..."
"बोल ना. काय?"
"मी शामच्या वेळेला यमन शिकायला सुरवात केली..."
(हा मुलगा कटाक्षाने मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण आहे हिंदी भाषिक. त्यामुळे हा संवाद त्याच्याच भाषेत.)
अत्यंत आनंदाने मी "व्वा. क्या बात है!" म्हणतो.
"एक नोट लागत नव्हती नीट. बराच काल प्रयत्न केला. मग जमली. मग मी फुल्ल थ्रोटेड... इतका आनंद झालाय... (मी मनातल्या मनात म्हणतो, तू शिकू लागल्यानंच मलाच इथं इतका आनंद झालाय की तुझा आनंद काय वर्णावा?)
"...एकदम फ्रेश. कालपर्यंतचे तीन दिवस फेसबुकवर होतो नुसता. आय वॉज कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग द टाईम... बट नाऊ आय हॅव डिसायडेड, अबकी बार कसल्याही डायव्हर्शनकडे मन गेलं तर यमन..."
मी त्याला म्हटलं "अरे, हे लिही."
"लिही? शब्दच नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी... कोणत्याही भाषेत!"
शब्दांच्या पलीकडला हा अनुभव काय असावा याची कल्पना मला क्षणार्धात येते. गेल्या वीसेक वर्षांचा प्रवास आठवताना.
---
आठवतं तसं, मी ऐकायला सुरवात केली त्याला आता वीसेक वर्षे झाली असतील. त्याआधी गाणं ऐकणं हा काही छंद वगैरे नव्हता, आवड तर नाहीच. ती अचानक उद्भवण्याचं कारण बहुदा हुबळीत झालेला एक कार्यक्रम असावा. गंगूबाई हनगल यांच्या अमृतमहोत्सवाचा. नवी नोकरी, त्यामुळं अंगावर आलेलं काम टाळायचं नाही हे मनावर पक्कं बिंबलेलं. त्या कार्यक्रमाला जावं लागलं ते असं कामानिमित्त. तीन दिवसांचा महोत्सव होता तो. सगळ्या मातब्बर कलाकारांची मांदियाळी होती. शास्त्रीय संगीत, आणि त्यातही गायकी, ही थोडी लांबच ठेवण्याची गोष्ट अशी आजवरची स्थिती होती माझी. पण काम म्हणून त्या सभागृहात असणं आवश्यक होतं. कलाकार आठवत नाही, पण पहिल्याच दुपारी संतूरवादन ऐकलं आणि ध्यानी आलं की, अरे हा प्रांत आपण समजतो तसा नाही. ऐकायला काही हरकत नाही. समजत नसलं तरी. ठाऊक नव्हतं की ही धारणा त्या थोर कलाकाराच्या सांगण्यातून अधिक पक्की होणार आहे. हुबळीत नव्यानंच मित्र झालेल्या दोघा-चौघांनी संध्याकाळी मला गंगूबाईंकडं नेलं आणि ओळख करून दिली. माझं वय वीस. म्हातारी उत्सवमूर्ती होती, तशीच उत्साहमूर्तीदेखील. प्रसन्न हसत तिनं हात जोडून नमस्कार केला आणि त्याकडं पहातच मी पदस्पर्श केला. "शास्त्रीय समजतं का?" बाकी काही बोलण्याआधीच त्यांचा प्रश्न तीरासारखा आला (एखाद्या धारदार तानेसारखा होता तो, हे नंतर खूप काळानं उमजत चाललंय).
"नाही. पण ऐकतो." माझी आठवण पक्की आहे कारण मी खोटं बोललो होतो. उत्तराचा उत्तरार्ध खोटा होता. ऐकलं होतं ते फक्त त्या दुपारी संतूर.
"ऐकत जा. समजून घेण्याचाही प्रयत्न कर." म्हातारीचा आशीर्वादवजा आदेश. मान डोलावण्यापलीकडं होतं तरी काय त्या वयात?
तासभर गेला असेल नसेल आणि आम्ही मंडळी सामोरे गेलो ते एच. वाय. शारदाप्रसाद यांना. दिल्लीतले हे बडे प्रस्थ (अतिशय चांगल्या अर्थी हा शब्द वापरतोय) आणि तरीही विलक्षण डाऊन टू अर्थ व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आधी वाचनातून झाला होता (अलीकडेच त्यांचं निधन झालं. विस्मृतीत गेलेल्या या माणसाच्या स्मृती माझ्या मनात त्यावेळी जाग्या झाल्या ते हुबळीतील त्या मैफिलीच्या चौकटीतच). ते या मैफिलीत? माझ्यासमोरचा प्रश्न. अज्ञानातून आलेला. कारण ते त्या कार्यक्रमाचे एक प्रमुख आयोजक होते. त्यांच्यात हाही एक रसिक दडला होता ते माझ्याबरोबरीच्या ज्येष्ठ व्यक्तींना ठाऊक होतं. शारदाप्रसादांबरोबर या ज्येष्ठांच्या संगीत या विषयाला धरून झालेल्या चर्चेनं पुन्हा डोक्यात सूर घुमू लागले ते दुपारी ऐकलेल्या संतूरचेच.
नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण संतूरच्या त्या सुरावटी मला कुठंतरी एखाद्या प्रसन्न अशा झऱ्याच्या काठी आपण बसलो आहोत अशा वातावरणात घेऊन गेल्या होत्या. झऱ्याचा खळखळाट आणि त्या सुरावटी यांचं काही तरी नातं असावं. किती तरी काळ त्या सुरावटी माझ्या मनात जाग्या होत्या. त्या यायच्या त्याच मुळी माझ्या शहरी गजबजाटापासून मला दूर नेत. निसर्गाच्या सान्निध्याची अनुभूती देत.
मग लक्षात येत गेलं, की हे ऐकलं पाहिजे. यात काही तरी निश्चितपणे आहे. त्यामुळं ऐकणं महत्त्वाचं. निदान वाद्यसंगीत तरी. निर्णय झाला. त्या मैफिलीची ही देणगी पुढं आजवरच्या जगण्याला सावरून धरत गेली.
- क्रमशः -
भाग दोन
भाग तीन
भाग चार

गुलमोहर: