कहाणी, टच अ‍ॅन्ड गो

Submitted by रेव्यु on 2 July, 2022 - 19:32

कहाणी टच ॲन्ड गो ची
मी अमेरिकेत 1 मार्चला आलो. साधारण 2 महिने कॅलिफोर्नियात मुलीकडे आनंदात व्यतित करून मग सियॅटलला दुसर्या मुलीकडे आलो. नंतर पूर्ण कुटुंबाचे स्नेहसंमेलन इथेच साजरे झाले. अगदी आनंदात मजेत वेळ जात होता. मध्यरात्रीपर्यंत गप्पा, लॉंग ड्राइव्ह्ज, खायप्यायची चंगळ अन मुलाजावयांत, नातवंडाना चांगलेचुंगले उत्साहाने करून घालणारी सौ, यामुळे मध्यंतरीच्या 2 ते 3 वर्षाच्या भावनिक दुष्काळ आणि भेटीगाठींची वानवा या मुळे आम्ही मजेत दिवस काढत होतो.
मग लॉंग वीकांताला माऊंट रेनियरची 3 दिवसांची रोड ट्रिप झाली. माऊंट रेनियर अन वाटेवरील अनेक प्रेक्षणीय स्थळे यांनी आम्हाला मंत्रमुग्ध केले. जागोजागी सुंदर धबधबे, व्हिजिटर्स पॉइंट्स आणि एका खेड्यातील एअरबी एन बी यांनी एक वेगळा अनुभव दिला.
PXL_20220627_004044106.PANO_.jpg20220625_093900.jpg20220625_111121.jpg20220625_130805-2-1.jpg20220625_111207 (1).jpg20220611_140851.jpg

आम्ही 3 दिवसाच्या सहलीनंतर 28 जूनला सियॅटल मध्ये घरी परतलो. आणि संध्याकाळीच नातवाने थंडी वाजतेय अन घसा दुखतोय म्हणून सुरुवात केली. घरीच कोविडची टेस्ट केली अन ती पॉझिटिव्ह निघाली. तो कॅलिफोर्नियात राहतो. थोरली मुलगी, जावई आणि दोन्ही मुले तिथून आली होती 14 तास ड्राइव्ह करून एक आठवड्यापूर्वी अन आणखी एक आठवडा वास्तव्य होते. पण आम्ही दोघे सिनियर सिटिझन्स आजी आजोबा असल्याने त्यांनी लगोलग रात्री 9 वाजता परत जाण्याचा निर्णय घेतला. अत्यंत विषण्ण मनाने आम्ही त्यांचा निरोप घेतला. रात्रभर त्यांना 14 तास ड्राइव्ह करावे लागणार होते पण निरुपाय होता-कर्टसी-कोविड.
त्यांचा दुसर्‍या दिवशी पोहोचल्याचा फोन आला. नातू रात्रभर अस्वस्थ होता. मी देखील रात्री नीट झोपू शकलो नव्हतो. काही वेळाने मला देखील खोकला जाणवू लागला होता आणि म्हणून घरी टेस्ट केली, निगेटिव होती. पण रात्रीपर्यंत कणकण जाणवू लागली. दुसर्‍या दिवसापासून माझा परदेशातील अनुभव सुरू झाला. मुलीने आरटी पीसीआर केंद्रात नेले. प्रचंड मोठ्या फूटबॉल केंद्रावर पार्किंगची व्यवस्था अन गाडीतूनच सॅंपल घेत होते.
newposts-covidtest-franciscan2.jpg
आधी अपॉइंटमेंट घेतली होती जी पूर्व अट होती. माझे सॅंपल ( दोन्ही नाकपुड्यात 10 वेळा गोल फिरवा-आतवर ढकलण्याची गरज नाही!) दिले अन चोवीस तासांनी येणार्‍या निकालाची वाट पाहू लागलो व स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले अन आमच्या नाशिकच्या फिजिशियनना संध्याकाळी फोन लावला. त्यांनी तापमान, प्राणवायू स्तर, श्वसनास त्रास आणि खोकला आहे का हे विचारले आणि माझे तापमान 100, प्राणवायू 98 व इतर लक्षणे नाहीत काहीशी घशात खरखर आहे हे सांगितले. त्यांनी अत्यंत आश्वासक पध्दतीने मुळीच काळजी करू नका, अत्यंत सौम्य लक्षणे आहेत, 100 % तुम्ही 3 ते 4 दिवसात बरे व्हाल परंतु विलगीकरण करा व विश्रांतीचा सल्ला दिला. मी मग एका वेगळ्या खोलीत स्थानंतरित झालो.
दुसर्‍या दिवशी रिझल्ट पॉझिटिव्ह आला. मी हादरलो! पत्रकात पॉझिटिव्ह असल्यास येथील वैद्यकीय विभागातून फोन येईल असे लिहिले आहे. अजून-4 दिवसांनी आला नाही.... भारतात तो लगेच येतो!!

रिझल्ट आल्यावर त्याच दिवशी मुलीने बर्‍याच धडपडीने (आणि जावयांच्या प्रयत्नाने) जवळच्या हेल्थ पॉइंट या क्लिनिक मध्ये नेले. हे खाजगी क्लिनिक आहे. आम्ही आत गेल्याबरोबर मी पॉझिटिव्ह आहे सांगितल्याबरोबर मला अगदी बाहेर, रस्त्यावर उभे रहायला सांगितले (किंवा कार मध्ये!). अंदाजे 3 तासांनंतर माझा नंबर आला, माझी प्राथमिक हिस्टरी व तपासणी केली. ब्लड प्रेशर, तापमान, वजन इ. घेतले. अन मग डॉक्टरीण बाई आल्या, त्यांनी नीट तपासले आणि माझ्या भारतातील डॉक्टरांनी सांगितले त्याची उजळणी केली. फक्त व्हिटॅमिन्स असलेले द्र्व पदार्थ पिण्यास सांगितले अन मग एक पत्रक माझ्यासमोर ठेवले. त्यात पॅक्सिविर नावाचे औषध आता अमेरिकेत सौम्य व तीव्र लक्षणे असणार्‍यांना देण्य़ाची शिफारस आहे परंतु त्यात काही औषधे घेत असल्यांना ते वर्ज्य असल्याचे लिहिले आहे. त्यात स्टॅटिन्स, म्हणजे कोलेस्टोरॉल कमी करणारी औषधे आहेत व माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व माझ्या आईवडिलांना हृदयरोगाची हिस्टरी असल्याने वयाच्या 60 व्या वर्षापासून मी घेत आहे. हे मी या अमेरिकन डॉक्टरीण बाईंना सांगितले. तरीही त्या म्हणाल्या निर्णय तुमचा आहे. भारतात हा निर्णय माझ्या डॉक्टरांनी घेतला असता. हे नवीन औषध बायडन हॅरिस योजनेखाली मोफत देऊन याची परिणामकारकता इमर्जन्सी बेसिस वर अप्रुव्हल घेऊन तपासली जात आहे. हा एक मोठा फरक मला जाणवला. मी नकार दिला आणि रात्री माझ्या डॉक्टरांशी पुन्हा बोललो. त्यांनी काहीही गरज नाही यास दुजोरा दिला.
आज चौथा दिवस आहे. गृह विलगीकरणात आहे. टेंपरेचर 98.3 वर कोणतेही औषध न घेता स्थिर आहे. प्राण्वायू 99 आहे.

या 4 दिवसात बरेच चिंतन केले, अनेक विचार मनात आले. मला काहीही त्रास झाला नाही. पहिले दोन चिंताग्रस्त दिवस होते. मी 70 च्या पुढे असल्याने प्रत्येक जण चिंताग्रस्त होते. खरेच कसे निमिषार्धात चित्र बदलते. आता नातूही बरा आहे. या कोविडने अनेकांची जीवनेच ध्वस्त केली. आजारी असताना एकटे राहणे किती कठीण असू शकते याची एक हलकी झलक मिळाली. आपल्या देशातील डॉक्टर मदतीला कसे पुढे येतात, दिलासाजनक बोलतात याची सुखद जाणीव झाली. बरेच काही शिकलो.
मी रोज 5 किमी चालतो, याचा बराच फायदा झाला आहे असे दोन्ही डॉक्टर म्हणाले. हा एक सुखद अनुभव.

जीवन क्षणभंगुर आहे अन आपल्याला मिळालेली देणगी आहे. रोज मिळणारे जेवण व त्याची चव, आपल्याला नीट श्वास घेता येतो आपल्या शरीराचे तापमान आपोआप नियमित केले जाते, या बद्दल आणि अशा अनेक वरदानांप्रति अन माझे जीवन आनंददायक करणार्या माझ्या डॉक्टर अन अनेक हितचिंतकांची, प्रेम करणार्या कुटुंबिय अन मित्रांची या क्षणी व या घटनेत प्रकर्षाने कृतज्ञतापूर्वक आठवण झाली अन आनंद अन क्लेश या एकाच जीवनाची भिन्न नव्हे तर अभिन्न अंगे आहेत याची जाणिव या 10 दिवसात झाली अन खूप काही शिकलो म्हणून हा अनुभव शेअर करण्यासाठी हा पंक्तीप्रपंच!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख!
तुम्हाला कोविड झाला ते वाईटच,पण आपल्या माणसांत असताना झाला ते चांगले झाले.मानसिक आधार मिळाला.

आईवडिलांना हृदयरोगाची हिस्टरी असल्याने वयाच्या 60 व्या वर्षापासून मी घेत आहे........ हे माझ्यासाठी चिंतनीय आहे.

देवकी
हा माझ्या डाॅक्टरांचा सल्ला होता. मला बी पी आहे व वजनही जास्त आहे.
काळजी करू नका..let the Dr decide

चांगला लेख!

*"आनंद अन क्लेश या एकाच जीवनाची भिन्न नव्हे तर अभिन्न अंगे आहेत >>>+11

काळजी करू नका.....अजिबात काळजी करत नाही.
चिंतन करण्याजोगे म्हणून चिंतनीय म्हटले आहे.कदाचित शब्द प्रयोग चुकीच्या अर्थी वापरला गेला असावा.

तुम्ही बरे झालात आणि खर्चाचा फटका पडला नाही, हे बरे झाले.

इन्शुरन्स नसेल आणि आरोग्यसेवेची गरज पडली, तर अमेरिकन हेल्थसिस्टीममध्ये भल्याभल्याना नागडे करायची क्षमता आहे.

मी कुठेतरी वाचले होते की एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळत नाही किंवा मिळालेली गोष्ट हरवते. आपल्या आरोग्याला आणि एकंदरीत आयुष्याला हे लागू पडते.

उपाशी बोका>>> अन आपण नेलेला इन्श्यरन्स इतका महान आहे की त्याचा टोल फ्री लागला नाही अन मग मी निवृत्त, अर्जन नसलेला म्हणून वेळ काढली..... आपले ट्रॅव्हल इन्शुरन्स वाले त्याहून बेकार आहेत
बजाज वाल्यांना पाठवलेल्या मेल् चे ४८ तास झाले उत्तर नाही, मुलीचा नंबर दिला आहे त्यावर फोन नाही

<< जीवन क्षणभंगुर आहे अन आपल्याला मिळालेली देणगी आहे. >>

----- छान लिहीले आहे. बरे झाल्यावरही काळजी घेत रहा...

छान लेख. काळजी घ्या.
डॉक्टरांचे अनुभव नेहमीच वेगवेगळे येतात. टोकाचे चांगले ते टोकाचे वाईट. पण आजारात ते देवच वाटतात हे खरेय.
आजारात आपल्या माणसात असणे केव्हाही चांगलेच.

छान लिहिलं आहे. Mild infection होतं हे वाचून बरं वाटलं तरी काळजी घ्या.

आज शेवटचा दिवस.
माझ्या डॉक्टर मित्रांना (मायबोलीकर) मला विचारायचे आहे..... या नंतर काय पश्चात-परिणाम अपेक्षित आहेत. आता तापमान, प्राणवायू व इतर सर्व पॅरॅमिटर्स व्यवस्थित आहेत. काल ४ किमी फेरफटका मारून आलो (घरी शिव्या खाल्ल्ल्या) .
लाँग कोविड म्हणजे काय? सध्या लक्षणीय थोडा त्रास म्हणजे प्रातर्विधीची प्रिक्वेन्सी वाढली आहे.. काही मार्गदर्शन मिळाल्यास आनंद होईल

सौम्य आजार होता आणि आजूबाजूला घरची मंडळी होती ह्या जमेच्या बाजू! काळजी घ्या! लगेच नेहमीच्या रूटीनला सुरूवात करू नका. ओमायक्रोन नंतर ज्येनांना पटकन थकवा येतो असे लक्षात आले आहे माझ्या. शिवाय व्हिटॅमिन सप्लीमेंट्स सांगितले असतील तर ती लगेच बंद करू नका. डॉक्टरांना विचारुन अजून 15 दिवस घेता येतील का ते बघा. फायदा होतो.