पावसाचा ऑर्केस्ट्रा !

Submitted by vaiddya on 19 July, 2009 - 04:55

पावसाळा सुरु तर झाला आता पण आधी जेव्हा ऊष्ण उन्हाच्या झळा करपवत होत्या तेव्हा ...

माझ्या मनात आठवण येत होती ...

माझ्या लहानपणीच्या घराची ...

पावसाळा हे ही एक निमित्त आहेच या आठवणीसाठी ...

मी पहिली-दुसरीत असेन ... आणि घरसुद्धा एकाच खोलीचं होतं ... पत्र्याच्या भिंती आणि कौलांचं छप्पर ...
जून महिन्यात गावाहून परत आल्यावर पहिला पाऊस यायचा तेव्हांची आठवण !
कौलांचं छप्पर कितीही साफ केलेलं असलं तरीही पाऊस त्यातून वाट शोधत घरात शिरायचाच !

मग धुणं वाळत घालायची काठी घेऊन जिथून गळतंय ती एक-दोन कौलं जरा जरा हलकेच ढोसायची म्हणजे गळायचं थांबत असे ... पण मी जर कधी एकटाच घरी असलो आणि पाऊस असा घुसखोरी करू लागला तर मी मात्र एक गम्मत करत असे

काठीने कौलं ढोसायची कल्पना मला पसंत नव्हती ... मी वेगवेगळी भांडी त्या गळ त्या धारांखाली ठेवून ही गम्मत करत असे

वेगवेगळी भांडी आणि गळणारे पाणी यांच्यातून ध्वनिंची एक मालिका तयार होत जायची ... आणि हा ऑर्केस्ट्रा मी पाऊस पडत राहील तोपर्यंत एन्जॉय करत राहायचो ... पाणी भरलं की आवाज कमी होत असे म्हणून मी एक बादली आणून त्यात जमा होणारे पाणी पटापट रिकामे करत असे ... म्हणजे पुन्हा ते भांडे आवाज करायला लागत असे ... प्लास्टिक, स्टील, एल्यूमिनियम अशी विविध भांडी वापरली की वेगवेगळी नोटेशन्स तयार होत असत ...

खूपच मजा येत असे ...

गुलमोहर: