झाली संध्याकाळ--(वीक एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 25 June, 2022 - 10:46

मी जेंव्हा सॉक्रेटिस म्हणजे सुक्रातची कहाणी वाचली तेंव्हा थोडा अस्वस्थच झालो. तो एकटा अगदी लहानपणापासून एका निर्मनुष्य बेटावर रहात होता. पूर्ण आयुष्य त्याने तेथेच व्यतीत केले. हे जरी वाचायला सोपे असले तरी कल्पना करा की किती अवघड असते असे रहाणे. आपण कधी इतरांना न बोलता जगू शकतो का? मी असेही वाचले अहे की सुक्रातला कुणीही बोलायला नसल्याने तो स्वतःही बोलू शकत नव्हता. आपली लहान मुले आपले बोलणे ऐकून स्वतः जीभ हलवून बोलायचा प्रयत्न करतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तात्पर्य, सहजीवन हे माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना पण अवश्यक असते. एक म्हण आहे ना "Man is a social animal". सर्व प्राणीमात्रांना थोड्या फार फरकाने हे लागू पडतेच. म्हणून तर मानवाने कुटुंब पध्दती निर्मिली असावी.
एकदा कुटुंब म्हंटले की त्यात वेगवेगळी नाती आलीच. मग प्रत्येक नात्याचे महत्व, आवश्यकता, रेशमी धागे वगैरे पर्यायाने निर्माण होतात. अशाने जीवन सुसाह्यही होते आणि असाह्यही होते हे नक्की! प्रत्येकाने सर्व नाती सुसह्य असतील या साठी प्रयत्नशील असायला हवे.
मी आज थोडे आईच्या नात्याबद्दल बोलणार आहे. हे जन्मापासून आपसूक तयार झालेले नाते आहे. आईचा महिमा कित्येक पोथ्या पुराणांनी वर्णन केलेला आहे. मातृ देवोभव पित्र देवोभव हेच तर दाखवते. अनेक साहित्यिकांनी पण आई या नात्याचा उदोउदो केलेला आह. ऐंशी टक्के कवींनी आपली पहिली कविता आईवरच लिहिलेली असते. हे सारे घडणे सहाजिकच आहे. असे का झाले याची कारण मिमांसा करण्याची गरज नाही.
मी ज्या घरी रहात होतो त्या घराच्या खिडकीत एका चिमणीने घरटे बनवायला सुरू केले होते. तिचे घरटे बनवण्या पासून बसून बघण्याचा छंद आम्हा उभयतांना लागला होता. हा एक आनंददायी विरंगुळाच होता म्हणा ना! तेथील हालचलीवरून आता घरट्यात काय चालू आहे याचा अंदज येत असे. आम्ही दोघे यावर चर्चाही करत असू. या विषयावर मला कविता करायची उर्मी आली. ही कविता आपल्यासाठी खाली पेश करतोय. वाचल्यानंतर ध्यानात येईल की माणूस आणि चिमणी यांच्या आयुष्य जगण्यात खूप साम्य आहे.

झाली संध्याकाळ

चोंच उघडुनी वाट पहाते
पक्षिणिचे ते बाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

बाळा चारा खाऊ घाली
खूप खूप मायेने
पाठीवरुनी हात मखमली
फिरवी ती प्रेमाने
कुशीत निजता बाळ वाटते
येवू नये सकाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

बाळाच्या खोड्या दंग्यांनी
घरटे गजबजलेले
तिला आवडे बाळ नेहमी
कानी कुजबुजलेले
कौतुक जेंव्हा बाळ खेळते
सोडुन सारा ताळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

पंख पसरुनी कसे उडावे
तिने शिकविले त्याला
आकाशाचे स्वप्न लागले
अता पडू बाळाला
उरात धडधड प्रश्न भयानक
तुटेल का ही नाळ?
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

एके दिवशी चारा घेउन
अशीच ती परतता
घरट्यामध्ये तिने पाहिली
खूप निरव शंतता
भिरभिरत्या नजरने शोधी,
मनी रक्तबंबाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

स्वतंत्र होउन बाळ उडाले
हीच जुनी ती कथा
आईच्या प्राक्तनात असते
कुरतडणारी व्यथा
एकलपणचे शल्य उरी अन्
मावळतीचा काळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users