१४ ऑक्टोबर २०२४ रात्रीचं चंद्र- शनि पिधान आणि धुमकेतू

Submitted by मार्गी on 14 October, 2024 - 04:15

आज १४ ऑक्टोबर २०२४ रात्री चंद्र- शनि पिधान!

C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतूचे संध्याकाळच्या आकाशात आगमन

✪ शनि- चंद्र पिधान बघण्याची दुर्मिळ संधी
✪ एका क्षणात शनि चंद्राच्या अंधार्‍या भागामागे अदृश्य होणार व काही वेळाने त्याच्या प्रकाशित भागाकडून परत दिसणार!
✪ महाराष्ट्रामध्ये पिधानाची साधारण वेळ रात्री ११.४५ ते १.४० अशी आहे
✪ C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतू संध्याकाळी शुक्राच्या जवळ दिसतो आहे
✪ धुमकेतू बघण्यासाठी अंधारं आकाश व पश्चिम क्षितिज दिसणारी जागा हवी
✪ स्मार्टफोनचा प्रो- मोड वापरून धुमकेतूचा फोटो घेता येऊ शकतो
✪ अनुभवावेत असे दोन्ही विलक्षण अनुभव
✪ आकाश दर्शनाचे महिने सुरू झाले!

सर्वांना नमस्कार. आज रात्री आपल्याला आकाशातल्या दोन विलक्षण घटनांची अनुभव घेण्याची संधी आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे धुमकेतू C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS). आता हा धुमकेतू संध्याकाळच्या आकाशामध्ये दिसतो आहे. पुढचे काही‌ दिवस म्हणजे १४ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर तो पश्चिमेकडे तेजस्वी शुक्राच्या उजव्या बाजूला दिसेल. पुढचे १० दिवस ह्या धुमकेतूला बघण्याचे सर्वोत्तम दिवस आहेत. शहरापासून दूर अंधारं आकाश असलेल्या ठिकाणी तो फिकटसा पांढरा ठिपका म्हणून नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतो. बायनॅक्युलर व छोट्या टेलिस्कोपने तो जास्त चांगला दिसेल. त्याची रोजची आकाशातली स्थिती तुम्ही stellerium सारख्या खगोलीय ॲपवर बघू शकता. स्मार्टफोन वापरून त्याचा फोटोसुद्धा घेता येऊ शकेल. त्यासाठी कॅमेराचा प्रो- मोड वापरता येईल. शटर स्पीड ४ सेकंद किंवा ८ सेकंद, ISO हे ८०० किंवा १६०० (तुम्हांला जितकं अंधारं व काळं आकाश दिसत असेल त्यानुसार), फोकस इनफिनिटी अशी सेटींग करता येऊ शकेल. मोबाईल पश्चिमेचा फोटो घेईल असा तिरपा स्थिर ठेवून टायमर ५ सेकंद ठेवता येईल. त्यानंतर फोटो घेताना थोडा वेळ मोबाईल स्थिर ठेवायचा (टायमरचे सेकंद + शटर स्पीडचा अवधी). त्यानंतर तुम्हांला फोटो घेता येईल. काही‌ वेळा प्रयत्न केल्यावर धुमकेतूचा फोटो घेता येऊ शकतो.

(आकाश दर्शनाबद्दलचे माझे इतर लेख इथे उपलब्ध)

धुमकेतूचं निरीक्षण हा नेहमीच विलक्षण अनुभव असतो! आपण इंटरनेटवर बघतो त्या फोटोमध्ये असतो, तसा तो कदाचित दिसत नाही! पण तरीही इतक्या दूर असलेला हा अंधुक पांढरा धुळीचा डाग बघणं हा विलक्षण अनुभव असतो. जर आकाश अगदी काळं असेल व दृश्यमानता उत्तम असेल, तर आपल्याला त्याची अनेक अंश पसरलेली शेपूटही दिसू शकते! आणि अर्थातच धुमकेतू आपल्याला संयम शिकवतो! धुमकेतू शोधण्यासाठी व बघण्यासाठी अनेक रात्री लागू शकतात. हा धुमकेतू सूर्याकडे येत असताना पहाटे दिसत होता तेव्हा अनेकदा प्रयत्न करून दिसला नाही. आणि तो संध्याकाळच्या आकाशात आल्यावर ढग आले होते. त्यामुळे आपल्याला ढगांची व दृश्यमानतेच्या स्थितीचीसुद्धा साथ असावी लागते.

आज रात्रीचा मुख्य सोहळा मात्र मध्यरात्रीचं चंद्र- शनि पिधान आहे! त्याच्यासाठीसुद्धा आपल्याला ढग नसण्याची प्रार्थना करावी लागेल! सध्या शनि कुंभ राशीमध्ये आहे. रात्री चंद्र काही वेळेसाठी पृथ्वी व शनिच्या मधोमध येईल व त्यामुळे शनि झाकला जाईल! मंगळाचं असं पिधान बघणं हा थरारक अनुभव होता! त्यामुळे हा अनुभव अजिबात चुकवण्यासारखा नाही! अचानक एका क्षणात शनि चंद्राच्या अंधार्‍या भागाच्या मागे “दिसेनासा” होतो आणि नंतर परत एका क्षणात तो चंद्राच्या प्रकाशित भागाच्या बाहेर दिसायला लागतो- हे दोन्ही क्षण थरारक असतात! शनि चंद्राच्या तुलनेत फार जास्त दूर आहे. चंद्र साधारण तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे तर शनि आपल्यापासून सुमारे १३५ कोटी किलोमीटर अंतरावर आहे! चांगल्या टेलिस्कोपद्वारे शनि व चंद्राचा एकत्र फोटोसुद्धा घेता येऊ शकतो. नुसत्या डोळ्यांनी बघताना चंद्रामुळे झाकला जाण्याच्या काही मिनिटे आधी शनि चंद्राच्या प्रकाशाच्या तेजामध्ये दिसेनासा होईल व पलीकडून बाहेर आल्यानंतरही काही मिनिट चंद्राच्या तेजामुळे दिसणार नाही. ही‌ घटना बायनॅक्युलर किंवा छोट्या टेलिस्कोपने चांगली बघता येऊ शकते.

ह्या दोन्ही आवर्जून बघण्यासारख्या आहेत व मुलांना दाखवण्यासारख्या आहेत! प्रयत्न तर नक्कीच करण्यासारखा आहे. जरी धुमकेतू पहिल्याच संध्याकाळी दिसला नाही, तरी प्रयत्न करणं व हे मुलांना सांगणं उपयोगाचं आहे. आपण ह्या घटना मोबाईल किंवा युट्युबवर नाही तर प्रत्यक्ष आकाशात बघूया! धुमकेतूच्या निमित्ताने मुलांना संयमाचं उदाहरणही सांगता येऊ शकतं! त्यासाठी वेळ लागतो व प्रयत्न करावे लागतात. पण जेव्हा धुमकेतू दिसतो, तेव्हा तो क्षण अविस्मरणीय बनतो! तेव्हा धुमकेतू बघायला तयार राहू! शेवटी तो सुमारे ८०,००० वर्षांनी आपल्या सूर्याला भेटायला आलेला पाहुणा आहे ना!

आणि हो, आकाश दर्शनाचे दिवस सुरू झाले आहेत. येत्या आठवड्यामध्ये पावसाचा शेवटचा स्पेल संपल्यानंतर निरभ्र आकाश मिळणार आहे! माझी आकाश दर्शनाचे सत्र लवकरच सुरू होत आहेत. आपल्या ठिकाणी असं सत्र आयोजित करायचं असल्यास संपर्क करू शकता. माझा टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह मी २५ जणांच्या ग्रूपसाठी असे आकाश दर्शन सत्र घेत असतो.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या ब्लॉगवर माझे आकाश दर्शनाचे अनुभव वाचता येतील. त्यासह तिथे ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान इ. बद्दलचे माझे लेख वाचता येतील. तुम्हांला अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहेर जाऊन पाहिले. आकाश पुर्णपणे ढगांनी भरलेय. चंद्राचाच पत्ता नाहीय तर बाकीचे काय दिसताहेत. अ‍ॅपवर दोन्ही पाहुन घेतले.

लेख छान आहे. माहितीबद्दल धन्यबाद.

धन्यवाद मार्गी. तुमचा लेख काल वाचनात आला आणि आज विमानप्रवासात माझ्या बाजूलाच शुक्रतारा दिसला. म्हणून जवळपास धूमकेतू शोधला असता तो ही दिसला. मध्ये विमानाची काच असल्याने आणि मोबाईलवरून फोटो काढल्याने इतपतच चांगला आला.

Screenshot_20241014_220135_Gallery.jpg

@ rmd जी, अरे वा! खूपच मस्त! उंचावर प्रकाश प्रदूषण नसल्यामुळे काचेमधूनही फोटो चांगला आलाय!

चंद्रामागे जाणारा शनि बघण्याचा विलक्षण अनुभव!

काल संध्याकाळी खूप ढग असल्यामुळे धुमकेतू C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) बघता आला नाही. नंतर तर पाऊस पडला. पण अगदी मोक्याच्या क्षणी ढगांनी वाट दिली आणि पिधान बघता आलं! काय अनुभव होता तो! माझा मित्र गिरीश मांधळेसोबत त्याच्या ८ इंची टेलिस्कोपसह हे पिधान बघण्याचा आनंद घेता आला. आम्ही दोघांनी २३ जानेवारी २००२ ला झालेलं चंद्र- शनि पिधानही बघितलं होतं (२२.५ वर्षांपूर्वी)! आणि परत काल एकत्र बघितलं. ह्यावेळी माझा ४.५ इंची टेलिस्कोप व बायनॉक्युलरही होता. अतिशय ढगाळ वातावरणामध्ये मध्यरात्रीपर्यंत वाट बघावी लागली! पण जेव्हा बघायला मिळालं तेव्हा ते नितांत अद्भुत होतं!

फोटोज व व्हिडिओज

चंद्राचा मोठा पृष्ठभाग व त्याच्याजवळ येणारा शनि! हळु हळु तो चंद्राच्या जवळ येत गेला आणि अप्रकाशित बाजूच्या मागे गेला! पण हे एका क्षणात झालं नाही तर हळु हळु झालं. टेलिस्कोपिक व्ह्यूमधून खूप छान दिसलं. पहिले एका बाजूची कडी दिसेनाशी झाली, नंतर शनिचं बिंब (डिस्क) जायला लागली व नंतर दुसर्‍या बाजूची कडी दिसेनाशी झाली! काही क्षणांसाठी तर शनि अर्धवर्तुळाकार दिसला! चंद्राचा वर्तुळाकार अप्रकाशित पृष्ठभागही दिसला! शनि आणि खड्डे खड्डे असलेला चंद्र!

शनि जेव्हा चंद्राच्या प्रकाशित बाजूने बाहेर आला तेव्हा चंद्राच्या तेजामुळे बराच वेळ दिसला नाही. प्रकाशित बाजू इतकी तेजस्वी होती की फोटोही नीट घेता येत नव्हता. आणि बाहेर आल्यावर कित्येक वेळ डोळ्यांना दिसत नव्हता. पण काय थरारक अनुभव होता! फोटोंचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद.

-निरंजन वेलणकर 09422108376. 15 ऑक्टोबर 2024.

पिधान नाही बघता आलं पण चंद्र शनी युती बघितली. धुमकेतू आज रात्री बघतो दिसला तर. शुक्राच्या जवळ आहे म्हणजे शोधायला सोपा पडेल.

अरे मस्त फोटो.. धूमकेतूचे माहीत होते पण चंद्र शनी कल्पना नव्हती. छान माहिती.

रमड.तुमचेही किलर लक !

नमस्कार. अनेक दिवस रोज प्रयत्न केल्यावर आज पुण्यामधून ढग असूनही काही मिनिटांसाठी धुमकेतू दिसला. ऑफिकस म्हणजे भुजंगधारी तारकासमूहातल्या येड प्रायर आणि येड प्रोस्टेरियर ह्या दोन ता-यांच्या मदतीने दिशा शोधून अखेर धुमकेतू दिसला! पण ढग व प्रकाश प्रदूषणामुळे शेपटी स्पष्ट दिसली नाही. पण धुरकट पट्टा स्पष्ट दिसला! ढगांमध्ये मिळालेल्या थोड्या वेळेत बायनॅक्युलरमधून काढलेला हा फोटो:

ज्यांना ज्यांना धूमकेतू दिसला त्यांचं अभिनंदन! Happy रमड, भारीच मिळालाय फोटो. सोमवारी संध्याकाळी मला एक विमानप्रवास आहे, तेव्हा बघूया दिसतोय का ते.
मी पहाटे बघितला, पण अगदी अंधुक. काल संध्याकाळी आकाश त्या मानाने बरं होतं. शुक्र अगदी दिमाखात चमकत होता, पण धूमकेतूच्या ठिकाणी ढग! Sad

धन्यवाद माधव, झकासराव, अस्मिता, वावे आणि अमुपरी!

वावे, अगदी अचानक धनलाभ टाईप गावला धुमकेतू. Happy तुलापण नक्की दिसेल बघ.

@ RMD जी Happy

चंद्र व शनि पिधानाच्या वेळी शनि चंद्राच्या मागे जातानाचा हा व्हिडिओ. शनिची कडी व वरचा भाग मागे गेलेला दिसतो, शनि अर्धगोल दिसतो व शनिचं बिंब नाहीसं होतं, मग कडीचं टोकही नाहीसं होताना दिसतं. युट्युबवर व्हिडिओ अपलोड केला.

@ मार्गी :

'जी' वगैरे नका लावू आयडीच्या मागे. उगाच राजकारणात असल्यासारखं वाटतं Happy
तुमचा व्हिडिओ फारच छान आहे. शनीची कडी पहायला मजा आली. व्हिडिओ पाहताना शनी रोटेट होतो आहे असा भास होतो Happy काही आप्त-परिचितांशी तुमची लिंक शेअर केली आहे. त्यांनीही व्हिडिओ आवडल्याचे कळवले.

अरे मस्तच! मी काल विमानातून बाहेर धूमकेतू दिसतोय का ते बघण्याचा जाम प्रयत्न केला पण काही दिसला नाही! खिडकी पश्चिमेलाच होती, पण आतच जास्त उजेड असल्यामुळे काचेत प्रतिबिंबच दिसत होतं Lol अजून थोडी लवकरची फ्लाईट असायला हवी होती.
हा काल वाचलेला एक विनोद

Dear comet Tsuchinshan-Atlas, thanks for making a lot more people look at us the last few evenings
-- With Love, Venus and Clouds

@ rmd अरे वा! मस्त! ओके! Happy

@ वावे जी, हो ना!

अपडेट-

पवना जलाशयाजवळ अंजनवेल इथे मी व माझ्या मित्राने २६ व २७ ऑक्टोबर रोजी धुमकेतू दर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम घेतला. तिथे आठ इंची, साडेचार इंची टेलिस्कोप्सने व १५ X ७० बायनॅक्युलरनेही धुमकेतू छान दिसला. बायनॅक्युलरनेही टेल छान दिसत होती. बाकी आकाशही खूप सुंदर होतो. लोकांना मुख्यत: दाखवत असल्यामुळे फोटो हवा तसा घेता आला नाही. हा एक फोटो त्यातल्या त्यात थोडा बरा आला-

हा धुमकेतू सूर्याच्या जास्त जवळ गेल्याने नाश पावला Sad ज्यांना दिसला ते खरेच भाग्यवान, फोटो मिळाला ते सुपर भाग्यवान.

उत्तराखंड पर्यटन विभागाने नक्षत्रसभा या नावाने astro-tourism खगोल(शास्त्र) पर्यटनासाठी* काही कार्यक्रम आयोजित केले आहेत.
https://www.starscapes.zone/nakshatra-sabha/

*खगोल पर्यटन म्हटलं तर ते अंतराळ भ्रमण होईल. योग्य शब्द काय ?

@ माधवजी, ज्यांनी धुमकेतू बघितला ते खरंच नशीबवान आहेत! हा धुमकेतू सकुशल आहे व आता परतीच्या मार्गावर आहे. सूर्याच्या जवळ जाण्यापूर्वी तो पहाटे दिसत होता, सूर्याजवळून वळाल्यानंतर पश्चिमेच्या आकाशात आला. आता अंधुक होत जातोय. पण टिकून आहे. गेल्या महिन्यात अजून एक सन ग्रेझिंग धुमकेतू आला होता, तो सूर्याच्या अगदी जवळ गेला होता. त्याचं‌ सूर्यापासूनचं कोनीय अंतर खूप कमी असल्यामुळे तो दिसू शकला नाही. तो सूर्याजवळ खंडीत झाला.

@ भरत जी, हो, चांगला उपक्रम आहे तो. नेमका शब्द असा नाही सांगता येणार. पण खगोलशास्त्रीय पर्यटन असं म्हणाता येऊ शकेल.