मकरसंक्राती...

Submitted by छन्दिफन्दि on 13 January, 2024 - 23:25

आता सण साजरे करणं जरा सोपं झालंय का?
असेल तर सोशल मिडियाच्या कृपेनेच!
आता संक्रांतीचचं बघा ना!
मला आठवतंय लहानपणी आई मोठ्ठी बरणी भरून तिळगुळ करायची. काही तास तरी तो प्रोग्राम चालायचा. तीळ, खोबरं, दाणे भाजल्याचा खमंग वास, आणि ते त्या गरम चिक्कीच्या गुळात टाकल्यावर मग तर त्या खमंग वासात वेलाचीचा सुगंध, गुळाचा गोडसर वास मिक्स होऊन त्याच जे काय बने ते आम्हाला नकळत स्वयंपाक घरात खेचून नेई. थोडं मोठं झाल्यावर आम्हाला पण ती लाडू वळायला बसवायची कारण ते गरम असताना पटापट वळायला लागतात. हाताला तूप फासून हळूचकन वरच्या वर थोडंसं ते mixture उचलायच, पटापट गोल गोल वळायचं. तूप वगैरे लावून सुद्धा हात लाले लाल होत.मग लगेच देवाला नैवेद्य दाखवून पहिला तिळगुळ तोंडात टाकायचा. तो टणक लाडू काटकन दाढांखाली मोडायचा. खोबरं, दाणे, तीळ ह्यांचा खमंगपणा, चिक्कीच्या गुळाचा गोड चिकटपणा आणि तो कुरकुरीत लाडू.. heavenly!!
तर तीन चार तास खपून (आईने) लाडू केले की त्यांच्या पुड्या करायच्या, शाळेतल्या बाईंसाठी. उरलेले लाडू बरणीत जायचे.संक्रातीच्या दिवशी संध्याकाळी, शेजारी पाजारी सगळ्यांकडे जाऊन हातावर तीळगुळ ठेवून, मोठ्यांना नमस्कार करायचा. त्यांनी दिलेल्या तिळगुळाचे, हलव्याचे बकाणे भरायचे हाच कार्यक्रम!
जास्तकरून चौथी पर्यंत, दुसऱ्या दिवशी शाळेत बाईना तिळगूळ द्यायचा. सगळीच मुलं तिळगुळ आणायची. बाईंकडे एक मोठी पिशविभरून तिळगुळ व्हायचा. मग बाई तोच तिळगुळ परत सगळ्या मुलांना वाटून टाकायच्या.
आमच्याकडे दोन दिवसात ती भरलेली बरणी रसातळाला जायची. मग आईची ओरडा आरडी " अरे किती तिळगुळ खाता, पोटात दुखेल. रथसप्तमी पर्यंत घरी कोणी आल तर हातावर ठेवायला पण तुम्ही तिळगुळ शिल्लक ठेवत नाही वगैरे वगैरे.."पण आम्हाला माहीत असायचं तिने नक्की कुठेतरी अजून एक बरणी दडवून ठेवलीय. आम्ही तर बहिर्जिंचे वंशज असल्यासारखे ती बरणी शोधून काढायचो आणि गुपचूप हळू हळू तो तिळगुळ पण फस्त करायचो. मग एखाद दोन दिवसातच परत एक आरडा ओरडी " अरे काल ती मामी आली, तिळगुळ द्यायला म्हणून आतली बरणी काढलीं तर तुम्ही ती ही संपवलेली. .."
हा सगळा त्रागा बहुदा वरवरचा असावा कारण तिने अजून एकदा होतील अशी तिळगुळाची सगळी तयारी ठेवलेली असायची आणि मग परत एकदा ते तिळगुळ बनायचे. असं करत कसे बसे ते रथसप्तमी पर्यंत ते पुरायचे.

पण आता कस what's app आणि FB ने तिळगुळाची कशी छान सोय करून ठेवली आहे. बसल्या बसल्या शेजारी पाजारीच नाही जगभरात असलेल्या आपल्या आप्तेष्टांना पटकन तिळगुळ पाठवता येतात.. तेही हवे तितके. रथसप्तमी पर्यंत पुरवायची चिंता तर नकोच नको.

तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हा डिजिटल तिळगुळ. तिळगुळ घ्या आणि सोशल मीडियावर (आणि सोशल मिडियामूळे ) का असेना, गोड बोला!
मकरसंक्रातीच्या शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख!
बाईंना तीळगूळ देणे ...अगदी अगदी झाले.

किती गोड लिहीलाय बालपणीचा भाग.
आम्ही सोसायटीत तीन चार मैत्रिणी, टिळगूळ वाटपाकरता जात असू. तिथे, आता सांगायला लाज वाटते पण मी चिक्कूपणे तीळगूळ हातावर ठेवत असे. आणि लोकं बिचारे पसापसाभर देत, हात सैल राखून देत. मग घरी येताना पिशवी जड करुन आणल्याचा कोण आनंद Sad

मी चिक्कूपणे तीळगूळ हातावर ठेवत असे. आणि लोकं बिचारे पसापसाभर देत, हात सैल राखून देत. मग घरी येताना पिशवी जड करुन आणल्याचा कोण आनंद>>>> Lol Lol Lol

धन्यवाद सामो!

मस्तच.

तीळगुळ घ्या गोड गोड बोला, सर्व मायबोलीकरांना शुभेच्छा.

ते हाताला तूप लाऊन गरम लाडू चटके सोसत वळणे अगदी अगदी झाले.. आता विकतचे आणणे होतात.. मजाच गेली ती..
पण तरी लेकीने एकटी जाऊन सोसायटी मधील सर्वाँना तीळगूळ वाटून आली, काहीतरी जपले हे बरे वाटले.
बाकी पतंग उडवणे चालू आहे आठवडाभर.. त्याशिवाय संक्रांत नाही Happy

तीळ, खोबरं, दाणे भाजल्याचा खमंग वास, आणि ते त्या गरम चिक्कीच्या गुळात टाकल्यावर मग तर त्या खमंग वासात वेलाचीचा सुगंध, गुळाचा गोडसर वास मिक्स होऊन त्याच जे काय बने ते आम्हाला नकळत स्वयंपाक घरात खेचून नेई. >> अगदी डोळ्यासमोर आले बघा!
ते तिळगुळ वाटताना हलवा देणे आणि वडी घेणे, आपल्या खास मैत्रिणीला मोठी वडी राखून ठेवणे असले प्रकारही व्हायचे Lol

>>>>>>>हलवा देणे आणि वडी घेणे, आपल्या खास मैत्रिणीला मोठी वडी राखून ठेवणे असले प्रकारही व्हायचे
होय!!

>>>>बाकी पतंग उडवणे चालू आहे आठवडाभर.. त्याशिवाय संक्रांत नाही Happy
पतंगाच्या मांज्यामुळे बरेचदा कबूतर व अन्य पक्ष्यांच्या जीवावरती बेतते मात्र.

आमचे गुजराथी शेजारी आम्हा मुलांसाठी कुरमुऱ्याचे/ चुरमुऱ्याचे लाडू देत त्यातल्या काहित चाराणे आठाणे घालून देत.
आम्हा मुलांना लाडवापेक्षा त्या पैश्यात रस.

>>>>आमचे गुजराथी शेजारी आम्हा मुलांसाठी कुरमुऱ्याचे/ चुरमुऱ्याचे लाडू देत त्यातल्या काहित चाराणे आठाणे घालून देत.
अरे वा!!
>>>>आम्हा मुलांना लाडवापेक्षा त्या पैश्यात रस.
हाहाहा

आमचे गुजराथी शेजारी आम्हा मुलांसाठी कुरमुऱ्याचे/ चुरमुऱ्याचे लाडू देत त्यातल्या काहित चाराणे आठाणे घालून देत.
आम्हा मुलांना लाडवापेक्षा त्या पैश्यात रस>>> मस्त आठवण

तिळगुळ वाटताना हलवा देणे आणि वडी घेणे, आपल्या खास मैत्रिणीला मोठी वडी राखून ठेवणे असले प्रकारही व्हायचे>>> Bw

आमचे गुजराथी शेजारी आम्हा मुलांसाठी कुरमुऱ्याचे/ चुरमुऱ्याचे लाडू देत त्यातल्या काहित चाराणे आठाणे घालून देत.
आम्हा मुलांना लाडवापेक्षा त्या पैश्यात रस>>> मस्त आठवण

>बाकी पतंग उडवणे चालू आहे आठवडाभर.. त्याशिवाय संक्रांत नाही>> आमच्या वेळीं/ इकडे पतांगांच विशेष करून संक्रांतीला नव्हता काही.

गुजरात मध्ये त्याची खूप धूम होती पण सो मि नसल्यामुळे असेल बहुदा पण इकडे तेवढं संक्रांतीला पतंग असा विशेष काही नसायचं..

पतंगाच्या मांज्यामुळे बरेचदा कबूतर व अन्य पक्ष्यांच्या जीवावरती बेतते मात्र.
>>>>>>>

खरे आहे म्हणा हे..
पण आमच्या बालपणी, म्हणजे माझे बालपण जिथे गेले आहे तिथे पतंग उडवणे केवळ संक्रातीपुरते नव्हते तर दोन तीन महिने चालणारा सीजनल खेळ होता तो.. रोज संध्याकाळ झाली की सगळी पोरे गच्चीवर.. शेजारच्या बिल्डिंगमधील पोरांशी मारामारी व्हावी इतके पॅशन आणि इमोशन असायचे त्यात.. आठवणींचा वेगळा लेख बनेल. कारण आम्ही स्वतः पतांगीच नाही तर मांजा सुद्धा बनवला आहे. असो ते पुन्हा कधीतरी.. पण सुदैवाने म्हणा माझ्या नजरेसमोर कधी कुठला पक्षी घायाळ झालेला मी बघितला नाही. कदाचित आमच्या इथले पक्षी हुशार असावेत जे त्यांना पतांगीचा अंदाज असावा..
पण एकदा मात्र आमच्या इथल्या मुलाची मान कापली गेली होती. बाईकवरून जात होता आणि काही मुले रस्त्यावर पतंग उडवत होते.. त्यामुळे कल्पना आहे हे किती घातक असू शकते. बाकी गुल झालेल्या पतंगीमागे सुद्धा मुले वेड्यासारखी धावताना पाहिली आहेच. काही मुलांच्या तर हे इतके डोक्यात चालायचे की क्रिकेट खेळताना देखील, फिल्डींग वर लक्ष द्यायचे सोडून लक्ष आकाशात की वर कोणाची पेच लागते आणि कोणाची गुल होते आणि कसा मी लुटतो..

धन्यवाद शर्मिला!

मीच लिहिला असावा असा लेख आहे
Submitted by भ्रमर o >>> आदरमोद

छान लिहिलं आहे.
आमच्या आईचे लाडू कसे होत असत म्हणजे त्यांची चव वगैरे काही आठवत नाहीये पण आम्ही फक्त आमच्या आईने केलेला तीळ गुळच खात असू हे आठवतंय. त्याकाळी देवाण घेवाण भरपूर होत असल्याने आईने केलेले लाडू देण्यात संपत आणि दुसऱ्यांकडचे आमच्या घरात येत. आईला लाडू दे सांगताना आपल्या कडचा असेल तरच दे नाहीतर नको अशी अट घालत होतो आम्ही तिला.

मनीमोहोर धन्यवाद!

तुमची आठवण वाचून मलाही आठवलं की खरंच प्रत्येकाचा तिळगुळ वेगळा असे.
आईचे वेलची, दने, खोबरं घातलेले एकदम खमंग आणि कुरकुरीत असतं/ असतात.

पण काही साध्या गुळाचे मऊ, कधी चिवट, काहीनच्या वड्या असे अनेक उपप्रकार असतं/ असतात.

एकदा ऑफिसमध्ये एकाने त्याच्या आईने ( औरंगाबाद) करून पाठवलेला तीळगुळ आणला.. एकेक लाडू चांगला दिवाळीला बेसन लाडू करतो येवढं मोठा. जेवढं आठवत त्यानुसार तीळ कूट, तूप आणि पिठीसाखर घालून केलेले ते कणकेच्या किंवा बेसन लाडवांसारखे मऊ होते.
चव नाही लक्षात पण तो येवढं मोठा, गूळ न घातलेला तिळगुळ म्हणून चांगलाच लक्षात राहिला..