अगं अगं बशी..! - १

Submitted by प्राजु on 15 June, 2009 - 14:47

सर्वसाधारणपणे पब्लिक ट्रान्स्पोर्ट.. म्हणजे सार्वजनिक वाहतूकीची साधने कोणती ?? असा प्रश्न जेव्हा शाळेमध्ये विचारला जायचा तेव्हा अगदी न चुकता बस, टांगा, रिक्षा .. अशी यादी असायची. कारण मी शाळेत होते तेव्हा सिक्ससीटर, पिग्गि, मिनी बस असले प्रकार नव्हते. तुम्ही श्रीमंत असाल तर रिक्षातून जा.. नाहीतर टांगा, बस आहेच.
इचलकरंजी मध्ये तेव्हा डेक्कन पासून एस टी स्टॅण्ड पर्यंत टांग्याची वाहतूक होती. म्हणजे गुरू टॉकि़ज पर्यंत १ रूपया आणि एस टी स्टँड पर्यंत १.५० रूपया. घोड्याच्या मागे असलेल्या टांग्यात बसायला खूप आवडायचं. याचं कारण असं, की घोड्याच्या डोक्यावर लावलेला पिसाचा तुरा, घोडा पळायला लागला की मस्त हलायचा आणि नुकत्याच तेव्हा पाहिलेल्या मर्द सिनेमातल्या अमिताभ बच्चन आणि अमृता सिंग यांची आठवण यायची. Happy पण ही टांग्याची सोय होती फक्त एस टी स्टॅण्ड पर्यंतच. डेक्कन ते एस टी स्टॅण्ड!!! मग आमची शाळा होती राजवाडा चौकात. ते अंतर इतकं मोठं होतं की, बस शिवाय पर्याय नव्हता.. चौथी पर्यंत रिक्षाने शाळेत गेले. पाचवी नंतर तरी बस जाता येईल.. व्वा! असं वाटलं. कोरोची -शिरदवाड्-कोरोची अशी बस असायची. बसने घरी यायला १ तास लागायचा म्हणून आई-बाबांनी पुन्हा रिक्षा लावली आणि बस च्या मागे "हुईईईईईईईईईई!" करून आपण पळतो आहोत हे माझं स्वप्नं अपुरंच राहिलं.

शाळेत ६ वीत एकदा गणितात मार्क कमी पडले म्हणून आईने मला राजवाड्याजवळ असलेल्या एका गणिताच्या क्लास ला घातलं. तो क्लास सकाळी ९-०० ते १०-०० असायचा. तेव्हा रिक्षा १०.१५ ला यायची शाळेत नेण्यासाठी. त्यामुळे सकाळी क्लास ला जाण्यासाठी बस हा पर्याय निवडला. आणि संध्याकाळी एकदम शाळा सुटल्यावर येताना रिक्षा. हरकत नाही!! एक वेळेला तर एक वेळेला!!! झालं ..माझं बसचं पर्व सुरू झालं..!!! आणि इथूनच.... अगदी इथूनच आपण दोघी (मी आणि बस) समांतर रेषा आहोत कधीही एकत्र न येणार्‍या याचं प्रत्यंतर आलं. सकाळी ९ चा क्लास, मी ८.३० ची बस पकडायला बाहेर पडायची. पहिले दिवशी बहुतेक बाकीच्यांचे नशिब जोरावर होते म्हणून बस वेळेत आली.. मी अगदी गुणी मुलीसारखी क्लास ला वेळेत पोचले. क्लास झाल्यावर जवळच्याच मैत्रीणीकडे जाऊन सकाळच्या वेळेसाठी आईने दिलेली पोळी-भाजी खाल्ली.. मग शाळेत गेले. व्यवस्थित ८ तास बसून अभ्यास केला आणि संध्याकाळी रिक्षातून घरी आले. व्वा!!! काय थ्रील होतं!! पण हे थ्रील काही फार काळ नाही अनुभवता आलं. अगदी दुसर्‍याच दिवशी माशी शिंकली. झालं असं.. की मला निघायला ५ मिनिटं उशिर झाला आणि मी बस स्टॉपवर पोचले तेव्हा बस माझ्या समोर अशीऽऽऽ निघून जाताना मी पाहिली. घरी आले, आणि बाबांना इतक्या लांब सोडायला चला म्हणून हट्ट केला.. बाबांनी सोडलं ! तो दिवस पार पडला. तिसरे दिवशी घरातून मुद्दाम ५ मिनिटे लवकर बाहेर पडले, स्टॉप वरही बरीच लोकं दिसत होती. मात्र बराच वेळ झाला तरी बस आली नाही. शेवटी कुठून तरी समजलं बस कोरोची ला ब्रेक डाऊन झाली आहे. ब्रेक डाऊन होणं म्हणजे ब्रेक डान्सचाच वेगळा प्रकार असावा असं वाटलं तेव्हा. मात्र बस कशी असा डान्स करेल?? घरी परत आले आणि आईला विचारलं.. तर उत्तर मिळण्या ऐवजी आजोबांच्या सोबत क्लास ला पाठवण्यात आलं. चौथ्यादिवशी बस आली, मी चढले मात्र... एस टी स्टॅण्ड जवळ एक टांगा पलटी झाला होता.. घोडा खाली रस्त्यावर झोपला होता आणि इचल सारख्या छोट्या शहरात मेन रोड ब्लॉक झाला होता. त्यामुळे ९.०० ला क्लास ला पोचणारी मी, ९.३० ला पोचले आणि "लवकर आलात महाराणी!!!" अशी त्या सरांची बोलणीही खाल्ली. घरी आल्यावर घडलेला वृत्तांत जसाच्या तसा अगदी त्या घोड्याच्या रंगापासून, तो ज्या पोज मध्ये रस्त्यावर झोपला होता त्याच्या सकट, त्याच्या तरीही छान दिसणार्‍या डोक्यावरच्या तुर्‍यापर्यंत यथासांग वर्णन करून झालं. पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मी स्टॉप वर जाऊन उभी राहीले.. पण बसच आली नाही. कारण काही समजले नाही. मात्र आली नाही हे खरं. ९.१५ पर्यंत वाट बघून पुन्हा ९.३० च्या ठोक्याला मी घरात हजर. तो पर्यंत बाबाही गेले होते आणि आजोबाही. आणि सकाळी बसने जाणार म्हणून रिक्षावाल्या मामांना सकाळी येऊ नका असं सांगितलेलं.. त्यामुळे मला शाळेत सोडायला आईलाच यावं लागलं ते ही स्पेशल रिक्षा करून. शनिवारी सकाळची शाळा.. त्यामुळे क्लास नव्हता. रविवारी आई-बाबांचं काय बोलणं झालं कोणास ठाऊक पण.. सोमवार पासून माझा तो गावातला क्लास मात्र बंद झाला. आणि बसशी होऊ घातलेलं नातं मध्येच तुटलं.

त्यानंतर बसचा तसा संबंध कधी आला नाही. कोल्हापूरला देवीच्या देवळात जाताना भवानी मंडप नावाची बस पकडायला लागायची. राजारामपुरीतून मंडपात जाणे बसने.. मस्त वाटायचं!! सोबत मैत्रीणी असल्या की, बस अगदी वेळेवर यायची आणि वन पीस मध्ये भवानी मंडपात पोचायची कुठेही ब्रेक डाऊन न होता. (आता ब्रेक डाऊन चा अर्थ समजायला लागला होता). मैत्रीणींसोबत चकाट्या पिटत बस मध्ये मस्त वेळ जायचा. असंख्य प्रकारचे वास, भाजीच्या बुट्ट्या, कोल्हापूरी चपलांची कर्र कर्र.. पानाच्या पिंका, तोबर्‍यात (पानाच्या) बोलणारा कंडेक्टर, वाटेत कोणी आडवं आलं तर, "अरेऽऽए! **व्या... काय माझीच गाडी गावली का रं मराया?" अश्शी करकचून शिवी हाणणारा चालक... सगळा माहोल प्रचंड जिवंत. त्यातच.. कधीकधी इंजिनियरिंगच्या मुलांनी कंडेक्टरशी घातलेली हुज्जत, त्यांची चालणारी टवाळकी.. मजा यायची. पण हे सगळं अनुभवायला मिळायचं केव्हा.. तर माझ्या मैत्रीणी सोबत असतील तेव्हा आणि तेव्हाच. कारण मी एकटी स्टॉपवर उभी असले तर चुक्कुन सुद्धा बस यायची नाही वेळेत. उशिराच येणार, किंवा आधीच गेलेली असणार .. कमितकमी कॅन्सल तरी झालेली असणार. मैत्रीणींचं नशिब चांगलं .. त्यांच्यामुळे मला बस मिळायची. मी एकटी मैत्रीणींशिवाय उभी असले स्टॉपवर तर आजूबाजूच्या लोकांना माझ्यामुळे बस मिळायची नाही. आमचं वाकडंच ना!! म्हणजेच काय.. तर आम्हा दोन समांतर रेषांना जोडणारी तिसरी रेषा कंपल्सरी हवीच!!

क्रमशः

- प्राजु

गुलमोहर: 

<<इचलकरंजी कोरोची -शिरदवाड्->>

ही खरोखर गावाची नावे आहेत का? कुठल्या देशात? की विनोदी कथेसाठी विनोदी नावे निवडली आहेत? गंमत करत नाहीये, मला खरेच माहित नाही.
Happy Light 1

प्राजु..छान लेख.

<<<<<<<<<<ही खरोखर गावाची नावे आहेत का? कुठल्या देशात? की विनोदी कथेसाठी विनोदी नावे निवडली आहेत? गंमत करत नाहीये, मला खरेच माहित नाही>>>>>>>>>>>>>

कोरोची , शिरदवाड...माहीत नसले..तरी ईचलकरन्जी माहीत असायला हरकत नाही महाराश्ट्रीयन लोकाना!..किमान अशा प्रकारची नावे असतात एव्हढे तरी....त्यासठी तिथेच राहीले पाहीजे असे कही नाही...
फुलराणी

अरेच्या माझी शाळा पण तीथेच होती. १ नं. ShaLa. nMntar mee kagal la gelo 1989 la.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

छ्या:! आम्हाला असली काही मज्जा अनुभवायला मिळाली नाही!
आम्ही नेहेमी पुणे नाहीतर नागपूर या शहरात राहिलो. तिथे कश्शाची मज्जा नसते. सगळेच सगळ्यांना लहानपणापासून माहित असते. अगदी विमानपर्यंत. मग टांगे नि रिक्षा नि बस यांच्यात मजा वाटण्याजोगे काहिच नाही! पायी गेले तरी वाटेत तेच ते. दुकाने, घरे! कुठे जवळपास चिंचा बोरांची झाडे नाहीत, नुसते उजाड सिमेंटचे वाळवंट!

Happy Light 1

प्राजु झकास लेख. दुर्दैवाने आमच्या लहानपणी बसचा फारसा संबंधच नाही आला. चार किमी चं अंतर मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करत पार करण्यात जी मजा होती ती बसच्या प्रवासात थोडीच असणार आहे. आणि त्यातुन वाचलेल्या पैशामध्ये कल्पना टॉकीजला ब्रुसली, जॅकी चेन चे पिक्चर बघता यायचे, हाही एक महत्वाचा फॅक्टर होता.

***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)

छान लेख Happy

कोरोची , शिरदवाड...माहीत नसले..तरी ईचलकरन्जी माहीत असायला हरकत नाही महाराश्ट्रीयन लोकाना!.. >>> अर्थातच .. भुगोल - महाराष्ट्राचा शिकलेल्या लोकांना.. Happy