गळती

Submitted by झुलेलाल on 7 June, 2009 - 01:53

गळती

चंद्रपुरातल्या समस्यांविषयी कॉंग्रेस उमेदवार नरेश पुगलिया आणि भाजपच्या हंसराज अहिरांचे प्रतिनिधी आमदार सुधीर मुनगंटीवार या दोघांशी माझं बोलणं झालं होतं. एक नेमका धागा मिळाला होता; पण त्या समस्यांच्या पलीकडेही काही असू शकतं, असं मला वाटत होतं. इथं शाळा आहेत; पण गळतीचं प्रमाणही खूप आहे.
मुनगंटीवारांकडून निघताना एक कार्यकर्ता सोबत बाहेर आला.
`इथे शिक्षणाच्या, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कशा आहेत?....' मी त्याला विचारलं.
`इथल्या पाण्यात क्षार वाढलेत. ते पिऊन ग्रामीण भागात आजार, किडनीचे विकार बळावतायत. लहान मुलांना याचा जास्त त्रास होतो.' तो म्हणाला.
`मुलं शाळा का सोडतात? शाळांमधली गळतीची समस्या कशामुळे वाढते?'... बोलता बोलता अचानक त्यानं मलाच प्रश्न केला. मग मी मला आठवणारे सगळ्या समित्यांचे अहवाल डोक्यात साठवायला सुरवात केली.
`मुलांना शिक्षणात रस नसतो. आईबापांमध्येही शिक्षणाचे महत्त्व पोचले नाही. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, असा आग्रह धरणारे आईबाप अजूनही ग्रामीण भागात कमी आहेत आणि मुख्य म्हणजे, गरिबी. आपला मुलगा शाळेत गेला, तर मजुरीच्या कामात त्याची मदत होणार नाही, कमावणारे हात कमी होतील, या भीतीनं आईबापदेखील शाळेचा आग्रह धरत नसावेत. मुलीनं शिकून काय करायचं, हा विचारही ग्रामीण भागात असतोच,' आठवेल तसं मी बोलून गेलो;
पण त्यानं नकारार्थी मान हलवली.
`तुम्हाला अभिमन्यूची गोष्ट माहीत आहे?' त्यानं नवाच प्रश्न विचारला. मी "हो' म्हटलं, आणि त्याच्याकडे बघितलं.
`आईच्या पोटात असताना चक्रव्यूह भेदायची कला तो ऐकून शिकला. कारण, त्याच्या आईला सकस आहार मिळत होता. गर्भवतीला सकस आहार मिळाला, तर तिचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. शहरातल्या, नोकरी करणाऱ्या बायकांना बाळंतपणाआधी आणि नंतरही, विश्रांतीसाठी, बाळाच्या पालनपोषणासाठी हक्काची रजा मिळते. खेडेगावांमध्ये, गरोदर बाई अवघडलेली असली, तरी तिला पाणी काढावं लागतं. शेतात राबावं लागतं, गुरंढोरं, शेळ्या घेऊन रानात जावं लागतं. बाळंतपणानंतर पुन्हा लगेच तिला राबावंच लागतं....' तो माझ्याकडे न पाहता, चालताचालता बोलत होता.
`तिचं मानसिक आरोग्य शहरी बाई इतकं सुदृढ राहील? तिच्या बाळाच्या बुद्धीचा विकास होईल?' त्यानं पुन्हा मलाच सवाल केला.
पुन्हा मी नकारार्थी मान हलवली.
आता अभिमन्यूचा संदर्भ हळूहळू लक्षात येत होता.
`तर तो अभिमन्यू, एका संपन्न घरातल्या बाईच्या पोटात होता. पोटातल्या बाळाचं नीट संगोपन व्हावं, म्हणून तीच नव्हे, तर अवतीभोवतीचं सगळं जग तिची काळजी घेत होतं. मग गर्भातल्या त्या बाळानं स्वस्थपणानं चक्रव्यूह भेदायचं तंत्र ऐकलं, तर त्यात विशेष ते काय?
आमच्या गावातल्या बाईच्या पोटातलं बाळ काय ऐकणार? तिचं आरोग्य तितकं चांगलं असतं? तिला सकस अन्न मिळतं? पोटातल्या बाळाचं संगोपन नीट होतं?' तो पुन्हा भडभडून बोलत होता. मी नकारार्थी मान हलवत होतो.
`मुलाला जन्मानंतर सकस आहार मिळाला, त्याचं नीट संगोपन झालं. तर त्याच्या मेंदूची वाढही चांगली होते. मुलांची बुद्धी वाढते आणि त्याला शिक्षणाची गोडी लागते. तो स्वत:च शिक्षणात रमतो आणि शाळेत जातो.' तो विश्žवासानं बोलत होता.
`आमच्या भागात, शाळा सोडणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप आहे; पण त्याचं कारण हेच आहे. त्याला शिक्षणात गोडी वाटत नाही. कारण त्याच्या मेंदूचा तसा विकासच झालेला नसतो.' त्यानं कोडं उलगडलं.
आपल्या मुलानं खूप शिकावं, असं ग्रामीण भागातल्या आईबापांनाही वाटत असतं. त्यासाठी स्वत: राबायची त्यांचीही तयारी असते. मुलींनाही शिकवायची त्यांची इच्छा असते. पण...'
तो पुढे बोलला नाही.
पण, मी समजून गेलो.
आईच्या आरोग्याशी, तिच्या गरोदरपणाच्या काळातील काळजीशी आणि पोटातल्या बाळाच्या संगोपनाशी शाळा गळतीच्या कारणाचं मूळ जोडलं गेलं आहे, हे कुणी लक्षात घेतलं असेल?... मला प्रश्न पडला.
`कुठून मिळवलीत एवढी माहिती?' मी त्याला विचारलं.
`भाऊंनीच मागं कधीतरी सांगितलं होतं.' तो उत्तरला.
निवडणुकीच्या प्रचारात गळतीचा मुद्दा नसला, तरी त्याला ही समस्या छळतच होती. गळतीच्या कारणांचा एक वेगळा कंगोरा मला शिकायला मिळाला होता.
------------------
http://zulelal.blogspot.com

गुलमोहर: 

किती खरं आहे...
तुम्ही सद्ध्या मायबोलीवर जे लिहित आहात ते अत्यंत अस्वस्थ करणारं आहे...

तो कार्यकर्ता खरच कळकळीचा असला पाहीजे नाहीतर आजचे राजकारणी म्हणजे काही बोलायलाच नको,
असो, छान लेख !!

झुलेलाल, आयटीशी अगदी सहमत. कधी कधी 'काय प्रतिक्रिया लिहायची ह्यावर?'
अशी असहाय्य, निष्प्रभ आणि नि:शब्दं करणारी प्रतिक्रिया मनात येते.

दाद म्हणते ते अगदी खरं. अगतिक आणि असाहाय्य ह्याच भावना मनात येतात.

>> गळतीच्या कारणांचा एक वेगळा कंगोरा मला शिकायला मिळाला होता.
खरं आहे.