अंमली! - भाग १०

Submitted by अज्ञातवासी on 6 March, 2023 - 05:15

सततचा प्रवास आणि त्यानंतर लांबत गेलेलं आजारपण, यामुळे हा भाग टाकण्यास उशीर झाला.
पुढील भाग लवकर टाकण्याच्या प्रयत्न असेन, पण अक्षम्य विलंबसाठी मनापासून माफी!

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83001

धडधडत्या छातीने, मंद पावलांनी तो आत गेला.
एक उंचपुरी, धिप्पाड व्यक्ती पाठमोरी उभी होती.
समोरच टेबलावर एक प्रचंड मोठी बंदूक पडली होती, आणि अनेक मोठ्या बंदुका आजूबाजूला पडल्या होत्या.
त्या व्यक्तीने बाजूला पडलेली एक छोटी बंदूक उचलली, लोड केली, व मागे वळली.
तिच्या दर्शनानेच तो दिपून गेला...
कित्येक वर्षांनी...
जी व्यक्ती बनायचं तो स्वप्न बघत होता, तीच व्यक्ती त्याच्या समोर उभी होती.
"बसा. पप्पू कुठे आहे?" एक धीरगंभीर आवाज घुमला.
"पप्पू?तो गाडीत बसलाय..."
"मग तुम्ही इथे काय करताय? जा, तुम्हीपण गाडीत बसा."
"दादासाहेब..."
"...बोलवा त्याला..."
मानस भांबावून गेला.
"मी काय म्हणालो? बोलवा त्याला."
मानस धावतच तिथून निघाला.
थोड्याच वेळात पप्पू तिथे हजर झाला.
"पप्पू, किती दिवसांनी दिसतोय. मागे एकदा कृष्णाबरोबर आला होतास. आज इथे येऊनही भेटायचं नाही?"
"तसं नाही ओ दादासाहेब..."
"मग कसं? मुलगी झाली तुला, पेढे काय साधी जिलेबी दिली नाहीस तू."
पप्पू ओशाळून उभा राहिला.
तेवढ्यात जोशी आत आले.
हातात एक छोटी पेटी घेऊन...
दादासाहेबानी पेटी घेतली, आणि उघडली.
...चिमुकले चांदीचे पैंजण...
"राजूशेठ... कलाकुसरीत कधीही चुकणार नाही. खूप सुंदर...हे घे रे... चिमुकलीसाठी भेट."

पप्पू भारावून गेला. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
"घे रे..."
त्याने वाकूनच दादासाहेबांकडून पेटी घेतली.
"आयुष्मान भव!" त्यांनी पेटीवर हात ठेवत आशीर्वाद दिला.
...मानस हे बघूनच गप्प बसला...
"बरं ये आता. याच्याशी बोलतो थोडावेळ."
"पप्पू नमस्कार करून निघून गेला."
"बस."
मानस बसला.
"बोल."
त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता.
"अरे, बोल..."
"ते...जैन म्हणत होते."
"अच्छा तुझं ऑफिस आहे होय त्या बिल्डिंगमध्ये."
"दादासाहेब जैन म्हणताय तिथून ऑफिस खाली करायचं. त्यांचं म्हणणं आहे, तिथून वाड्यावर नजर ठेवता येईल. मी साधा बिजनेसमन आहे हो. कशाला नजर ठेऊ? मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय दादासाहेब, आणि माझी जागा. मोठ्या कष्टाने ती जागा मी मिळवली आहे."
"बीजनेस कधी सुरू केलास?"
"झाले असतील चार-सहा महिने."
"आणि इतक्या कमी काळात प्राईम लोकेशनला जागा घेण्याइतका तू मोठा झालास?"
मानस बावरला.
"दादासाहेब मी स्पेशालिटी केमिकल बनवतो, यात प्रचंड नफा असतो. मी केमिकल इंजिनीरिंगचा टॉपर आहे. तुम्ही वाटल्यास जेजे कॉलेज मध्ये चौकशी करा."
"अच्छा, आम्हालाही शिकायला हवं, स्पेशालिटी केमिकल कसे बनवतात ते."
"दादासाहेब, कशाला थट्टा करताय?"

"नाही, म्हणजे कुठल्या केमिकलमधून इतका नफा मिळतो ते बघता येईल."
मानस काहीही बोलला नाही.
"चल, तुला काहीतरी दाखवतो."
दादासाहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
दोघेजण बाहेर आले.
"सापाला वाटतं, तो भक्ष बघतोय..." दादासाहेब समोर बघत म्हणाले.
समोरच मानसच ऑफिस दिसत होतं. लांबवर... काचेच.
आणि पुढच्याच क्षणी त्या काचेच्या ऑफिसच्या सगळ्या काचा फुटताना त्याला दिसल्या.
"...पण त्याच्यावर गरुडाची नजर असते." दादासाहेबानी वाक्य पूर्ण केलं...
मानसच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. उष्ण अश्रू. त्याच्या शरीरात आता संतापाने आगडोंब उसळत होता.
"जैन दोन दिवसात वाड्यासमोरची जागा पूर्ण पॅक करून ऑफिस नव्यासारखं करून देतील."
एवढं बोलून दादासाहेब त्याच्या उत्तराचीही वाट बघत थांबले नाहीत.

"तो अजूनही समोरच्या बिल्डिंगकडे बघत होता."
त्याचं संपूर्ण अंग कंप पावत होतं...
आणि तो हसायला लागला. मोठमोठ्याने...
त्याला हसू आवरत नव्हतं.
तो वेड्यासारखा हसतच होता.
तो गाडीत बसला आणि निघूनही गेला.
त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. अतीव समाधानाचं हसू!
*************************************
त्या खोलीत दादासाहेब बसले होते. समोरच खानसाहेब बसले होते.
"खानसाहेब काय वाटतंय?"
"काहीतरी काळंबेरं आहे."
"मी लक्ष देण्याइतकं?"
"नाही दादासाहेब, दरवर्षी असे करोडपती नाशकात येतच असतात. फक्त याच्या पैशाचा मार्ग शोधला पाहिजे."
"केमिकल इंजिनियर म्हणतो स्वतःला. आपला केमिकल इंजिनियर लावावा का मागे? बघू तरी, कोणतं केमिकल बनवतोय ते."
"ठीक आहे, तसंही आपण थोडे दिवस मुंबईला राहू. हा विषय मागे पडायला नको दादासाहेब."
"फोन करा त्याला. बोलावून घ्या आताच. बघू नेमकं काय आमच्या नजरेत पडत नाहीये."
"जी दादासाहेब."
खानसाहेबांनी फोन लावला. थोडावेळ त्यांचं बोलणं झालं.
"निघतोय, येईल अर्ध्या तासात."
"ठीक आहे. तुम्ही निघा खानसाहेब. मुंबईची तयारी करा."
खानसाहेब तिथून निघाले.
थोड्या वेळाने एक गाडी आत आली.
त्यातून एक तुळतुळीत टक्कल केलेली व्यक्ती उतरली व सरळ दादासाहेबांकडे गेली.
"ये डिसुझा, तुझीच वाट बघत होतो." दादासाहेब हसले.
...आणि डिसूझाही हसला....

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट.
"सापाला वाटतं, तो भक्ष बघतोय..." दादासाहेब समोर बघत म्हणाले.
समोरच मानसच ऑफिस दिसत होतं. लांबवर... काचेच.
आणि पुढच्याच क्षणी त्या काचेच्या ऑफिसच्या सगळ्या काचा फुटताना त्याला दिसल्या.
"...पण त्याच्यावर गरुडाची नजर असते." दादासाहेबानी वाक्य पूर्ण केलं...

काय लिवलय!!

<< हा भाग टाकण्यास उशीर झाला. >>
भाग टाकलात याबद्दल आभार.

आणि तो हसायला लागला. मोठमोठ्याने...
त्याला हसू आवरत नव्हतं.
तो वेड्यासारखा हसतच होता.
तो गाडीत बसला आणि निघूनही गेला.
त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. अतीव समाधानाचं हसू!

हे काही कळले नाही. पुढील भागात या हसण्याचे कारण असेल कदाचित..

लेखक महोदय
ह्याच्या पुढचे भाग काढून घेतले त्याबद्दल वाईट वाटलं, आम्हा सामान्य वाचकांसाठी ते खूप वेगवेगळ्या वळणानी जाणारे, कथा नायकाच्या प्रेमात पडायला लावणारे होते, असो कथेचे सर्व हक्क आणि निर्णय लेखकाच्या स्वाधीन असतात
तुम्ही वेगळ्या रूपात ही कथा पुढे न्याल ह्याची खात्री आहे.