वेगवेगळी फुले उमलली

Submitted by kadamb on 5 June, 2009 - 18:11

हृदयनाथ मंगेशकरांचं हे गाणं ऐकलं की मन अजूनही हळुवार होतं. एकमेकांच्या अंगावर फुलांचे झेले उधळण्यचे दिवस सरल्याचा हळवा सूर लागतो.पण कधीतरी ते फुलपंखी दिवस उमललेच असतील ना? त्या दिवसांची जेव्हा केव्हा कल्पना मी करते तेव्हा तेव्हा वाटते,तो मधुमास (चैत्र) असावा, वसन्ताचे आगमन नुकतेच झाले असावे. मनसिज असा कामदेव , तो तर वसंताऋतूचा मित्रच...........मोगऱ्याचा धुंद करणारा गंध असेल, तो आणि ती हरवून गेले असतील एकमेकात.!

मोगरा ,आम्रमंजिरीचा गंध,गुढीपाडवा अशा अनेक गोष्टी वसंताच्या संदर्भात आठवतात..अगदी लहानपणी 'आला वसंत दारी' म्हणून एवढे काय खूष व्हायचे?" असे वाटायचे. कारण गुढीपाडव्याच्या आगे मागे तोंडी परीक्षा असायच्या. मग लेखी परीक्षा .! फक्त गच्चीवर किंवा गॅलरीत बसून अभ्यास करताना कोकिळांचे कूजन ऐकू यायचे, अंतर्मनाला सुखावून जायचे! कै री चा छुन्दा , साखरंबा आणि पन्हे व्हायचे. उन्हाळा शीतल व्हायचा. आरोग्य संपदा मधे'आला उन्हाळा तब्बेत सांभाळा' असा कार्यक्रम आला की उन्हाळा हे काही तरी तब्बेत सांभाळण्याजोगं भारी प्रकरण आहे अस वाटायचं.

थोडे मोठे झाल्यावर होळी,पाडवा आणि बोर्डाच्या परीक्षा, पेपर तपासणे याची पक्की गाठ बसली, ती काही केल्या सुटता सुटेना.

अमेरिकेत आल्यावर या स्प्रिंग सीज़न चे महत्त्व पटायला लागले. बर्फाचे पांढरेशुभ्र डोंगर सुरुवातीला फारच कौतुकाचे होते. आकाशात बसून कुणीतरी मोदकाची पिठी चाळावी तसा बर्फ भुरभुरत असे. माझ्या वाढदिवसाला पहिला स्नो फॉल पाहिला तेव्हा वाटले या परक्या देशात आहे तरीही कुणीतरी आपल्याला आभाळभर शुभेच्छा देत आहे. नंतर हे शुभेच्छा देणं रोजचच झाल..

मग स्वच्छ ऊन कधी आहे हे पाहण्यासाठी वेदर चॅनेल पाहवासा वाटायला लागला.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मात्र थोडे तेज:पुंज दिवस यायला लागले. एखाद्या दिवशी तापमान चांगला असेल तर जत्रेत असावी तशी बागेत गर्दी दिसायला लागली. खुरटलेली, सुकलेली झाडं तरारून फुलायला लागली.सृष्टी हिरवाईने नटली. गवतावर नाजूक पिवळी फुलं दिसायला लागली.नितांतसुंदर चेरी ब्लॉसम पहिला. लाल गुलाबी ट्यूलिप्स दिसायला लागले. असं ऐकिवात आहे की अंस्टरडॅमला लोक या मौसमात केवळ ट्युलिपसच्या बागा पाहायला जातात. लंडनच्या बंकिंगहॅम पॅलेस चा बगीचा देखील या काळात नयनरम्य दिसतो.

असा सालंकृत निसर्ग पाहाताना कालिदासाचे ऋतुसंहार नाही आठवले तरच आश्चर्य! ऋतुमानाचा सामान्य माणसाच्या मनावर इतका परिणाम होतो मग कामिजनांची हृदये विद्ध नाही का होणार? सृष्टीत एव्हढे नव चैतन्य आल्यावर कात टाकल्यासारखी मोठमोठी जॅकेट्स टाकून बीचवर निघाली मंडळी समुद्र्स्नान घ्यायला, जल क्रीडांचा आनंद लुटायला!

मुलांच्या सायकली निघाल्या, स्कर्टमधे मुली शोभून दियायला लागल्या,मिकी मौसचे रंगीत फ्लोट दिसायला लागले. निळे,हिरवे असे शीत रंगसंगतीचे कपडे जाउन पिवळे,लाल असे फ्लोरोसेंट कलर्स दिसायला लागले. हीटर बंद झाले आणि गाड्यांच्या काचा इतक्या महिन्यानी उघड्या करता आल्या. गरम कॉफी ऐवजी कलिंगडे ,स्ट्रॉबेरी,टरबूजे दिसायला लागली ग्रोसरी स्टोर्स मधे.

वसंत गेला ,ग्रीष्म संपला ,एके दिवशी झाडावर लाल पिवळी छटा दिसायला लागली. थोडी थंडीची शिरशिरी आली. एकेक पान गळावया लागले. फॉल सुरू झाला वाटते...........उ म ले ली फुले गळून गेली.
फुलांचे झेले उ ध ळण्या चे दिवस संपले!

कदंब
http://shreya-tanujasblog.blogspot.com/

गुलमोहर: 

छान लिहिलय, कदंब (आयडीही मस्तय). मायबोलीवर स्वागत आहे.... बहरत रहा Happy

मस्त लिहीलय

प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल धन्यवाद...........!

मस्तच. कालीदासाच्या ऋतुसंहार बद्दलही लिहा.

कंदब, फारच सुरेख!

आकाशात बसून कुणीतरी मोदकाची पिठी चाळावी तसा बर्फ भुरभुरत असे>> ही प्रतिमा आवडली!

खूप छान ,प्रसन्न वाटलं वाचताना. गोडं उपमा दिलीस स्नो ला.बरोब्बर डोळ्यासमोर चित्रं आले

खूप छान ,प्रसन्न वाटलं वाचताना. गोडं उपमा दिलीस स्नो ला.बरोब्बर डोळ्यासमोर चित्रं आले

सुरेख लिहिलंय! मायबोलीवर स्वागत आहे!

वा! ते गाणं आणि ऋतुचक्र यांची अशी सांगड आवडली Happy

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

मस्त आहे.
_______________________________
"शापादपि शरादपि"