दगड-धोंडे

Submitted by आर्च on 3 July, 2009 - 12:05

आताच माझ्या बॅकयार्ड मधून चक्कर मारून आले. जास्त काही झाडं आहेत किंवा खूप काही फुलं लावली आहेत असं नाही. नाही म्हणायला चार मॅग्नोलियाची झाडं आहेत. आणि छान ट्रिम केलेले अझेलियाज आणि काही एव्हर्ग्रीन्स. पण अनवाणी पायाने मऊशार गवतातून चालायला मला खूप आवडतं. नवराही लॉन अगदी टिपटॉप ठेवतो. मोईंग त्याला रिलॅक्सेशन देतं असं त्याचं म्हणणं आहे. ह्याच यार्डमध्ये एक छोटसं पाँड आहे. भोवती विकतचे दगड लाऊन नैसर्गिक रुप द्यायचा प्रयत्न केला आहे. (बिल्डरची कल्पना)आणि एक छोटासा धबधबापण केला आहे त्यात त्याने. जो चालवायला प्लगइन करावा लागतो. जेंव्हा पाहुणे येणार असतील तेंव्हा तो चालू केला जातो. पुण्याची नं मी. तेंव्हा गुण नाही तर वाण लागणारच न. ह्या पाँडचं मला फार आकर्षण आहे कारण त्या भोवती माझ्या बर्‍याच काही आठवणी मी साठवलेल्या आहेत.

सगळ्यांसारखीच मलाही प्रवासाची खूप आवड आहे. कुठेही गेलं तरी निसर्गाची विविध रुपं पहाणं मला आवडतं आणि त्यामुळे चालणंही भरपूर होतं. खरं तर कॉलेजमध्ये असताना कलेक्शन ट्रिप्स मला अजिबात आवडत नसत. पावसातून, चिखलातून चालताना कधी एकदा घरी जातो आणि आणलेली पानं फुलं खाली ठेवतो असं व्हायचं.

इथे आल्यावर सुरुवातीला पुष्कळच फिरणं झालं. आणि कुठेही गेलं की ठरलेल्या टुरिस्ट अट्रॅक्शना भेटी देणं. भरपूर फोटं काढणं आणि आईबाबांना त्याच्या कॉपीज पाठवून आपल्यात सामील करणं हे तर रुटीनच झालं होतं. प्रत्येक ठिकाणची सोव्हेनिअर्स घेतलीच पाहिजेत असही वाटायचं. खर तर तेच तेच मग्ज, चमचे नाहितर प्लेटस. त्यावर तिथल्या अ‍ॅट्रॅक्शन्ची चित्रं. पण परत गेल्यावर घरात नको का काही लोकांना दाखवायला की कुठे गेलो होतो तेथल्या वस्तू? मग मुलं झाल्यावर त्यांना गेलो त्या ठिकाणच्या नावांनी टी शर्ट घ्यायला सुरुवात केली. मुलं मोठी झाल्यावर त्यांना तर त्यातही इंटरेस्ट राहिला नाही. घरात नको त्या आणि नको तितक्या वस्तू खुपच साठायला लागल्या.

दहा बारा वर्षापूर्वी अलास्काला गेलो होतो. समरमध्ये निसर्गाची समृध्दी मनसोक्त पहायला मिळते तेथे. स्वच्छ हवा मनापासून घेता येते. स्वच्छ निर्मळ पाण्यामध्ये कायाकींग करताना बाजुच्या परिसराचा आनंद लुटता येतो. अशाच एका निसर्गरम्य लेक शेजारी बसलो असताना, आजुबाजुला पसरलेल्या दगडांकडे लक्ष गेलं. निरनिराळ्या आकाराचे दगड पण सगळे तुळतुळीत गोटे. बर्फ आणि पाण्याने अगदी पॉलिश केल्यासारखे. त्यानंतर आजुबाजुला हिंडतानापण ते लक्षात आलं. त्यावेळी अलास्काहून येताना मी एक दोन मुठींच्या आकाराचा गोटा घेऊन आले. घरी आल्यावर त्यावर अलास्का आणि आमच्या ट्रिपच्या तारखा लिहिल्या आणि ठेवून दिला.

त्यानंतर कुठेही फिरायला गेलं की सोव्हेनिअर म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे दगड आणायला सुरुवात केली. रॉकीजमधले लाल, ब्लॅक हिल्समधले काळे, यलोस्टोनजवळचे पिवळट छ्टा असलेले. अर्केनसामधले तपकिरी, आमच्या टेनसीमधले करडे. तर असे हे गोळा केलेले दगड्-धोंडे त्यावर ते कुठले आणि मी कधी आणले ह्याच्या तारखा लिहून मी ते माझा पाँडवर मांडून ठेवले आहेत. पाँडवरून चक्कर मारताना त्यांच्याकडे बघितलं की मला भेट दिलेल्या जागांची, ट्रिप्सची आठवण होते. घरात जागा तर आडत नाहीच पण छोट्या छोट्या वस्तू दर आठवड्याला पुसतपण बसाव्या लागत नाहीत. पाऊस आला की माझे दगड साफ होतातच. आणि पाहुणे आले की त्यांनाही थोडिशी वेगळी बॅकयार्ड ट्रिप घडवली जाते.

माझं हे दगडप्रेम एकादवेळेस मी "राकट देशा, कणखर देशा, दगडांच्याही देशा" ची असल्यामुळे असण्याची ही शक्यता आहे.

गुलमोहर: 

वा! आईडिया मस्तच आहे. आमच्याकडे दहा कॉफी मगस् झालेत! बायको वैतागलिये Sad

मस्त लिहीलय!

छान लिहीलयस आर्च.

काय भारी आयडीआ आहे !! मी आत्ताच चालू करते! अजुन वेळ नाही गेली.. Happy
आयडीआ सारखाच लेखही मस्त आहे ! छान लिहीलंय!

www.bhagyashree.co.cc/

आयडिया मस्त आहे आर्च.. पण तू ट्रीपची माहिती कशानं लिहितीस? पावसानं ते पुसुन जाणार नाही?

आमचा फ्रीज भरलाय फ्रीज मॅग्नेटस् नी.. Happy

आर्च
सहीच लिहीलय. मी पण असे दगड आणते पण अगदी छोटे छोटे जे झाडांच्या कुंडीत टाकता येतात डेकोरेशन साठी तसे. तुझी त्यावर ठिकाण-तारीख टाकायची अभिनव कल्पना एकदम आवडली.
बाकी मी अजुनही भक्तीभावाने सगळीकडचे टीशर्ट गोळा करते, त्याचा कंटाळा येईल असे वाटत नाही.

मस्त लेख आणी कल्पना पण्...जुन्या आठव णीना उजाळा देण्याची अफलातून कल्पना!!
मी फ्रीज वर लावायची मॅग्नेट गोळा करते....प्रत्येक ठिकणची..तेही घरात फार अड्चण न होता साठ्वता येतात! आणी फ्रीज पण सारखा नवीन वाटत राहतो!

Happy

मी आधी टि शर्ट गोळा करायचो.. पण ते नंतर खराब होऊन जातात.. कारण ते जिम ला किंवा खेळायला घातले जातात.. ! नंतर मग स्वेटशर्ट आणायला सुरुवात केली.. पण मग ते इतके झाले की भारतात असताना त्यांचं काय करावं हा प्रश्ण पडला.. पण सुरूवाती पासून मॅगेनेट आणि कार्ड गोळा केली होती... त्यामूळे ते अजून चालू आहे.. आणि हल्ली हल्ली कप किंवा ग्लासेस पण जमा झालेत समहाऊ.. मनिष म्हणतोय तस फ्रिज भरेल बहूतेक आता त्या मॅगनेट्स नी.. Happy

आर्च फार छान आयडीया आहे. मी पेनी प्रेस करुन आणायचे.

छान लिहिलयसं आर्च. मी एव्हढी मॅग्नेट्स गोळा केली आहेत पण आता नवा स्टेनलेस स्टील फ्रीज आला आणि सगळी एका बॉक्स मध्ये ठेवून दिली. Sad
तुझी दगड गोळा करण्याची कल्पना खूप आवडली.

छानच Happy
मलाही अशीच लहानपणापासूनच दगड गोळा करायची आवड आहे.
लहानपणी साबरमतीच्या आश्रमात गेलो होतो. तिथे ठिकठिकाणी नर्मदेतले गोटे दिसतात. त्यांचाही सजावटीसाठीच वापर केलेला आहे. मी तिथल्या सुरक्षारक्षकांची (आणि आईबाबांची) नजर चुकवून दोन गोटे उचलून आणले होते. Wink

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

आर्च, त्या बागेचे व दगडांचे फोटो का नाही टाकलेस? Happy बाकी मागे पण टेनेसी वाचले ऐकले होते तुझ्याकडुन तेव्हाही आठवले तसे आत्ताही कार्व्हर यांची आठवण झाली.

आयडीया नी लेख दोन्ही छान Happy

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

मीही चित्रदुर्गहुन एक टरबुजा सारखा मोठा गोल गरगरीत दगडी चेंडू आणला आहे Happy

मला पण हा छंद होता. अगदी बटाट्यासारखा दिसणारा, काजू बी सारखा दिसणारा दगड माझ्याकडे होता.
ट्रेक ला गेल्यावर पण हा उत्साह असतो. आम्ही दगड गोळा करुन जी एसच्या सॅकमधे टाकत राहतो. ( मग कधीतरी त्याच्या लक्षात येते ते )

नगर परिसरात केवळ दगडांचे एक संग्रहालय असल्याचे, लोकसत्ता मधे वाचले होते.

अरे वा ! मलाही हे असं सगळं गोळा करायला आवडतं. हि सवय आईमुळे लागली. माझ्या आईला सुकलेली रानकणसं, वेगळ्या आकार, रंगांचे दगड, वळलेली लाकडं( काष्ठशिल्प करायला) गोळा करायला आवडायची.
तुमच्या पाँड्चा फोटो बघायला आवडेल Happy
धनु.

सही आहे..... आयडीया आणि लेख दोन्ही Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

मनिष, वॉटरप्रूफ मार्कर्स चांगले असतात.

धनु. मीपण छोटे छोटे कोन्स गोळा करून सजावट करते. यलोस्टोनमध्ये खुप प्रकारप्रकारचे कोन्स मिळाले. आगदी अर्ध्या इंचापासून. सुरेख आकाराचे. फोटो टाकेन.

मस्त पण मला त्यावर तारीख टाकायची आयडीया फारशी आवडली नाही. म्हणजे दगडासारख्या नैसर्गिक सुंदर गोष्टीला फारस कोष्टकात टाकल्यासारखं वाटलं. IMHO
मी मधे म्हादेईच्या किनार्‍यावरून आणलेत काही दगड पण ते मस्तपैकी एका कॉर्नरमधे मांडून ठेवणार मूहूर्त लागला की.

सुविनियर म्हणून शॉट ग्लास बेस्ट. जागा व्यापत नाहीत फारशी आणि इतर वस्तूंपेक्षा स्वस्त असतात.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

आमचा फ्रि़ज आधीच भरला आहे.. मात्र ही दगडांची आयडिया मस्त!!
प्राजु
http://praaju.blogspot.com/