दुर्बोधता-२ [बा.सी. मर्ढेकर]

Submitted by pkarandikar50 on 18 July, 2009 - 03:42

दुर्बोधता-२ [बा.सी. मर्ढेकर]

बा.सी. मर्ढेकर्रांच्या काव्यातील दुर्बोधतेविषयी मौज, सत्यकथा इ. प्रतिष्ठीत मासिकातून वाद / चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यत जी. ए. कुलकर्णींनी सुद्धा भाग घेतला होता.अगदी खरमरीत भाषेत त्यांनी लिहिलेल्या पत्राचे काही अंश मी माझ्या पहिल्या स्फुटात [दि. २७ जुन २००९ http://www.maayboli.com/node/8953] उद्धृत केले होते.

मर्ढेकरांच्या बाबतीत अगदी जाणकार समीक्षकांमधेही, त्यांच्या अनेक कवितांच्या नेमक्या अर्थाबाबत मतभेद होते. मर्ढेकर जाऊन अर्धशतक उलटलं तरी अद्यापही मर्ढेकरांची कविता संशोधक भाष्यकार आणि समीक्षकांना आव्हान देतेच आहे. गंगाधर गाडगीळ, द.भि. कुलकर्णी, श्री.पु.भागवत, विजया राजाध्यक्ष [मर्ढेकरांची कविता : स्वरुप आणि संदर्भ - खंड १ व २] इ. मान्यवरांनी खूप संशोधन आणि लिखाण केलं आहे. त्याच पंक्तीतले एक ख्यातकीर्त भाष्यकार म.वा. धोंड यांनी मर्ढेकरांच्या 'दुर्बोध' वाटणार्‍या सोळा कवितांविषयी सखोल संशोधन, विचार करून १९६७ ते १९९८ ह्या कालावधीत विविध प्रतिष्ठीत नियतकालिकांमध्ये एकूण १३ लेख लिहिले. त्यांचा संग्रह 'तरीहि येतो वास फुलांना' [प्रकाशक: राजहंस प्रकाशन पुणे १९९९] वाचल्यानंतर प्रथम हे जाणवतं की एखाद्या कवीच्या/ लेखकाच्या साहित्याचा मागोवा घेणं, त्यातल्या अर्थ-छटांचा सुसंगत अर्थ लावणं हे काम किती जिकिरीचं आणि संशोधकाच्या विद्वत्तेची, व्यासंगाची आणि चिकाटीची कसोटी पाहणारं असतं!

म. वा. धोण्ड यांनी आपल्या संशोधनाची पूर्वपिठीका स्पष्ट करताना म्हटलं आहे," १९४३ पासून मर्ढेकरांच्या कविता जसजशा प्रसिद्ध होत गेल्या, तसतशा मी वाचीत गेलो. काही सहज समजल्या, काही प्रयासाने उमगल्या तर काही अखेरपर्यंत दुर्बोधच राहिल्या. त्या दुर्बोधतेने मला अस्वस्थ केले. मी मराठीचा प्राध्यापक असूनही मला त्या कळू नयेत, हे अपमानास्पद वाटले. त्याहून बलवत्तर कारण म्हणजे त्यातील प्रतिमांनी मला खूळ लावले. .... दुर्बोधता हे मर्ढेकरांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण होऊन राहिले; त्यांची एखादी कविता सहज कळली, तर स्वतःला चिमटा घेऊ लागलो. ...या कवितांवरीलच नव्हे, तर समग्र मर्ढेकरांवरील इतरांचे लेख वाचून काढले.कु णाचा कुणाशी मेळ बसत नव्हता आणि तरीही प्रत्येकजण आपल्या अभिप्रायावर ठाम होता. मीच एक करंटा निघालो. 'सारे धन्वंतरी प्राज्ञ | मीच रोगी' असा प्रत्यय येऊ लागला. परंतु मर्ढेकरांच्या पकडीतून इतक्या सहजी स्वतःची सुटकाही करून घेता येईना. वेळी-अवळी त्यांच्या कवितेतले चरण आठवू लागले, त्यांतील प्रतिमा दिसू लागल्या... असा या प्रतिमांनी छळ मांडला. - आणि या छळवादातूनच तोवर दुर्बोध वाटलेल्या काही कविता अकल्पितपणे उलगडत गेल्या; संपूर्णपणे नव्हे, तर काहीशा. संपूर्ण उलगडा होण्यासाठी बरेच काही करावे लागले- खूप वाचावे लागले, स्वतःशीच वाद घालावा लागला, विचरपूर्वक मांडलेला व्यूह विस्कटून टाकावा लागला, नव्याने मांडणी करावी लागली, असे बरेच काही. यातून ज्या कवितांचा समाधानकारक अर्थ लागतगेला, त्यांच्यावर लिहीत गेलो. ... अजूनही काही कविता छळताहेतच. त्या केंव्हा प्रसन्न होतील ते पहायचे!" [पॄ. १६६-१६७]

'पिपांत मेले ओल्या उंदिर' ही मर्ढेकरांची कविता फार गाजली. तीच्यावर अनेकांनी भाष्ये केली. स्वतः धोण्डांनीसुद्धा ऑगस्ट १९६७ च्या सत्यकथा अंकात एकनिरुपणात्मक लेख लिहला होता पण त्यांना स्वतःलाच त्यांचं 'ईंटरप्रिटेशन' बोचत राहिलं पुढे १९९३ मध्ये एका [दुसर्‍याच विषयावरच्या] लेखांत रॉबर्ट बर्न्स [१७५९-१७९६] च्या एका कवितेतल्या काही पंक्ती लेखकाने उद्ढृत केल्या होत्या. त्यांतल्या 'माईस अ‍ॅण्ड मेन' ह्या शब्दांच्या जोडीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावरून त्याना जॉन स्टाइनबेकच्या १९४० च्या सुमारास वाचलेल्या 'ऑफ माईस अ‍ॅण्ड मेन' ह्या कादंबरीची आठवण झाली. मग त्यानी बर्न्सचा कवितासंग्रह आणि स्टाइनबेकची ती कादंबरी मिळवली. त्यांच्यावरून सुरू झालेल्या विचार-शृंखलेतून त्यांना 'पिपात मेले ओल्या उंदिर' चा जो नवा अर्थ गवसला, तो अगदीच वेगळा होता. त्यावर त्यांनी १९९४ मधे 'पुन्हा एकदा पिपांत मेले' ह्या शीर्षकाचा लेख लिहला. ते दोन्ही लेख 'तरीहि येतो वास फुलांना!' ह्या पुस्तकांत वाचायला मिळतात!

मर्ढेकरांच्या काही 'दुर्बोध' कवितांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संदर्भ आहेत. पहिले आणि दुसरे महायुद्ध, ब्रम्हदेशावरील जपानी आक्रमण, कोरियातील युद्ध, आसाम मधला भूकंप यांसारख्या घटनांचे संदर्भ काही प्रतिमांना आहेत. हे लक्षात न आल्यामुळे, त्या देव आणि भक्त, शहरी धावपळ आणि ग्रामीण संथ जीवन, यंत्रयुग आणि मानव, यांसारख्या भलभलत्या संदर्भात वाचल्या गेल्या. मर्ढेकरांना अभिप्रेत असली संदर्भ शोधण्याकरता धोण्डांनी घेतलेले परीश्रम थक्क करणारे आहेत.

मर्ढेकरांच्या कवितेत एकीकडे वाचकाला झपाटून टाकण्याचं सौंदर्य आणि सामर्थ्य असलेल्या प्रतिमा आहेत तर दुसरीकडे दुर्बोधताही आहे. त्या तथाकतित 'दुर्बोध' कवितांचा अर्थ लावताना मर्ढेकरांच्या व्यक्तिगत जीवनातले चढ-उतार, त्यांच्या भावविश्वावर झालेले आघात इत्यादिंचा अभ्यास आणि विचार आधार-साधने म्हणून करायचा का असा प्रश्न म.वा.धोण्डांनाही पडला होता. याच मार्गाने जाऊन त्यांना सहा कवितांचा अर्थ उलगडता आला. त्यासंदर्भात ते म्हणतात, " कवीच्या वैयक्तिक जीवनाच्या संदर्भात कविता वाचणे, हे अनेक समीक्षकांना गैर वाटते. कविता ही स्वतंत्र आणि स्वयंभू कलाकृती मानूनच तिचा आस्वाद घ्यावा, असे ते म्हणतात. मलाही त्यांचे म्हणणे पटते... कवीचे वैयक्तिक जीवन सर्वज्ञात नसते आणि ते जाणून घेण्याच्या खटपटीत वाचक कवितेपासून दूर दूर जाण्याचा धोका असतो. परंतु, कवितेला भेटण्याचे सर्वच राजमार्ग खुंटतात, तेंव्हा असे आडमार्गाला वळणे प्राप्तच होते. ते गैर असेल तर त्याला कारण खुद्द कवीच. त्यांनीच जर स्वतःच्या वैयक्तिक जीवनाच्या संदर्भात कविता लिहिली नाही, तर वाचकालाही या आडमार्गाला लागण्याची पाळी येणार नाही." [पॄ.१७१].

मर्ढेकरांच्या हयातीत त्यांच्या कवितेतील दुर्बोधतेवर बरीच टीका झाली होती पण त्या टीकेला त्यांनी कधीच उत्तर दिले नाही. मात्र त्यांच्या काही कवितांवर अश्लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर मोरारजीभाईंच्या मुंबई सरकारने खटला गुदरला होता [आज आपल्याला वाटते की हा एक मोठ्ठाच विनोद होता पण मर्ढेकरांना त्या दिव्यांतून बाहेर पडताना तीन-चार वर्षे अतोनात मनःस्ताप झाला, न झेपणारी आर्थिक झळ सोसावी लागली, आकाशवाणीसारख्या सरकारी खात्यांतल्या नोकरीतही त्यांचा भरपूर छळ झाला, त्यातून ते शरीराने आणि मनानेही खचले.] त्यावेळी नाईलाजाने मर्ढेकरांना चार-पाच कवितांचे अर्थ स्पष्ट करावे लागले होते. तेवढा एकुलता एक अपवाद वगळता, मर्ढेकरांनी त्यांच्या कवितेवर निरूपण कधीच केलं नाही. खुद्द श्री. पु. भागवतांनी लिहून ठेवलेल्या एका आठवणीत म्हटले आहे, " .. एकदा गप्पा मारताना मी त्यांना विचारले, 'तुमची 'झोपली ग खुळी बालके' ही कविता मला नीटशी कळली नाही. ती कशाबद्दल आहे? ते म्हणाले, 'देन द पोएम डझ नॉट एक्झिस्ट फॉर यू अ‍ॅट ऑल'."

मर्ढेकरांच्या नितंत सुंदर परंतु दुर्बोध कवितांचे अर्थ समजण्यासाठी आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी म.वा.धोण्डांचं पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे, हे तर झालंच. पण त्या पुढे जाऊन, संशोधक समीक्षकाला किती कष्ट घ्यावे लागतात, किती विविध अंगांनी कलाकृतीचा वेध घ्यावा लागतो याचं यथार्थ दर्शन आपल्याला घडतं. हे साध्य करण्यासाठी प्रकांड विद्वता, व्यासंग, चौफेर वाचन तर हवंच ; पण संशोधकाला 'खूळ' लागल्याशिवाय त्याच्या हातून असं काम पार पडत नाही, हेही आपल्या मनावर ठसतं.

ज्या मा. बो. करांना मर्ढेकरांची कविता समजावून घ्यायची आहे, त्यांना हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा वाटेलच पण ज्यांना 'साहित्यांतली दुर्बोधता' ह्या विषयात रस आहे त्यांनीही हे पुस्तक जरूर वाचावं, असं मी आग्रहाने म्हणेन.

-बापू करंदीकर.

गुलमोहर: 

बापू,

मस्त लेख..

मर्ढेकरांचं एक सुंदर व्यक्तिचित्र श्रीपुंनी 'साहित्याची भूमी' या पुस्तकात रेखाटलं आहे. याच पुस्तकात श्रीपुंनी मर्ढेकरांच्या कवितांविषयी केलेली दोन भाषणंही आहेत..

छान लेख. मागचा राहिला होता, तोही वाचला आता.
वरील पुस्तके मिळवून वाचायला हवीत आता. Happy

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

बापु साहेब फारच छान लिहीले आहे तुम्ही... आणि एका महत्त्वाच्या विषयाला माबो. वर टाकुन तुम्ही माझ्या सारख्यांना जाग पण आणली त्याबद्दल धन्यवाद

खरय करंदीकरजी. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
हे पुस्तक म्हणजे मानदंड. अफाट आणि अप्रतिम.
हे पुस्तक वडलांनी वाचायची सक्ति केली होती- त्यांच्यालेखी धोंड म्हणजे व्यासंग personified. पुढे मी बहूधा अंजली किर्तनेंचा (चु.भु.द्या.घ्या.) लेख वाचला. एकेका शब्दासाठी धोंड कसे दुनिया पिंजून काढत त्याबद्दल.

तरीही त्यांनी विजयाबाईंवर व्यक्तिगत खुन्नस असल्यागत ताशेरे ओढलेत ते मात्र मला खटकलं. हे काय प्रकरण आहे ते कळले नाही.
मुळात आपल्यालाच अभिप्रेत असलेलाच एकमेव अर्थ आणि अंतिम सत्य असा धोंडांनी का धोशा लावला तेवढं फक्त समजलं नाही.
असो - आपल्याला काय. आपण अभ्यासू वृतीने वाचावे.

बापू
अगदी महत्त्वाचा विषय अन इतक्या सुरेख पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे पुस्तक मिळवून वाचायला पाहिजे. मर्ढेकरांच्या कविता खूळ लावतात हे खरं!

बापू,
तुमचा लेख फार आवडला. आणी म. वा धोंडांच्या पुस्तकाची ओळख करूब दिल्याबद्दल धन्यवाद!
अन्जलि

विजयाबाईंवर खुन्नस काढलीय असं मला तरी वाटलं नाही. उलट अगदी सुरुवातीलाच धोंड नमूद करतात की विजयाबाईंचं पुस्तक वाचून त्यांना मर्ढेकरांच्या कवितांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करण्याची स्फुर्ती मिळाली.[का चेव चढला?]. त्यांनी जरूर विजयाबाईंची मतं खोडून काढली आहेत पण त्यांत वैयक्तिक टीकेचा वास नाही.
बापू करंदीकर

बापू, परत एकदा उत्तम लेख.

    ***
    जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
    जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी