कवितेचा शब्द, अर्थ

Submitted by अनन्त्_यात्री on 25 May, 2026 - 01:11

कवितेचा जन्म कसा?
अपार देखणा !
शब्द जन्मखुणा, अर्थ
प्रसवाच्या वेणा

शेषामाथी पृथ्वी तसा
कवितेचा तोल
शब्द कल्लोळ केवळ,
अर्थ डोह खोल

भूल घाली कवितेची
अनाहत साद
पावश्याची हाक शब्द,
अर्थ मेघनाद

ध्यानी मनी कवितेचा
चाफा लपलेला
शब्द जड-शीळ झाला,
अर्थ हो चित्कला

Group content visibility: 
Use group defaults