मृगजळ-२

Submitted by प्राजु on 26 June, 2009 - 14:12

मृगजळ-१

"न्हाय पोरी.. जे सांगते ते नीट ऐक्.. ह्यो आबा.. त्यो तुझा बा न्हाई... मी त्याची घरवाली बी न्हाई.. रखेली हाय. " असं सांगून माय पुन्हा बांध फुटल्यासारखी रडायला लागली..
राणीवर वीज कोसळली होती...
"माऽऽऽऽऽय... .. अगं काय सांगतियास ह्ये?? कोन हाय माझा बा? माऽऽय्..कोन हाय गं माझा बा?" राणीने अकांत मांडला..
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"माऽऽय बोल गं... ए माऽऽय!!" राणीचं सर्वांग कापत होतं. रखेली या शब्दाचा अर्थ न समजण्या इतकी ती लहान नक्कीच नव्हती. "आपली माय रखेली..!!!" कानात कोणीतरी शिशाचा उकळता रस ओतत आहे असं तिला वाटलं. पाखरांनी भरलेल्या झाडावर वीजेनं कोसळावं तसा "रखेली" हा शब्द तिच्यावर कोसळला होता. तिची माय... आणि रखेली??? छे!!! त्यातून सावरायला तिला खूप खूप वेळ लागला. ती एकटक माय कडं बघत होती. मायच्या चेहर्‍यावर बदलणारे भाव ती टिपत होती. "रखेली... रखेली... रखेली.." या एका शब्दानं तिचा आत्मविश्वास, तिचा मायवरचा विश्वास, तिचा देवावरचा विश्वास.. या सगळ्यांना तडा दिला होता.

"पोरी.... माजा बा, दारूडा असला तरी चांगला व्हता. लई जीव होता माज्यावर त्याचा. एक दिवस सांच्याला पिऊन जो पड्ला तो उठलाच नाही. मला तर माजी माय आटवत बी नाय. ह्यो आबा अन त्याची माय दोगांची खानावळ व्हती. मी खानावळीत फरशी, भांडी घासायचं काम कराया लागले. आबाच्या मायनं खानावळीतच रहायला जागा दिली. दिवसभर काम करून रात्री हितंच झोपायची मी. आबाची माय मेली अन ह्यानं हित्तं दारूचा गुत्ता चालू केला. म्या हितंच राह्यले. दारूचे ग्लास अन भांदि धुवून हितंच र्‍हायले. "
एक मोठ्ठा श्वास घेतला मायनं आणि तीनं राणीकडं पाहिलं. राणी थोडीशी शांत झाली होती. मायलाही थोडं बरं वाटलं.
"आबाच्या राज्यात, तोंडवर करून बोलायची सोय न्हाई हे तर तुला म्हाईतंच हाय. मी मुकाट माजं काम करायची. एकदिवस "त्यो" भट्टीत कामाला आला. असंल माझ्यापेक्षा १-२ वर्सानी मोठ्ठा. ना कधी मी त्याचं नाव इचारलं ना त्यानं माजं !! पण माजं मन त्याच्यावर जडलं व्हतं. त्यो बी, भट्टी लावता लावता माज्याकडं बघायचा.. हसायचा. पर कद्धीसुदिक आमी बोल्लो न्हाय एकमेकाशी. आबाची लय भ्या वाटायची. त्याच्याकडं बघताना.. लई इश्वास वाटायचा त्याच्याबद्दल. आबाची आरडावरड चालूच असायची. आन् एकदिवस.. आबा लई चिडला व्हता. कोनाशी तरी भांडन करून आल्याला त्यो. "त्यो" भट्टीत गूळ घालत व्हता.. मी त्याच्याकडं बघत ग्लास उचलीत व्हते. माझ्या हातनं ४-५ ग्लास एकदम खाली पडले अन फुटले. आबा यकदम खवळला.... त्याच्या डोळ्यांत रगात उतरून आलं. "तुझ्या मायला..... !!!!!!!!!फुक्कट र्‍हाती अन्..त्याच्याकडं बघत काम करतीस काय... थांब आज तुजं ते डोळंच फोडतो..." असं म्हनत आबा एक फुटकी बाटली घ्यून माझ्या अंगावर आला. 'त्यो' तिथचं व्हता.. त्यानं लगोलग येऊन आबाचा हात धरला..त्याला मागं ढकलून मला एकदम जवळ ओढत्... मला घेऊन तो पळून गेला. आबा मागं आलाच पळत. आमी पळत पळत .. सिकंदरच्या भट्टीच्या गोदामात गेलो. पोरी.... .. घाबरून बसलो.. अन्.... आमच्याही नकळत आम्ही एकमेकाच्या इतकं जवळ आलो.. ती वेळ... अजूनपन तश्शीच येती डोळ्यापुढं. त्याच्या मिठीत मला जगातलं लई मोठं सुख मिळालं व्हतं. त्याच्या मिठीत आधार मिळाला होता. त्याच्या कुशित इस्वास मिळाला होता. माज्यावरचं त्याचं प्रेम समजलं व्हतं. वाटलं व्हतं.. वाळवंटामंदी खरंच पान्याचा झरा आला हाय आणि आता या वाळवंटाचं नंदनवन हुईल."......... बोलता बोलता मायच्या डोळ्यांत भूतकाळ तरळून गेला. राणी जीव कानांत एकवटून मायचं बोलणं ऐकत होती.

"पण पोरी... आम्ही सावरतोय तोवर आबाची माण्सं तिथं आली.. अन् त्याला ओढत घ्यून गेली.. हे सगळ इतकं भराभर झालं राणी.. .. काही विचार करायला थोडासुदिक टाईम न्हाय भेटला. पन त्या दिसानंतर "त्यो" कद्धीच दिसला न्हाय मला. दिनू म्हनाला आबानं त्याला चोरीच्या अरोपाखाली पोलिसात दिलं. मी कुटं जानार?? कोन व्हतं मला...? त्योच तुरूंगातून सुटून येईल एकदिवस म्हणून वाट बघत राह्यले गुत्त्यावर काम करत. पण एकदिवस लक्षात आलं... मला दिवस गेलेत. मला लई आनंद झाला. पन .. त्याला ह्ये कोन सांगनार?? आबाला कळलं.. त्यानं अकांत तांडव केला.. "आई असताना कामाला ठेवली म्हणून माजलीस काय..? नंदाकडं नेऊन इकली तर पैकं तरी मिळतील... !!! माद****द!!" लई गयावया केली तेवा आबानं हितं र्‍हाऊ दिलं. पन त्यानं अट घातली..माज्या लेकराला म्हंजी तुला त्यो त्याचं नाव दील.. पन मी जन्मभर त्याची रखेली म्हनून र्‍हायचं. मला घर नव्ह्तंच. आणि हितं र्‍हायले तर "त्यो" एकदिवस मला न्यायला येईल असं वाटत व्हतं. आबानं त्याचा शब्द पाळला.. तुला नाव दिलं त्याचं , मी थोडं काम करून तुला शिकवीत व्हते. पन आता..? पोरी... आबाची तुझ्यावर वाईट नजर हाय! मी ही अशी... !! पोरी, तुझं तुला सांभाळयला हवं आता. ही माय न्हाय गं आता तुला पुरी पडनार... माजं सगळं संपलं गं आता... जप बाई स्वतःल जप." असं म्हणत माय एकदम रडायला लागली. यावेळी मायला शांत करावं असं राणीला वाटलं नाही. ती मायच्या या बोलण्याचा विचार करत होती. माय म्हणत होती त्यातही तथ्य होतं. पण मायला आपला बा कोण आहे ? त्याचं नाव काय आहे हे ठाऊक नसावं याचं तिला वाईट वाटलं. "राणी.... सगळीचं मानसं वाईट नसतात गं. तुला सुद्धा तुला समजून घेनारा गावलंच कुनीतरी.. तुझ्या बा सारखा. तुजं समदं नीट व्हायला पायजे. ह्ये वाळवंटातलं जगनं तुझ्या वाटंला नगं गं बाय माजे....तू... तू निघून जा हितनं. लांब जा.. स्वत: वाघिन हो. ह्या आबापासनं आदी लांब जा. हितनं बाह्येर पड पोरी आदी या नरकातनं बाह्येर पड. न्हायतर त्या आबा तुला त्या चंदाला इकून मोकळा हुईल... तुला जायलाच पायजे हितनं." मायचा बांध पुन्हा फुटला. ती ज्या कळकळीनं सांगत होती.....त्यावरून राणीला अंदाज आला की आबा काय करू शकतो. तिच्या हेही लक्षात आलं की, माय रखेली असली तरी आपण ह्या आबाची औलाद नाही. आणि याचंच तिला खूप बरं वाटलं. रडून रडून थकलेल्या मायला मीठ्-भात भरवून राणी बाहेर ओट्यावर येऊन बसली. काहीतरी मनाशी ती निश्चय करत होती. 'काय करावं?? आज रात्रीच किंवा उद्या रात्री. आबा झोपलेला असताना माय ला घेऊन बाह्येर पडायचं ... सकाळी साखर कारखान्याला ऊस घ्यून जानारे ट्र्क दिसतात हाय्वेला. त्यांतला एका ट्रक मधून लांब जायचं. पडेल ते काम कराय्चं. मायला सरकारी इस्पितळात घेऊन जायचं तिच्यावर उपचार करायचे... पुढं काय होईल ते होऊदे.. पण ह्या आबापास्नं मायची नी आपली सुटका करून घ्यायची. ' तिनं मनाशी हे अगदी पक्कं केलं. म्हंटलं तर थोडी भिती... म्हंटलं तर थोडा उत्साह.. अशी काहीतरी विचित्र अवस्था झाली होती तिच्या मनाची. आता आबा घरी आला की, त्याला जेवायला वाढायचं.. जेवन करून तो पुन्हा गुत्त्यावर गेला की, मायला हा आपला प्लॅन सांगायचा आणि मग मध्यरात्री दोघिनी घर सोडायचं... असं तिनं मनोमन ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे आबा रात्री आला तोच तणतणत! दोघा मायलेकिंना भरपूर शिव्या घालतच आला तो. आबाला पाहताच राणीच्या कानांत पुन्हा तो शब्द घुमू लागला.."रखेली.. रखेली..." !! त्याला वाढता वाढता तीचं लक्ष आबाकडं गेलं.. त्याची नजर तिच्या शरीरावरून फिरत होती. तिला त्याची किळस आली. कसंबसं त्याला वाढून ती मायपाशी जाऊन बसली. माय झोपली होती. चेहरा अतिशय शांत होता. मनातली खळबळ शांत झाल्यासारखा. आजारी असली तरी माय आज प्रसन्न दिसत होती. आणि कितीतरी दिवसांनी मायला शांत झोप लागली होती. ..याचं तिला बरं वाटलं. आधाशा सारखा जेऊन आबा परत गेल्या गुत्त्यावर.

तिनं बाकीची आवरा आवरी केली. मायचं पातळ, आपले पंजाबी ड्रेस..असं सगळं तिनं एका गाठोड्यात भरलं. मायला वस्तीवरच्या डॉक्तरनं दिलेली औषधं तीनं न विसरता गाठोड्यात बांधली. बरोबर असाव्या म्हणून २-३ भाकरी करून घेतल्या. हे सगळं बांधलेलं गाठोडं आबाला दिसू नये म्हणून तीनं ते मायच्या पलंगाच्या खालच्या खणात ठेऊन दिलं. आबा रात्री येऊन झोपला की आपण निघायचं..बस्स!!! आपला हा सगळा प्लॅन माय ला सांगायला हवा. तिला जागीच रहा असं सांगायला हवं आणि त्याआधी तिला थोडं जेवायला घालायला हवं.. असा विचार करत ती उठली. तिला खूप उत्साह आला होता..
"माय.. ए माय! उठ गं.. थोडं जेवून घे. आज रात्रिच हे वाळवंटातलं जगणं संपणार आहे.. बघ तू. हितनं लांब जायचंय आपल्याला. खूप लांब." ताट वाढता वाढता ती बोलत होती..
मायचं ताट वाढून घेऊन ती माय जवळ आली.."माय... ए माय... माय गं!!! माऽऽऽऽऽऽऽऽऽय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!" हातातलं ताट थाडकन् खाली पडलं. मायनं जगणं केव्हाच संपवलं होतं आणि ती खूप खूप लांब निघून गेली होती...........

अपूर्ण..

गुलमोहर: 

खूप छान जमली आहे कथा. पुढच्या भागाची वाट पहात आहे.

खरच खुप छान आहे कथा......पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

आवडली कथा. पुढचा भागही लवकर येउ देत.

मला एड्स झालाय. मी न्हाय जगत आता. पण तू सांबाळून र्‍हा पोरी.."
राणीच्या मायला एड्स कसा झाला ?
आबा तर धडधाकट वाटतोय मग आणि आता तिची माय पण ह्या जगात नाही तो प्रश्न अनुत्तरीत राहणार काय ?

आबा धडधाकट आहे म्हणजे त्याला एड्स झाला नाही असं नाही. आणि तो धडधाकट आहे असा उल्लेख कुठेही कथेत नाहीये. त्याचा हेकेखोर आणि तणतण करणार स्वभाव फक्त वर्णन केला आहे.

दुसरी आणि प्रामाणिक गोष्ट मी आबा धडधाकट कसा हा विचार नव्हता केला. आपण सांगितल्यानंतर पुन्हा एकदा कथा वाचली, तेव्हा लक्षात आलं की आबाच्या तब्बेतीबद्दल कुठेही मी उल्लेख केलेला नाहीये. त्याला झालेला एड्स हा अजून तो पार कोलमडून पडावा इतक्या स्टेज ला गेला नसावा असा विचार करायला जागा आहे. Wink

प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु, पुढच्या भागाची वाट पहातोय...........