म्युनिसिपल कौन्सिलर भगवंतराव जमदाडे

Submitted by एम.कर्णिक on 17 July, 2009 - 03:31

"हं, क्काय संबाजीराव, काय इसेस?" म्युनिसिपल कौन्सिलर भगवंतराव जमदाड्यांचा हा तंबाखूच्या पिंकेत भिजलेला प्रश्न सदोदित खेटर मारल्यागत चेहरा करून असणार्‍या संभ्या ल्हवाराचं रोजच स्वागत करतो.

मराठी दुसरी यत्ता 'फ्येल' असलेले हे भगवंतराव जमदाडे चांगली साठएक एकर जमीन बाळगून आहेत. आणि म्हणूनच ते कदमवाडीच्या वॉर्डातून 'मुन्शीपल कोन्शिलर' झालेले आहेत. काही नाही तरी 'कॅरेम' भरायला हातभार (की बूडभार?) म्हणून ते प्रत्येक सभेला जातात; एरवी त्यांच्या मळ्यातल्या झोपडीत बसून मळ्यावर 'नदर ठिवणे' आणि आल्यागेल्याबरोबर चकाट्या पिटणे हेच त्यांचे काम असते. मळ्यातली झोपडी रोज संध्याकाळी त्यांच्या आणि वाडीतल्या एका संभ्या लोहाराच्या गप्पा कान देऊन ऐकत असते.

आज संभाजीराव विशेष काळजीत दिसला. फासेपारध्यांची पालं माळावर पडली म्हणजे त्यांची दोन पाय दोरीने बांधलेली गाढवं गावभर चरताना दिसतात; दोन पाय बांधल्यानं ती जशी खुरडत चालतात तसा हा दोन पायांचा गडी खुरडत आला. आला तो तसाच भगवंतरावांच्याजवळ तांब्या घेऊन बसल्यागत बसला.

"काय संबाजीराव, काय कारबारनीनं कोरड्यास बिगडीवल व्ह्तं का काय वो आज?"

खाँक थू करून संभ्या बसल्याबसल्याच तोंड बाजूला करून थुंकला. "च्या बायली कारबारनीचं काय रोजचच हाय वो, पर साली पोरंबी काव आनायल्यात राव. तुमास्नी सांगतो बगा भगवेंतराव; ह्या साल्यास्नी येकयेकास्नी ऐरनीव घालून घनानं ठोकून काडावंसं वाटतंया बगा !"

दोन बोटं ओठांवर उभी धरून त्यांच्या मधल्या फटीतून पिंकेची पिचकारी उडवीत भगवंतरावांनी एकदा संभ्याकडे बघून घेतलं आणि म्हणाले, "आता आनि काय क्येलं बाबा तुज्या परल्यानं?"

"क्काय क्येलं? अवो रांडच्च्यानं मलाच भाजिवलं न्हवं का ! आयला आपल्यासारं घन बडवाय लागू ने पोराला, चार बुकं शिकून शानंसुरतं व्हावं तेनं म्हनून साळत घातला त्येला तर भडवा साळाच चुकिवतोया म्हनं. आज मास्तर भ्येटला व्हता त्येचा सक्काळ्च्याला; तवा म्हन्ला. दोम्पारच्याला आल्ता परल्या भाकर खायाला म्हनून; तवा धरला; चार रट्टं लगावलं आनि इचारलं. तसं साल्यानं भट्टीतला चिमटाच उचिल्ला बगा आनि लावला की वो माज्याच हाताला. बायली आसला बोंबाल्लो म्हन्तासा. त्यवड्यात गडी ठ्यां. मायला राती यीलच कनै घरला. तवा बगतो. तुडिवतोच आज साल्याला."

संभ्यानं मनगटावरचा चट्टा एकवार चोखला आणि त्यावर फुंकर घालत गपशार बसून हायला. भगवंतरावांनी एकदा संभ्याच्या हाताकडं बघितलं आणि म्हणाले, "प्चुक प्चुक, बायली लईच बाजिंदं हाय कि रं तुजं परल्या ! पर मर्दानीच्या, तुलाबी आसं हुयालाच पायजेल हुतं बग येकडाव. तुला पयल्यापास्नं सांगीत हुतो पोराला साळंत घालू नगोस म्हनून. पर आईकशिला तर न्हवं?"

"तुमी म्हन्तासा भगवेंतराव, पर साळंत ग्येल्याबिगार काई खरं न्हाई बगा. न्हाईतर तिच्याआयला हाईच की आमच्यावानी ठॉक ठॉक करायचं ! पर म्हन्लं साळा सिकल, म्याट्रिक न्हई तरी निदान सातवी फायनल झालं तरी कुटंतरी मास्तर म्हनून लागंल का न्हई? मजी घन बडवाय नको का काय नको ! आवो हाय काय ह्या ल्हवारकीत ?"

यावर भगवंतराव एकदा गडगडून हसले आणि म्हणाले, "संब्या, माजं आईक. पोराला साळंतनं काड. न्हाई न्हवं का जीव लागत त्येचा साळंत? न्हाई तर न्हाई. मायला पोरानी कसं उंडरायचं आस्तया शेरड्यांवानी तर तेनास्नी धरतासा आनि डांबतासा साळंत. तुमी बी श्यानं आनि पोरास्नी श्यानं करनारं त्ये मास्तरबी श्यानं ! म्या म्हन्तो, मायला न्हाई प्वार साळा सिकलं तर काय बिगडंल ? आ ? सांग की. आ ?"

"बिग्गडतंय क्काय? श्येवटी हाईच की आपली ल्हवारकी. पन्ज्याआज्ज्यापास्नंची माज्यावरची म्हेर्बानगी."

"हांग आस्सं ! …… तू काय शिकलाईस रं संब्या? बायली, आंगटा तरी उट्वाय लागतोय का रं तुला कवा? कुटं घोडं थटलय रं तुजं? सांज सकाळ भाकरी हान्तुयास, घन बडिवतुयास, पानबिडी करतुयास, सगळं आवरुनशान रातच्याला मुडद्यावानी झोपतुयासबी न्हवं? आ? कुटं आडलं गा?" एवढं बोलल्यावर भगवंतरावाना वाटलं काय आपण प्रश्न टाकला पण ! संब्याच्या बाच्या बालाच काय त्येच्याबी बाच्या बाला जवाब देता न्हाई यायचा. त्यांनी आपल्या फर्ड्या बोलण्यावर खूष होऊन इकडंतिकडं बघितलं आणि संभ्याकडं बघत असतानाच त्याना एकदम त्यांच्या 'न्हानपनीची' आठवण झाली. ’हॉक’ करून हसून ते चट्ट्य़ाकडं प्रेमळपणानं बघत बसलेल्या संभ्याला म्हणाले, "संब्या, आरं तु या वाडीत नवीन हैस. मी किती शिक्लुया दक्कल हाय तुला?"

"म्याट्रिक न्हाई तर व्ह्प्पा तरी झाला असशिलाच न्हव?"

"थुत, आरं मी दोन वर्सं शाळंत ग्येल्तो त्येवडंच. आरं आमचा आबा बी आसाच तुज्यावानी, तिर्पागड्या डोचक्याचा ! त्यो सोता काय शिकल्याला न्हवता खरं पर त्येला वाटायचं आपल्या भग्यानं साळा सिकावी. खरं भग्याचं मन कुटं हुतं साळंत? आयला टगेपना करीत वाडीभर उंडारायचो बग. कुटं मोरबाळ्याच्या मळ्यातनं उसाची कांडकी मोड, कुटं पाटलाच्या चिच्चच्या झाडावरनं चिच्चा पाड, कुटं पंचगंगेत पवायला जा आसं कायबाय करायचो. आदी मुद्दलात साळंत ग्येलोच कवा? धा वर्सांचा हुतो बग मी, तवा आबानं साळंत घातलाता. मास्तर हुता बग तवा येक कुरकळणी म्हनून. त्यो तिच्या बायली लई गरीब हुता. गरीब मंजी तसा खवाट हुताच म्हन. माज्या आबाकडनं कुटं बावचीच्या शेंगा न्हे, वांगी न्हे आसं कायबाय कायबाय फुकट न्ह्याचा रोज. पोरास्नी दनादन दनादन बुकलायचा. पर मला मातुर पठ्ठ्यानं कवासुदिक येक बोट म्हनून लावलं न्हाई हां ! तर बग त्या वर्साला मी कटाकटी येक म्हयनाभर साळंत ग्येलो आसंन. तरीबी लेका पास क्येलं भाद्दरानं ! मातर दुसर्‍या यत्तेला येक मास्तर नवा आला. लई बेरक्या हुता बग त्यो. आयला पयल्या दिवसाला ग्येलो साळंत त्यो हूं म्हनून चिच्चांची कंगलं घिऊन. म्हन्लं ह्यो मास्तरबी घील आनि गप बसंल. पर कुटलं रं ! बेन्यानं दिल्या चिच्चा खिडकीतनं फेकून आनि आशी हानली की नाय माज्या कानसुलात ! तवाधरनं बग मी त्या मास्तरड्यावर डूकच धरला. पवायला याचा रं त्यो, तवा म्हन्लं येकडाव बुडवायचाच त्येला. पर मर्दा काय जमलंच न्हाई. त्यो तळ्यापसल्या कदमाचा सर्जा हाय न्हवं?...."

"त्यो दुकानवाला?"

"व्हय त्योच. लेकाचा सदोंदी असायचा मास्तरासंगट. त्यो मर्दा पवनार नंबर येकचा. म्हनताना ग्येलो न्हाई बग त्या वाटंला. मग बग येक डाव काय क्येलं, खाजकुयली असतीया न्हवं? ती आनली आनि मास्तराच्या हातरुनात दिली पसरून."

"हातरुनात? त्ये आनि कुटं घावलं तुमास्नी?"

"व्हय तर काय ! साळंतच गडी झोपायचा त्यो. तवा येकडाव क्येला ह्यो गोमकाला. दुसर्‍या दिवशी गडी साळंत आला त्यो निस्ता हिकडं खांजळ, तिकडं खांजळ, टरारा टरारा टरारा निस्ता खांजळंतच ! बायली मला हासूबी आवरंना. पोरं इचारायली; का हास्तुयास म्हनून; आनि तितंच समदा बावचा झाला. पोरास्नी सांगताना त्या भडव्या सर्ज्यानं आइकलं रं आनि सरळ मास्तरकडं जाऊन सांगितला. तवा बग त्यो मास्तर आला आनि आयला लातच हानली माज्या कंबरड्यात पाक्कदिशान ! आस्सला बोंबाललो बग आनि त्येला म्हनलं, "मास्तर, तुज्या आयला, ये तू आमच्या आळीकडं मं बग दावतो तुला जमदाड्याचा हिसका" आनि जो ठ्यां सुटलो कनै त्यो दगडं गोळा करून घरात बसलो लपून. म्हन्लं मास्तर आता आपल्या मागनं येनार….."

"आनि आबा न्हवते ?"

"न्हाई गा, आबा ग्येल्ता मळ्याकडं उसाला पानी पाजवाय. मला काय वाटलं ? का त्ये मास्तरडं यील घराकडं आबाला सांगाय म्हनून. पर त्ये ग्येलं सरळ मळ्याकडंच आनि दोम्पारच्याला आबाबरूबरच आलं घरला. आबा आला त्यो चिच्चंचा फोकच घिऊन आला. फुडं मास्तर आनि मागनं आबा. मी काय आबाला बगितला न्हाई रं ! मास्तर आला आला म्हनून म्या आपला ह्यो टिप्पिरा दगुड उचलला आनि असा उडीवला म्हन्तोस. पर बायली नेम चुकला आनि त्येला लागलाच न्हई. तंवर आबा आला फुडं आनि त्येनं आन त्या मास्तरानं मिळून मला धरून आस्सला श्येकाटला, आस्सला श्येकाटला म्हन्तोस ! आरं आमचा ढवळ्या काय मुतंल असा निस्ता खाळ खाळ खाळ मुतायलो मी मर्दा."

"म्हंजी मास्तरानीच तुमचा काटा काडला म्हना की !"

"तर काय रं ! बायली अगदी ढोरावानी ठोकला रं मला दोगानी मिळून. राती हातरुनातबी सारका मुततच होतो बग. सक्काळच्याला आबानं इचारलं, "भडव्या साळंत जानार का न्हाई?" तवा गड्या, निस्ता गड्या, आंगाला आस्सा झेंडू फुटलाता म्हन्तोस ! तरीबी आमच्या आईंच्या मागं हुबं हाऊन म्हन्लो, "ह्यो मास्तर लाता घाल्तोय पेकाटात. म्या श्याप न्हाई जानार त्येच्याकडं." तवा मं आबानं मला सदरबाजारच्या साळंत घातलं. तितं बग कटाकटी सा सात म्हैनं काडलं असतील. त्येवड्यात आबा आमचा गचाकला आनि माजी साळा सुटली. आबा गेला म्हनून रड्लो पर साळा सपली म्हनून लई बरं बी वाटलं मर्दानीच्या."

"मं तितनं फुडं साळंला ग्येला न्हाईच म्हना का?"

"छ्या, तितनं फुडं मग मळ्यातच राबलो बग. आस्सा मळा क्येलाय म्हन्तोस ! बग, आबाकडं धा येकर मळा होता. मी त्येच्यावर वाडीत आनि कागलला मिळून आनि पन्नासएक येकर जिमीन घेतली."

"हैन तिच्यामारी ! मायंदाळच पैका वडलासा की वो."

"तर रं. आता मला सांग, मी काय साळा सिकलो हुतो का? आयला दोन वर्सं साळला गेलो हुतो त्येनं काय ढेकळं येतय आमास्नी लिवाय वाचाय? तरीबी येवडं केलंच का न्हाई? आनि मुन्शीपाल्टीचा कोन्शिलर बी झालो का न्हाई? आनकी काय पायजे ? आं?"

"म्हंजी बिनशिकताच येवडा बारदाना वाडिवलासा म्हना की?"

"आता बग की तूच ! बरं माजं येक र्‍हाऊन दे; आबा तरी काय सिकलाता? तरी काई न्हाई तरी धा येकर जिमीन बाळगून हुताच का न्हाई? काय कदी भाकरतुकड्याची वान पडली न्हाई त्येला. आनि माजं तर तू
बगतुयासच."

"व्हय व्हय !"

"आरं खरी मजा म्होरंच हाय मर्दा. त्यो मास्तर ? येवडा शिकल्याला ? काय मिळीवलं त्येनं? काल परवाच आल्ता माज्याकडं. मुन्शिपाल्टीच्या साळंत त्येच्या दोन पोरान्ला त्येवडं लावून घ्या म्हनून सांगत हुता. म्हन्जे हाय का नाय तूच बग !"

"आत्ताएच्याआयला !"

संभ्यानं काढलेल्या ह्या उद्गारामुळे भगवंतराव सुखावले. त्यांनी आपला पाचुंदाभर मिश्यांचा झुबका चाचपीत इकडे तिकडे नजर टाकली. वस्तीकडनं त्यांची लक्षुमी चार वर्षांच्या त्यांच्या पोराला पुढं घालून झोपडीकडं येत होती. त्यांनी बसल्या जागेवरनंच हाक दिली, "काय हाय?"

चिंतेने व्यग्र झालेल्या लक्ष्मीनं एक पाकीट त्यांच्या हातात दिलं आणि म्हणाली, "कागुद आलाय बगा पोष्टातनं. तार हाय म्हनं. बगा तरी काय हाय त्ये !"

तार म्हटल्यावर भगवंतराव नाही म्हटलं तरी जरा चरकलेच. मुकाट तोंडानं त्यांनी पाकीट उघडलं आणि आतला कागद पाहू लागले. पण त्यावरल्या इंग्रजी अक्षरांनी ते अधिकच गोंधळून गेले. तिघंही गंभीरपणे त्या कागदाकडं बघत बसले. बाजूनंच गावाच्या दिशेला चाललेल्या मास्तरांनी, "क्काय भगवंता ?" असा निर्हेतुक प्रश्न टाकला नसता तर ते आणखी बराच वेळ तसेच बसले असते. मास्तरांचा आवाज ऐकून भगवंतरावांचा चेहरा थोडा उजळला. त्यांनी तो कागद मास्तरांकडे दिला आणि आवाजातली अगतिकता शक्य तेवढी लपवायचा प्रयत्न करत ते म्हणाले,

"गुरुजी, जरा बगा वो काय हाय त्ये. जरा घ्या थोडा तरास आमापायी. आमी तिच्याबायला आडानी र्‍हायलो, म्हनून तुमास्नी सारकं सारकं तरास देनं पडतया बगा. जरा करा आमावर थोडी म्हेरबानगी."

हे बोलताना त्यानी थोड्या वेळापूर्वीच्या आपल्या निष्ठावान श्रोत्याकडं एक चोरटा केविलवाणा कटाक्ष टाकला. पण भाजलेल्या चट्ट्यावर फुंकर घालत असलेल्या संभ्याचं त्यांच्याकडं लक्षही नव्हतं.

-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

छान आहे कथा. गावरान भाषेचा बाज संभाळला आहे.

"जाग्यावर पलटी खटक्यावर बोट की राव!!" कथा मस्तच्... (माझा १ मित्र कागलचा, तो हे वाक्य नेहमी म्हणायचा... पण मला अर्थ माहीत नाही. बर्‍याच दिवसांनी कोल्हापुर कागल साईड्ची भाषा ऐकली... तेव्हा ऐकीव ज्ञान पाजळायची अनावर इच्छा झाली... :-p
पण या अवतरणलेल्या वाक्याचा अर्थ सांगेल का कोणी मला?)

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

लै मंजी लैच झ्याक .........मुकुंददा(तुम्ही?) Happy

अ‍ॅना-मीरा, ड्रीमगर्ल, प्रकाश, धन्यवाद.
ड्रीमगर्ल, तुम्ही 'अवतरणलेल्या' एक्स्प्रेशनचा अर्थ मीही शोधत आहे.
प्रकाश, या अपत्याचा जन्म झाला तेव्हा (१९ डिसेंबर १९६५ - साप्ताहिक 'आलमगीर') ) मी २२ वर्षांचा होतो. डज दॅट एक्स्प्लेन?

मुकुंद कर्णिक

सही..... अगदी आनंद यादवांची आठवण झाली. मजा आली.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

मुकुंददा, काय बाज संभाळलाय भाषेचा... जबरदस्तं. खूप आवडली... खूपच.
माझ्या सासरच्या मोठ्या घरी गेलं की, ही भाषा ऐकू येते (कोल्हापूरजवळ). समोरच "लव्हाराचं" घर आहे Happy

मुकुंदराव, मजा आला वाचून. सही आहे तुमचा भग्या.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

मोहन, शलाका आणि कौतुक,
स.न.वि.वि.
भगवंता, संभ्या लव्हार, गुरुजी आणि दस्तुर खुद्द, आम्ही सर्वजण तुमचे खूप आभारी आहोत.
स. नि. डा. हा. आं.
मुकुंद कर्णिक