गड्या एकदा आपण भेटू

Submitted by sanika11 on 19 July, 2009 - 23:34

खोंडासम पिऊनी वारा,
हुंदडू गाव आपुला सारा;
पारंब्याच्या शेंड्या लपेटू,
गड्या एकदा आपण भेटू.

कृष्णातिरी खेळ मांडू,
खोटेनाटे मजेत भांडू;
वादात मग उगाचच पेटू,
गड्या एकदा आपण भेटू.

वडाखालती विटी-दांडू,
माळावरती गोट्या सांडू;
विहीरीत दुसर्‍याला रेटू,
गड्या एकदा आपण भेटू.

माळावरच्या चिंचा तोडू,
बांधावरच्या कैर्‍या पाडू;
आंबट्-गोड चव लुटू,
गड्या एकदा आपण भेटू.

रात्रीची ती अंगत्-पंगत,
चढे जेवणा न्यारी रंगत;
कोपरापासून हातही चाटू,
गड्या एकदा आपण भेटू.

भजनाचे हे सूर चढती,
ज्ञाना-तुका घेऊ पुढती;
विठूच्या मग पायी खेटू,
गड्या एकदा आपण भेटू.

गुलमोहर: 

कधी भेटायचं सागा? तुम्ही माझे सारे बालपण लिहून काढले आहे.

-हरीश दांगट

भेटायलाच हवं ही सगळी मजा करायला Happy
खुप छान!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

भजनाचे हे सूर चढती,
ज्ञाना-तुका घेऊ पुढती;
विठूच्या मग पायी खेटू,
गड्या एकदा आपण भेटू.

सहज सुंदर कविता.... बालपणीचे Flashback....:)

मस्तच आहे.....कधी भेटताय सांगा आता ? Happy

गड्या एकदा आपण भेटू.
खरचं ..प्रोमिस ...
वडाखालती विटी-दांडू
माळावरती गोट्या सांडू
भातुकलीचा खेळ मांडु .
.....ओके......

वा वा, बालपणीच्या गावाकडल्या स्मृती जाग्या झाल्या. छान.
..............................................................................
हलकी 'घ्या', जड 'घ्या'
दिव्याखाली 'घ्या', अंधारात 'घ्या'
'घ्या', 'घेऊ' नका
तुमचा प्रश्न आहे!

उमेश
धन्यवाद. कोठे हरवला होतास? बरेच दिवसांनी माबोवर.