व्हॉट'स द पॉईंट

Submitted by jpradnya on 16 September, 2022 - 20:02

व्हॉट'स द पॉईंट ?
मला कधी मधी असं वाटंत राहातं. ट्रिगर काहीही असू शकतो. जगात घडणाऱ्या काही खूप वाईट किंवा दुःखद घटना. माझ्या स्वतःच्या नकोश्या आठवणी. जग किती unfair आहे ह्याचा पदोपदी होणारा साक्षात्कार. आयुष्य कसं क्षणभंगूर आहे आणि आपण कितीही इमले बांधले तरी ते काळाच्या ओघात कसे नष्ट होणार आहेत ह्याची झालेली जाणीव. कोहं च्या शोधाचा प्रवास जो निरंतर सुरु असतो पण हाती काही ठाम लागताना दिसत नाही. आपली विश्वासाची स्थाने सुद्धा पोकळ आहेत हे सत्य समोर येतं तेव्हा. दरवेळी तो ट्रिगर नेगेटिव्ह असतोच असंही नाही. अत्यंत आनंदाच्या क्षणानंतर उमटलेली शांतता सुद्धा व्हॉट'स द पॉईंट कडे नेते कधीकधी.
एखाद्या छंदापलीकडे गेलेल्या कलासाधनेत रमणारी माणसं बघितली कि मला फार हेवा वाटतो. त्यांना असल्या प्रश्नांचा त्रास होत नसावा असं वाटतं कारण त्यांचा प्रवास फार वेगळ्याच ट्रॅक वर सुरु असतो. किंबहुना त्या कलासाधनेतून मिळणारा सृजनाचा आनंद हा त्यांचा तात्कालिक 'पॉईंट' असावा असा माझा अंदाज आहे. त्या प्रतिभासाधनेच्या (ह्याला डोंबलाची वेळ-काळ नसते) क्षणी ते त्या क्षणाशी इतके समरसून जातात कि त्यात अदवईताची अनुभूती असावी. परंतु मग ते लौकिकात परतले कि मग काय? २४ * ७ कुणी ती नशा घेऊन जगू शकत नाही ना? आहार निद्रा भय मैथुन ह्या शरीर गरजा तर माणूस म्हणून जन्माला आलेल्या कुणाला चुकल्या नाहीत. मग फक्त ह्या व्यावहारिक गरजा शेवटच्या श्वासापर्यंत भागवणं एवढंच काय ते माझं विहित कर्म असेल का? माझ्या 'असण्याचं' काय प्रयोजन आहे कि माझं अस्तित्त्व ही जगात शुद्ध योगायोगाने झालेली ताटभरती आहे?

ह्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करते अनेक माध्यमांमधून. कधी साहित्य, तत्त्वज्ञान, कधी आध्यात्म तर कधी मानसशास्त्रात. आपल्या डोक्यात काही केमिकल लोच्या तर नाही ना, असाही विचार डोकावून जातो. मग समानशील मित्रमंडळींना थोडंसं चाचपलं की कळतं ते सुद्धा कुठेतरी ह्याच बोटीत बसलेत. कुणाची बोट थोडी पुढे धावत्ये तर कुणाची हळूहळू तरंगते आहे. किंबहुना काय पॉईंट आहे हाच शोध सुरु असतो आपल्या सगळ्यांचा. आणि ह्या प्रवासात आपण पूर्णपणे एकटे असतो. समांतर असतो.

स्वतःचा आणि आयुष्याचा शोध ह्या विषयावर खूप उत्तमोत्तम साहित्य आणि कलाकृती निर्माण झाल्या आहेत. मला भावलेल्या निवडक काही इथे नमूद कराव्याश्या वाटतात. नंदा प्रधानला सापडलेलं उत्तर कि जगात काहीच नसतं. आपण ज्या क्षणी श्वास घेतो तो क्षण असतो. एक चिकन सूप स्टोरी होती. भरतीच्या वेळी पुळणीवर फेकल्या गेलेल्या माश्यांना समुद्रात परत फेकणाऱ्या एका लहान मुलाची. त्या मुलाचे आजोबा त्याला वास्तवाची जाणीव करून देताना म्हणतात कि "अरे बाळा तू कितीही प्रयत्न केलेस तरी ह्या लाखो माश्यांना वाचवू शकणार नाहीस...मग कशासाठी हा अट्टाहास करतोस?" त्यांच्याकडे लक्ष ना देता तो लहानगा उत्तर देतो "पण माझ्या हातातला हा एक मासा तरी वाचला ना?" ! मध्यंतरी कियानू रीव्हस आणि लिली कॉलिन्स च्या भूमिका असणारा "टू द बोन" नावाचा सिनेमा सुद्धा खूप परिणामकारक वाटला. जगण्यातला रस गमावलेल्या टीनएजर चाहा प्रवास आहे. तिच्या "व्हॉट'स द पॉईंट" ला "देअर इज नन" असं प्रांजळ उत्तर देणारा तिचा डॉक्टर मलाही बरंच काही सांगून गेला. साठी उलटलेल्या माणसाने "माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय?" असा प्रश्न ईशा फाऊंडेशन च्या सदगुरूंना विचारला तेव्हा "तुम्ही एवढी वर्ष काय करत होतात? आणि तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट्य ठरवणारा मी कोण?" असा सडेतोड प्रतिप्रश्न करून त्यांनी सर्वांनाच अंतर्मुख केलं (निदान मला तरी).

तर सांगायचा मुद्दा असा की देअर इज नो पॉईंट ऑर देअर इज नो वन पॉईंट इथे माझी गाडी येऊन थांबते. दुनिया मे जब आये है तो जीना ही पडेगा. आणि जर जगायचंच असेल तर मग गाणं म्हणत कि कण्हत येवढाच चॉईस उरतो. माझं म्हणाल तर मी कधी कण्हते आणि कधी गाणं म्हणते. कण्हणं निदान हळूहळू तरी कमी झालं तरी माझी कहाणी सुफळ संपूर्ण म्हणेन मी.
तुमचं काय?

Group content visibility: 
Use group defaults

>>माझं म्हणाल तर मी कधी कण्हते आणि कधी गाणं म्हणते. कण्हणं निदान हळूहळू तरी कमी झालं तरी माझी कहाणी सुफळ संपूर्ण म्हणेन मी.>> That's the point !!!
छान लेख. मनोगत आवडले.

जग किती unfair आहे ह्याचा पदोपदी होणारा साक्षात्कार. आयुष्य कसं क्षणभंगूर आहे आणि आपण कितीही इमले बांधले तरी ते काळाच्या ओघात कसे नष्ट होणार आहेत ह्याची झालेली जाणीव. >> रोजच्या बातम्या बघितल्या नंतर हे फिलिंग येतं मला. चांगलं काही घडतांना दिसतच नाही. किंवा घडत असेल ते दाखवत नाही. दाखवतात ती फक्त सत्तेची मारामारी.. रोज होणारे अपघात.. पुर..