विंबल्डनचे सेंटर कोर्ट

Submitted by पराग१२२६३ on 25 June, 2022 - 10:21

टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी.

विंबल्डन सुरू झाल्यावर काही वर्षांमध्येच स्पर्धेचा लौकीक वाढत गेला आणि त्यात सहभागी होणाऱ्या टेनिस स्पर्धकांची संख्याही वाढू लागली. साहजिकच 1877 पासून उपलब्ध असलेली कोर्ट कमी पडू लागली. त्यामुळे विंबल्डन स्पर्धेसाठी नव्या जागेची शोधाशोध सुरू झाली. नव्या जागेची निवड झाल्यावर विंबल्डनमधीलच चर्च रोड येथे नवीन कोर्ट्सचे संकुल उभारण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी ऑल इंग्लंड टेनिस असोसिएशनच्या या कोर्टच्या संकुलात स्पर्धेच्या लौकिकाला साजेसे सेंटर कोर्टही उभारण्यात आले. आज आपण जे सेंटर कोर्ट पाहतो ते हेच. 1922 पासून या नव्या संकुलात स्पर्धा भरविल्या जाऊ लागल्या. आज या संकुलात एकूण 20 कोर्ट्स आहेत. त्यांच्या मध्यभागी असलेले सेंटर कोर्ट हे त्यांच्यातील सर्वांत मानाचे आणि मुख्य कोर्ट. ब्यॉन बोर्ग, पीट सँप्रस, बोरीस बेकर, रॉजर फेडरर, नोवाक द्योकोविच, राफाएल नादाल, स्टेफी ग्राफ, मोनिका सेलेस, व्हिनस आणि सेरेना विल्यम्स यांच्याबरोबरच अनेक दिग्गज टेनिसपटूंनी हे सेंटर कोर्ट गाजविले आहे. मार्टिना नव्हरातिलोव्हाचा विंबल्डन विजेती होण्याचा विक्रमही सेंटर कोर्टने पाहिला, तर दुसऱ्या बाजूला इव्हान लेंडलसारख्या दिग्गजांना या कोर्टावर कधीच विजय मिळवता आला नाही.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विंबल्डन स्पर्धा भरविण्यात आल्या नव्हत्या. त्या काळात नाझींचे लंडनवर हवाई हल्ले सुरू झाल्यावर विंबल्डन येथील टेनिस कोर्ट त्यांच्या बॉम्बचे लक्ष्य ठरली होती. ऑक्टोबर 1940 मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सेंटर कोर्टचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महायुद्ध संपल्यानंतर विंबल्डन स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. मात्र युद्धाच्या परिणामांमुळे ब्रिटनवर प्रचंड आर्थिक ताण आला होता. त्यामुळे सेंटर कोर्टच्या पुन:उभारणीचे काम काही काळ स्थगित ठेवण्यात आले होते.

विंबल्डन ही हिरवळीवर खेळली जाणारी एकमेव ग्रँड स्लॅम आहे. त्यामुळं या संपूर्ण क्रीडासंकुलातील आसने आणि अन्य वस्तूंवरही हिरव्या रंगाचा प्रभाव पडला आहे. परंपरावादी ब्रिटनमधील विंबल्डन स्पर्धांमध्ये काळानुरुप नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार होत गेला आहे. विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर बसविलेला इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्ड हे या कोर्टाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. डॉट मॅट्रिक्सवर आधारित इलेक्ट्रॉनिक गुणफलक 1982 मध्ये बसविण्यात आला होता. मात्र ठराविक अंतराच्या पलीकडून त्या फलकावरील माहिती प्रेक्षकांना दिसण्यात अडचणी येऊ लागल्या होत्या. सेंटर कोर्टवर प्रेक्षकांसाठी आसनसंख्या वाढविल्यावर तर ही बाब प्रकर्षाने जाणवू लागली होती. अखेर 2008 पासून त्या डॉट मॅट्रिक्स फलकाची जागा नव्या तंत्रज्ञानावर आधारित एलसीडी स्कोअरबोर्डने घेतली. तसेच खेळाडूची सर्व्हिस आऊट असल्यास वाजणारा बझरही लावला गेला. त्यामुळे नेटमॅनची गरज संपली. हा बझरही सेंटर कोर्टचे आणखी एक खास वैशिष्ट्य ठरला होता.

विंबल्डन आणि पाऊस या दोघांचं एक अतूट नातं आहे. इंग्लंडच्या लहरी पावसाने चांगला रंगात आलेला सामना बंद पाडल्याचा अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे. बऱ्याचदा हा व्यक्तय दीर्घ काळ राहिल्यामुळे उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी खेळवला गेल्याचेही या सेंटर कोर्टने अनुभवले आहे. यावर उपाय म्हणून संपूर्ण सेंटर कोर्टवर पूर्ण आच्छादन घालण्याची जोरदार मागणी सर्व स्तरातून होऊ लागली होती. परंपरावादी असलेल्या ब्रिटिश व्यवस्थापनाने त्या मागणीकडे बराच काळ दुर्लक्ष केले. मात्र त्या मागणीचा जोर वाढतच गेल्याने अखेर 2006 मध्ये सेंटर कोर्टवर सरकते छत बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. ते काम 2009 मध्ये पूर्ण झाले. त्यामुळे आता रंगात आलेला सामना पावसामुळे बंद करण्याची गरज उरलेली नाही.

सेंटर कोर्टमधील अनेक गोष्टींमध्ये आजपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. या सेंटर कोर्टवर ब्रिटीश राजघराण्यातील व्यक्तींसाठी खास राखीव आसनव्यवस्था करण्यात आली आहे. अंतिम सामन्यांच्यावेळी या आसनांवर बसूनच डचेस आणि त्यांचे कुटुंबीय सामन्यांचा आनंद घेतात. त्यांच्या हस्तेच स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना सेंटर कोर्टवर चषक प्रदान करण्याचा छोटेखानी पण अतिशय शिस्तबद्ध सोहळा पार पडत असतो.
सेंटर कोर्टच्या आसनक्षमतेतही गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या सेंटर कोर्टची आसनक्षमता पंधरा हजार प्रेक्षकांची आहे.

स्पर्धेच्या प्रत्येक दिवसाचा पहिला सामना याच सेंटर कोर्टवर होतो. स्पर्धा जसजशी रंगात येऊ लागते, तसतसा टेनिसप्रेमींचा ओघ विंबल्डनकडे आणखीनच वाढू लागतो. त्यांच्यातील प्रत्येकाला तिकीट मिळणे शक्य नसते. त्यामुळे तिकीट न मिळालेल्या टेनिसप्रेमींना सेंटर कोर्टमध्ये रंगलेला सामना पाहता यावा यासाठी कोर्टच्या बाहेर मोठा टी.व्ही. स्क्रीन लावण्यात आला आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/06/blog-post_24.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती.

Wimbledon मध्ये कोणत्याही रंगाचे कपडे घालून खेळता येत नाही. पांढरे कपडेच घालावे लागतात.

पराग, तुझे हे विंबल्डनचे पोस्ट बघुन माझ्या “ ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन“. या एका जुन्या लेखाची आठ्वण झाली. त्यात सुरुवातीला लिहीलेले (थोडा बदल करुन) इथे परत टाकले तर इथे ते उचित दिसेल.

“ जून महिना म्हटले की पहिला पाउस्, शाळेचा पहिला दिवस.. नविन वर्ग, नविन वर्गशिक्षक्,नविन पाठ्यपुस्तके,नविन वह्या हे समिकरण लहानपणी जितके डोक्यात भिनले होते तितकेच जून महिना सुरु झाला म्हणजे आता विंबल्डन स्पर्धा फार काही दुर नाही हेही मला १९७५ साल उजाडेस्तव समजु लागले होते...

माझ्या टेनिसप्रेमाला कारणीभुत होणारी कोणती एक टेनिस स्पर्धा असेल तर ती म्हणजे विंबल्डन! टेनिसमधे वर्षातुन चार ग्रँड स्लॅम स्पर्धा असल्या तरी का कोण जाणे जरी ती वर्षातलि पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा असली तरी मला ऑस्ट्रेलिअन ओपन बद्दल कधीच एवढे आकर्षण वाटले नाही जेवढे फ्रेंच ओपन, विंबल्डन व यु एस ओपनबद्दल वाटले. एखाद्या सावत्र मुलासारखी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसस्पर्धा टेनिसप्रेमींच्या मनात नेहमीच उपेक्षली गेली आहे.तसेच फ्रेंच ओपन स्पर्धेतले पॅरिसचे लाल मातीचे रोलँड गॅरस व त्या स्पर्धेतले फ्रेंच पंचांनी फ्रेंच भाषेमधे उच्चारलेले पॉइंट्स व स्कोर व एकंदरीतच पॅरिसमधले ते वातावरण..... कितीही रोमँटिक वाटले... व न्युयॉर्क मधे होत असलेल्या यु एस ओपन स्पर्धेचे वातावरण.... कितीही कॅज्युअल,समरी व फेस्टिव्ह वाटले तरी... त्या स्पर्धांना विंबल्डनचे वलय नाही या मताचा मी तरी आहे.. या विंबल्डन स्पर्धेला मात्र एक वेगळेच वलय आहे.. एक वेगळीच फॉर्मॅलिटी आहे.. एक वेगळाच चार्म आहे. तो नेमका शब्दात वर्णन करणे कठीण आहे.. पण ही स्पर्धा गेली ४७ वर्षे बघताना मला तरी तसे वाटले आहे.”

अवांतरः

“ विंबल्डन ही हिरवळीवर खेळली जाणारी एकमेव ग्रँड स्लॅम आहे.”

हे जे तु म्हणालास ते आज लागु पडते. पण १९७४ पर्यंत यु एस ओपन( जी जेव्हा फॉरेस्ट हिल्स , न्युयॉर्क, इथे व्हायची) स्पर्धा सुद्धा ग्रास कोर्ट वर खेळली जायची. मग १९७५ ते १९७७ तिथे क्ले कोर्टवर स्पर्धा खेळली गेली.

मग १९७८ मधे स्पर्धा सध्याच्या फ्लशिंग मेडोज इथे हलवण्यात आली तेव्हापासुन ती हार्ड कोर्टवर होउ लागली. (अमेरिकेचा ग्रेट टेनिसपटु जिमी कॉनर्स यु एस ओपन ५ वेळा जिंकला व त्यात त्याने ही स्पर्धा तिनही प्रकारच्या कोर्ट सरफेसवर जिंकली आहे. १९७४ मधे ग्रास कोर्टवर, १९७६ मधे क्ले कोर्टवर व १९७८ च्या फ्लशिंग मेडोज मधल्या इनॉगरल स्पर्धेत हार्ड कोर्टवर! तस करणारा तो जगातला एकमेव टेनिस्पटु आहे! आणखीन त्याच्याबाबतीत वाखाणण्यसारखी बाब म्हणजे ग्राफाइट रॅकेटचा जमाना सुरु झाल्यावरही त्याने त्याच्या कारकिर्द्रीच्या शेवटपर्यंत वुडन रॅकेट सोडली नाही!)

छान लेख, जसे लॉर्डस क्रिकेटची काशी वाटत आलेय तसेच विंबल्डन टेनिसबाबत. आणि असे वाटण्यात गोर्‍यांचा मोठेपणा आणि आपला कमीपणा कधी वाटला नाही.. पीट सँप्रस सुद्धा याचसाठी आवडायचा कारण त्याने विम्बल्डन जिंकायचा सपाटा लावला होता. कदाचित तो विम्बल्डनचा हिरवा रंग डोळ्यांना सुखद वाटायचा.. हल्ली बाकी टेनिस बघणे सोडलेय..

मी कोठेतरी असे वाचले होते की विम्बल्ड्नचे सेन्टर कोर्ट हे खासगी आहे म्हणजे याचे शेअर्स आहेत व ते विकत घेता येतात. हे खरे आहे का?

मुकुंद,
<<जून महिना म्हटले की पहिला पाउस्, शाळेचा पहिला दिवस.. नविन वर्ग, नविन वर्गशिक्षक्,नविन पाठ्यपुस्तके,नविन वह्या..... >>>
<<फ्रेंच ओपन स्पर्धेतले पॅरिसचे लाल मातीचे रोलँड गॅरस व त्या स्पर्धेतले फ्रेंच पंचांनी फ्रेंच भाषेमधे उच्चारलेले पॉइंट्स व स्कोर व एकंदरीतच पॅरिसमधले ते वातावरण.....>>>

अगदी माझ्याही मनातल्या भावना लिहिल्याबद्दल धन्यवाद!!