स्वर्थी प्रेम--(वीकली लिखाण)

Submitted by निशिकांत on 6 August, 2022 - 10:31

आपला देश आणि संस्कृती दोन्हीही अंध श्रध्देने बरबटालेले आहेत. आपण पदोपदी या गोष्टी बघतो पण आपणास याचे कांहीही वाटत नाही. सारे कांही अंगवळणी पडलेले आहे. सर्वांची मने खरेच बधीर झाली आहेत का? आपणास वाटेल की हे काय मी बोलतो आहे. असे लिखाण माझ्या प्रकृतीच्या विपरीत आहे. पण जेंव्हा एखादी उद्वेगजनक घटना घडली किंवा बिनदिक्कतपणे समाजाकडून स्विकारली गेली की घुसमट होते अक्षरशः .  
आता स्त्रियांवर होत असलेल्या अन्यायाबाबत मी बर्‍याच गझला आणि कविता लिहिल्या आहेत. यात आईचे वार्धक्यातील जीवन, वेश्यांच्या व्यथा, मलगा आणि मुलगी यात होत असलेला भेदभाव, विवाहीत महिलांवर होत असलेले आत्याचार, आणि स्त्री भ्रुणांचे होत असलेले शिरकाण ज्याला मी जन्माआधी केलेला खून असे म्हणेन यांचा समावेश आहे. ही यादी खूप मोठी आहे आणि हे युगानुयुगे चालू आहे. पुढे काय होणार हे धूसर आहे; जरी सध्या शहरातून थोडा आशेचा किरण दिसतोय. खेड्यात अजूनही फारसा बदल नाही. लोकांचा दृष्टीकोन अजूनही बदललेला नाही. मी जेव्हा जेंव्हा काव्यसंमेलनात किंवा गझल मुशायर्‍यात हजर होतो तेंव्हा अवर्जून  स्त्री समस्येवर एखादी रचना वाचतोच. प्रेक्षकांकडून दाद मिळतेच पण दुसरे कवि/शायर माझी टिंगल करतात. त्यांचा नेहमीच प्रश्न असतो की स्त्रियांचे रडगाणे किती दिवस गाणार स्टेजवरून? मी एकदा त्यांना स्पष्टपणे उत्तर दिले की जोपर्यंत अन्याय चालू आहेत तोपर्यंत हे प्रश्न उजागर करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. शेवटी समाजाचा एक भाग असल्यामुळे नुसते टाळीबाज लेखण/वाचन करून चालत नाही, तर समोर असलेल्या प्रश्नांचा उहापोह होणे पण अवश्यक असते.
हे सर्व लिहिण्याचे कारण की मला एक विचित्र घटना ऐकण्यात आली.  आमच्या नात्यातील एक महिला नोकरी करते. त्या परवा घरी आल्या होत्या. बराच वेळ गप्पा, चहा पाणी झाले. त्या सुशिक्षित असून स्वतः नोकरी पण करत होत्या. त्या कांही दिवसापूर्वी त्यांच्या सोबत काम करणार्‍या एका महिला कर्मचार्‍याकडे गेल्या होत्या. त्या ज्यांच्या घरी गेल्या होत्या तेथील बाईंने एक महिन्यापूर्वीच जुळ्यांना जन्म दिला होता. क्षेम विचारण्यासाठी त्या गेल्या होत्या. दार उघडल्यानंतर त्या आत गेल्या आणि गप्पा सुरू झाल्या, थोड्या वेळाने पाळण्यातून बाळ रडण्याचा आवाज आला. दोन्हीही लेकरं रडत होती. बाईंनी उठून एक बाळ आणले तिच्या पतीने दुसरे बाळ घेतलं. आईने मुलाला घेतले होते तर वडिलाने मुलीला. वडील मुलीला बाटलीने दूध  पाजू लागले. तान्ह्या मुलाला आई अंगावर पाजवू लागली. फीडींग झाल्यानंतर भेटायला गेलेल्या बाईंनी तिला विचारले की हे असे का? घरातील बाईने सांगितले की आम्ही दोघांनी ठरवले आहे की  मुलाला अंगावर पाजायचे आणि मुलीला पावडरचे दूध. जेंव्हा आलेल्या बाईने विचारले की हे असे का? तर आईने कर्टली सांगितले की हे आम्ही दोघांनी मिळून ठरवले आहे आणि इतर कुणाला या बाबत प्रश्न करण्याचा हक्क नाही.
वातावरण एकदम सुन्न झाले आणि त्यांनी निरोप घेतला. हे सत्य घटनेवर आधारीत आहे. मुलीपेक्षा मुलगा नक्कीच वृध्दत्वात जास्त काळजी घेईल हा स्वार्थ यात दडलेला असल्यामुळे मुलाकडे जास्त ओढा असतो माय बापाचा. म्हणून मी अशा प्रेमाला स्वार्थी प्रेम म्हणेन.
आधी वर सांगितल्या प्रमाणे माझ्या स्त्री प्रधान कवितांची खिल्ली उडवली जायची. तीच कविता खाली देतोय. या कवितेत स्त्रीभ्रुणाचा आक्रोश दाखवला आहे. या कवितेचे वैशिष्ट्य असे की या कवितेचे वाचन करताना प्रेक्षकातील बर्‍याच स्त्रिया रडतात इतकी ही कविता त्यांना भिडते.

आई मला मार गं
 
गर्भात तुझ्या मी अंकुरतेय
होईल तुला भार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

चाचणी नंतर कळेल जेंव्हा
मुलगी आहे म्हणून
कूस तुझी चांगली नाही
बाबा म्हणतील कण्हून
ताई झाल्या वेळीचा तू
आठव जरा थरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

टिटवी ओरडेल कुत्री रडतील
सारे होईल अमंगल
चाहूल माझी घेवून येईल
नैराश्याचं जंगल
मला नाही व्हायचं कधी
अनाहूत नार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

लग्नानंतर बदलतय नाव
गोत्र अन कुलदैवत
हरवून जातोय आपला सूर
लावू कसा धैवत ?
अपेक्षा अन वास्तव यात
खूप खूप दरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

अन इनव्हायटेड चालेल कदाचित
पण अन वांटेड नसावं
मी तर आई दोन्ही आहे
जगात कोठे बसावं ?
तुझ्या सारखा नकोय मला
अंधारशी करार गं
लिंग निदान चाचणी अधीच
आई मला मार गं

मला नाही मरायचय
नणंद दीरा कडून
मरण नकोय मला कधी
सासू सास-या कडून
जळून मेल्या नंतर तुझ्या
डोळ्याला लागेल धार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

फ्रीझ, पंखा, टीव्ही, स्त्री
हेच जगाचं माप गं
आदिमाया, आदिशक्ती
लोणकढी थाप गं
या जगातून जन्मा पूर्वीच
होऊ दे फरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

दूर दिसतोय आशा किरण
मंद स्मीत ओठी
वेळ खूपय कदाचित
तुझ्या पणतीच्या पोटी
बिजली म्हणून जन्मेन मी
करण्याला प्रहार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.नं. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users