चिरकुट मुलगी -1 आणि 2

Submitted by केशवकूल on 16 June, 2022 - 12:38

चिरकुट मुलगी
राजकुमारी वेणू ह्यांच्या कृपेने श्री केशव कुलकर्णी(माननीय सदस्य “भारत इतिहास संशोधन मंडळ” पुणे) ह्यांची विविचे(विचित्र विश्व) “दरबारी इतिहासकार” म्हणून नेमणूक झाली. विचित्र विश्वची समग्र बखर लिहायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. राजकुमारीच्या आदेशानुसार श्री भागो ह्यांनी विविच्या चित्र विचित्र लोकांबद्दल, तिथल्या जादूगिरीबद्दल सहा खंडात अनेक कथा (खर तर जसे घडले तसे) लिहिल्या. पुण्याच्या काही छिद्रान्वेशी इतिहासतज्ञांनी त्या परीकथा आहेत अशी भलावणी करून त्यांना उडवून लावल्या. “परीकथा म्हणजे इतिहास नव्हे” “सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे” “ह्या कथा लहान मुलांसाठी म्हणून ठीSSSSSक आहेत.” असा सूर लावला. काहीही असो पण तमाम महाराष्ट्राच्या विशेषतः पुण्याच्या बालचमूच्या हृदयात ह्या कथांनी प्रेमाचे स्थान पटकावले. “हरी पुत्तर” च्या कथा नंतर विविच्या कथांनी बालमनावर अशी भुरळ टाकली. एक गमतीची गोष्ट सांगतो कि मोठे बापे आणि काकू आजी हे पण ह्या कथा चुपचाप गुपचूप वाचतात. पण चार चौघात हे मान्य करायची त्यांची तयारी नसते.
पुण्यात झालेल्या वादावादीची बातमी अखेर विविच्या महाराणी बाईसाहेबापर्यंत पोहोचली. पुणे काय चीज आहे हे बिचाऱ्या राणीसाहेबांना कसं माहित असणार? राणीसाहेबांचा मूड खराब झाला. दरबारीजनांनी राणीसाहेबांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला कि पुण्याच्या असल्या उचापतींकडे पुण्याच्या एक दोन पेठातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक सोडले तर इतरेजनांचे लक्ष नसते. पुण्याचे लोक घराघरातून सॉफ्टवेअरच्या कॉप्यूटर भट्ट्या लावण्यात पटाईत म्हणून जगप्रसिद्ध आहेत. ते आपल्या कामात रात्रंदिवस बिझी असतात. ते असल्या गोष्टीत काय म्हणून लक्ष घालतील? तर त्याकडे इग्नोरास्त्र वापरणे उचित. इत्यादी इत्यादी.
पण नाही. राणीसाहेबांनी मग जादू करून विवि अदृश्य करून टाकले. जगाचा विवीशी असणारा संपर्क तोडून टाकला. विवीची नाकेबंदी करून टाकली. पूर्वी एकदा जगात कोविड साथ आली होती तेव्हाही अशीच नाकेबंदी करण्यात आली होती. विवि जगाच्या नकाशावरून, गुगल मॅपवरून देखील गायब झाले. केकूचा विविशी संपर्क तुटला. त्याला ते तरी काय करणार? पुढच्या गोष्टी कशा लिहिणार? त्यांनाही काही सुचेना.
आपल्याला विविच्या कथा वाचायला मिळणार नाहीत हे समजल्यावर लहान मुले निराश झाली. मोठी माणसे गुपचूप निराश झाली. ओफिसांत बॅासशी किंवा सहकाऱ्यांबरोबर खटखट झाली किंवा स्वत्वाला कुत्रे चावले तर किंवा इतर तत्सम अश्या गोष्टींनी क्षुब्ध झालेल्या मनाला उतारा म्हणून मोठी माणसे विविच्या कथा वाचत असतात. त्यांनी आता काय करावे? ट्विटरवर एकाने सुचवले कि चला आपण भागोवर इमेलचा मारा करूया. त्याच एकाने मेलचा मजकूर बनवून दिला. मग काय इमेल फुक्कट असल्याने सर्वांनी कॉपी पेस्ट करून भागोला धडाधड धाडून दिल्या. बिचाऱ्या भागोची इमेल पेटी दुथडी भरून वाहू लागली.
एका हुशार मुलीने मात्र चाकोरीबाहेर जाऊन विचार केला. परिस्थितीवर मात करण्याची युक्ति शोधून काढली.
(अवांतर---- “एका हुशार मुलीने” ?----मी तुम्हाला सांगतो, खरोखर मुली खूप हुशार असतात हो. लॉंग हेअर, शॉर्ट ब्रेन अशी हिणवणी करणाऱ्या लोकांनी हे ध्यानात ठेवायला पाहिजे). असो.
तिने लिहिले, “मत्प्रिय केकूजी, का नाही आपण राजकुमारीशी मोबाईलवर संपर्क करू शकत? मोबाईलच्या अति तीव्र लहरी विविच्या सुरक्षाकवचाला भेदू शकतील अस माझे मन मला सांगतेय. नाही म्हणू नका. प्रयत्न करायला काय हरकत आहे? केकूजी, बी+!”
भागोनेही प्रयत्न करायचे ठरवले. आणि अहो आश्चर्यम्! फोन लागला! राजकुमारी वेणूशी गप्पागोष्टी झाल्या. परिणामस्वरूप केकूने ही “चिरकुट मुलगी” कथा लिहिली.
(खर पाहीलेतर VHF, UHF. X-RAY. GAMA-RAY, COSMIC-RAY विविच्या सुरक्षाकवचाला भेदू शकत नाहीत. सुरक्षाकवच भेदले गेले ते मुलांच्या इच्छाशक्तीमुळे. त्यामुळेच केवळ केकू आणि राजकुमारी ह्यांच्यात संपर्क होऊ शकला. त्यामुळेच विविच्या महाराणी बाईसाहेबांचे हृदयपरिवर्तन झाले व त्यांनी हे वन टाईम एक्सेप्शन सूट दिली. फक्त केकू आणि राजकुमारीसाठी.)
तुम्हाला आश्चर्य वाटेल की राणीसाहेबांना हे समजले तरी कसं? उत्तर अगदी सोप्प आहे. राणीसाहेबांच्या महालात एक मोठ्ठं रजिस्टर आहे. त्यात जगात घडणाऱ्या घटनांची नोंद केली जाते. जसं आपल्या हृदयाच्या जरा डाव्या बाजूला चित्रगुप्त बसलेला असतो. तो आपल्या चांगल्या वाईटाची नोंद करत असतो. विचित्र विश्वचे इंजिनिअर ह्याला distributed processing असं म्हणतात. विवीच्या पद्धतीला ते central processing पद्धत म्हणतात. इकडे राणीसाहेब दररोज सकाळी ह्या नोंदी स्वतः बघतात. विचित्र विश्वावर येणाऱ्या संकटांची चाहूल त्यांना आधीच लागते. त्यावर उपाययोजना करायला मग सोपं पडतं.
ते पहा. पुण्याच्या त्या बैलोबा बबडूने फुलपाखराचे पंख उपटून टाकले. झाली त्याची नोंद इकडे. आता बबडूला विविचा व्हिसा कधीच मिळणार नाहीये. त्याचे नाव काळ्या यादीत गेले आहे. आता मी हे लिहितो आहे आणि तुम्ही ते वाचाल, बरा वाईट प्रतिसाद द्याल. हे सगळे त्या रजिस्टरमध्ये नोंदले जाणार आहे ह्याची जाणीव ठेवा.
हे एवढे नमन पुरे आहे. अस नको व्हायला की नमनालाच घडाभर तेल,

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
“अंकलकाका, लोणी कुठाय?” जोजोने विचारले. अंकलकाका बंद खिडकीतून दूरवर बघत होते. बंद खिडकीतून त्यांना काय दिसत होते ते त्यांचे त्यांनाच माहित. अंकलकाकांच्या विचित्र वागणुकीचा जोजोवर काही परिणाम होत नसे. अंकलकाकांनी आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळली आणि ते उद्गारले, “संपलं.”
“लोणी संपल? मग आता काय? निदान जाम तरी असेल? लोणी नाय तर नाय जाम बरोबर खाऊया.”
जोजो स्टुलावर चढून फडताळं तपासात म्हणाला.
“नाही.” अंकलकाका त्याच निरिच्छ आवाजात बोलले.
“जाम सुद्धा नाही? लोणी नाही, जाम नाही, केक नाही, जेली नाही, सफरचंद? तेही नाही. फक्त ब्रेड आहे. नशीब.
“संपल.” अंकलकाका दाढी कुरवाळत बोलले. त्यांनी खिडकी उघडली. कुठल्यातरी अनोळख्या स्पेस-टाईम मधे ते गुंगले होते.
जोजो बिचारा सुका ब्रेड खात बसला.
“आपल्या अंगणात फक्त ब्रेडचे झाड आहे. त्या झाडावर आता केवळ दोन ब्रेड उरले आहेत. ते पिकायला वेळ आहे, अंका, आपण गरीब का आहोत? ब्रेड आहे तर लोणी नाही. लोणी असेल तर जाम नाही. लोणी आणि जाम असेल तर ब्रेड नाही. आयुष्य अस पार्ट बाय पार्ट जगायचे असतं? ब्रेड, लोणी, जाम, सफरचंद असं एकत्र आपण शेवटचे केव्हा खाल्लं? आठवतेय?”
“नाही.”
“नाही ना. मी सांगतो.” जोजोने आठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याही आठवणी धूसर झाल्या होत्या.
जोजोच सगळी बडबड करायचा कारण अंकलकाका जSSरा कमीच बोलत असत. अंकलकाकांनी धीर गंभीर नजरेने आपल्या छोट्या पुतण्याकडे नजर टाकली. अंकलकाकांच्या नजरेत एकच भाव होता. तो म्हणजे धीर गंभीर! जोजोने त्यांना कधी हसलेल्रं किंवा रागावलेले बघितलं नव्हतं. त्याच्यात भर म्हणून कि काय ते अगदी जरुरी असेल तरच बोलत आणि ते देखील एखादा शब्द. जोजोला इतक्या दिवसाच्या सहवासाने अंकाच्या मनात काय आहे याच अंदाज त्या एका शब्दाने येत असे.
जोजोचं नाव जोजो कसं पडलं? लहानपणी (म्हणजे जोजोच्या लहानपणी) जोजो लहान होता. लहान असला तरी जोजोला रात्री लवकर झोप येत नसे. अंका त्याला काऊ चिऊच्या गोष्टी सांगत. पण जोजो झोपायच्या ऐवजी अंकाच स्वतःच्या गोष्टी ऐकत ऐकत झोपी जात! अंकांना स्वतःचे बालपण आठवलं. त्यांची आई त्यांना अंगाई गीत गात असे. आहा. अंकांनी पण जोजोला अंगाई गीत “गाऊन” झोपवायचं ठरवलं.
“बाळा जो जो रे, बाळा जो जो रे
पापणिच्या पंखांत झोपु दे डोळ्यांची पाखरे
झोपी गेल्या चिमण्या राघू
चिमण्या राजा नकोस जागू
हिरव्या पानांवरी झोपली वेलींची लेकरे....”
हे गीत ऐकल्यावर जोजोच्या डोक्यात प्रकाश पडला. हे तर अंगाई गीत आहे. आता तर झोपायलाच पाहिजे. इलाज नाही. जोजोला गाढ झोप आली.
त्या दिवसापासून अंकलकाका जोजोला जोजो म्हणू लागले.
असो.
“अंका, सांगा मला. आपण एवढे गरीब का आहोत?” जोजोने पुन्हा विचारले.
“नाही.”
“नाही कसे? काय आहे आपल्याकडे?”
“घर.”
“घर? घराचे काय विशेष. विचित्र विश्वात प्रत्येकाचे स्वतःचे घर आहे. आणखी काय?”
“ब्रेड.”
“मी खातोय हा शेवटचा पिकलेला ब्रेडचा तुकडा आहे. ह्या अर्ध्याचा अर्धा मी तुमच्यासाठी टेबलावर ठेवला आहे. भूक लागेल तेव्हा खा. तो चतकोर संपला कि मग आपण काय खाणार? विवि मध्ये कोणी उपाशी राहत नाही. माहिती आहे. विवि मध्ये फळा फुलांची रेलचेल आहे. हे ही माहिती आहे. पण आपण जिथे राहतो तेथे नाही. जिथं सुबत्ता आहे तिथं आपल्याला जायला पाहिजे.”
“कुठं?”
“अंका, मी लहानपणापासून इथच राहिलो आहे. आपण विवि कडे प्रस्थान ठेवायला पाहिजे. दक्षिणेला तो डोंगर आहे तिथं हतोडे राक्षस राहतात. ते कुणालाही तिकडून जाऊ देत नाहीत. उत्तरेचा डोंगर तर निर्मनुष्य आहे...”
“एक.”
“काय एक? हो खरच की. मी पण ऐकलं आहे कि तिकडं एक फॅमिली रहाते. तुम्ही वर्षापूर्वी मला सांगितलं होतं. जादुगार डॉक्टर अष्टावक्र आणि त्यांची बायको. बरोबर? पहा अंका, तुम्ही एका वर्षात जेव्हढी माहिती दिली तेव्हढी मी तुम्हाला एका मिनिटात दिली. ते दोघेजण त्या डोंगरावर रहातात. त्या डोंगराच्या पल्याड विविची सुबत्ता असताना आपण दोघेजण या भयाण अरण्यात का वस्ती करून राहिलोय?”
“खरय.”
“काका, चला तर आपण उद्याच तिकडे जायला निघू. तेच तेच बघून मला मरणाचा कंटाळा आला आहे. काहीतरी नवं बघायला मिळेल. जिकडं आपले दाणा पाणी आहे तिकडं आपण जायला पाहिजे. हे पक्ष्यांना पण समजते. सुबत्ता आपल्याकडे येत नाही तर आपण तिच्याकडे जायला पाहिजे. नाही का?”
अंकलनी उत्तर दिले नाही. त्यांचे मन दुसऱ्याच जगात विहार करत होते. अंकलनी बंद खिडकी घट्ट बंद केली. सूर्य मावळतीवर झुकला होता. संध्याछाया झाडांच्या शेंड्यांवर रेंगाळत होत्या. हवेत थोडा गारवा जाणवत होता.
जोजोने शेगडी पेटवली.
अंकल आणि जोजो आपल्या विचारात गुंग झाले होते.
बरीच रात्र झाली. जोजो अंकलकाकांना म्हणाला, “काका, उरलासुरला ब्रेडचा चतकोर खाऊन घ्या आणि आपण
झोपूया.”
“हं.”
पण अंकलनी ब्रेड खाल्ला नाही. छोटा जोजो केव्हाचा झोपी गेला. अंकल मात्र शेगडीच्या उबेत विचार करत करत केव्हा झोपेच्या आधीन झाले ते फक्त सळसळणार्या जंगलालाच माहित.
(क्रमशः)
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
Frank Baum ह्यांच्या Patchwork Girl ह्या कथेचे स्वैर, मनसोक्त, मनःपूतम् मराठी रुपांतर.

(चित्र विचित्र कथांसाठी माझा ब्लॉग इथे आहे.)
(https://iammspd.blogspot.com)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users