तोंडलीभात ते तिरामिस्सु

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"नऊ वाजत आलेत. पिझ्झा खाऊन पोरं निवांत आहेत. आता आपल्या जेवणाचं काय?" अचानक १५-२० माणसं एकत्र आली आणि वेळ छानच जात होता. फक्त स्वयंपाकघरात जाऊन खुडबुडायचा कंटाळा आला होता. आयत्या वेळचं पिठलं खिचडी, वरण भात, कॅनमधल्या राजम्याची करी-नान असं एरवी केलेलं आज अगदी नको वाटंत होतं. बरेचदा बाहेरचं खाणं पण नको वाटंत असतं. तरी आपल्या घरी चाललंय हे बघून पोटापाण्याची सोय करायला स्वयंपाकघरात जावं लागणार हे दिसंत असताना कधी नव्हे ते नवर्‍याला प्रेम उफाळून आलं.
"बस तु. आणु काही तरी बाहेरून". जीव कसा गारेग्गार झाला. Happy
आता ह्यापुढली १५-२० मिनिट 'काय आणायचं आणि कुठून' ह्यावर जाणार हे तर दिसतच होतं.
"थाई खाऊ यात?"
"ए नको गं, आमचं परवाच झालंय"
"बरं मग पिझ्झा हटचा पास्ता?"
"त्यात व्हेज ऑप्शन नसतं. मला नको. फार तर व्हेज पिझ्झा चालेल."
"हे तुला दोन तासांपूर्वी नव्हतं सांगता येत? मुलांसाठी आणला तेव्हा?"
आत्ता कुठे वादावादीला सुरवात झाली होती. अजून बरंच रण माजायचं.
"करी क्लबमधून आणायचं का? कोंबडी, मटण, भाज्या काय हवं ते आणता येईल."
"नको बाई, फार मसालेदार असतं जेवण." एकेक पर्याय हाणून पाडण्याचा महीला वर्गाचा सपाटा अवर्णनीय होता.
"माझं तर बाई चिप्स, भेळ आणि बफेलो विन्ग्ज खाऊन पोट भरलंय."
"ए बाकीच्यांचं राहु द्या गं बाजुला. अवनी, तुला काय खावसं वाटतंय?"
अवनी म्हणजे भारतातून महीन्याभरापूर्वी लग्न होऊन आलेली विहंगची बायको. बिचारी भांबावली होती सगळ्यांमधे. तीचा नवरा चिप्स चावत शांतपणे टीव्ही बघत बसलेला.
"अरे विहंग, विचार तरी तीला."
"ती खाते काय वाट्टेल ते." इती अवनीपती.
"गप रे तु. सांग अवनी. ह्या बायकांचं राहु दे. त्यांचे नवरे आणि त्या मिळून बघून घेतील. हा गोंधळ नेहमीचाच आहे. सवय कर. तुला काय आवडतं?"
"मला मेक्सिकनफूड आवडलं. तिजुआनातलं."
"तिहुआना!!!!!"
क्षणाचाही विलंब न लावता तीच्या नवर्‍याचं करेक्शन!
"राहु दे राहु दे. तु इथे आलास तेव्हा माहिती आहे जालापिनो पॉपर्स म्हणायचास ते! :)" नको नको म्हणंत असताना न राहवून मी बरळलेच!
ह्या असल्या गोंधळात शेवटी अर्ध्या तासात एक फायनल लिस्ट तयार झाली. सर्वानुमते नवरे मंडळींनी गिळायला आणण्याचं ठरलं. घरात ४-५ बायका उरल्या आणि टिव्हीच्या खोलीत गोंधळ घालणारी मुलं. मग तु काय मागवलंस मी काय मागवलंय ह्यावर बडबड सुरु झाली. अवनी जरा गप्प गप्प वाटली.
"अवनी, आर यु ओके?"
तीला कोपर्‍यात नेऊन विचारल्यावर डबडबून डोळे भरऊन आलेल्या अवनीनं मानेनच कसानुसा होकार भरला.
"खरं सांग. काय झालं?"
"विहंग सारखा माझ्या चुका काढतो. मी प्रयत्न करतेय अ‍ॅडजस्ट व्हायचा. पण हॉटेलात गेलं की 'तुला कटलरी वापरता येत नाही, ऑर्डर करता येत नाही, ह्याचा उच्चार असा, असं सारखं टोकत असतो."
"अगं दुर्लक्ष कर. नाही तर ठणकावून सांग त्याला. भारतातून आला तेव्हा त्याची स्थिती ह्यापेक्षा काssही वेगळी नव्हती. बघीतलंय आम्ही. आपण सगळेच शिकतो हळुहळू."
आणि नको नको म्हणताना बर्‍याच गोष्टी डोळ्यांसमोर तरळल्या.....
***

भारतात राहून मध्यमवर्गीय घरातल्या स्वयंपाकावर, मुख्यत: घरच्या अन्नावर वाढलेला माझा पिंडं! वेगवेगळ्या हंगामी भाज्या, कडधान्याच्या आमट्या, बिरडी, मसालेभात, पोळ्या हा आठवड्याचा स्वयंपाक असे घरात. रवीवारी इडली सांबार चटणी. दोसे, उत्तपे हा जेवणातला बदल. मराठमोळे पोहे, उपमा, उकडपेंडी, सांजा असं नाष्त्याला मिळायचं. त्यात बदल म्हणून कधीतरी वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं, पौष्टीक ढोकळे Happy असा प्रकार असायचा. कचोर्‍या, समोसे, आलुबोंडे, ताज्या मटारकचोर्‍या, भरलेले पराठे, दहीवडा, सांबारवडा म्हणजे पर्वणीच होती. मांसाहारी घरात वाढल्यामुळे मटण, चिकन चे रस्से, सुकं, त्यांच्या बिर्याण्या, अंड्याचे प्रकार, माश्याची आणि सोडे-सुकटाची कालवणं व्हायची.
गोडात तरी काय पुरणपोळी, श्रीखंड, खिरी, कानोले, निनावं असं असायचं. आयत्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी भजी आणि शिरा व्हायचा. बाहेरचं खाणं तर फारच क्वचित. आणलंच तर गोडात मिठाया, जिलबी, इमरती असं काहीबाही. दिवाळीचा फराळाही तोच शेव, चिवडा, लाडू, शंकरपाळे, चकल्या, अनारसे आनि कडबोळी!
कॉलेजमधे असताना बाहेर खाण्याची चटक लागलेली पण तेही काय चाट, इडली-दोसे, समोसे असल्या प्रकारांपलीकडे नाही. फारफार तर देसी चायनीज आणि 'इटालियन'च्या नावाखाली मिळणारा तथाकथित पास्ता, एकदाच चाखलेलं फ्रेंच अनियन सूप.
अश्या खादाडीच्या पार्श्वभूमीवर मग अमेरिकेत आगमन झालं!! आणि मग काय विचारता......
***

"आज काय खायला जायचं?"
"तुम्हीच सांगा ईटालियन, चायनीज, जॅपनीज, थाई, मेक्सिकन की देसी."
"मिडल इस्टर्न ट्राय करायचं? डियरपार्कला उघडलंय बघ नवीन."
"त्यापेक्षा ग्रीक खाऊ यात का?"
एग प्लांट पार्मेजाँ, सूशी, बरिटो, यीरो आणि डम्प्लिंग्जवर देह पोसल्यागत संभाषणं सुरु झाली.
"जाऊ देत. त्यापेक्षा घरीच तोंडलीभात करते. पटेल ब्रदर्समधे छान ताजी तोंडली मिळालीत. कंटाळला जीव बाहेरचं 'तेच ते' खाऊन!"
"भाता बरोबर कैरी-कांदा लोणचं आणि मठ्ठा करते."
"हो हो. आम्ही मदत करतो चिराचिरीत."
उत्साहात मंडळी स्वयंपाकघरात आली आणि फोन वाजला.
"अवनी बोलतेय. शनीवारी संध्याकाळी तुम्ही लोक चक्क घरी सापडलात!"
"बोल बोल. अगं बाहेर पडणार होतो. पण घरीच जेवायचं ठरलंय. तेव्हा स्वयंपाक आणि बोर्ड गेम्स असा प्लॅन आहे."
"सुरु नाही ना केला स्वयंपाक."
"नाही. जातच होते."
"मग असं करा, इकडेच जेवायला या."
"चालेल. काय करून आणू?"
"छे छे. अगदी काही करायचं नाही. माझा स्वयंपाक तयार आहे."
"लग्नाच्या पहील्या वाढदिवसाला तुम्ही बाहेरगावी जाणार होता ना? मग हे काय?"
"जाऊ पुढल्या आठवड्यात. या तर तुम्ही."
आमचं लुटखुट दाराला कुलुप घालून अर्ध्या तासात विहंग-अवनीकडे पोचलं. जेवणाचा थाट बघतंच राहीले मी.
मिनस्त्रोन (?), कालामारी-क्रॅब केक, सिझर सॅलड विथ क्रोसिनी आणि ग्रिल्ड चिकन, मॉझ्झरेलाच्या तुकड्यांवर टोमॅटोचे काप, तुळस, लाल ढोबळी मिरचीचे काप ऑलिव्ह तेल वगैरे घालून कायकाय केलेलं. १-२ प्रकारचे पास्ते आणि वाईन. प्रत्येक पदार्थाचं नाव घेऊन ओळख झाली. पोटभर गप्पा आणि भरपेट जेवण झाल्यावर फक्त आडवं व्हायचं बाकी होतं.
"आज फ्रेंच करायचं ठरवलं होतं. पण आयत्यावेळी इटालियन केलं."
"पोटात जागा ठेवा बरं का. अवनीनं कातील तिरामिस्सु केलंय." विहंगनी माहिती पुरवली.
पोटात इंचभर जागा नव्हती पण तिरामिस्सु म्हंटलं की "नाही" म्हणू नये. पाप लागतं म्हणून तेही हाणायचं ठरवलं. एका नाजुकश्या "डिझर्ट प्लेट" मधे भरल्यापोटी लाळ गाळायला लावणारा तिरामिस्सुचा तुकडा आला. पहील्याच घासात अगदी तोंडात विरघळला!
"काय काय घातलंस गं. अप्रतीम लागतोय." मी विचारताच अवनीपती बोलले,
"एकेक इन्ग्रेडियन्ट पारखून आणलाय. त्यातल्या मास्कापोन चीझसाठी तर दोन दुकानं हिंडलोय!"
"विही, 'मॅस्कारपोने' " अवनी त्याच्या कानात हलकेच कुजबुजली!
*****************

विषय: 
प्रकार: 

छान लिहिलंयस मृ... अजूनपण फजिता आणि जालेपिनो आठवतंय...
नुसता खाद्यपदार्थच नाही तर लॅटिनांची नावं उच्चारतानापण फजिती झालिये. 'होरे' नाव अ‍ॅड्रेस बूक मध्ये शोधून शोधून दमलो होतो.... Happy आणि राहेश म्हणजे राजेश हे समजायलापण खूप वेळ लागला...

मस्त लेख !!! एकदम पटला.
आणि असे बरेचसे "अवनीपती" पण पाहिल्येत आजूबाजूला. नवीन लग्न करून पहिल्यांदाच परदेशात आलेल्या बायकोच्या सारख्या चुका दाखवत राहायचे. फक्त जेवणातच नाही तर प्रत्येक बाबतीत. अनेकदा तर अश्या नवीन आलेल्या बायकांना त्यांच्या स्वतःच्या आवडी निवडी ठरवताच येत नाहीत.
आमच्याकडे बरंय. आम्ही दोघं एकदमचं आलो अमेरिकेत. त्यामुळे सगळ्या चुका दोघं मिळून करतो. Happy

मृ, मज्जा आली वाचतांना. ( अर्धा एक किलो वाढलं ही असेल मेलं..आमचं आपलं नुसतं वाचूनही !!)
अवनी चं टिट फॉर टॅट फार्फार आवडलं.विहंग चा चेहरा पाहायला मिळाला असता तर अज्जून मजा आली असती.

Zee : छान लिहीलय. बहुतेक सगळ्याजणी यातुन जात असतील सुरवातीला नन्तर आहेच तिरामिस्सु, टॉर्टिया !!! >>>

सगळ्याजणी नव्हे सगळेजण म्हणा .. फक्त भारतातुन आलेल्या मुलिच नव्हे तर मुले सुद्धा यातुन जातात.

मृण्मयी,
पदार्थांची यादी वाचून माझ्या (सी.के.पी.) आजिची जाम आठवण आली बघ. यातले काही पदार्थ, खास करून निनाव, तर आईला पण जमायच नाही. उगाच सुस्कारे न सोडता या वीकेण्डला करूनच बघणार असा निर्णय घेतला आहे. खूप मजा आली तुझा लेख वाचून.
कल्पू

लोकहो, मनःपूर्वक धन्यवाद!

छान लिहीलयस मृ. आवडले.

मस्त आहे. भारतीय पदार्थांच्याआठवणीनी तोंडाला पाणी सुटलय. लेख खूप आवडला.
_______________________________
"शापादपि शरादपि"

नमस्कार,
मी इथे नविन आहे.
मॄ ताई, लेख फार अवडला.

मृण्मयी
लेख तर छानच आहे, मस्त लिहेलय. वाचून तोंडाला पाणी सुटलं. पण तिरामिस्सु म्हणजे काय पदार्थ (अरेरे) हेच माहित नसल्यामुळे एव्हढे रिलेट होता आले नाही. जरा कोणी फोटो टाकू शकेल का? म्हणजे मी काय मिस् करतेय हे तरी कळेल.
धनु.

सहीच आहे. मस्त जमलय तिरामिस्सु. Happy

तिरमिस्सु केक आहे इटालियन पद्धतीचा.
-------------------------
जाने क्युं लोग मोहोब्बत किया करते है..

हा घ्या फोटो . Tiramisu नावाने गूगल केल्यास रेसिपी सुद्धा मिळेल . Happy
बाकी लिखाण मात्र फक्कड जमलंय . Happy आता लवकरच खायला हवं .

T.jpg

छान लेख!
परवा पुण्यात 'करी ऑन द रुफ' मधे तिरामिस्सु मागवला होता..अतिशय भन्कस...
आता देशात असताना विचारही करणार नाही.

स्स्स्स्स्स्स्स उगीच सांगितलं फोटो टाकायला.
जळून जळून खाक झाले.
खा खा मजा करा.

त्रास आहे मृण हा लेख म्हणजे ... सॉल्लिड तोंड खवळलंय !
उच्चाराच्या गोंधळाचा अजून एक पदार्थ 'केसडिया' -- देसी उच्चार 'कसादिला' Happy

प्रतिसादांकरता मनःपूर्वक धन्यवाद!

संपदा, हा घोर अन्याय आहे. डोळ्यांना दिसणारं तिरामिस्सु तोंडात टाकायला मिळू नये! Sad

मस्त लेख गं मॄण्मयी.
ते मॅस्करपोने चीज मी एकदा ग्रोसरीत शोधायला गेले होते ( फूड ने. वरच्या जिआडा कडून इटॅलिअन उच्चार शिकून ) तिथल्या अमेरिकन मदतनीसाला बराच वेळ कळत नव्हते.
सगळ्यात कहर म्हणजे एकदा आम्हाला 'व्हॅनिला इसेन्स' समजावून सांगता सांगता पुरेवाट झाली होती. एक तर ही लोकं इसेन्स म्हणत नाहीत एक्स्ट्रॅक्ट म्हणतात. शेवटी त्याला कळलं की हे व्ह-निल-ला मागत आहेत. उच्चारांइतकेच आपले इंग्रजी शब्दांवरचे आघातही वेगळे पडतात आणि ह्यांना समजत नाही.

हे मस्तच लिहिलयस मृ... आम्ही पण अमेरिकेत एकत्र आल्यामुळे कुणी कुणाला शहाणपणा शिकवला नाही. पण लेक अधेच मधे शिकवते Happy

लगे हाथ बोर करुन घेतो... तोंडले की क्या बात है...

इसवी सन २००० च्या आसपासची गोष्ट आहे.
मा. सुष्मिता सेन यांना बिवी नं. १ चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळाला...

तेव्हा तो पुरस्कार घेताना त्या म्हटल्या होत्या:-
"बघा राव.... शेवटी जे नशिबात असतं ते मिळतंच... कोणी आपल्यापासुन आपलं नशीब हिसकावुन घेऊ शकत नाही... (त्या बाहुलीला कवटाळत....) " त्यांचा रोख सौ. ऐश्वर्या कडे होता. ( सु. सा. नलगे.. )

मुद्दा काय? नसीब है भाई सभिका नसिब है भाई| जो लिखा है वो तो जरुर मिलेगा....
आई शप्पथ! काय पकवलाय..... जातो आता... Happy

प्रज्ञा, धन्यवाद.

हा धागा वर आल्यावर सगळ्यात पहिले खोदकामगार प्रज्ञा यांचीच आठवण झाली. Happy आणि खरंच निघालं. Proud

मी ही हे आत्ताच वाचलं... झकास जमलाय लेख. आता माय्बोली आय्डी मृण्मयी यांची सर्व रंगीबेरंगी पाने लगेहाथो वाचून घेते.

Pages