जाणे कुठल्या दुःखाचा

Submitted by द्वैत on 13 September, 2023 - 13:57

जाणे कुठल्या दुःखाचा हा
असा लागतो नाद
देह स्वतःचा पोखरताना
ऐकू येई साद

जाणे कुठले गाणे मी
गुणगुणतो वाऱ्यावर
मेघ धुळीचा क्षितिजावरती
पांघरतो चादर

जाणे कुठले स्वप्न पाहतो
कुठल्याश्या प्रहरी
खिन्न मनाने परतून येती
काठावर लहरी

जाणे कुठल्या वाटेवर मी
शोधत फिरतो गाव
हिंदोळ्यांवर लाटांच्या या
डुलते माझी नाव

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users