“कच्चे विषय!”

Submitted by Charudutt Ramti... on 24 July, 2022 - 08:30

आज लेकीच्या शाळेतून पहिल्या तिमाहीचे, ब्रिज कोर्स का काय? म्हणतात ते, त्याचे मार्क्स आले. काही विषयांत 'वीस' पैकी 'सव्वा अठरा' वगैरे मार्क्स पाडून सुद्धा मुलगी आणि आई ह्यांच्या ऍनालिसिस नुसार ते अपेक्षे पेक्षा कमी आहेत, वगैरे अशी वादळी चर्चा सुरु आहे घरी. “तुझ्या क्लास टीचर बरोबर एकदा मी बोलून घेते फोन वर!” असं काही तरी दोघींच्या मध्ये सुरु असलेल्या संवादातील वाक्य माझ्या कानावर आलं. एकंदर विषय वरवर वाटतो त्यापेक्षा अधिक गंभीर असावा. अर्थात, तिला पाचवीत पहिल्या तिमाहीत पडलेल्या घटक चाचणीतील गुणांचं, “ती”, “तिची आई” आणि “तिचे वर्गशिक्षक”, असे तिघेही, सविस्तर “पृथ:करण” आणि “आत्मपरीक्षण” करतीलच.

परंतु, तिला किती मार्क्स पडलेत ते फारसं महत्वाचं नाही. एखाद्याचा एखादा विषय ‘कच्चा’ का राहतो? हा ‘माझ्या’ संशोधनाचा आणि आजच्या लेखाचा खरा विषय आहे. आम्ही लहान असताना सुद्धा, 'अमक्या तमक्या विद्वानाला गणित संस्कृत वगैरे विषयांत शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली होती! काहीतरी लाज बाळगाss' वगैरे गोष्टी आम्हाला आमच्या प्रगती पुस्तकावर शेरे मारताना नेहमी ऐकवलं जायचं.

आता ‘गोखले, रानडे, टिळक, आगरकर आदी प्रभृतींनी मुंबईत किंवा पुण्यात १९१७ साली संस्कृत मधली शंकरशेट शिष्यवृत्ती पटकावली होती’, ह्यात मला लाज बाळगण्यासारखं नक्की काय होतं?" हेच मला समजायचं नाही. मला नव्हती गरज संस्कृत मध्ये शिष्यवृत्तीची! विषय कट. पण झालं असं की, माझ्या ह्या अश्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे माझे आणि शिक्षकांचे संबंध बऱ्यापैकी ताण तणाव पूर्ण राहिले. विशेषतः भाषाविषयक शिक्षकांबरोबर तर माझे संबंध फारच पराकोटीचे ताणलेले होते.

त्याचं कारण म्हणजे, ‘गणित’ आणि ‘शास्त्र’, ह्या दोन्ही विषयात, “सदरहू विद्यार्थ्याला आ-ज्जी-बा-त ग-ती नाsssही” ह्या बद्दल माझे गुरु, माझे पालक आणि स्वतः मी, ह्या तिघांचेही १००% एकमत होतं. ‘इतिहास’, ‘भूगोलाच्या’ शिक्षकांना त्या विषयांत स्वतःलाच गोडी नव्हती. त्यामुळे त्यांनी ‘विद्यार्थ्यांना’ ह्या दोन विषयांची गोडी लावावी, अशी अपेक्षा आमच्या संस्थेच्या संचालकांनी सुद्धा कधी त्या बापुड्या इतिहास आणि भूगोलाच्या शिक्षकां कडून धरली नव्हती. राहता राहिला विषय 'भाषे'चा.

खरे तर मला १०० मार्कांचं संस्कृत अजिबात झेपणार नाही हे माहिती असूनसुद्धा माझ्या नशिबी स १०० मार्कांचं संस्कृत घेणं आलं. आमच्या शिक्षण पद्धतीत का कुणासठाऊक आठवी ते दहावी यत्तेत तुम्हाला जर, इतर कौशल्य ह्या गटात मोडणारे ‘सुतारकाम’ / ‘जोडकाम’ / ‘कातकाम’ आदी विषय घ्यायचे असतील तर १००% संस्कृत कंपलसरी होतं. आयुर्वेदाचा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर, ‘१०० मार्कांचं संस्कृत आवश्यक’ हे समजू शकतो पण 'सुतारकामाचा' अभ्यासक्रम आणि १०० मार्कांचं 'संस्कृत' हे 'गणित' काही मला आजता गायत समजलेलं नाही. असो त्यामुळे पाठांतराची अजिबात आवड नसताना सुद्धा 'सद्'-'सन्न' वगैरे क्रियापदं चालवणं हे माझ्या नशिबी आलं. संस्कृतच्या सरांनी "हां! रहा उभा!! आणि चालव सद्-सन्न" असं म्हंटलं की, मी नुसतांच ‘सुन्न’ होऊन त्यांच्या कडे पाहत उभा ऱ्हायचो. 'सुभाषितं' मला उभ्या आयुष्यात कधी पाठ झालीच नाहीत. 'कराग्रे वसते लक्ष्मी' ह्या सुभाषिताच्या पहिल्या चरणाला मी 'तक्रं शक्रस्य दुर्लभ:' हे चरण लावून मोकळा झालेलो आहे, तिसरं चरण आठवलं तर ठीक नाही तर ‘व्यासोच्छितष्टम् जगत सर्वम्’ वगैरे. तंत्र शिक्षण हा आवडीचा विषय असल्यामुळे लोखंडाला तांबं आणि पितळेला बीड वेल्ड करावं तसं एकाला दुसऱ्या अर्थाचं सुभाषित जोडून मी सुभाषितांचे मॉडर्न आर्ट सारखे 'कोलाज' निर्माण करायचो.

माझी ही क्रियेटीविटी असह्य होऊन, पहिल्याच टर्मच्या शेवटी, “ह्याला शक्य असल्यास शंभर मार्कांचं हिंदी, किंवा किमान पक्षी ५०% मार्कांच हिंदी आणि ५०% संस्कृत (त्या अभ्यासक्रमाला ला आमच्या वेळी असं संयुक्त हिंदी व संस्कृत असा जड शब्द होता) दे-ण्या-त या-वे, संस्कृत भाषेत गती शून्य” असं संस्कृतच्या 'भावे' सरांनी पर्यवेक्षकांना पत्र लिहून असंस्कृत शब्दात माझ्यावर ताशेरे मारले होते. त्यांवर पर्यवेक्षकांनी ह्या विद्यार्थाच्या इतर कौशल्य विषयात 'सुतारकाम' हा विषय असल्यामुळे ह्याला संयुक्त हिंदी/संस्कृत अथवा पूर्ण हिंदी घेऊ शकत नाही!' असा शेरा मारून ह्या संस्कृतच्या शिक्षकांवर आमच्या शाळेच्या पर्यवेक्षकांनी त्यांच्या दोघांमधला कोणत्या तरी जुन्या विवादाचा सूड उगवला होता.

शेवटी कसंतरी करून मी संस्कृतच्या 'सनातनी' शिक्षकांच्या तावडीतून सुटका करून राष्ट्रभाषा वगैरे हिंदीच्या वर्गात 'विशेष' सवलत प्राप्त करून दाखल झालो. संस्कृत ची ‘ही’ अशी तऱ्हा, तर हिंदी ची वेगळीच गत. 'चमनकी कलियां, खील उठी और झरने बोल पडे' मध्ये पडे मधल्या “ड” च्या खाली द्यायचा नुस्का वगैरे मला कधीच आठवायचा नाही. 'मामाजी की ऐनक' ह्या गोष्टीतलं गमक मला स्वतःला कधीच गवसलं नाही. मुन्शी प्रेमचंद, अमृता प्रीतम वगैरे कितीतरी मोठी साहित्यिक प्रतिभा असलेल्या समृद्ध लेखकांचे धडे आमच्या पाठय पुस्तकात असले, तरी शिरीष कणेकरांनी म्हंटल्या प्रमाणं 'गर हैसियत चाहते हो| तो खैरीयत रक्खखो!' वगैरे हिंदी चित्रपटातले संवाद जसे आपल्याला अजिबात समजत नाहीत, तसे, मला ह्या सुंदर हिंदी कथांमधले संवाद कधी कळलेच नाहीत. 'जिहाले मस्ती, मुकुंद रंजीश' किंवा वगैरे घझल सदृश हिंदी चित्रपटा मधली गाणी कशी आपल्याला अजिबात समजत नाहीत तरीही केवळ चाल आवडते म्हणून ऐकत राहतो तसं, मी ह्या मनाला अजिबात ‘न’ भावणाऱ्या हिंदी ह्या भाषा विषया कडे ‘सेमिस्टर दर सेमिस्टर’ त्रयस्थ पणे पाहत राहिलो.

पुढे शाळा संपून कॉलेज सुरु झालं तेंव्हा गुलज़ार ह्यांच्या कविता आणि गझल वगैरे प्रकार आवडू लागले, पण आम्हाला शाळेत अभ्यासक्रमात गुलज़ार का नव्हते ते माहित नाही. 'फुल खिले है गुलशन गुलशन' किंवा 'कच्ची धूप' वगैरे त्या वेळेच्या हिंदी दूरदर्शन नॅशनल नेटवर्क प्रोग्रॅम पाहून जेवढं हिंदी शिकलो तेव्हढंच काय ते हिंदी बाकी ह्या भाषेची आमची 'बुनियाद' तहे उम्र कच्ची ती कच्चीच!

एकीकडे हे सगळं असलं तरी मात्र, शेतात राब राब राबणाऱ्या एखाद्या कुणब्यानं हिरव्या मिरचीचा ठेचा, पिठलं भाकरी, आणि एका बुक्कीत फोडलेल्या कांद्यावर करावं तसं प्रेम मी 'मराठी' भाषेवर शाळेत असताना केलं. वेळेची आणि गुणांची अजिबात पर्वा न करता लायब्ररीत जाऊन तासंतास 'गो.नि.दां.' वाचले. शुद्धलेखनाची आणि व्याकरणाची तमा न बाळगता पाच पाच पानी निबंध लिहिले. ‘गण’, आणि ‘वृत्त’ ह्यांचं भान न ठेवता चक्क ‘मुक्तछंदा’त असंख्य कविता केल्या. पहाटे चार वाजता उठून घोकंपट्टी करून सुद्धा, संस्कृत सुभाषितं अजिबात पाठ न होणाऱ्या मला, 'बालकवीं'ची कविता पहिल्याच वाचनात तोंडपाठ का व्हावी हे माझ्या शिक्षकांना सुद्धा आजता गायत 'न' सुटलेलं कोडं आहे.

पु.भा.भावेंच्या लघुकथेनं जसं 'वेड' लावलं 'तसं', जि.एं.च्या कधीच न समजणाऱ्या पिंगळा वेळ वगैरे नवकथांनी सुद्धा. कितीही मोठ्या ऋषीच्या आश्रमात आयुष्य वेचलं तरीही सापडणार नाही, असं तत्वज्ञान भा.रा.तांब्याच्या कवितेतून शिकलो. सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट हे विषय न समजणाऱ्या वयात सुद्धा नारायण सुर्वेंच्या 'भाकरीच्या चंद्राने' वेड लावलं. चिं. विं. चे ‘चीम्मणराव’ आणि गुंड्याभौ’ हे आम्हाला लॉरेल आणि हार्डी पेक्षाही निरागस आणि निखळ वाटले. शंकर खंडो पाटील, हे तर आमचं ग्रामदैवत! शंकर पाटलांचा 'खेळ खंडोबा' ह्या माकडांच्या शिरगणतीच्या कथेची मी सहावीत किती 'आवर्तनं' केली असतील? हे माझं मलाच माहिती नाही. 'पु.लं.'च्या आणि माझ्या सारख्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मुलांच्या शाळेतील 'गणगोता'ला तर अंत नाही.

अश्या रीतीने, माझे शाळेत (आणि पुढे आयुष्यात) काही विषय कच्चे राहिले ते कायमचेच. तरीसुद्धा मराठी भाषे सारखे काही विषय मात्र कायमचे ऋणानुबंध जोडून गेले, अगदी आयुष्यभरासाठी! जाऊ दे! मूळ विषय तिसरीकडेच गेला भरकटत आणि फारंच विषयांतर झालं. ह्या माझ्या स्वभावामुळेच मराठीत निबंधाला पंधरा पैकी साडेसात च्या वर कधी गुण मिळाल्याचं मला स्वतःला तरी आठवत नाही. लेकीनेही शाळेत तोच कित्ता गिरवला असणार, दुसरं काय?

~ चारुदत्त रामतीर्थकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख. माझ्या दृष्टीने कुठल्याही भाषेचं महत्त्व म्हणजे इतरांशी संवाद साधता येणे, इतपतच. त्यामुळे कुठल्याच भाषेबद्दल कधीच जिव्हाळा असा वाटला नाही, असे हळवे होणे तर फार दूर राहिले.
माझ्या दृष्टीने तरी मूळ मुद्दा, १८.२५ गुण मिळाले तरी अपेक्षाभंग झाला, हा आहे.

जाता जाता: सध्या संस्कृतचा व्यवहारात शून्य उपयोग आहे. त्यात वेळ वाया घालवण्याऐवजी स्पॅनिश, मंडारीन, जर्मन, फ्रेंच अशी एखादी भाषा शिकणे अधिक उपयुक्त ठरेल.

सध्या संस्कृत शिकवणे हे भावनेच्या आहारी जाउन, आपली भाषा, वगैरे म्हणून शिकवतात. खरे तर त्यात ना शिक्षकांना गम्य आहे ना विद्यार्थ्यांना.
ज्यांना भारतीय तत्वज्ञान, भाषाशास्त्र इ. विषयात अधिक ज्ञान मिळवायचे असेल त्यांना संस्कृत शिकण्याचा फायदा होईल. पण इन्डियन आयडॉल, क्रिकेट, संगणकशास्त्र, एम्बीए असे झटपट श्रीमंत करण्याचे मार्ग असताना उगाचच संस्कृत कशाला?

संस्कृत भाषा पेपरात भरपूर मार्क पडतात , शिवाय हिंदी व संस्कृतचे शिक्षक उपलब्ध असतात , स्पॅनिश, मंडारीन, जर्मन, फ्रेंच असे शिकवणारे शिक्षक प्रत्येक शाळेत आणणार कुठून ?

मी तर मंडारिन हे नावच आज ऐकले

छान लेख.
सोनेका कमरा वाचतांना लहानपणी माझ्या डोळ्यासमोर पिवळा धम्मक लखलखणारी झोपण्याची खोली यायची. पण सोनेका तकिया म्हंटलं की मात्र मान दुखायला लागायची.

छान लेख.
संस्कृत भाषा हा 'scoring subject' आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेच्या तुलनेत भरपूर गुण मिळू शकतात. एकूण गुणांची सरासरी वाढायला त्याचा खूप उपयोग होतो. पूर्वीच्या काळी बोर्डात यायचं असेल तर संस्कृतशिवाय पर्याय नव्हता.
त्यामुळे ही भाषा मार्क वाढायला किती लोक घ्यायचे आणि खरंच आंतरिक प्रेम म्हणून किती लोक शिकायचे हा प्रश्न आहे Happy

खुसखुशीत लेखन, आवडले.

... सुभाषितांचे मॉडर्न आर्ट ..
हे केले आहे, असाच वाह्यातपणा म्हणून Happy

हिंदी-संस्कृत संयुक्त म्हणजे शुद्ध मराठीत कॉम्पोझिट आमचेही होते आणि सुरुवातीला आमचा 'राम' दुडक्या चालीनेच चालत असे.

छान लेख आहे.

सध्या संस्कृतचा व्यवहारात शून्य उपयोग आहे >> उपयुक्ततावादच लावायचा झाला तर शाळेतले निम्म्याहून अधिक विषय बंद करावे लागतील. किंवा असलेल्या विषयात निम्म्याहून अधिक अभ्यासक्रम बदलावा लागेल. भूमिती, त्रिकोणमिती सर्वांच्या काय कामाची? त्यापेक्षा करव्यवस्था, बाजारभाव, शेअर्स वगैरे शिकवा. इतिहास काय कामाचा, त्यापेक्षा नागरिकशास्त्र पूर्ण मार्कांना आणि इतिहास २० मार्काला ठेवा. जीवशास्त्रात यकृत, प्लिहा, माश्यांचे सापळे वगैरे शिकवण्यापेक्षा किंवा रसायनशास्त्रात ऊर्ध्वपातन की कायतरी शिकवण्यापेक्षा उत्तम स्वयंपाक कसा करावा ते शिकवा.

बरोबर

हिंदी संस्कृत शाळेत असण्याचे अजून एक कारण म्हणजे देवनागरी लिपी सेम आहे

ह्यांचा द्वेष म्हणून तमिळ बंगाली शिकायची तर अजून एक लिपी शिकावी लागेल

Chhan लेख.

आमच्या शाळेच्या groupmadhil एकाने आजच,संस्कृत शिकूया आणि आपली प्राचीन विद्या( स्थापत्य किंवा अजून इतरही) इतरांसमोर मांडूया,अशी घोषणा केली आहे.

माणूस हुशार आहे.पण हे करणे कितपत व्यवहार्य आहे.तो स्वतः दुबईला राहतो.म्हणजे बाकीच्यांनी शिका आणि काय तो उजेड पाडा!कुठल्या ग्रहावर राहतात ही माणसे देव जाणे.

>>>>>>>कितीही मोठ्या ऋषीच्या आश्रमात आयुष्य वेचलं तरीही सापडणार नाही, असं तत्वज्ञान भा.रा.तांब्याच्या कवितेतून शिकलो. सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट हे विषय न समजणाऱ्या वयात सुद्धा नारायण सुर्वेंच्या 'भाकरीच्या चंद्राने' वेड लावलं. चिं. विं. चे ‘चीम्मणराव’ आणि गुंड्याभौ’ हे आम्हाला लॉरेल आणि हार्डी पेक्षाही निरागस आणि निखळ वाटले.

क्या बात है!!! खरच खरच.

सुंदर लेख....
नुकतेच पु.लं.चे बिगरी ते मॅट्रिक पुन्हा ऐकले....
https://youtu.be/ofmzP-bLlFM
काहीसा तसाच अनुभव तुमचाही.

मी सुदैवी आमचं बाल्य कोणी मास्तरांनी करपवलं नाही.

छान लिहिलेय

वर म्हटल्याप्रमाणे मी ही संस्कृत scoring विषय आहे म्हणूनच निवडला होता

लेख आवडल्याच्या अभिप्रायाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!