स्वप्न रंगवित होतो

Submitted by निशिकांत on 16 August, 2022 - 10:33

स्वप्न पडावे म्हणून निद्रे!
तुला आळवित होतो
सखीस स्वप्नी बघावयाचे
स्वप्न रंगवित होतो

स्पर्श मखमली मोरपिसांचे
आभासी, सुखकारी
वेदनेसही किनार मिळते
तुझ्यामुळे जरतारी
इंद्रधनूचे रंग घेउनी
तुला चितारित होतो
सखीस स्वप्नी बघावयाचे
स्वप्न रंगवित होतो

परस्परांना पूरक अपुले
लोभसवाणे नाते
चमचमणार्‍या दवात तू,मी
थरथरणारे पाते
नजरेने नजरेस सखीच्या
मी कुरवाळित होतो
सखीस स्वप्नी बघावयाचे
स्वप्न रंगवित होतो

ओंजळ तुझिया आठवणींची
रिती पाहिली करुनी
हाती उरला दरवळ इतका!
गेलो मी गुरफटुनी
तुझ्याच परिघामधे स्वतःला
बंदी बनवित होतो
सखीस स्वप्नी बघावयाचे
स्वप्न रंगवित होतो

प्रवासगाथा मी थांबवली
सरता दिशा दहावी
साथ देउनी दावलीस तू
मला दिशा आकरावी
तुझ्यामुळे नवक्षितिजे, कक्षा
मी धुंडाळित होतो
सखीस स्वप्नी बघावयाचे
स्वप्न रंगवित होतो

सुरावटींच्या कैक कळांनी
मैफिल ही सजलेली
सप्तसुरांच्या सरीत आपण
दोघेही भिजलेली
गुलमोहरल्या कैक क्षणांना
मनी साठवित होतो
सखीस स्वप्नी बघावयाचे
स्वप्न रंगवित होतो

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users