स्वप्न

Submitted by निशिकांत on 12 July, 2022 - 10:53

मी जरी असलो कफल्लक
मालकी माझीच असते
स्वप्न माझे पाहताना
वेदना गालात हसते

लाजरी बुजरी अताशा
केवढी निर्भीड दिसते !
काय म्हणती लोक याची
काळजी स्वप्नात नसते

येउनी हळुवार माझ्या
ओघळांना रोज पुसते
कोंडलेल्या भावनांचे
स्वप्न हे काहूर नुसते

रंजल्या अन् गांजल्यांचे
भाग्य कोमेजून झुलते
आस थोडी स्वप्न बघता
कोरड्या डोळ्यात फुलते

जीवनी आभास फसवे
दु:ख ज्यांच्या आत जळते
स्वप्न बघता मृगजळांना
गारव्याची साथ मिळते

शक्य नाही जे कधीही
स्वप्न मज का तेच पडते?
लाचखोरी संपल्याचे
पाहिले मी, जे न घडते

संपदा, मेल्या क्षणाला
नेहमी मागेच उरते
जन्म पुढचा साथ करण्या
स्वप्न नवखे हात धरते.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users