कविता... सुचलेली ती, की केलेली ती?

Submitted by bepositive on 9 July, 2009 - 02:05

नमस्कार,

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. माझा मित्र मला एका सरांबद्द्ल सांगत होता. म्हणाला की ते कविता करायला शिकवतात. ऐकायला विचित्र वाट्लं म्हणून २ २ दा विचारलं. हो म्हणे कवितांचा क्लास घेतात. मी म्हटलं की मग चांगलं आहे हे... जगातला कुठ्लाही माणूस कवी होऊ शकतो असं असेल तर. माझ्या एका मामेबहिणीने तिच्या ऑर्कुट प्रोफाईल मधे लिहिलं होतं.. 'आय लाईक टू मेक पोएम्स. आय हॅव मेड १४ पोएम्स सो फार'

आत्ता मायबोली हितगुज च्या होम पेज वर वाचलं. मराठी गझल कार्यशाळा. यात गझल या प्रकाराबद्दल ज्ञान दिलं जात असेल तर ठीक आहे. परंतु गझल करायला वगरे शिकवण्यात येत असेल तर या प्रकाराला मी निव्वळ वेडेपणा म्हणेन.

मला असं विचारायचंय तुम्हा सर्वांना, की कविता 'करता' येते का हो? म्हणजे 'चला आता मी जरा कविता करतो' असं म्हणतात का लोकं? मी तरी ऐकलेला वाक्यप्रयोग असाच आहे की कविता 'सुचते'. म्हणजे ही अशी गोष्ट आहे की ज्यावर आपला कंट्रोल नसतो. ती आपसुक होते. स्फुरते.

'करणे' हे क्रियापद कदाचित आजकालच्या फिल्म साँग लिरिसिस्ट ना लागू पडेल. किंवा अशा लोकांना लागू पडेल जे प्रेयसीला इंप्रेस करण्या साठी र ला ट जुळवून एखादं प्रेमकाव्य 'करतात'. पण हा शब्द माणसं सर्रास वापरतात. आणि कविता करतात सुद्धा.

मी मराठी माध्यमातून शिकलो. मला मराठी व्याकरणाचं ज्ञान आहे, अभिमान आहे. मराठीत काव्यलेखनाचे छंद आहेत, व्रुत्त आहेत, प्रकार आहेत. काव्य काव्यासारखंच असलं पाहिजे हे ही पटतं. तरीही कधीकधी हा प्रश्न पडतो... की भावनांना मीटर असावं का?

उत्तरं अजून मिळालेली नाहीत. पण एवढं मात्र खरं.

जे सुचतं ते रुचत नाही
आणि जे रुचतं ते सुचत नाही.
जे बांधतो ते नांदतंच असं नाही
आणि जे नांदतं ते बांधतोच असं नाही
-अपूर्व
(हे सुचलं मला लिहिता लिहिता)
-------------------------------
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा. आभारी आहे.

गुलमोहर: 

व्वा! नाही नाही म्हणता एक कविता 'केलीत' की!
जे सुचतं ते रुचत नाही
आणि जे रुचतं ते सुचत नाही.
जे बांधतो ते नांदतंच असं नाही
आणि जे नांदतं ते बांधतोच असं नाही

थोडं स्वतन्त्र्य घेऊन :
जे मला सुचतं ते लोकांना रुचत नाही
[अशी मला शंका आहे!]
आणि जे सुचतं ते मलाच रुचत नाही
[कधी कधी]
आणि जे रुचतं ते सुचत नाही.
[बर्‍याचदा]
जे बांधतो ते नांदतंच असं नाही
आणि जे नांदतं ते बांधतोच असं नाही

'गझल' हा एक काव्यप्रकार आहे, स्वतःचं असं 'व्याकरण' असणारा[म्हणजे नियम, वृत्त, छन्द, यमक, उपयमक वगैरे]. तो एक काव्य-प्रकार म्हणून कुणाला शिकावासा वाटत असेल. काहींना अधिक चांगला आस्वाद घेण्यासाठी तर काहींना गझल रचण्यासाठी म्हणून. त्यामुळे एक 'कार्य-शाळा' घेण यात मला तरी काही गैर वाटत नाही. अर्थात, त्या कार्यशाळेत आलेल्या रचनांमधे 'काव्य-गुण' किती होते हा भाग निराळा! त्या दृष्टीने मलाही ती काव्य-शाळा हा प्रकार कंटाळवाणा वाटला पण म्हणून तो 'शुद्ध वेडेपणा' असं मात्र मी म्हणणार नाही.
मारून-मुटकून कोणी कवी होउ शकणार नाही हे अगदी मान्य! पण मग तसं पहायला गेलं तर मग 'आर्ट स्कूल' चं प्रयोजन तरी काय? ज्या माणसाकडे मुळात चित्रकला किंवा शिल्पकला वगैरेचं 'टॅलेण्ट' आहे, त्याला उपजत कलागुणांना, शास्त्रीय पद्धती आणि प्रघात यांचं प्रशिक्शण मिळालं तर ते कलागुण विकसित होतात, कसब [स्किल] विकसित होतं, एक वेगळी दृष्टी येते, दिशांची ओळख होते, विविध प्रकार समजतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 'सकस' आणि 'नीरस' यामधला फरक करता येउ लागतो. त्या पुढे जाऊन, स्वतःची दिशा ठरवणं, आपला आवडता प्रकार निवडणं, नव-नवे प्रयोग करून पहाणं, आपली स्वतंत्र ओळख आणि शैली निर्माण करणं हे प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून असतं. जे 'फाइन आर्ट' च्याबाबतीत घडतं, जे संगीताच्या किंवा नृत्याच्या बाबतीत घडतं, तेच 'क्रिएटिव्ह रायटिंग' च्या बाबतीतही का घडू नये?
कोणताही नावजलेला कलाकार घ्या, त्याने भरपूर 'शागिर्दी' केलेली दिसेल मग ती गुरुकडे किंवा शाळेत जाऊन केलेली असो. ती एक आवश्यक 'पूर्व-साधना' आहे. अशी शागिर्दी केली [किंवा प्रशिक्षण घेतलं]म्हणजे तो आपोआप मोठा कलाकार होणार नाही हे उघडच आहे.
कविता स्फुरते, ती तिचं स्वतःची वाट शोधत आणि फोडत शब्दरूप घेउन 'बाहेर' येते ह्या तुमच्या मतावर काही वाद होउच शकत नाहीत. पण त्या शब्दांना वृत्त किंवा छंदात बंदिस्त करायचं किंवा मुक्तछंदातच राहू द्यायचं हे कवीच्या इच्छेवर अवलंबून राहील, नाही का? अगदी मुक्तछंद घेतला तरी त्यातल्या श्रेष्ठ रचनांना स्वतःची एक लय, एक धून, एक नाद्-प्रवाह असल्याचं दिसतं. केवळ कल्पना-चातुर्य किंवा शब्द-सौष्ठव पुरे पडत नाही.
कविता संगीत-बद्ध करण्यासाठी तीला 'मीटर' असणं चांगलं. पण आरती प्रभूंच्या 'गेले द्यायचे राहून' सारख्या कवितेलाही एक समर्थ संगीतकार सुंदर चाल लावू शकतो पण तो अपवाद म्हणावा लागेल.
कविता आणि गीत यांच्यात फरक नक्की आहे पण उत्तम काव्यगुण असणारी कित्येक 'गीते' आपल्याला माहीत आहेत तशा 'टाकावू' म्हणण्याजोग्याही असंख्य कविता आपण वाचतो.

-बापू करंदीकर.

बापू करंदीकर

पटलं. आणि आवडलं सुद्धा. जे तुम्ही इतर कलांबाबत म्हणालात, तेही मला कधीच आवडलं नाही. आठ्वी नऊवी मधे केवळ चित्रकलेत नापास म्हणून मागे बसवलेली मुलं होती आमच्या शाळेत. अरे ! ती कला आहे त्याची सक्ती का म्हणून ??? मला नाही कळत माणूस कसा काढावा, Whats the problem? म्ह्णून मी अपात्र झालो का? तसंच गाण्याचं नाचाचं आहे. आतून वाटलं तर शिकतो माणूस. येतंच ते. कलेला साथ देणं जास्त महत्वाचं. वाट कला स्वतःच शोधते.

मुक्तछंदाचा मी पुरस्कर्ता नव्हे. कारण मुक्तछंदाच्या नावाखाली आजकाल काहीही लिहिलं जातं. त्यामुळे असं नव्हे की मुक्तछंदच असू द्यावा किंवा मुक्तछंद श्रेष्ठ आहे वगैरे. पण माझं म्हणणं असं आहे की एखाद्या साच्यातून जन्मलेली मूर्ती आणि मूर्तिकाराने त्याच्या हातांनी घडवलेली मूर्ती यात जो फरक आहे तोच सुचलेल्या आणि केलेल्या कवितेत आहे.
-------------------------------------------
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा. आभारी आहे.

श्री. बापू करंदीकर, तुम्ही खरच छान लिहिलं आहे.

पण मला एक सांगा, मी सध्याच्या बर्याच कविंच्या कविता वाचल्या आणि मला त्याना गद्य कविता म्हणवसं वाटलं. त्या मला मुक्तछंदाच्याही पलिकडे वाटल्या. एखादं वाक्य अर्ध वर आणि उरलेलं खाली लिहाव तसं वाटलं. त्यात आषय नसतोच असं नाही. पण कवितेच्या व्याख्येतुन त्याना कविता म्हणता येतं का? कारण मला वाटायचं कविता म्हणजे छंदोबद्ध रचना. जसं "अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं" वगैरे.

हे फक्तं माझ्या महिती साठी आहे. कोणत्याही कवितेवर टीका करावी असा उद्देश नाही आणि तेव्हढं ज्ञानही नाही.

धन्यवाद.

बापूंनी तर षटकारच मारला. बापूतुम्ही खूपच सुन्दर लिहिता. तुम्ही रेग्युलरली येत जा पाहू येथे ...तुमची फार गरज आहे इथे,...

मी बर्‍याच नियमितपणे मा. बो. वर येत असतो. माझ्या अल्पबुद्धीनुसार काही-बाही प्रतिसाद देत असतो. षटकार वगैरे काही मारत नाही. तुम्हाला रस असेल तर मी
मा.बो. वर केलेल्या पोस्ट पैकी काही पोस्ट्स ह्या लिंक वर वाचू शकता.
http://prabhakarkarandikar.blog.co.in/
तुमच्या प्रतिक्रिया दिल्यास मला आनंदच होईल.

बापू करंदीकर

सॉलिड ... कवी आणि कविता यावर जोरदार चर्चा होते आहे.
पण कविता करयला कोणी शिकवु शकेल असे वाटत नाही.
कविता हि बहुधा आपल्या विचारान्चे सर्वात सुन्दर प्रकटिकरण असते.
मग गेले द्यायचे रहुन्..सारख्या कवितेतुन कवीचा आपल्या प्रतिभेबद्दलच विचार व्यक्त होतो.
अनेकदा ऐकुनही हा अर्थ कधी लागला नाही. परवा सा रे ग म च्या प्रोग्राम मध्ये मन्गेशकरानी हा अर्थ स्पष्ट केला. सन्दीप खरे च्या कविताही छानच असतात. अर्थ आला की मग छन्द, मात्रा, वृत्त गौण होतात.
अर्थात प्रत्येकाला त्या कवितेत आपल्या अनुभवानुसार वेगळा अर्थ सापडेल.
मग आयुष्य हे चुलिवरले कान्देपोहे हे गद्य देखिल गाणे होते.
-मयूर

कविता... सुचलेली ती, की केलेली ती?
या विषयावर आपण सर्व, जी चर्चा करीत आहात ती मी वाचली.
पहिल्याच (bepostive) यांच्या post वरची सहज स्फुरलेली कविता
देखील चांगली वाटली. माझ्याही मते कविता ही स्फुरते, आतून येते.

जास्त काही लिहिण्यापेक्षा, मायबोली वर काही दिवसांपूर्वी
मी post केलेली माझी कविता इथे परत post करतोय,
म्हणजे मला काय म्हणायचय ते स्पष्ट होईल ----

जन्म कवितेचा

ये नच कविता कधि आमंत्रुन
येते कधि ना करुणा भाकुन
अनुभव, घटना मनास स्पर्शुन
जाती दुखवुन, कधी सुखावुन
विचार काहुर मनात दाटुन
जलदापरि ये मन ओथंबुन
शब्द, भावना संगम होउन
आशय बरसे काव्यघनातुन ......... १

ये नच कविता कधिही कळवुन
दार कुणाचे ना ठोठावुन
मनी जन्मुनी, येई आतुन
कवच मनाचे अवचित भेदुन
भाव मनीचे मनास लंघुन
निर्झरापरी झुळझुळ वाहुन
झर झर झरती ते झरणीतुन
आणि उतरती कविता होउन ...... २

ये नच कविता कधि हातातुन
सृजन तिचे हो मनगाभ्यातुन
विचार दर्या उधाण येउन
भाव उर्मी त्या उठती उसळुन
येति तटी अन् जाती विखरुन
शब्दांची ती रत्ने सांडुन
त्या शब्दांच्या पल्याड जाउन
भाव बोलती कविता होउन ........ ३

......... उल्हास भिडे १६-७-२०१०

(बापू, क्या बात है.... )
कविता करायला शिकता येतं का? का नाही?
गजल? हो तर... ते एक तंत्र आहे... प्रोग्रॅमिंगच्या भाषेत सिन्टॅक्स्ट! लिहायची तर शिकायलं हवं, यारो.
शिकून गाणं गाता येतं का? अर्थात!
शिकून तबला वाजवता येतो का? अर्थात!

कोणतीही कला शिकायला लागल्यावर लक्षात येतच की ही आपली वाट आहे किंवा नाही. मग प्रवास व्हिन्सेन्ट व्हॅन गॉ, किंवा लताबाई (किंवा पंडितजी) किंवा झाकीरभाई ह्या दिशेनं, की... त्यांनाही पार करून की... आपली दिशाच वेगळी?

शिकल्यावर झाकीरभाईंसारखा तबला वाजवता येईल का? नक्कीच नाही... कदाचित शिकून तुम्ही त्यांच्याहीपेक्षा तयार किंवा अगदी वेगळ्याच धर्तीचं वाजवाल... काय सांगता येत नाही.
शिकून वाजवता येईल का? न शिकताही वाजवणारे आहेतच की. पण रितसर शिकण्यानं जो रियाजाचा, अभ्यासाचा, घडण्याचा पथ आहे, तो अधिक सुलभ होतो.
शिकून वाजवता येईल का? सांगता येत नाही. ती आपली वाट आहे का नाही ते कळण्यावर आहे.

ह्या सगळ्या कलापथांच्या सुरुवातीला एक कला बीज, सृजनाची तळमळ, अनुभवलेलं खोलवर भिडणं आणि ते व्यक्तं करण्याची असीम असोशी असं काही उराशी असणं आवश्यक आहे. "इथे मायबोलीवर तर सुरुवातीला लिहिलय त्यानं... वैभव जोशी.... तो गजल लिहितो... सोप्पय आणि फार वा वा होते... म्हणून मीही गजल लिहीन..."
ह्या विचाराने उत्तम छंदकाव्य लिहिणार्‍या कवी(यत्री)ला गजल तंत्र शिकता येईल एकवेळ, पण "गजलीयत"च्या गर्भातली गजल नाही "पाडता" यायची. त्यासाठी "त्या" गर्भकळा भोगाव्याच लागतील.

अगदी कळायला लागल्या बरोबर कविताच लिहू शकणार्‍यांचा रियाज आधीच्या जन्मीचा असतो असं माझं प्रामाणित मत आहे. व्यक्तं करण्याचा त्यांचा अभ्यास, रियाज आधीच झाला होता... ह्या जन्मी भिडलं ते भिडवलं... इतकं सहज होतं त्यांना. येरांना रियाज हा करावाच लागतो. इतरांच्या लिहिण्यातून, आपल्या लिहिण्यातून जे शिकत जातात ते घडत जातात, स्वत:ला जाणीवपूर्वक वेगळं घडवत जातात...
अनेक बालकलाकारांच्या बाबतीत दिसतच. पाचव्या-सहाव्या वयाला अनेक तालवाद्य वाजवू शकणारा एक वीर (मराठी पाऊल पडते पुढे?). ह्याचा रियाज आधीच्या जन्माचा असणार असं माझं मत आहे.

बाकी झाकीरला सुद्धा शिकावंच लागलं अन रियाजच करावा लागला. शांताबाईंनी त्यांच्या लिहिण्याच्या "शिकण्याबद्दल" उदंड लिहून ठेवलय...

तेव्हा... कोणत्याही कलेचं तंत्र हे शिकावच लागतं, "आत्म"सात करावाच लागतं..... चुकुन ते आत्मसात झालेल्याच अवस्थेत जन्माला आला असाल तर बोलायला यायच्या क्षणी कविता (किंवा गजल), पाय टाकता यायल्याक्षणी कथ्थक.... इ. येणं शक्यं आहे.
अन्यथा तंत्र शिकण्यात(च) बरच तथ्य आहे.... जीव मंत्रून आला असाल तरच, हं... (नाहीतर ही वाट आपली नव्हे म्हणावं).