वारकर्‍यांची मांदियाळी--(वीक एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 16 July, 2022 - 10:06

आपला देश आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे भक्तिभावाचे माहेर घर आहे. जत्रा, यात्रा,  सणवार आपल्या राज्यात खूपखूप आहेत.  खरे सांगायचे तर या सर्व बाबी आपल्या संस्कृतीचा  अविभाज्य घटक आहेत. माणसांची आणि समाजाची जडणघडण त्यामुळे हवी तशी होते. याला दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या भूमीत झालेले संत महात्मा हे पण आहेत.

आमच्या आभ्यासक्रमात परिपूर्ती नावाचा कथा संग्रह होता. सर्व कथा इरावती कर्वे या प्रसिध्द लेखिकेने लिहिलेल्या होत्या. या कथासंग्रहाचे नाव परिपूर्ती ठेवण्याचे एक गमतीदार कारण आहे. एकदा इरावती कर्वे काम आटोपून कॉलेजमधून (जेथे त्या नोकरी करत होत्या) घरी परतत असतांना घरापासून थोड्या अंतरावर त्यांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता, आई येत असलेली पाहून त्याने आपल्या मित्रांना सांगितले "ती माझी आई आहे". हे त्यांनी स्वतः ऐकले. त्यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे की त्यांना वेगवेगळे पुरस्कार, मानसन्मान मिळाले. पण मुलाचे ही माझी आई आहे सांगितलेले ऐकून त्यांना जीवन सार्थकी लागल्याचा विचार मनात आला आणि म्हणून त्यांनी या कथा संग्रहाचे नाव परिपूर्ती असे ठेवले. किती उद्बोधक प्रसंग आहे नाही! हे मी सहजच सांगितले. पण आजचा संबंध असा की या पुस्तकात एक प्रदीर्घ लेख होता तो पंढरपूरच्या वारीवर!  या वारीचे इतके सुंदर वर्णन आहे की वाचताना माणूस हरवून जातो. मी त्यावेळेस एका पेपरमधे आलेल्या परिक्षणात वाचले होते की हा लेख म्हणजे महराष्ट्राच्या संस्कृतीचा आरसा आहे.
आजही वारी म्हणजे वर्षातून दोन वेळेस  येणारा सांस्कृतिक महोत्सव असतो. सर्व लोक उत्सुकतेने वाट बघत असतात. आपण ऐकतो की लोकांचा नास्तिकवादाकडे कल आहे हल्ली. पण पंढरीची वारी ही अपवाद दिसते. सालाबाद भाविकांची संख्या वाढतच आहे. परवाच कळाले की या महासागरात सॉफ्टवेअर कर्मचार्‍यांची पण एक दिंडी निघते.
हे सर्व व्यवस्थापन अगदी सुरळीत चालते. एवढा भक्तांचा महासागर असून वारी व्यवस्थित पार पडते  हे विशेष!
सर्व वारकरी घरून कांहीही न घेता निघतात. या पायी प्रवासात त्यांची थांबण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था पण लोकच करतात. या वारीत सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश असतो. अगदी गाडीतून प्रवास करणार्‍यांपासून ते चालत चालत वाटचाल करणार्‍या पर्यंत!  
ही वारी म्हणजे आपल्या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. माझे एक मित्र वारीला जाऊन आले. ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी या वारीचे वर्णन " वारकर्‍यांची मांदियाळी" असे केले.  हे सर्व ऐकून आठवून मी इतका प्रभावित झालो की मी लागलीच या विषयावर कविता, अभंग्,भारुड रचले. त्यातील एक रचना अभंग रुपात खाली माझ्या वाचकांसाठी पेश करतोय.

पांडुरंगा--

सदैव मनात । दिससी स्वप्नात ।
रंगलो तुझ्यात । पांडुरंगा ॥१॥

नको घरदार । नको येरझार ।
दावा मुक्तिद्वार । पांडुरंगा ॥२॥

मोहविते माया । सोकावली काया ।
जन्म गेला वाया । पांडुरंगा ॥३॥

रमलो नात्यात । आलो मी गोत्यात ।
पाय चिखलात । पांडुरंगा ॥४॥

असू दे उपाशी । रोज एकादशी ।
जागा दे पायाशी । पांडुरंगा ॥५॥

मठ्ठ निर्विकार । तरी मी अधीर ।
जागवी लागीरं । पांडुरंगा ॥६॥

जन्म गेला फुका ।पामराचे ऐका ।
माझा व्हावे सखा । पांडुरंगा ॥७॥

गळा तुझी माळ । तोडली का नाळ ।
तुझाच मी बाळ । पांडुरंगा ॥८॥

करमेना घरी । भाऊबंद तरी ।
रमतो मंदिरी । पांडुरंगा ॥९॥

"निशिकांत" म्हणे । कृपेचे चांदणे ।
होवो माझे लेणे । पांडुरंगा ॥१०॥

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे छानच.
मोहविते माया, सोकावली काया, आणि असू दे उपाशी रोज एकादशी हे विशेष आवडले.
इरावतीबाईंच्या त्या लेखावरून दुर्गाबाईंना विठोबा म्हणजे स्थानिक वीर असावा, पशुपालन करणारा धनगर असावा असे पुसटसे वाटले आणि रा चिं ढेरे ह्यांनाही तसेच वाटून त्या बीजाचा " श्रीविठ्ठल एक महासमन्वय" ह्या पुस्तकाच्या रूपाने महावृक्ष झाला.

अभंग खूप छान आहे, आवडला.

<< वारी म्हणजे आपल्या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. >> +१

<< मुलाचे ही माझी आई आहे सांगितलेले ऐकून त्यांना जीवन सार्थकी लागल्याचा विचार मनात आला आणि म्हणून त्यांनी या कथा संग्रहाचे नाव परिपूर्ती असे ठेवले. किती उद्बोधक प्रसंग आहे नाही! >>
मूल झाल्यावरच जीवन सार्थकी लागते का?