मी आणि माझे आजोबा

Submitted by केशवकूल on 21 July, 2022 - 10:58

मी आणि माझे आजोबा. ह्या जगात आजोबाच माझे सर्व काही होते. माझे बाबा, माझी आई, माझा भाऊ बहीण, माझे मित्र, माझी शाळा, माझी चित्रांच्या गोष्टीची पुस्तके. सर्व काही माझे आजोबा!
आजोबांची परिस्थिती माझ्यासारखीच होती. मला आजोबांशिवाय कोणी नव्हते. आजोबांना माझ्याशिवाय कोणी नव्हते.
जगता जगता केव्हातरी मला समजले की लहान मुलांना आई बाबा असतात. मी आजोबांना आई बाबांच्या बद्दल कधी विचारलं नाही आणि आजोबांनी स्वतःहून कधी सांगितले नाही तोपर्यंत माझी समजूत होती की मुलांना आजोबा असतात आणि आजोबांना मुलं असतात.
माझं हे असच होतं. माझं जग आजोबांच्या भोवती फिरत होतं.
आमच्या घराच्या दारावर खिळा ठोकून आजोबा तिथे काळी बाहुली लटकावून ठेवत. त्या बरोबर दोऱ्यांनी विणलेले जाळे असे. त्यात कोंबडीचे अंडे. वर लाकडी कोळसा. ह्याला आजोबा ‘अगोचर नजरेचे’ जुगाड असे म्हणत. अंड्याचा जीव हल्लक म्हणून अगोचर नजरेनं फुटते. जर ते अंडे फुटलं तर आजोबा खूप घाबरून जात. “चल छोटी बाली, आपल्याला इथून पळायला पाहिजे.” ते मला सांगत. “ते आपल्या जवळ पोहोचले आहेत.”
मी आजोबांना कधी विचारले नाही की ‘ते’ म्हणजे कोण? आणि आजोबांनी स्वतःहून कधी सांगितले नाही..
ताबडतोब बाबा त्यांची सुटकेस बरोबर घेत, माझे कपडे बोचक्यात बांधत आणि आम्ही रातोरात मिळेल ते वाहन - ट्रक, बैलगाडी, ट्रेन, टमटम, बस- जे मिळेल ते पकडून त्या गावातून पळून जात असू.
अशी भ्रमंती आमच्या पाचवीला पुजलेली. त्यामुळे मी शाळेत अशी कधी गेले नाही.
“तुझे आईबाबा कुठे असतात?” शेजारचे कुणीतरी विचारत.
“आईबाबा? ते काय असते? मला आजोबा असतात. तुला आजोबा नाहीत?”
घरी येऊन मी आजोबांना विचारले, “मला आईबाबा का नाहीत?”
“पुन्हा जर कुणी तुला टोकलं तर त्यांला सागायचं कि माझ्या आईबाबांना वाघानं खाल्लं.”
आजोबा नेहमी काहीतरी शोधत असत. त्यांची नजर सारखी भिरभिरत असे. आम्ही नवीन घरात गेलो की आजोबा प्रथम घराचे कोपरे तपासत. मोठं झाड दिसलं की त्याचा बुंधा चोहोबाजूने तपासून बघत. ते काय शोधत होते? एक गोष्ट निश्चित होती की त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांना शेवटपर्यंत मिळालं नसणार.
एकदा माझ्याचाने राहवेना.
“आजोबा, तुम्ही काय शोधता आहात?”
“छोटी बाली, मी एका जगातून दुसऱ्या जगात जायचा रस्ता शोधात आहे. माझ्या मित्रांनी सांगितले आहे की असे बरेच रस्ते आहेत. त्या रस्त्यांना झिप असते. ती झिप खेचली कि नवीन जगात जायचा मार्ग दिसतो. आपण एकदा का नवीन जगात गेलो कि ह्या आपल्या पाठी लागलेल्या राक्षसांपासून आपली सुटका होईल.”

आजोबा आणि मी एकदा बागेत फिरायला गेलो होतो. आजोबा नेहमीप्रमाणे झाडांच्या बुंध्याशी ‘खेळत’ होते. मी चिंचेचे झाड कुठे आहे का बघत होते. बाबा नवीन जगाची झिप शोधत होते तर मी झाडाच्या मुळाशी बुटके लोक दिसतात का ते बघत होते. बुंध्याशी एक मोठी कुत्र्याची छत्री होती. म्हणजे इथे निश्चित बुटक्या लोकांची वस्ती असणार. हे बुटके लोक खूप हुशार असतात. दुसऱ्या जगाचे दरवाजे वगैरे त्यांनाच माहित असणार. कुणाची चाहूल लागली की दुसऱ्या जगात पसार होत असणार. मला जर का दुसऱ्या जगाची झिप मिळाली तर आजोबा किती खूष होतील.

समोरच्या झाडात सळसळ झाली. आजोबांनी माझा हात पकडून मला झाडाकडे खेचलं. आम्ही दोघे मोठ्या झाडाच्या मागे लपलो. मी आजोबांना विचारले कि काय झालं. आजोबांनी तोंडावर बोट ठेऊन चुप राहण्याचा इशारा केला. माझ्या मते ती सळसळ बुटक्याची होती. बुटका टोपी विसरला असणार. परत घ्यायला आला असणार. त्यांना काय घाबरायचं?
पण नाही. आजोबांच्या डोक्यात दुसरी वळवळ होती.
आम्ही लपत छपत घरी आलो, ते देखील सरळ नाही. आम्ही शहराच्या ज्या भागात राहत होतो त्याच्या अगदी विरुद्ध टोकाला, रस्त्याच्या कडेला एका फाटक्या हॉटेलात जाऊन आम्ही वडा पाव आणि मिसळ खाल्ली. आजोबांची ‘त्यांना’ हूल देण्याची युक्ति असणार. निव्वळ दाखवणूक. खाताना देखील आजोबा इकडं तिकडं डकुडकु पहात, भिरभिरत्या नजरेने खात होते. घरी परत जाताना आजोबा सारखे मागे बघत होते.अखेर जेव्हा आम्ही घरी पोहोचलो आणि बाबांनी पाहिलं ‘बुरी नजर’ वाले अंडं शाबूत आहे तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला.
त्या रात्री आजोबांनी मला घट्ट कुशीत घेतले.
“छोटी बाली, तू आता मोठी झाली आहेस तुला सांगायला हरकत नाही. आपल्या आजूबाजूला अमानुष जीव वावरत असतात. रक्तपिपासू वटवाघळे, आकार बदलणारे प्राणी, बिनसावलीची ‘माणसे’. चालणारी झाडे, उलट्या पाउलांनी पळणारे असे त्यांचे अनेक प्रकार आहेत. ते आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जातात. तिथे आपली कातडी सोलतात, आपला आत्मा काढून बाटलीत बंद करून ठेवतात. आज तुझ्या लक्षात आले का? ते झाड आपल्याला शोधत फिरत होते. नशीब आपण वाचलो. काही माणसेपण ‘त्यांच्या’ गोटात सामील झाली आहेत. कुणाकुणापासून बचाव करायचा? आणि कसा? त्यांनी आपल्याला खाल्लं कि आपल्याला समजणार, त्यांची ओळख पटणार. तो पर्यंत उशीर झाला असतो. मग काय उपयोग? पण तू घाबरू नकोस बरका. मी आहे न.”
“मी काय सांगतो आहे तिकडे लक्ष दे. तुला कुठेही कोणी अनोळखी दिसला त्याच्या नकळत त्याला चुकवून घरी यायचे आणि मला सांगायचे. मला खरं खरं सांगितलस तर चॉकलेट बक्षीस!”
आजोबांच्या जवळ एक जुने पुराणे, जीर्ण शीर्ण झालेले पुस्तक होते. त्यात चित्रं होती. अघोरी प्राण्यांची, आजोबा मला त्या पुस्तकाला हात पण लावू देत नसत.
“आजोबा आजोबा मी बागेत खेळत होते ना तेव्हा एक अनोळखी माणूस बघितला.”
“त्याने तुला बघितले नाही ना?”
“नाही नाही, मी झाडांच्या मागे लपत छापत घरी आले.”
आजोबा माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत मला म्हणाले, “खर सांगते आहेस न कि थापा?”
“खरच. अगदी खरच.”
“कसं दिसत होतं?” आजोबा नेहमी ‘तो’, ‘ती’. अस न म्हणता त्या जीवांना ‘ते’ म्हणत.
“त्याचं अंग जणू दगड तासून बनवल्या सारखे होतं.”
आजोबांनी पुस्तक उघडले. “त्याला ‘दगडया म्हणतात. खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा माणस डोंगराच्या कडी-कपारीत वसतीला रहात तेव्हा. त्याला देवांनी शाप दिला..का तर त्याने देवांच्या सश्याची शिकार केली. हा त्याचा गुन्हा. तेव्हापासून भटकतोय बिचारा! गुन्हा काय, शिक्षा काय. देवाच्या दारी न्याय नसतो हेच खरं.”
मी आणि आजोबा अशीच भटकंती करतो आहोत. फरक एवढाच की आम्ही कधी तरी स्थिरस्थावर होऊ अशी खात्री होती. दगडीला मात्र सुटकेचा मार्ग नव्हता. एकेकाचं नशीब दुसरं काय.
एकदा मी रस्त्याच्या कडेला डबक्यात बेडकांची गंमत बघत बसली होती. कुठे काही खुट झाले की बेडक पाण्यात उड्या मारून गायब होत. पाठी आवाज झाला म्हणून वळून बघते तो काय एक म्हातारी आज्जी माझ्याकडे पाहून बडबडत होती. मी लपण्याचा प्रश्न नव्हता. कारण ती माझ्या समोरच होती. आमची नजरानजर झाली. पाच नांग्यावाल्या इंगळीच्या विषासारखी विखारी नजर. नुसत्या नजरेनच डसली असती जणू. अशीच काहीबाही बडबडत पुढच्या वळणावर नाहीशी झाली.
मला त्या बाईची भीती वाटत नव्हती. मला आजोबांची भीती वाटत होती आता आजोबा रागावतील. पण मी खरं खरं सांगायचे ठरवलं. आजोबा अजिबात रागावले नाहीत. उलट ते म्हणाले, “छोटी बाली, तू अगदी बरोबर वागलीस. तू घाबरून पळायला लागली असतीस तर तिने तुला जागेवरच खाल्ले असते. आता ती त्यांच्या जगात जाईल आणि सगळ्या खाविसांना सांगेल. त्या आधी आपल्याला इथून पळाले पाहिजे.”

आणि आम्ही पळालोच!
आजोबांनी आपली सुटकेस आवरली. मी माझे बोचके बांधले आणि आम्ही कूच केले.
अश्या धावपळीत शाळा होणार कशी? वर आजोबांना नेहमी भीति वाटायची की माझे मास्तर “त्यांच्यात” सामील असतील, “त्यांचे” हंडीबाग असतील मला कच्चे खातील. खरतर तेव्हा मुली शाळेत तरी कुठे जात होत्या?
“थोडी मोठी हो. मीच तुला शिकवीन.” आजोबा
जास्त कुणाशी बोलायचे नाही, जास्त कुणाशी संबंध ठेवायचे नाहीत. आपण बरे आणि आपले काम बरे. अशी आजोबांची पॉलीसी होती.
मी जेव्हा नऊ वर्षांची झाली तेव्हा मला समजले की हा काही मी आणि आजोबा ह्यांच्यातला गमतीतला खेळ नव्हता, हा आम्हा दोघांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता.
“छोटी बाली, मला थोडं काम आहे. तुला एकट सोडून जायचे जीवावर येतय. जायला तर पाहिजेच. हा गेलो आणि हा आलो बघ. तोवर तू स्वतःची काळजी घेशील? कोणी अनोळखी इकडे फिरताना दिसलं तर भीमरूपी म्हणायची.”
“आजोबा कुठं जाताय तुम्ही?”
“मी माझ्या मित्रांना भेटायला जातो आहे. इम्पॉर्टंट कामं आहेत. येताना तुझ्यासाठी ‘बुढढीके बाल’ घेऊन येईल हो.”
“तुमचे मित्र देखील त्यांच्यासारखेच आहेत काय?”
“आजकाल कुणाचं काही खरं नाही. बघता बघता देवमाणसं दानव होतात. कधी कधी ह्या पसाऱ्यातून कोणीतरी चांगला भेटतो. मला पण ह्या पळापळीचा उबग आला आहे. ह्या जोखमीतून केव्हा एकदा सुटका होईल अस झालय. एकदा ज्याचे त्याला सुखरूप पोहोचवले की सुटलो एकदाचा. तारुण्याच्या धुंदीत जबाबदारी घेतली खरी, आता वाटतंय कि चूक केली.”
आजोबा काय बोलत होते? मला काही समजलं नाही. पण आता मोठी झाली होते. आजोबांनीच तस सांगितलं होत. त्याची आठवण झाली.
“आजोबा तुम्ही खुशाल जा. मी आता मोठी झाली आहे. माझी काळजी करू नका.”
आजोबांना हसू आले. “मोठी बाली, मी येतोय.”
बाबा आपल्या कामासाठी गेले. इकडे मी मात्र एकटी बसून कंटाळले. आजोबांनी माझ्यासाठी गोष्टीचे पुस्तक आणले होते. तेच वाचत बसले. “लाल बाली आणि लबाड लांडगा.”
माझ्या मागेच धाडकन आवाज आला. दरवाजा आपटून आजोबा घरात आले. पण आजोबा कधी दरवाजा हापटत नाहीत. मी मागे वळून बघते तर काय आजोबांच्या ऐवजी अणकुचीदार दात असलेला लबाड लांडगा गोष्टीतून निघून माझ्यासमोर अवतरला होता.
“आहा, नात तर मिळाली. आता आजोबा मिळायला काय उशीर!”
लांडग्याच्या कानात कोणीतरी कडाडले.
“ओके ओके सर. ए मुलगी, तुझ्या आजोबांची वही कुठे आहे? आणि ते यंत्र?”
“कुठली वही? कुठलं यंत्र? आमच्याकडे एकपण वही नाहीये. यंत्र नाहीयं.”
“सर, ती म्हणते की “आमच्याकडे एकपण वही नाहीये.”” पुन्हा कडकनाथ कडाडला. लांडगा थर थर कापत होता. उसने अवसान आणून तो पुन्हा छोट्या बालीवर गुरगुरला, “काय बेशरम पोरगी आहे पहा. आजोबांनी हीच शिकवण दिली काय? बऱ्या बोलाने सांग वही कुठे आहे? नाहीतर ...”
‘नाहीतर काय’ सांगायला त्याला वेळ मिळाला नाही. त्या आधीच त्याच्या डोक्यात फुलदाणी आदळली. आजोबानीच फेकली असणार! आजोबा दरवाज्यात उभे होते.
“छोटी बाली तू आधी आत जा. दरवाजा घट्ट लावून घे. तवर मी ह्याचे दात आणि नख्या काढून घेतो. तुझ्यासाठी सोन्याचे पेंडंट होऊन जाईल.”

मी आतल्या खोलीत जाणार होते इतक्यात माझे लक्ष जमिनीवर पडलेल्या कागदांवर गेलं. त्यात दहा अकरा लोकांचा एकत्र काढलेला फोटो होता. आजोबांच्या तरुणपणीचा असावा. त्यातील दोघांच्या चेहेऱ्याभोवती लाल शाईने फुल्या मारल्या होत्या. आजोबांच्या भोवती वर्तुळ काढले होते. जणू काय दोघांचे काम तमाम झाले होते. आता आजोबांचा नंबर! बरोबर दुसरा कागद होता. त्यावर चित्र रेखाटले होते. एक लहान नळकांडे आणि त्याच्या सभोवती मोठे नळकांडे. लहान नळकांड्यावर प्रश्न प्रश्नचिन्ह केले होते. लबाड लांडग्याच्या पॅंटच्या खिशातून हे पडलं असणार.
मी आजोबांना तो फोटो दाखवला. तो पाहून आजोबा थोडे भावूक झाले असावेत असं मला वाटलं. पण ही वेळ भावूक होण्याची नव्हती. जो भावूक हो गया वो समझो मर गया. भावूक बादमे, पूरा जिंदगी पडा है भावूक होने के लिये. पहले अपनी जान तो बचाओ.
पुन्हा आम्ही आवारा आवर केली आणि निघालो.
सूर्य मावळून अंधार पडायला सुरवात झाली होती.
“हे एक बरीक चांगलं आहे. अंधार पांघरून आपण मजल दरमजल करत जाऊ. नशिबात असेल तर वाटेत छकडा, धमणी, बैलगाडी असं काही भेटेल. नाहीतर आहेतच दोन पाय. थकली न माझी बाली. तू तरी काय करणार.माझी नात ना तू!”
दुरून हवेवर तरंगत गाण्याचे सूर येत होते. आजोबा थबकले. हा बैलगाडीवाला असेल तर निदान थकलेल्या बालीला थोडी विश्रांती मिळेल.
“ओ, गाडीवाले बाबा, पुढच्या तिठ्ठ्यापर्यंत गाडीत घ्याल काय?”
गाडीवाल्याने आम्हाला निरखून पहिले. खिशातून एक बंदा रुपया काढला. “ह्या रुपयाचे काय म्हणणे आहे?”
अस म्हणून त्याने रुपया हवेत उडवला.
“तुमचे नशीब जोरावर आहे. ह्या रुपयाचे वेवफंक्शन कोलॅप्स झाले आणि म्हणतेय घ्या दोघांना गाडीत. बसा पटापट गाडीत.”
“अरे व्वा. तुम्ही तर युनिवर्सिटीत प्रोफेसर असायला पाहिजे. इथे का गाडी चालवताय?
“हा आला तुमचा तिठ्ठा”, त्याने आजोबांना उत्तर द्यायचे टाळले. “ही पहिली वाट नरकाकडे जाते. ही दुसरी वाटही नरकाकडे जाते. ही तिसरी वाटही नरकाकडेच जाते. तुम्ही लोक काय म्हणता त्याला ते ‘फ्रेंडली हेल!’”
“च्यायला, म्हणजे एकूण ‘ऑल रोडस् लीड टू हेल.’ ‘रोड नॉट टेकन’ असा मनस्ताप नाही’.” आजोबांच्या तोंडी ‘च्यायला’! माझी मलाच लाज वाटली.
“ह्या पहिल्या वाटेने नरकाचे ‘जन्म-मृत्यू फ्रेण्डशिप द्वार’ पाच क्षणात येते. दारापाशीच माझ्या भावाचा गुत्ता आहे. मस धंदा करतो. नरकात चेक इन करायच्या आधी--- अव्वल पिणारे म्हणतात जस्ट वन लास्ट पेग! आयुष्यात कधीही न प्यालेले म्हणतात जस्ट वन फर्स्ट पेग!”
आजोबा स्मितहास्य करत म्हणाले, “वेळ येईल तेव्हा मी पण येईनच. किती पैसे द्यायचे?”
“सर मी पैसे घेत नाही. येणारे सारे सडे फटिंग. डेबिट/क्रेडीट कार्ड स्वाईप करायचं मशीनपण नाही. नरकाच्या परिसरात नेटवर्क पण मिळत नाही. पैसे कोण कसे देणार? त्या ऐवजी तुम्ही मला एखादे चांगले पुस्तक रेकमेंड करा.”
आजोबांनी नंतर मला सांगितलं की तो भविष्य काळात बोलत होता. आजोबांनी पण मग भविष्य काळात स्विच मारलं.
“स्लॉटरहाऊस-5 वाचले नसशील तर वाच. ते वाचल्यावर तुला समजेल. आमचा नरक तुमच्या नरकाच्या वरताण आहे. अवर्स इज बिगर द्यान युवर्स! आम्हाला कमी लेखू नगस.”
गाडीवान दादाला अजून बोलायचे होते. आजोबा घाईत असल्याने जास्त बोलण्याच्या मूड मध्ये नव्हते.
गाडीवाला थॅंक्स म्हणून चालता झाला. त्या किर्र झाडीत मी आणि आजोबा. प्रत्येक झाड जणू आम्हाला खायला उठलं होतं.
आम्ही बैलगाडीत होतो तेव्हा छान उजेड होता. गाडीवाला जाताना आपल्या बरोबर उरलासुरला उजेड घेऊन गेला. त्याला उजेडाची जास्त गरज असावी.
त्या गर्द अंधारात, जंगलात आजोबा पुन्हा चालायचे थांबले. आता काय? आजोबा मला एकटं सोडून जाऊ नका ना. भीति वाटते आहे.
“आ हा. इथेच कुठेतरी आहे.”
आजोबांनी आपली सुटकेस माझ्या समोर ठेवली आणि ते झाडीत घुसले. मला विचारलं नाही की सांगितलं नाही.
डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार होता. आधी अंधार हवा हवासा वाटत होता. आम्हाला मायेचं पांघरूण घालून राक्षसांपासून रक्षण करत होता. आता तोच खायला उठला होता. झाडं जंगली प्राण्यांसारखी दबा धरून बसली होती जणू. आजोबा लवकर परत या ना. भीतीने किंकाळी पोटातच दबली होती. झाडीतून कोणीतरी मला हाक मारत होतं. मी माझ बोचकं आणि आजोबांची सुटकेस उचलली, वाट दिसेल(?) तिकडे धाव घेतली.
“अगो, माझी बाळ ती गुणाची. कुठं पळताव तुमी?”
मी आजोबांच्या कुशीत शिरले आणि हमसाहमसी रडू लागले. नऊ वर्षाचा ताण एका क्षणात बांध तोडून बाहेर पडला.
“छोटी बाली, शानी बाली उगी उगी. माझच चुकलं. ललू नको. चल आता.”
आजोबांनी एका हातात सुटकेस आणि दुसऱ्या हातात माझ बोचक घेऊन चालायला सुरवात केली.
आम्ही रस्ता सोडून जंगलात घुसलो. समोर साफसूफ केलेल्या जागेत एक भंगार मोटारगाडी उभी होती.
“चल बस, माझ्या मित्रांना माहित होत की आपल्याला गाडीची गरज पडणार आहे. त्यांनीच इथे उभी केली होती.”
आजोबांनी हॅंडल मारून गाडी चालू केली. त्याचा काही उपयोग नव्हता. आम्ही चारी बाजूंनी घेरलो गेलो होतो.
“प्रोफेसर, आम्हाला माहितं होतं. तुम्ही येणार आहात म्हणून. केव्हापासून वाट पाहत आहोत. तेव्हढी सुटकेस द्या. आणि मग कुठं जायचं तिकडं जा.” सूटेड-बूटेड जंटलमन खविसाने लुभावणाऱ्या गोड आवाजात कूssss केले. हा त्यांचा सरदार असावा. त्याच्या बाजूला जिभल्या चाटणारा वनमानुष होता.
खुनशी लोकांचा सगळीकडे अनिर्बंध संचार असतो.
“सर मला खूप भूक लागली आहे. ही छोटी मुलगी चालेल मला.” बाजूला उभी असलेली जख्खड म्हातारी बोलली. आजोबांनी मला घट्ट जवळ घेतले.
“प्रोफेसर, मला हिंसाचाराचा तिटकारा आहे. रक्त बघून मला उलटी होते. आणि बुद्धिबळाचे नियम कधी माझ्या बथ्थड डोक्यात शिरले नाहीत. माझा आवडता खेळ होता आणि आहे तीन पत्ती. खेळणार काय? पण काय उपयोग? तुमची तिन्ही पाने ओपन आहेत. तुम्ही, तुमची नात आणि ती सूटकेस! द्या ती सुटकेस माझ्याकडे.”
आजोबा चूप. सुटकेस हातातून सोडायची नाही असा जणू त्यांनी निश्चय केला होता.
“मला माहित होतं की तुम्ही तसे ऐकणार नाही. कॉलेजमध्ये पण तुमची हट्टी म्हणून प्रसिध्दी होती.”
त्याने जाकेट मागे केलं अन कमरपट्ट्यातून पिस्तूल बाहेर काढले.
“डॉक्टर, तुम्ही तर गोळ्या खाऊन जगत असणार, ह्या तुमच्या नातीला गोळ्या खचितच आवडत असणार.”
आजोबांना “हे राम” म्हणायची देखील संधी मिळाली नाही.
आम्ही दोघांनी अलगद “दुसऱ्या जगात” प्रवेश केला.
सुटकेस मात्र मागेच राहिली.
हा दिवस होता 1 जानेवारी 1945
कदाचित 30 जानेवारी 1948. किंवा 4 एप्रिल 1968!
ह्या नंतर वेगाने घटना घडत गेल्या,

The first atomic bomb detonated over a populated area occurred on August 6, 1945 at 8:15 AM over the Japanese city of Hiroshima. The bomb name was Little Boy. The bomb type was a gun-assembly bomb. It was deployed by a B-29 bomber named the Enola Gay.

It is estimated roughly 70,000 to 135,000 people died in Hiroshima and 60,000 to 80,000 people died in Nagasaki, both from acute exposure to the blasts and from long-term side effects of radiation.

Group content visibility: 
Use group defaults

>>कदाचित 30 जानेवारी 1948. किंवा 4 एप्रिल 1968! >> अफलातून! ही ओळ वाचली आणि अंगावर शहारेच आले.
मजा आली केकू!