सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता घरगुती गणेशोत्सवात सुद्धा आरत्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत घोषणा अक्षरशः:घसा फाडून म्हणायची पद्धत पडली आहे. यंदा मंत्रपुष्पांजली सुद्धा ओरडून ओरडून म्हटलेली ऐकू आली.>> त्यात नवीन काय आहे? 'वर्षातून एकदा आम्हाला एवढ्या मोठ्या आवाजात ओरडायचे परमिट मिळे', असं पुलं नी त्यांच्या लहानपणच्या गणपती बद्दल लिहून ठेवलं आहे.
पण ते एक असो. ऍडमीन मजकूर यांनी अजून हा धागा मुखपृष्ठावर कसा घेतला नाही? 'शिवाजी महाराजांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला' अशासारखी क्रांतिकारक माहिती जगाला कळणं गरजेचं आहे!

Dj नंतर ३ टिंब हवे होते ना Light 1

बरं आता गणेश उत्सव तर संपला

दिवाळीत फटाके फोडावे
बिन आवाज बिना प्रदूषण वगैरे वगैरे धागे येऊ दे की. म्हणजे अचानक सण आल्यावर जागृती नको. आणि ९रात्र + डी जे + मोठ मोठ्या सिंगर्सँसोबत स्टेज शो वरती पैशांची उधळपट्टी वगैरे वगैरे राहिलं

गणेशनगर सोमाटणे फाटा येथील घटनेत पोलिसांनी अटक केलेल्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांची संख्या नेमकी २१ आहे. गणपतीला प्रिय असलेली संख्या. या २१ गणेशभक्तांसाठी क्राउड फंडिंग व्हायला हवे.

शिवाजी महाराजांशी जोडला. महाराजांचे नाव आले की समाजात गोष्टी आपोआप मान्य केल्या जातात. इतिहासात जाणून बुजून गोष्टी घुसवल्या जाऊ लागल्या तर तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला पाहिजे>>>> Lol Lol Lol

माबो वर काही लिहून इतिहासात काही बदलता/ घुसावता येणं, आणि
माबोवर पोस्ट टाकून ते हाणून पाडलं असा समज करून घेणं... सगळच मजेदार आहे.

माबोवर प्रसिद्ध होण म्हणजे व्यवहाराच्या खेळात श्रीमंत होण्यासारखं
आहे.. ह्याची आठवण झाली.

माबो वर काही लिहून इतिहासात काही बदलता/ घुसावता येणं>>
अशा छोट्या प्लॅटफॉर्म वरून हळू हळू अजेंडा रेटला की पुढे कावेबाज लोक तो लिखित इतिहास आहे असे ठणकावून सांगतात. लंगोटी फकीर रामदासची पदोन्नती डायरेक्ट महाराजांचे गुरू कशी झाली हे तुम्हाला माहित नसेल. किंवा लेनला खोटे पुरावे कसे पुरवले गेले हे ही माहीत नसेल.
आणि इतिहासाचे म्हणाल तर इतका खरा इतिहास वाचून कोळून प्यायलो आहे की तुमची शिकवणी घेऊ शकतो.
असो, मुख्य विषय सणांच्या माध्यमातून चालणार धुडगूस हा आहे आणि बऱ्याच मराठी वृत्तपत्रांनी आज तो ठळकपणे मांडला आहे. ह्यावर सरकार आता पुढच्या वर्षी काही तरी करेल ही भोळी अशा. इथला गाशा गुंडाळून आता नवीन मैदान शोधतो Happy . शब्बा ख़ैर ।

लंगोटी फकीर रामदासची पदोन्नती डायरेक्ट महाराजांचे गुरू कशी झाली हे तुम्हाला माहित नसेल>>>> खरा अजेंडा कुणाचा काय आहे किंवा द्वेष आहे हे कळले.

कळायला उशीर झाला.

डीजेचा आवाज कमी करा सांगितलं तर गणेशमंडळांचे कार्यकर्ते काठ्या आणि रॉड्स घेऊन बदडतात.
सार्वजनिक उत्सवांतील गैरप्रकारांबद्दल मायबोलीवरलिहिलं तर अज्ञानी आणि अजनबी यांच्यासारखे लोक शब्दांनी बडवतात. एवढाच फरक.

आवाज वाढला कुणी नाही ऐकला

पुणे ३० तास.. मुंबई २८ तास.. ठाणे १५ तास.. नाशिक १३ तास. - मी आधीही विचारलं. अनंतचतुर्दशी किती दिवस असते?

मुलुंडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी,एकजण गंभीर

मुंबईच्या माजी महापौर डॉ शुभा राऊळ यांनी गणेशमूर्तींच्या उंचीचा मुद्दा घेतला होता, त्यांना त्यांच्याच पक्षाकडूनही पाठिंबा मिळाला नाही.
पी ओ पीच्या मूर्ती नकोत या नियमातून दर वर्षी सूट दिली जाते.

मुंबईत कुठेही डीजेचा वापर झाला नाही, ध्वनिप्रदूषणाची एकही तक्रार आली नाही, असं पोलिस सांगताहेत.
नियम पाळायचेच नसतील, तर नियम करायची नाटकं तरी कशाला हवीत? उगाच कागद फुकट.

जर नियम पाळायचेच नाहीत

रात्री लक्ष्मी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका चना जोर गरम वाल्याकडून सात-आठ जणांच्या टोळक्यानं भेळ घेतली. पैसेच दिले नाहीत. त्यानं पैसे मागितले तेव्हा सगळेजण त्याच्या अंगावरच धावून गेले आणि त्या पन्नाशीच्या वयाच्या माणसाला दमदाटी केली, एक-दोन टोलेही दिले. तो माणूस बिचारा घाबरून गेला, जागेवर थरथर कापायला लागला. ती पोरं त्या माणसाची टर उडवत, हसत खिदळत निघून गेली. जाताना त्याच्याकडची चुरमुऱ्याची पिशवीच उचलून घेऊन गेली. आता चुरमुरेच गेले म्हटल्यावर याचा धंदाच संपला !
पंधरा-वीस जणांच्या टोळक्यानं रात्री साडेतीन-चारच्या सुमारास एका मिल्कशेक वाल्याला धरलं. त्याच्याकडून पंधरावीस मिल्कशेक घेतले. पैसे मागितल्यावर दमदाटी केली, धक्काबुक्की केली. हपापाचा माल गपापा ! थोड्याफार फरकानं असे अनेक प्रसंग काल डोळ्यांसमोर घडताना दिसत होते.
गर्दीचा फायदा घेऊन मुली आणि स्त्रियांच्या जवळ जाऊन स्पर्श करण्याचे आणि छेड काढण्याचे तर अक्षरश: शेकडो प्रकार घडत होते. ढोल-ताशांच्या ठेक्यावर काही मुली नाचू लागल्या. लगेच बाजूला चार-पाच पोरं जमा झाली. नाचता-नाचता मुलींच्या अगदी जवळ जाऊ लागली. बेसावध मुलगी बघून तिच्या कानात कर्कश पिपाणी वाजवणे, तिचं लक्ष नसल्याचं पाहून हळूच तिच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडणे, जळती सिगारेट हातावर टेकवणे, ओढणी किंवा वेणी ओढणे, तरूण मुली किंवा स्त्रियांच्या जवळ जाऊन मुद्दामच घाणेरड्या शिव्या देणे असे विकृत प्रकार तर अनेक पाहिले. “विनाकारणच धक्काबुक्की करून पोरीबाळींना त्रास देण्याची हक्काची जागा म्हणजे मिरवणुकांचे रस्ते !” असाच समज समाजानं करून घेतलेला दिसतो. हा समज की गैरसमज याचं उत्तर कुणाकडे आहे?
अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आपण कोणते कपडे घालावेत किंवा कसं वावरावं याचं भान युवतीच काय पण स्त्रियांनाही नव्हतं, हे दुर्दैवानं आणि खेदानं नमूद करावंसं वाटतं. स्त्रियांविषयीच्याच अश्लील आणि द्वैअर्थी गाण्यांवर स्त्रियांनीच बेभान होऊन नाचावं, म्हणजे कमाल झाली !
दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचा तर सुळसुळाट झालेला होता. रस्त्यावरच खुलेआम बसून मद्यप्राशनाचे कार्यक्रम सुरू होते. नीलायम टाॅकीज जवळ तीन-चार मुलं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाक्यांची तोडफोड करत होती. त्यांनी आठ-दहा गाड्यांचं प्रचंड नुकसान केलं. रस्ते बंद करण्यासाठी वापरलेले बांबूचे तात्पुरते अडथळे तर लोकच मोडून टाकतात, हा दरवर्षीचाच अनुभव आहे. पण बंद दुकानांची शटर्स तंबाखू, गुटख्याच्या पिंका टाकून रंगवणे, फ्लेक्स फाडणे, दुकानांच्या बाहेरचे दिवे काढून ते फोडणे, चारचाकी-दुचाकी गाड्यांना स्क्रॅचेस मारणे, आरसे फोडणे असे उद्योग सर्रास घडत होते.
डुकराच्या ओरडण्यासारख्या आवाजाच्या पिपाण्या वाजवत रस्त्यावर मोकाट फिरायचं, तऱ्हेतऱ्हेचे विचित्र प्राण्यांचे आणि कवट्यांचे मुखवटे तोंडाला लावून मोकाट फिरायचं, मक्याची कणसं किंवा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पायानं टोलवत टोलवत फिरायचं... या गोष्टी सामाजिक एकात्मता, देवभक्ती, देशभक्ती, हिंदू धार्मिक परंपरांविषयीचं प्रेम-आस्था-आपुलकी, मंगलमय पवित्र वातावरण यापैकी नेमकं काय करतात? याचं खरंखुरं उत्तर कुणी देऊ शकेल का?
हा काही आजचाच प्रकार आहे असं नाही. २००६-०७ साली मी पुण्यात काॅट बेसिसवर राहत होतो तेव्हाची गोष्ट. गणपती उत्सव जवळ आलेला. संध्याकाळी दारावरची बेल वाजली. दार उघडलं, एकदम चार-पाच माणसं थेट घरातच घुसली. दोन जणांनी सगळं घर फिरून पाहिलं. किती जण राहता वगैरे चौकशी केली. आणि चौघं राहताय ना, मग प्रत्येकी ३००/- प्रमाणे १२००/- रूपये द्या असं म्हणून बसून राहिले. शेवटी खूप अर्जविनंत्या करून प्रत्येकी १५०/- प्रमाणे ६००/- रूपये घेतले आणि गेले. हाच प्रकार २०१८ सालीदेखील सुरू आहे.
सातारा रोडवरच्या एका हाॅटेलमध्ये ऐन गणेशचतुर्थीच्याच दिवशी रात्री जवळपास ३०-४० माणसं पावतीपुस्तक घेऊन आली. काऊंटरवर जोरदार बाचाबाची सुरू होती. यातली बरीचशी पोरं पंचविशीच्या आतलीच. इकडे हात घाल, तिकडे हात घाल असे उद्योग सुरू होते. एकदोघांनी ज्यूस काऊंटरवरची फळंच उचलून नेली. एकजण पावभाजी काऊंटरवरचे टोमॅटो-काकडीचे काप खात उभा होता. एकाने तर कहरच केला. आॅर्डर घेऊन जाणाऱ्या वेटरला अडवलं आणि त्याच्या ट्रे मधल्या तीन-चार मसाला पापडच्या डिश काढून घेतल्या. तिथंच खात उभा राहिला. मग इतरांना जरासं धैर्य आलं. मग कोल्ड्रींक्सचा फ्रीज उघडून बाटल्या काढून घेऊ लागले, एकानं चीज क्यूब्ज चा बाॅक्सच उचलला. हा सगळा प्रकार अर्धा तास सुरू होता. काऊंटरवरचा माणूस मला म्हणाला, “व्यवसाय करायचा असेल तर हे सगळं सहन करावं लागतंच. नाहीतर तोडफोड करतात, नुकसान करतात, आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात, मारहाण करतात. पंचवीस हजार मागत होते, दहा हजारात फायनल होतंय बहुतेक.”
गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देताना सामाजिक प्रवर्तकांना हेच अपेक्षित होतं का? समाजातल्या व्यावसायिकांना अशाप्रकारे लुटणं अपेक्षित होतं का? याची उत्तरं कुणी मागायची आणि या प्रकारांवर अंकुश कोण आणणार? याचं ठोस उत्तर समाजाला हवं आहे.
सार्वजनिक उत्सव हे अशा गोष्टी राजरोसपणे करण्यासाठीचं हक्काचं निमित्त आहे का? माणसांना जे एकट्याला किंवा स्वतंत्रपणे करता येणार नाही, नेमक्या त्याच गोष्टी अशा मोठ्या गर्दीचा फायदा घेऊन केल्या जातात का? यातलं तथ्य शोधण्याकरिता सामाजिक संशोधनाची आवश्यकता आहे.
सार्वजनिक मिरवणुकीचं गणितच फार निराळं आहे. दहा दिवसांकरिता प्रतिष्ठापित केलेला देव नवव्या दिवशी दुपारीच मांडवाबाहेर काढायचा, आदल्या दिवशी रात्रीच त्या पूजेतल्या देवालाच थेट रस्त्यावर नंबरासाठी रांगेत उभं करायचं, पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर नंबर लागत नाहीच. मग या रांगेत उभ्या असलेल्या गणपतींचा अनंत चतुर्दशीची सकाळ ची पूजा, आरती, नैवेद्य आणि संध्याकाळची पूजा-आरती-नैवेद्य होतो का? शोडषोपचार होतात का? रांगेत गणपती उभा केला की, त्याची पूजाअर्चा माणसं पार विसरूनच जातात. त्यांना मिरवणुकीचे वेध लागलेले असतात. (त्यातही “वाट पाहे सजणा, संकष्टी पावावे” अशांचीच संख्या जास्त. अनेकांना तर तेवढंही येत नसतं. मग आरती आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा स्पीकर वरच लावली की काम ओके !)
कार्यकर्त्यांची मिरवणुकीची हौसच मोठी दांडगी.
ते गणपतीच्या रथासमोरच रस्त्यावरच जेवतात, तिथंच झोपतात. डीश, द्रोण, पत्रावळी, चमचे, पाण्याच्या (आणि अन्य सर्व प्रकारच्या द्रव पदार्थांच्या) बाटल्या वगैरे तिथंच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. गणपती बाप्पा सकाळ होण्याच्या प्रतिक्षेत रथावरच बसून असतात.
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पारोश्या अवस्थेतच मिरवणूक सुरू होते, आंघोळही न केलेले सो काॅल्ड भक्त मोठ्या भक्तिभावानं शीला की जवानी, बोल मैं हलगी बजावू क्या, पोरी जरा जपून दांडा धर अशा गाण्यांवर नाचत राहतात. हे कुठल्याच शुचितेत किंवा पावित्र्याच्या व्याख्येत बसत नाही.
राष्ट्रीय सणांच्या दिवशी शोभायात्रा निघतात, त्यात केवळ देशभक्तीपर गाणीच वाजवली जातात. पण मग देवाच्या मिरवणुकीत आयटम साॅंग्ज कशी काय लावली जातात? अशा सर्व कार्यकर्त्याकरिता एखाद्या वेगळ्या दिवशी डीजे नाईट आयोजित केली तरी काम होऊन जाईल, त्याकरिता गणेशोत्सवाचंच निमित्त कशाला हवं?
कित्येक ठिकाणी तर निवडलेल्या दुर्वांच्या जुड्या नसतातच. त्याऐवजी उपटून आणलेलं गवतच वाहिलेलं असतं. म्हणजे तेही महत्वाचं वाटत नाही. मग याकडे धार्मिक उत्सव म्हणून कसं पहावं? आणि का पहावं?
दहाच्या दहा दिवस अंडी किंवा मांसाहारी पदार्थ खुशाल खायचे, व्यसनं करायची, मनसोक्त अपेयपान,धूम्रपान करायचं आणि ‘हा बघा आमचा हिंदूंचा प्रिय उत्सव’ असं वरून पुन्हा आपणच म्हणायचं, हा कुठला अजब प्रकार? एकूणच सवंगपणा, आचरटपणा, छचोरपणा, स्वत:च्या मनातल्या असामाजिक कृती करण्यासाठी गणेशोत्सव आणि मिरवणुका यांचा व्यवस्थित वापर केला जातोय, यामागची सामाजिक मानसिकता जाणली पाहिजे.
लोकमान्य टिळक, न.चिं.केळकर अशा मान्यवरांनी पुढाकार घेऊन हा उत्सव उभा केला आहे. मिरवणुकीची सांगता मान्यवरांच्या भाषणांनी होत असे. यांची शिस्त तर इतकी करडी होती आणि सामाजिक जरब अशी होती की, त्यांचा शब्द मोडण्याची कुणी प्राज्ञा करू शकत नसे. आज तशीच शिस्त पुन्हा लावण्याची आवश्यकता नाही का? की उत्सवातला आनंद आम्ही लुटणार आणि गैरप्रकार किंवा तत्सम गोष्टी घडल्या की त्याची जबाबदारी प्रशासन-पोलिस यांच्यावर ढकलणार? याचा विचार आपल्या मनात आहे की नाही?
सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची कोणती विशेष आचारसंहिता किंवा चौकट आहे का? आजवर ती नसेल तर, ती असायला नको का? उत्सवाचं नियोजन, आखणी, खर्चाची सोय, मूर्तीचा आकार किंवा तपशील, देखाव्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे, मिरवणुकीसंबंधी चे मार्गदर्शक नियम, उत्सव संपल्यानंतर रथ किती दिवस रस्त्यात तसाच ठेवायचा, मांडव किती दिवस ठेवायचा, आॅडीट कुणाकडून करून घ्यायचं, उत्सवासाठी शिस्तपालन समिती कशी नियुक्त करायची याविषयी आजवर कुणीही पुस्तिका काढलेली नाही. १२५ वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या उत्सवाविषयीचं असं मार्गदर्शनच असू नये, ही केवढी मोठी तृटी आहे?
प्रत्येक कार्यकर्ता सूज्ञ असतोच, असा आपला समज आहे का? असा सरकारचा समज आहे का?असा धर्मादाय आयुक्तांचा समज आहे का? आपण सर्वांनाच जन्मत:च सूज्ञ, समंजस, समजूतदार, विवेकी असं समजण्याची चूक करतो आहोत का? उत्सव हा उत्सवासारखाच झाला पाहिजे याविषयी सर्वांचं एकमत असेलच, पण मर्यादांचं भान सुटणाऱ्यांविषयीचं कारवाईचं पाऊलही तितक्याच कठोरपणे टाकलं पाहिजे. समाजाला प्रबोधनाची आवश्यकता नेहमीच असते, ही गोष्ट नाकारण्यात अर्थच नाही. पण जेव्हा समाजच आम्हाला कुणीही अक्कल शिकवण्याची गरज नाही असं एकमुखानं म्हणायला लागतो तेव्हा काय समजावं?
उत्सवाला परिवर्तनाची गरज नाही, उत्सव पुन्हा त्याच्या मूळ सात्विक रूपाकडे नेण्याची खरी गरज आहे.

©️मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

मी आधीही विचारलं. अनंतचतुर्दशी किती दिवस असते?<<< गणेशमुर्ती चे पाण्यात विसर्जन हे केवळ औपचारीक असते. जेव्हा स्थानावरून मुर्ती हलवली जाते तेव्हाच तिचे विसर्जन झालेले असते. त्यामुळे मिरवणुक वगैरे सद्ध्या जे चालू आहे ते म्हणजे नुसता धुडगुस, आणि धुडगुस घालणार्‍यांना गणपतीच नाही तर कोणतेहि निमित्त पुरेसे असते . पुजा अर्चा / धर्म याच्याशी या लोकांना काही घेणे नसते.

सण जरूर साजरे केले जावेत, पण ते सामाजिक नियम पाळुनच आणि ते पाळले जातील ह्याची जबाबदारी प्रशासन झटकू शकत नाही.

सण साजरे करण्यामागे केवळ धार्मिक / सामाजिक नाही तर आर्थीक बाबीचा विचार असतो, बलूतेदारांना व्यवसायीक चालना देण्यासाठी हे सण आणि त्यातील रिती- परंपरा याची उभारणी झाली असावी.

मला वाटते हा धार्मिक सण नाहीच आहे तो सांस्कृतिक सण आहे.. आणि गाणी जी वाजतात- त्यांचे बिट्स महत्वाचे.. त्याचा अर्थ काढत बसायला कोणाला वेळ आहे...

बरोबर. म्हणजेच निमित्त गणपतीचं. लोकांच्या पैशावर सगळ्या प्रकारची मज्जा करायची सोय म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव.
डीजेचा खर्च वर्गणीतून. नाचायला फुकटचा रस्ता हा डान्स फ्लोर. सगळ्यांची नाचायची हौसही फिटते.
नुसती डान्स पार्टी ठेवली तर किती लोक येतील आणि खर्चही होईल. गणपतीचं निमित्त केलं की सगळं राजरोस करता येतं.
गणपती निमित्तमात्र.

" हा धार्मिक सण नाहीच आहे" - सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आणि त्यात चाललेल्या प्रकारांच्या समर्थकानेच हे सांगितले ते बरे झाले.

राज ठाकरे योग्य बोलत आहेत.
ते शुद्ध मनाने योग्य ते बोलत आहेत .
पण पुरोगामी विचाराची आताची नाटकी लोक मनात द्वेष ठेवून विरोध करत असतात.
त्यांच्या मनात दुष्ट हेतू असतो.
म्हणून त्यांनी कोणी राज ठाकरे सांगत आहेत ते पण सांगायचं प्रयत्न करू नये.
उलट परिणाम होईल

नाहीतरी लोक बौद्धिकदृष्ट्या अंधळे आणि बहिरे झालेलेच आहेत. शारीरिक दृष्ट्या झाले तर काय बिघडलं?

आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय!

आकडेवारी सांगाल का?
गणपती विसर्जन मध्ये वाजणाऱ्या वाद्य न मुळे .
इतकी लोक मेली,इतकी बहिरी झाली, .
ही आकडेवारी विरोध करणाऱ्या पुरोगामी कडे नाही.
आणि असेल तरी ते देणार नाहीत.
कारण सर्वच मंडळ बेजबाबदार वागत नाहीत .
काही मोजकेच वागतात.
समाज सुधारणा हा बिलकुल हेतू नसणारे फक्त हिंदू धर्माच्या सणाना विरोध करणे इतकाच हेतू असणारे आकडे वारी देवूच शकत नाहीत

Priyanka गांधी नी इस्कॉन वाले गो वंश विकतात असा आरोप केला आहे.
कोण आहेत त्यानं माहिती देणारे.
इस्कॉन ला प्रचंड फंड हिंदू धर्मीय देतात.
गो वंश विकून पैसे कमावण्याचे त्यांना काहीच कारण नाही

Priyanka गांधी नी इस्कॉन वाले गो वंश विकतात असा आरोप केला आहे.
कोण आहेत त्यानं माहिती देणारे.
इस्कॉन ला प्रचंड फंड हिंदू धर्मीय देतात.
गो वंश विकून पैसे कमावण्याचे त्यांना काहीच कारण नाही

प्रियांका नाही हो, भाजप खासदार मेनका गांधी यांनी आरोप केला आहे. तुमचेसुद्धा कान डोळे तपासून घ्या.

आकडेवारी राज ठाकरेंना विचारा.

अरेच्चा ? विरोध करायला लोक मारायला आणि बहिरे व्हायला पाहिजेत का ? आमच्या घराची खिडक्या दारे हादर्तात, डोकेदुखी होते, त्रास होतो हे कारण पुरेसे नाही ?

विमान, रेल्वे, गाड्या ह्यांच्या आवाज नी त्रास होत नाही का?
विविध रासायनिक कंपन्या ,शहर आणि महानगर.
हे वायू प्रधूषण पासून पाणी प्रदूषण पण करतात .
त्यांचा त्रास होत नाही का?
देशात एक पण शहर किंवा महानगर नको.
विमान,रेल्वे , मोटर गाड्या बंद करा अशा का मागण्या होत नाहीत
एकदम शांत वातावरण निर्माण होईल जेव्हा शहर , महानगर नष्ट केली जातील.
रेल्वे,विमान ही सेवा बंद केली जाईल.
,रासायनिक कंपन्यांना tale लावले जातील.
किती भयंकर विमानाचा आणि रेल्वे च्या हॉर्न चा आवाज येतो.
त्या पेक्षा dj परवडला

काहीही.
अहो विमान रेल्वे ह्या गरजेच्या सार्वजनिक सुविधा आहेत ना ? बर आणि विमान रेल्वे ह्यांचा आवाज सगळीकडे होतो आणि तितक्या मोठ्याने होतो असेही नाही. त्यामुळे तुलना मूर्खपणाची आहे. तसेही, विमानाचा आवाज होतो म्हणून आमच्या कानाशी डॉल्बी लावायचा लायसन्स मिळाला आहे ? पाण्यात रसायन मिसळतात म्हणून सगळी कचरापेटी नदीत मोकळी करण्याचा लायसन्स मिळाला का ?

काही गरजेच्या नाहीत करोड वर्ष ह्या सेवा नव्हत्या तरी लोक मस्त जगत् होती.
आता दोनशे वर्ष झालीत फक्त ह्या सेवा आहेत.

पृथ्वी चा विनाश .
महानगर,नगर,आधुनिक यंत्रणा .
ह्या मुळेच होत आहे .
सर्वांना माहीत आहे .
पृथ्वी सजीवांना जगण्यास कशामुळे निकृष्ट होत आहे.
तुम्ही फक्त dj वर च अडून आहात

Pages