लहान मोठं

Submitted by पाचपाटील on 2 September, 2022 - 09:51

लकी अली आणि त्याचं
गोरी तेरी आंखे कहे.. रातभर सोई नहीं..

तर ह्या गाण्यातल्या दुःखी बेसहारा बिचाऱ्या
नटीला कुणीतरी आधार द्यायला पाहिजे, असं
एक लहानपणी वाटायचं..! कुणीतरी कशाला?
आपणच पुढे होऊन जबाबदारी घ्यायला काय
हरकत आहे, असंच वाटायचं..!

अर्थात, वाटण्यानं काय होत नाय समजा,
पण तरीही एक आपलं वाटतंच ना..!
परंतु सदर बेसहारा व्याकुळ नटी स्पष्टपणे
गोरी असल्यामुळे, अशा केसमध्ये अनेकानेक
भारतीय पुरूषांना तिजला आधार देण्यासाठी
सरसावून बसावसं वाटतं, हे नंतर नंतर
समजायला लागतं.
परंतु आमचं वाटणं निराळं होतं. ते तेव्हाही
अगदीच निरूपद्रवी होतं. आणि आजही
कमालीचं मर्यादशील आणि सौजन्यशील
वगैरे आहे, असं काही जणींचं तरी म्हणणं आहे ब्वा.

म्हणजे एखादीनं आधार मागितला.
लगेच दिला. की चाल्लो आम्ही पुढे.
उगाच रेंगाळणं-बिंगाळणं नाही.
अपेक्षा वगैरे काही भानगड नाही.
नो स्ट्रिंग्ज ॲटॅच्ड, यू नो.

लहानाचे मोठे झालो तेही असेच एका
झटक्यात.
त्याआधी समजा खाकी चड्डी घरंगळू नये
म्हणून पट्टा करकचून आवळून, सपाट तेलकट
भांग पाडून शेंबुड पुसत शाळेत जाणं वगैरे..!
शाळेतल्या आणि घरातल्या मोठ्यांचं
दुनियेविषयी जे काही ज्ञान असेल, ते
भक्तीभावाने ग्रहण करणं वगैरे..!
तासांचं वेळापत्रक एका पानावर सुवाच्च
अक्षरात लिहून कंपासच्या आत व्यवस्थित
चिकटवणं वगैरे..!
कारण मग एखाद्या तासाची वही विसरली,
तर सर आपल्याला पिदवणार तर नाहीत ना ?
"काय रे ? चड्डी घालायचं बरोब्बर लक्षात राहतं,
मग वहीच कशी काय विसरतोस?"
असले टोकदार प्रश्न तर विचारणार नाहीत
ना गुरूवर्य?
शिवाय गणिताला दोनशे पानी वही घालायची
की तीनशे पानी ? वर्षाच्या मध्येच वही अचानक
संपणार तर नाही ना..?
ह्या असल्या चिल्लर काळज्या.

बाकी मग, कविता तर असतातच ना
म्हणजे.
एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकीन जी मी स्वप्राणाने.

आता अगदीच काही तुतारी वगैरे नसेल
आमच्याकडं समजा.
पण म्हणून काही थेट पिपाणीच होती,
असंही नाही.
त्यामुळे हे असं सारखं सारखं "ए पिपाणीss"
"एss पिपाणीss" म्हणून हिणवू नये.
अशी मानखंडना करू नये प्लीज.
कारण असंय की ह्यात माणसाला काही
चॉईस नसतो ना.
तसं असतं तर मग समस्त उग्र भारतीय
जावई तुतारीसाठीच रूसून बसले असते.
पण तसं जमत नाय ना.

आणि देवाचंबी कायतरी कॅल्क्युलेशन
असेलच की.
त्याप्रमाणे देव देतो. काहींना भरल्या हातानं
देतो. काहींना उगाच आपलं थातुरमातुर.
पण माणसानं पदरात पडेल ते स्वीकारलं
पाहिजे, ह्या मताचे आम्ही.

तर आमचा नंबर आला तेव्हा देव बोल्ला की,
ही घ्या पुंगी आणि ह्याच्यावरच भागवा, म्हणाला.
खेळाचा मनमुराद आनंद घ्या, असंही म्हणाला.
आणि जाताजाता डोळाही मारला.
तर चाललंय मग आपलं टुकूटुकू.
खेळत रहायचं.
कारण तो प्रसिद्ध कवीपण हेच म्हणतो.
देवाचे दिधले जग हे आम्हास खेळावया.
खेळायचे मग.. आणि काय?

आणि एकापरीने पुंगीच बरी पडते.
पॅंटच्या खिशात आरामात बसून जाते.
तुतारी असती तर उगाच गळ्यात बांधून
फिरावं लागलं असतं.
आणि चुकून समजा एखाद्यावेळी
आपोआपच वाजायला लागली तर उगाच
गळफास बसायचा.
अचानकमधी भयानक कायतरी कार्यक्रम
होऊन बसायचा.
तर म्हणूनच हाय हे बराय म्हणायचं.

असो. तर झालं असं की नंतर त्याच
सुमारास 'मोहरा' रिलीज झाला..!
गावच्या यात्रेत तंबूवाल्या थेटरात बघण्याचा
योग आला..!

अर्थात, पिच्चर तेव्हा काय कळला नव्हता..!
पण रविना टंडन आणि तिच्या त्या
''टीप टीप बरसा पानी'' मधल्या मनमुक्त
नृत्याविष्कारानं आम्हा सगळ्यांवरच
आयुष्यभराचा प्रभाव टाकला..!

ते गाणं बघताना, एक वेगळंच वैश्विक चैतन्य
आमच्या छोट्याशा शरीरावर वीजेसारखं
कडाडकन् कोसळलं..!
त्या वीजेचा दणकाच एवढा जबरदस्त
होता की तो आमच्या बालमनाला सोसला
नाही..!
म्हणजे आत काहीतरी प्रचंड
उलथापालथ झाली, एक प्रकारची
एनलाईटमेंट झाली; ज्यामुळे आमचा रोम रोम
लख्ख उजळून निघाला..!
आणि बहुतेक तेव्हाच आमचं बालपण
संपुष्टात आलं..!
आणि मग त्या तंबूतून बाहेर पडताना आम्ही
वेगळेच कुणीतरी होऊन बाहेर पडलो..!
रपारप दणादण पाऊस पडून गेल्यानंतर
थोडा वेळ सगळाच परिसर शांत स्थिर
स्तब्ध मौन होऊन जातो, तशीच साधारण
मनोवस्था.

तर आता ह्या सगळ्याची जबाबदारी आम्ही
त्या पिवळ्या पिवळ्या साडीतल्या रविना
टंडनवर टाकू इच्छितो..
तिनंच आम्हाला बालपणातून निष्ठूरपणे
खेचून बाहेर काढलं..
आणि सांगितलं की बाबा इथून पुढे खरी
मज्जा आहे तुमची..!
आता ह्यापुढे अशा अशा एका अद्भुत पर्वतीय
मायाजालीय प्रदेशाला सुरूवात झालेली आहे..!
आणि आता बाबांनो तुम्ही काही
पहिल्यासारखे होऊ शकत नाही कधीच.
परतीचे दोर कापले गेले आहेत आता.

मग म्हटलं की बाबा आता आपण मोठे
झालोच आहोत, तर आता ह्या मोठ्या
माणसांना सिरीयसली घेण्याची काईच
गरज नाही..!

कारण ही सगळी मोठी माणसं गुपचूप
मिटक्या मारत सगळ्या निषिद्ध गोष्टींचा
आनंद घेणार..!
त्या आयेशा झुल्काच्या गोबऱ्या गोबऱ्या
गालांचा तौलनिक अभ्यास करणार..!
किंवा 'दीदी तेरा देवर दिवाना' बघताना ह्यांचे
डोळे चमकणार की, तिथं सलमान गलोलीमध्ये
फूल ठेवून निशाणा साधत माधुरीच्या पाठीचा
अचूक वेध घेतो, तसं काही आपल्याला कधी
जमलंच नाही वगैरे..!
म्हणजे नेम धरता येईल, सराव करता येईल,
लक्ष्यभेदही जमून जाईल.
पण एवढं आकर्षक लक्ष्य आपल्या नशिबात
कसे बरे येणार? वगैरे वगैरे हुळहुळत बसणार की
ही एक गोष्ट राहूनच गेली आयुष्यात वगैरे..!

आणि नंतर आमच्याशी बोलताना मात्र थेट
ज्ञानेश्वरीत शोभेल अशी भाषा..!
का अशी गंडवागंडवी करता ?
हे झोल कशासाठी?
आणि का आमची अशी विवंचना करता ?
आम्हासही काही आनंद घेण्याचा हक्क
आहे की नाही?

"त्येला काय कळतंय..! बारकंय आजून!"
हे असं आमच्या तोंडावर आमच्याबद्दल म्हणता..!
हा सरळसरळ तेजोभंग आहे..!
बरोबर नाय हे..! जुलूमाय हा..!
भयंकराय हे सगळं..!

अहो, कोण कुठली रविना टंडन..!
पण तिनंच खरं तर आमचं दुखणं समजून
घेतलं..!
आमची जी एक कोंडी झाली होती, ती फोडून,
एक सकारात्मक बहारदार वळण दिलं
आयुष्याला..!

आणि तुम्ही??
सरळ ''बारकं है आजून'' म्हणता..!
असं किरकोळीत झटकून टाकता आम्हाला..!!
कुठे फेडाल?? थोडी तो मर्यादा रख्खो.
देव आहे. तो बघतोय म्हटलं..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच दिवसांपासून विचारणार होते, तुम्ही असं एकेका ओळीत ४-५ च शब्द असं मुद्दाम लिहिता की काही फॉर्मॅटिंग इश्यू आहे? कारण वाचायला त्रासदायक वाटते अशा फॉर्म मधे त्यामुळे (माझे )बरेचदा वाचलेच जात नाही पूर्ण.