अधिकार

Submitted by कौतुक शिरोडकर on 3 June, 2009 - 12:07

(काही वर्षापुर्वी वर्तमानपत्रात छापून आलेली कथा. मुळ कथा तर सापडली नाही. पण कथासुत्र लक्षात होतं. पुन्हा नव्याने मांडली. माझ्याच चौकटीला छेद देण्याचा एक प्रयत्न.)

सारंगचा फोन आल्यापासून ती दर दोन मिनिटांनी खिडकीकडे वळत होती. कधी नव्हे ते घड्याळ्याकडे तिचे सारखे वळून बघणे चालूच होते. घरातल्या सगळ्या घड्याळ्यात वेळ सारखीच होती आणि सरतही होती. पण सेकंदा-सेकंदाने. नेमक्या ह्याच गोष्टीचा तिला त्रास होत होता. वाट पहायची म्हटलं की सेकंद ही कधी मिनिटांसारखे तर कधी तासांसारखे वाटू लागतात. वेळ जावा म्हणून तिने शेवटी टि.व्ही. लावला. सगळे चॅनल्स सर्फ करून झाले. पण तिचे मन काही त्यात गुंतायला तयार नव्हते. तिने रिमोट सोफ्यावर टाकला व ती किचनकडे वळली. त्याला आवडणार्‍या सगळ्या वस्तु तिने किचनमध्ये तयार ठेवल्या होत्या. तो जे काही मागेल ते तयार व्हायला वेळ लागता कामा नये, तिने स्वत:लाच बजावलं. घड्याळात साडे-सहाचा टोला पडला आणि ती पुन्हा खिडकीकडे धावली.

सहाव्या माळ्यावरच्या तिच्या खिडकीतुन मेन गेट नीट दिसत होते. आता खिडकीसमोरून हलण्याची तिची इच्छा होईना. तिने गेटकडे नजर लावली. मेन गेट नेहमीप्रमाणे बंद होतं. वॉचमन गेट खोलण्यासाठी बाहेर आलाच की ती सरसावत होती. पण आत येणारी गाडी नेमकी भलतीच असायची. पुन्हा एकदा हॉर्नचा आवाज झाला. वॉचमन उठला आणि त्याने गेट खोलला. मरीन ब्लु कलरची स्कोडा आत आली आणि ती ड्रेसिंग टेबलकडे धावली. तिच्या मागच्या वाढदिवसाला त्याने दिलेली साडी नेसून ती तयार होतीच. मोजकेच दागिने, पावडरचा हल्कासा हात, एकुलती एक वेणी, केसात डाव्या बाजूस लाल गुलाबाचे फुल... सगळ्या गोष्टी त्याला आवडतील अशा. तिने स्वत:ला एकवार न्याहाळले. फणी घेऊन किंचित हललेली बट जाग्यावर आणली. गंमतीत फणी तिने भुवयांवर फिरवली. कित्येक दिवसांपासून समोर बेवारश्यासारखा पडलेला सेंट उचलून तिने किंचित फवारला. तो मंद सुगंध लेऊन ती हॉलकडे वळली. दाराकडे पोहोचल्यावर तिने एकवार हॉलमध्ये नजर टाकली. सगळ्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी होत्या. तेवढ्यात टि.व्ही. चालू असल्याचे तिच्या लक्षात आले. दोघांत तिसरा तिला नकोच होता. तिने चपळाईने सोफ्यावरील रिमोट उचलून टि.व्ही. बंद केला. रिमोट टि.व्ही.जवळ ठेवत असतानाच लिफ्टचा आवाज तिच्या कानी आला. तिने लगबगीने आतील दार उघडले. पुढच्या मिनिटात सारंग सेफ्टी डोरच्या पलिकडे होता. तिचा चेहरा केसात माळलेल्या गुलाबासारखा फुलला. तिने दरवाजा उघडला व तिला पहाताच त्याने किंचित हसून प्रत्युत्तर दिलं. थकवा त्याच्या चेहर्‍यावर जाणवत होता. तिने पुढे सरून त्याच्या हातातील बॅग घेतली व शेल्फमध्ये ठेवली. तोही तिच्यामागोमाग आत आला. येता-येता त्याने दोन्ही दरवाजे लोटले.

तो सोफ्यावर विसावला.
"फार थकलेला दिसतोयस." तिने जवळ बसून विचारले. त्याने चेहर्‍यावर स्मित.
"छान दिसतेस. नेहमीप्रमाणे" त्याने तिच्या डोळ्यात पाहील आणि ती लाजली... सुखावली.
"चहा घेणार की कॉफी? " तिने पुढे सरून विचारलं.
"कॉफी." त्याने मागे रेलत सांगितलं.
"सोबत उपमा. नेहमीप्रमाणे ? " तिने विचारलं आणि तो होकारार्थी हसला. ती किचनकडे वळली. तिने किचनच्या खिडकीतून पाहीलं तेव्हा तो कपाळावर डावा हात ठेवून अलगद पहूडला होता. तिने झटपट कॉफीसह उपम्याचीही तयारी केली.

तिची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. ती समोर उभी होती.
"तू फ्रेश होतोयस ना ? " तिने विचारले.
"दोन मिनिटात आलोच." तो बाथरूमकडे वळला आणि ती किचनकडे. तो परतला तेव्हा टिपॉयवर तिने कॉफी व उपम्याची प्लेट तयार ठेवलेली. त्याने प्लेट उचलली.
"हे काय ? एकच प्लेट. तू नाही खाणार ? " त्याने चमचा नाचवत विचारलं.
" तू सुरू कर. मी माझी प्लेट आणतेच." ती किचनकडे वळली. ती परतेपर्यंत त्याने उपम्याच्या फडशा पाडला.
"अजून आणू ? " तिने विचारलं.
"नको." त्याने हसून नकार दिला व कॉफीकडे वळला. ती शांतपणे त्याचं कॉफी पिणं न्याहाळत होती.
"काय पहातेस ? " त्याने विचारलं.
"काही नाही." तिने हसून त्याला टाळलं. प्लेट व कप घेऊन ती किचनकडे वळली. तो पुन्हा मागे रेलला.
"दिल्लीवरून पुन्हा कलकत्याला का गेलास अचानक ? " तिने भांडी सिंकमध्ये टाकताना त्याला विचारलं.
"काही विशेष नाही गं. आमचे जापनीज डेलिगेटस आले होते. व्हाईस प्रेसिडेंटचा फोन आला. म्हणाले, जमल्यास भेट. गेलो भेटायला. नथिंग इंटरेस्टिंग. रुटीन." त्याने पडल्या-पडल्या तिला उत्तर दिलं.
"मग आता किती दिवस मुक्काम ?" तिने मनात घोळणारा महत्त्वाचा प्रश्न विचारला.
"तीन दिवस. पुन्हा चेन्नईला जायचय त्यानंतर." त्याने उठून बसत तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
तीन दिवस. नॉट बॅड. तेवढे तर तेवढे. महिन्यातून असा फार थोडा वेळच तर तो तिच्या वाट्याला येतो. घर खायला उठते इतर वेळी. त्याला हे सांगून काही उपयोग नाही हे जसं तिला कळत होतं, तशी तिची घालमेल त्याला कळते हेही तिला कळत होतं. तिने ती चार भांडी आवरायला सुरूवात केली.

"किती वेळ लागणार आहे तुला तिथे ? " त्याने विचारलं.
"बस झालय रे आवरून. आलेच मी." तिने हातातील कप शेल्फमधे सारत उत्तर दिले. तो किचनमध्ये आला.
"रात्रीच्या जेवणाचा मेनू काय हवाय ? " तिने त्याला समोर पहाताच विचारलं.
"ते आपण नंतर वेटरला सांगू ? " त्याने तिला जवळ ओढत सांगितले.
"वेटरला ? इतके दिवस बाहेरचं खातोयस ना ? घरचं आवडेनासं झालय की काय ? " तिने लटक्या रागात विचारलं.
"घरचं आवडतय म्हणून तर परत येतो ना. पण तू जर आता स्वयंपाकाच्या भानगडीत पडलीस तर तास-दोन तास मला माशा मारत बसावं लागेल आणि या क्षणी मी त्या मुडमध्ये नाही. तेव्हा आज नो घरका खाना. तू तयार आहेसच आणि मीही. सो, लेटस गो फोर अ पार्टी."
"सुअर ? " तिने विचारलं. क्षणभर थांबला तो व मग हसून त्याने मान डोलावली.

रात्री दोघे परतले तेव्हा साधारण अकरा वाजले होते. त्याने गाडीतच सोडलेली कपड्यांची बॅग घेऊन तो तिच्यामागोमाग आत आला. बॅग सोफ्याजवळ टेकवून तो सोफ्यावर पहूडला.
"मी आलेच चेंज करून." त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकून ती आत निघून गेली. तो डोळे मिटून तसाच पडून राहीला. थोड्या वेळाने उठून त्याने ड्रॉवर उघडून घड्याळ व पाकीट आत टाकले. त्याच वेळेस त्याची नजर वरच्या कप्प्यातल्या फाईलकडे गेली. काच सारून त्याने फाईल काढली. पांढर्‍या रंगाच्या त्या प्लास्टिक फोल्डरवर "डॉ. जोगळेकर्स हॉस्पिटल" असं सुरेख लाल रंगात छापलं होतं. तेवढ्यात तिची चाहूल लागल्याने तो वळला.
"ही फाईल ? " त्याने विचारलं.
"नेहाची आहे. ती आली होती काल आणि इथेच विसरून गेली." तिने क्षणाचाही विलंब न करता त्याला सांगितलं आणि फाईलसाठी हात पुढे केला. तिच्या नजरेला नजर भिडवून त्याने फाईल पुढे केली. फाईल घेऊन ती आत गेली.

थोड्यावेळानंतर दोघे बालकनीत होते.
"झोप येतेय का ?" त्याने विचारलं.
"नाही. बोल." ती जांभई दाबत बोलली.
"आज पौर्णिमा आहे." तो आभाळाकडे नजर लावत बोलला. तिने त्या दिशेने पाहून हुंकार दिला. तो तिच्याकडे वळला.
"एक चंद्र तो नभी निरंतर, एक असे मज समीप सुंदर" तो गुणगुणला.
"अहो, कविमहाशय, परत या." ती खळाळून हसली.
"आलो." आणि तो तिच्या हास्यात सहभागी झाला. हसता-हसता ती किंचित गंभीर झाली.
"आईंची तब्येत कशी आहे सारंग ?" तिने विचारलं.
"ठिक आहे." त्याचा स्वर गंभीर झाला.
"पण नेहा तर म्हणत होती..." तिने वाक्य पुर्ण केलचं नाही. त्याने तिच्याकडे पाहीलं. तो काहीच बोलला नाही.
"असं किती दिवस चालणार आहे सारंग ?" तिने त्याचा हात हातात घेतला.
"मला माहीत नाही, श्यामल. पण मी कितीही प्रयत्न केला तरी मला मनातली अढी दूर सारताच येत नाही." त्याच्या स्वरात किंचित कंप होता.
"काहीही झालं तरी ती आई आहे ना, सारंग." तिला तो कंप जाणवला.
"म्हणून तर..." तो पुढे काहीच बोलला नाही. थोड्या वेळासाठी बाहेरची शांतता त्यांच्या बालकनीत आली. दुर कुठेतरी कुत्र्यांचे भुंकणे त्या शांततेला छेदत होते.
"आता त्यांचे जास्त दिवस नाहीत. मग हा अबोला राखण्यात काय अर्थ आहे ? उगाच का अशी शिक्षा केल्यासारखं..." ती बोलता-बोलता गप्प झाली. हा विषय त्याच्या आवडीचा नाही हे तिला माहीत होतं. म्हणून तिने हॉटेलमध्ये एकदाही हा विषय काढला नाही. त्याने तिच्याकडे पाहीलं.
"ही शिक्षा फक्त तिला एकटीलाच आहे असं वाटतयं तुला श्यामल. मला नाही. मी तिचा एकुलता एक मुलगा आहे आणि गेली तीन वर्षे हा अबोला चालू आहे तो काय फक्त तिला एकटीला शिक्षा करण्यासाठी. नाही श्यामल, नाही. चुक झाली तर त्याची शिक्षा ही भोगायलाच हवी. जशी तिला तशीच मलाही."
"पण हे सगळं माझ्यामुळे याची खंत आहे ना मला." तिचा कंठ दाटला आणि तो तिच्याकडे वळला.
"ये वेडाबाई, तू कशाला वाईट वाटून घेतेस ? " त्याने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा समोर आणला.
"मीही स्वत:ला समजावते रे कितीकदा. तुझ्या आईला मी पसंत पडली नाही. तिने मला नाकारलं आणि तूझा आणि तिचा अबोला सुरू झाला तो झालाच. तिच्या हट्टाला तुही हट्टानेच उत्तर दिले. हे सगळं पुन्हा पुन्हा आठवतं रे. मग माझं मलाच अपराधी वाटायला लागतं." ती आता कोणत्याही क्षणी रडेल असं वाटलं त्याला.
"श्यामल जर हे घडतेय तिच्या आणि माझ्या हट्टामुळे, मग तू उगाच कशाला गिल्टी फिल करून घेतेस ?" त्याने तिची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिला जवळ घेऊन त्याने लहान मुलाला थोपटावं तसं थोपटायला सुरूवात केली. त्याच्या त्या स्पर्शाने ती शांत झाली. बराच वेळ कोणीच काहीच बोललं नाही.
"श्यामल, नेहाला काय झालय ? " त्याने अचानक आठवल्यागत विचारले.
"काही नाही." ती बोलली.
"मग ती फाईल ? " त्याने तिच्याकडे पाहीलं.
"ती........ ती माझी फाईल आहे." तिने त्याच्याकडे पहात उत्तर दिलं.
"तुझी ? काय झाल ? कशासाठी ?" त्याने प्रश्नांची सरबत्तीच केली.
"मला दिवस गेलेत." तिने नजर चोरली.
"व्हॉट ? आणि तू हे मला आता सांगतेस. तेही अशा पद्धतीने." तो आनंदाने ओरडलाच. ती काहीच बोलली नाही.
"आय कान्ट बिलिव्ह इट. मी तुला सांगू शकत नाही की मला याचा किती आनंद झालाय ते. श्यामल, आय ऍम हॅप्पीएस्ट मॅन ऑन दिस अर्थ नाऊ. काय म्हणताहेत डॉक्टर ? तू बस पाहू आधी. बस इथे." त्याने तिला वेताच्या खुर्चीत बसवलं. "गुड. आता बोल."
"फक्त महीनाच झालाय सारंग. "
"असु दे. हे बघ, उद्या शॉपिंगला जायचं. तुला काय हवं ते तू घे. जे हवं ते. मला काही पुस्तकं घ्यावी लागतील. बाळाच्या आईची काळजी कशी घ्यायची ? बाळाची काळजी कशी घ्यायची ? या दिवसातील खबरदारी ? वगैरे वगैरे. मी नुसत्या कल्पनेनेच इतका एक्साईट झालोय मला काय करावं काय नाही तेच कळत नाही." त्याचा उत्साह आणि आनंद ओसंडून जात होते. "तुला काय वाटत श्यामल, मुलगा होईल की मुलगी ? मला तरी वाटतं की मुलगीच होईल. तुझ्यासारखी सुंदर, हसरी, बोलकी बाहुली." जणूकाही ती बाहुली त्याच्या नजरेसमोर होती.
"आणि तुझ्यासारखी झाली तर...... " ती फक्त काही तरी बोलावं म्हणून बोलली. त्याला त्याचं भानच नव्ह्तं. तो अजूनही बाहुलीच्या नादात होता.
"नको. ती कल्पना ही नको. तुझ्यासारखीच. फक्त तुझ्यासारखी." तो पुन्हा हरवलेला.
"पण असं काही होणार नाही सारंग." तिने शांत स्वरात त्याच्या मनोराज्याला छेद दिला. ती उठून उभी राहीली व बालकनीच्या रेलिंगवर रेलून बाहेरच्या अंधारात हरवू लागली.
"म्हणजे ? " एक अनामिक भीती मनात डोकावली व तो तिच्याकडे वळला.
"म्हणजे हे मुल मी ठेवणार नाही." ती निग्रहाने म्हणाली.
"काय ? वेड लागलय का तुला ? काहीही काय बडबडतेस तू ? श्यामल, हे आपलं मुलं आहे.... आपलं. आपल्या प्रेमाचं प्रतिक. तुला काय.... काय प्रोब्लेम आहे ते सांग मला. बोल... बोल लवकर." त्याला आता कारण जाणून घेणं गरजेचं होतं. एव्हढा मोठा निर्णय तिने एकटीने घेतला आणि तोही त्याला न विचारता. हे पटत नव्हतं त्याला. पटण्यासारखं नव्हतचं मुळी. त्या मुलावर त्याचा अधिकार होता. शिवाय त्या दोघांत तसा दुरावाही नव्हता आणि विसंवादही. मग असं का ?
"मी खरं तेच बोलतेय सारंग. तुझ्यासारखचं मलाही प्रिय आहे रे आपलं मुल. माझ्या रक्तामांसाचा गोळा. पण ह्या मुलाला मी जन्म देणार नाही." तिचा कंठ नकळत दाटला.
"ये श्यामल, हे बघ.... " त्याने तिचे खांदे धरले. " हे बघ... माझ्याकडे बघ आणि बोल.... बोल काय झालय तुला असा निर्णय घ्यायला ? प्लीज बोल.... ये श्यामल, बोल गं.... प्लीज." तिने मान वर करून त्याच्याकडे पाहीलं. त्याच्या डोळ्यातली अजिजी जाणवली तिला. आत काहीतरी तुटलं. तिने स्वत:चे डोळे पुसले. त्याच्या नजरेला नजर भिडवली.
"सारंग, नऊ महिने मी या कळा सोसायच्या आणि एका नव्या जीवाला जन्म द्यायचा. मातृत्वाचं अपार सुख मला देणार ते. पण मी त्याला काय देणार सारंग ? " तिने त्याच्या नजरेस नजर भिडवली.
"तुला म्हणायचय तरी काय ? "
"जन्माला आल्यावर त्याच नाव काय लावायचं मी सारंग ?" तिच्या खांद्यावरची त्याची पकड सैल झाली. तिला जाणवलं ते.
"म्हणूनच मला हे मुल नकोय, सारंग."
"हे..... मी... मी काय म्हणतो श्यामल... असा पराकोटीचा निर्णय घेऊ नकोस. यावर मार्ग काढता येईल." त्याच्या स्वरातील हतबलता पुन्हा एकदा तिला हादरवून गेली.
"तीन वर्षे.....गेली तीन वर्षे यावर काहीच मार्ग निघाला नाही सारंग आणि आता... आता तर सगळं हाताबाहेर जायची वेळ आली आहे. आई म्हणून मी माझं नाव देईन त्याला. श्यामल... श्यामल चव्हाण. पण वडिलांच्या नावापुढे काय लिहू ? मी सहन करीन रे जगाचे ताशेरे... पण त्याला शिक्षा का ? ते ही त्याचा काहीच दोष नसताना. उद्या तो जेव्हा त्याचे वडील कोण म्हणून विचारेल तेव्हा काय सांगू त्याला ? हे की तो एक अनौरस आहे. समाजाच्या नजरेत त्याची आई एक ठेवलेली बाई आहे म्हणून."
"श्यामल, मला पटतय तुझं म्हणणं पण यावर इलाज आहे."
"काय इलाज करणार यावर तू सारंग ? सगळं काही सोडून अपेक्षेने आलेले मी. परतीचे सारे दोर कापून. पण तुझ्या त्या घराभोवतीचं जातीधर्माचं कुंपण फारच उंच निघालं. मी पार करू शकले नाही. घराची हौस होती रे. घरपणाची... आपल्या माणसांची. पण घर लाभलं नाही रे मला. फक्त हा अलिशान फ्लॅट मिळाला. सगळी भौतिक सुखं माझ्या पदरात घातली तू. पण या सजवलेल्या घरातल्या एखाद्या फर्निचरसारखी अवस्था झालीय रे माझी. मला चारचौघात नेताना तुझी होणारी कुचंबणा, कोणी पाहील ही भीती, सतत सगळ्यांशी खोटं बोलणं... नाही... नाही रे सहन होत हे आता. या सगळ्या गोष्टींचा अंत व्हायला हवाय आता." तिच्या अश्रुंचा बांध आता पुन्हा मोकळा झाला.
"ये श्यामल... श्यामल.. मी असं काहीच होऊ देणार नाही. मी तुला सर्वांसमोर नेईन श्यामल सारंग अधिकारी म्हणून. माझं मुल माझच नाव लावेल. त्याला कोणीही हिणवणार नाही याची ग्वाही देतो मी. ओढून ताणून जगवलेली नाती नकोत आता मलाही. मी आईला या गोष्टींची सरळ कल्पना देईन. सगळं आपल्या मनासारखं होईल." तो तिची समजुत घालण्याचा पुर्ण प्रयत्न करत होता. तिच्या हुंदक्याचा स्वर आता कमी होऊ लागला. पण तिचे प्रश्न संपले नव्हते.
"सारंग, पण त्याला त्याचे अधिकार मिळतील, उजळ माथ्याने तो वावरू शकेल या समाजात की दुसरीचा म्हणून पुन्हा तो दुय्यमच ? "
"त्याला त्याचा अधिकार मिळेल श्यामल आणि तुलाही तुझा. विश्वास ठेव माझ्यावर."
"आणि अवंतीच काय ? " तिचे प्रश्न संपले नव्हते.
"ती फक्त कागदोपत्री पत्नी आहे श्यामल. आईच्या हट्टामुळे हे लग्न झालय याची तिलाही कल्पना आहेच. आईने आत्महत्येची धमकी देऊन मला तिच्याशी लग्न करायला लावलं हे मी तिला पहिल्या दिवशीच स्पष्ट सांगितलेलं. आम्ही कधी मनाने वा शरीराने एकत्र आलोच नाही. ते मला जमलं नाही आणि तिनेही प्रयत्न केला नाही. तिही घराण्याच्या अब्रुचा व आईवडीलांच्या इभ्रतीच्या नावाखाली माझ्यासोबत राहीली. कदाचित तिलाही या बेडीतून मुक्त व्हायचं असेल.... आणि नसलं तरी आता हा पती-पत्नीच्या नात्याचा... भातुकलीचा खेळ संपवावाच लागेल. आईच्या एका हट्टामुळे तीन जणांच्या स्वप्नांची राख झाली. पण त्या येणार्‍या भविष्यकाळाला मी सावरेन श्यामल. त्याला याची झळ लागू देणार नाही."
त्याच्या स्वरातला आत्मविश्वास तिच्या मनात रुजू लागला. तिने त्याच्या छातीवर आपलं डोकं टेकवलं. आज ती तीन वर्षाच्या कैदेतून मुक्त होणार होती. ’ठेवलेली’ या शब्दातून तिची आता सुटका होणार होती. ती आता एक 'धर्मपत्नी 'आणि तिच्या होणार्‍या बाळाची सर्वाथाने ’आई’ होणार होती. तिच्याच नकळत तिच्या डोळ्यातले ओघळ त्याचा शर्ट भिजवू लागले आणि त्याने तिला जवळ घेतले. आकाशातल्या चंद्राभोवतीची चांदण्याची रास त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांनी धुसरशी झाली.

समाप्त.

गुलमोहर: 

मस्त.......... आवडली.............नेहमीप्रमाणे...........

मस्तं टर्न... छान फुलवलीयेस, कौतुक.

खुपच छान्....आवडली Happy
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

छान. वास्तवात असे घडेल का? हा प्रश्न मनात डोकावलाच.

व्वा! मस्त एकदम!!
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

छान रंगवली आहे.. Happy भानसासारखाच प्रश्न मनात डोकावला, अन ऊत्तर नकारार्थी मिळालं.. Sad

कौतुक... कथा आवडली.. आणि खरच अस घडल तर काय निर्णय घ्यावा हा प्रश्नचे.. गुंता सगळा

येस.. छान फुलवलीयेस.. मस्त!!

खरच कौतुक मस्त फुलवलिय्स कथा, आवडली Happy

ही कथा वाचली आणि मनात आत अजुन एक कथा सुरु झाली एका आईची काय असेल तिच्या मनात आत्ता वयाच्या ह्या टप्प्यावर आत्महत्येच हत्यार वापरुन मुलाला मनासारख करायला लावल पण झाल का मनासारख?

आणि सर्वात जास्त मनात रेंगाळली ती कथेत (पुरेशी) न आलेली अवंती. जी चार चौघिंसारख स्वप्न बाळगुन कुणाची तरी पत्नी झाली. आणि तिच्या मेंदीचे रंगही उतरले नसतील तेव्हाच तिला तिच्या सत्यवानाचा (तिचा सत्यवानच तो किंवा ज्याच्यासाठी गौरीहार पुजला असा सदाशीव तो) "तो" निर्णय ऐकावा लागला. काय आल असेल तिच्या मनात. सप्तपदी चालताना तिनेही स्वप्न बघीतली असतील प्रत्येक पावला बरोबर.

त्याने तरी विरोध म्हणुन आईशी अबोला पुकारला तिने कुणाशी धरायचा अबोला?

आताही त्याने शेवटी घेतलेल्या निर्णयाने तिचे काय?

कौतुका, बघ श्यामल कळली तुला, अवंती कळायला पण कठीण नाही तुझ्यासाठी. पार्ट २ येऊ दे ह्यावर

मस्त कथा!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

कौतुक, आवडली कथा.. तु फुलवलीयेस पण छान....
कविताला अनुमोदन..
आणि कदाचीत आईला जाणवणारा आपल्या हट्टातला फोलपणा.. तीन जीवांची झालेली वाताहात पाहुन होणारी घालमेल.. यावरही काही येऊ शकेल...
----------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

आईच्या एका हट्टामुळे तीन जणांच्या स्वप्नांची राख झाली.>> Sad

कविता अगदी खरंय गं... आत्महत्येची धमकी देउन जर लग्न केलच तर सारंगने ती (तरी) जबाबदारी सांभाळायला हवी होती. जेवढी आईची चुक आहे तेवढीच त्याचीही...

पण तुझ्या त्या घराभोवतीचं जातीधर्माचं कुंपण फारच उंच निघालं. मी पार करू शकले नाही. घराची हौस होती रे. घरपणाची... आपल्या माणसांची.>>

माझ्या बाबतीत हे फार थोड्या फरकाने घडलंय. आमच्या लग्नालाही माझ्या आणि त्याच्या घरच्यांची संमती नव्हती.. पण मी श्यामलपेक्षा खुपच लकी आहे. कोणा अवंतीच्या आयुश्याची वाट नाही लावली स्वतःची स्वप्नं पूर्ण करायला.

त्याच्याशिवाय राहायच नाही तर दुसर्‍या कोणाच्या आयुश्याची वाट कशाला लावायची. त्याच्याशी लग्न नसत झालं तर मी दुसर्‍या कोणाशीही लग्न नसत केल. माहीतेय की बोलण खुप सोप आहे पण मग नंतर सगळे प्रॉब्लेम्स करून सगळ्यांनाच त्रास होण्यापेक्षा हे बरं ना?

लकीली आमच्या घरच्यांनी विरोध मागे घेतला अणि मागच्या महीन्यात आमचं लग्न झालं Happy

पण कौतुक, कविता म्हण्तेय त्याप्रमाणे भाग२ मध्ये अवंती येउ द्या...

आणि रहस्यकथाकाराच्या भुमिकेत अडकुन न पडल्याबद्दल अभिनंदन!!!


dreamz_unlimited.jpg