नाते

Submitted by अनन्त्_यात्री on 3 May, 2026 - 03:20

तुका विठू नाते कसे
स्मूक्ष्माचे जे विराटाशी
थेंबाचे जे सागराशी,
ठिणगीचे चांदणीशी,
क्षणार्धाचे कालौघाशी..
..तसे त्या दोघांचे नाते

तुका विठू नाते कसे
लेक माऊलीचे जसे
थोडे रुष्ट, थोडे तुष्ट,
तर्कापार, स्वयंस्पष्ट,
दृश्या खेळवी अदृष्ट..
..तसे त्या दोघांचे नाते

तुका विठू नाते कसे
ज्ञाताचे ज्ञेयाशी जसे
एकमेकाला जोखता,
क्षणा-कणाने वाढता,
घेई कवेत अनंता..
..तसे त्या दोघांचे नाते

Group content visibility: 
Use group defaults

देव भक्त विलक्षण
कोणा कळेचि नाते

सुंदर, भावस्पर्शी काव्य... __/\__

सुंदर.
मला माऊलींच्या या ओळी आठवल्या
कोणाचे हें रुप देह हा कोणाचा ।
आत्माराम साचा सर्व जाणे ॥१॥
मीतूं हा विचार विवेकें शोधावा ।
गोविंद हा ध्यावा याच देहीं ॥२॥