तरंगत्या विमानतळाची कहाणी

Submitted by पराग१२२६३ on 3 September, 2022 - 07:50
#vikrant

स्वदेशात प्रथमच बांधण्यात आलेल्या विमानवाहू जहाजाचे (विक्रांत) येत्या 2 सप्टेंबरला कोची इथं भारतीय नौदलात सामिलीकरण होत आहे. कोचीतल्या गोदीमध्येच या जहाजाची बांधणी करण्यात आलेली आहे. देशाने जहाजबांधणीच्या क्षेत्रात गाठलेला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. 2009 मध्ये या जहाजाच्या सांगड्याच्या कामाची सुरुवात झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2013 मध्ये या जहाजाचे जलावतरण झाल्यानंतर त्यावर विविध प्रकारच्या यंत्रणा बसविल्या गेल्या. त्यानंतर काही महत्वाच्या सागरी चाचण्या नोव्हेंबर 2020 पासून पार पडल्यावर आता हे जहाज नौदलात सामील होत आहे. सामिलीकरण झाले तरी हे जहाज पूर्ण क्षमतेने नौदलाला वापरता येण्यासाठी पुढील 6-8 महिन्यांचा कालावधी जाणार आहे. कारण या जहाजावरून लढाऊ विमानांचं संचालन करण्यासाठी अजून काही चाचण्या सुरू राहणार आहेत.

भारताच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या आणि त्यातही विमानवाहू जहाजाची स्वदेशातच बांधणी करण्यात आली आहे. याद्वारे चाळीस हजार टन वजनाचे विमानवाहू जहाज बांधण्याची क्षमता मिळविणारा भारत जगातील पाचवा आणि आशियातील दुसरा देश ठरला आहे. भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणाच्या दिशेनेही हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या जहाजाचा आराखडा नौदलाच्या `डायरेक्टोरेट ऑफ नेव्हल डिझाईन'ने, तर त्यासाठीचे उच्च प्रतीचे पोलाद `संरक्षण संशोधन आणि विकास संघटना' (DRDO) आणि `स्टिल अथॉरिटी ऑफ इंडिया' (SAIL) यांनी तयार केलेले आहे.

भारतीय नौदलासाठी विमानवाहू जहाजाची स्वदेशातच बांधणी करण्याचा विचार 1989 मध्ये सर्वप्रथम मांडण्यात आला होता. पण या जहाजासाठीच्या पोलादाच्या कापणीनं 11 एप्रिल 2005 ला स्वदेशी विमानवाहू जहाजाचं प्रत्यक्षात काम सुरू झालं. त्यानंतरही या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. इतक्या मोठ्या आणि त्यातही विमानवाहू जहाजाचं काम पहिल्यांदाच देशात होत असल्यामुळं अशा अडचणी येणं स्वाभाविक होतं. पुढे फेब्रुवारी 2009 मध्ये विक्रांतच्या सांगाड्याचं काम सुरू झाल्यानंतर नौदलाच्या सेवेत येण्यास त्याला 13 वर्ष लागली.

दोन धावपट्ट्या, ‘STOBAR’ (शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी)ची पद्धत आणि उड्डाणासाठीच्या धावपट्टीला पुढील बाजूस असलेला 14.2 अंशाचा ऊर्ध्वकोन (Ski-Jump) यामुळे मिग-29के विमानांना जहाजावरून उड्डाण करणे सहज शक्य होईल. जहाजावर उतरत असताना या विमानांचे हूक लँडींगसाठीच्या धावपट्टीवरील अरेस्टेड वायरमध्ये अडकून विमान काही क्षणांमध्येच थांबेल. भारतीय नौदलाच्या विमानवाहू जहाजांवर 1986 पासून हेलिकॉप्टरप्रमाणे उडू वा उतरू शकणारी सी हॅरियर ही लढाऊ विमाने वापरली जात होती. मात्र अशा प्रकारच्या विमानांची कार्यक्षमता मर्यादित असल्याने बदलत्या सुरक्षाविषयक परिस्थितीत जगभरात त्यांचा वापर कमी होऊ लागला आहे. म्हणूनच भारतानेही आपल्या नौदलाची लढाऊ हवाईक्षमता वाढविण्यासाठी मिग-29के आणि एलसीएच्या सामिलीकरणाचा निर्णय घेतला आहे.

विक्रांत 262 मीटर लांब, 62 मीटर रुंद असून त्यावर धावपट्टीसाठी सुमारे अडीच एकर क्षेत्रफळाचा डेक तयार करण्यात आला आहे. या जहाजावर 2200 वेगवेगळे कक्ष आहेत. त्यामध्ये महिला अधिकारी आणि नौसैनिकांसाठीच्या स्वतंत्र कक्षांचाही समावेश आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.ने (HAL) विकसित केलेल्या एलएम-2500 या चार गॅस टर्बाइन्सच्या मदतीने विक्रांत ताशी 28 सागरी मैल (Knots) वेगाने संचार करू शकेल. याचा पल्ला 7500 सागरी मैल असून 160 अधिकारी आणि 1400 नौसैनिक यांच्याबरोबर ते 45 दिवस दूर सागरात राहू शकेल.

अलीकडील काळात भारतीय नौदलाची कार्यकक्षा मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. त्यामुळे त्यात विविध प्रकारच्या अत्याधुनिक युद्धनौका, पाणबुड्या, विमाने समाविष्ट करण्यात येत आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात भारताला सर्वांत विस्तीर्ण आणि समृद्ध किनारा लाभला आहे. या महासागरातील 1280 बेटांबरोबरच सुमारे दोन लाख चौरस किलोमीटरच्या विशेष आर्थिक क्षेत्रावरही भारताचे अधिपत्त्य आहे. भारताचा सुमारे 90 टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार सागरी मार्गाने होतोच, शिवाय ऊर्जेची 70 टक्के गरजही याच मार्गाने भागते. या क्षेत्रातील सर्वांत प्रबळ नाविकदल असलेले भारतीय नौदल आता Blue Water Navy बनले आहे.

आपल्या राष्ट्रहितांचे मुख्यभूमीपासून दूरवर जाऊन रक्षण करण्याची क्षमता विमानवाहू जहाजात असते. म्हणूनच विमानवाहू जहाज देशाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याचे महत्त्वाचे साधन ठरते. अशा जहाजाचे महत्त्व 1971 चे भारत-पाक युद्ध, 1991 व 2003ची आखाती युद्धे, अफगाणिस्तानवरील अमेरिकेची कारवाई अशा विविध प्रसंगी स्पष्ट झालेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 'शं नौ वरुण:' (समुद्रदेवता आमच्यासाठी मंगलदायक राहो) हे ब्रीद असलेल्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात विमानवाहू जहाज असणे आवश्यक ठरते. स्वदेशी विमानवाहू जहाज महासागरात दिमाखात संचार करताना त्याच्या डेकवरील धावपट्टीवरून विमाने प्रत्यक्षात उड्डाण करू लागतील, तो दिवस केवळ नौदलासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवास्पद असेल. पण त्याचबरोबर तिसऱ्या विमानवाहू जहाजाची गरज लक्षात घेऊन दुसऱ्या स्वदेशी विमानवाहू जहाजाच्या बांधणीलाही लवकरात लवकर मंजुरी मिळावी.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/09/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users