वेगळा भाग - १४

Submitted by निशा राकेश on 11 June, 2022 - 07:11

मालकिणीला बघून बाबु भानावर आला आणि आपण काय चूक करून बसलो हे त्याच्या लक्षात आल , पण आता वेळ निघून गेली होती , कारण तो आता तिच्या समोरून पळूनही जाऊ शकत न्हवता.

“कोण मांगता” मालकिणीने त्याला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत विचारल.

बाबूच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटत न्हवते.

“अरे बाबा , कोण मांगता तुमको“मालकीण आणखीनच चिडली.

“ब ...ब...ब.....” बाबु भांबावल्या सारखा झाला होता ,

आणि तेवढ्यात आतून बायडाच बाहेर आली , बाबुला बघून ती देखील चापापली , पण तिने परिस्थिती क्षणार्धात सावरून घेतली.

“ अर...तू , तू इथ कुठ, शंकर्या परत आला का दारू पिऊन, तमाशा केला त्यान परत” बोलता बोलता बायडा ने बाबुला डोळा मारला.

बाबुला तरीही पुढे काही बोलता येईना .

“आंटी शंकर्या , माझा थोरला भाऊ , तो काल रात्री पुन्यांदा दारू पिऊन आला आणि त्याने लय तमाशा केला ”

आणि बाबू कडे मोठे डोळे करून “बोल काहीतरी” अस तोंड्यातल्या पुटपुटली.

“हो हो .. तेच , तेच सांगायला आलोय मी , तो आलाय घरात पुन्हा पिऊन , “ बाबू ने सारवासारव केली.

“लेकीन तुम कोण है इसका”

झाली का आता पंचाईत , आता काय सांगायचं.

“माया घराशेजारी राहतो आंटी हा , ह्याच नाव राम “

बायडाच्या तोंडून त्याच पहिल्यांदा निघालेलं त्याच नाव ऐकून त्याला खूप छान वाटल , आणि तो तिच्या कडे एकटक पाहू लागला .

“ तो , तुम अभी घर जायेगा“

“काय करणार जाव लागल, मी येती ना लगीचच , जावू न्हव.”

आंटी ने पुन्हा एकदा दोघांकड आळीपाळीने पाहिलं , “अभी जाव , लेकीन ये लडका , कल दुपेरको इधर वापस आनेका मिलने का मुझे, आयेगा ना “

बाबू ने नकळत मान डोलावली,

“येती हा मी आंटी” अस म्हणून तिने बाबुला बाहेच्या बाजूला जवळ जवळ ढकलल आणि ते दोघ फाटक उघडून बाहेर पडले.

बाबू ने मागे वळून पाहिलं तर मालकीण अजूनही त्याच्या कडे पाहत उभी होती .

“आता माग कश्यापायी पाहतोयस “

“अग, ती बघतेय ना अजून पण आपल्याकडे”

“व्हय, ठाव हाय मला , चल तू “

दोघ लांब जाऊन एका झाडाखाली पारावर जाऊन बसले.

“कसली धीट आहेस तू, त्या आंटी समोर माझी तर बोबडीच वळली होती”

“मंग, कुणालातरी धीट व्हावच लागल ना , “

बाबू खट्टू झाला , “ हो हो माहितीये, आता मला नाही येत खोट बोलता त्यात माझा काय दोष”

“अर तसं न्हवं, पण येळ काय सांगून येती का , तवा कांदितरी बोलायला लागत, बर ते मरू दे , तू कसकाय आलास बंगल्यावर”

बाबूने काल रात्री चंदू सोबत घडलेला सर्व प्रकार बायडाला सांगितला.

“तू नग, काळजी करूस , हुईल समंद नीट, मी हाय ना”

बाबू ने अत्यंत प्रेमाने तिच्याकडे पाहिलं , आणि तो पुढे काही बोलणार तेवढ्यात

“मी तुला टेकडीवर भेटती सांच्याला, आता लय येळ झाला डिसुझा आंटी चिडल मायावर”

बाबूला खरतर ती आणखीन थोड्यावेळ थांबावी अस वाटत होत , पण आंटीच नाव घेतल्या मुळे तो परत काळजीत पडला.

“तिने मला उद्या का बोलावलं असेल, “

“आता मला तरी काय ठाव, पण य तू , न्हाय आलास तर ती तुला शोधत आपल्या वस्तीवर बी ईल, लय चिवट हाय म्हतारी “

“काय , अग पण का , तिला काही संशय तर नाही न आला आपला”

“आता ते उद्याच कळल , चल येती मी, तू जपून जा घरी, आणि जास्त इचार नको करूस , “

बायडा झपझप चालत निघून गेली ,

बाबू जेव्हा घरी आला तेव्हा चंदू काही घरी न्हवता , पण दादा मात्र आज लौकर घरी आले असावे , कारण ते खाटेवर झोपले होते.

आईला विचारल्यावर ते आज घरीच होते कामावर गेलेच नाही अस त्याला समजल, काल झालेल्या प्रकारामुळे दादा देखील चंदूच्या प्रचंड काळजीत होते .

बाबू मग हाताला लागेल ते पुस्तक घेऊन दत्त मंदिरात गेला , पण त्याच लक्ष काही पुस्तकात लागेना , डोळ्यासमोरून अक्षर फिरू लागली , त्याने तसच पुस्तक उशाशी घेतलं आणि तो तिथेच आडवा झाला .

इतक्या कमी वयात नकळत आलेली कुटुंबाची जबाबदारी , आणि सोबतच त्यातल्या त्यात सुखाची झुळूक म्हणजे त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असेलेली बायडा, दोघाच एकमेकानवर असलेल निस्वार्थी प्रेम , त्यात कुठे ही हपापले पण न्हवत, होती ती फक्त सोबतीची गरज , कोणीतरी आपल्यासाठी आणि फक्त आपल्यासाठीच आहे ह्याची खात्री.

बायडा सोबत घालवलेले ते मखमली क्षण आठवतच त्याला झोप लागली.

आणि अचानक त्याच्या उश्या खालच पुस्तक कोणीतरी खसकन खेचून घेतलं आणि तेच त्याच्या तोडांवर मारलं,

बाबू धडपतच उठला तर समोर अशोक उभा होता ,

“अशक्या , मुर्खा, हि काय पध्द्त झाली का उठवायची “

“बाब्या , बावळटा हि काय जागा आहे का झोपायची “

“अरे , पडलो होतो असाच , पण तुझ्या सारखा मित्र असेल, तर कसली झोप आणि कसलं काय”

“ काय झाल , का असा इथे झोपलायस आणि काय कुठवर आली तुमची प्रेम कहाणी , सिनेमाला घेऊन गेलेलास ना , त्यानंतर कुठे गायब झालास रे”

“ अरे नाही पहिला सिनेमा , विसरून गेलो मी सिनेमाला जायचं , ती बिचारी एकटीच गुंजनला उभी होती खूप वेळ माझी वाट बघत”

“तुझ्या पुढे तर बाबा त्या परमेश्वरा ने देखील हात टेकले, किती दुर्दैवी आहेस रे तू , समोर सजवलेलं ताट आहे सुग्रास जेवण आहे आणि तु , तू जेवायचा विसरतोस “

“अशक्या फार बोलतोयस हा तू , सजवलेलं ताट वैगेरे काय , माझ प्रेम आहे तिच्यावर , हे बघ मला सगळ कळत , पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते , कधीही केव्हाही उठून काहीही करायचं नसत”

“तू तर कधीच काहीच करत नाहीस , ती कंटाळेल अश्याने तुला”

“बास अशोक, आमच आम्ही पाहून घेऊ,”

“ बस बोंबलत , ती सोडून गेली ना मग येशील माझ्या कडे रडत”

अशोक रागारागाने पाय आपटत निघून गेला , बाबू देखील मग दत्तमहाराजांना आठवनीने नमस्कार करून मग त्याच्या घरी जायला वळला.

मालकिणीला भेटण्यासाठी आज बाबू बर्यापैकी कपडे घालून बंगल्यावर पोहोचला,

आंटीनेच दार उघडल , बंगल्याच्या आत येताच तो इकडे तिकडे पाहू लागला, त्याला बायडा काही दिसली नाही.

“ वो आज नाही आया काम पे , मैने छुट्टी दिया उसको “ बाबू ने काहीही न विचारता आंटीनेच उत्तर दिल.

“आज सुट्टी दिली , मला बोलली कशी नाही बायडी “ बाबूने मनातल्या मनात बायडाला बडबड केली.

“और मैने हि मना किया था उसको तुझे कुछ ना कहे, मुझे तेरे अकेले से बात करनी था”

“काय , काय बोलायचं होत “ बाबू मनातल्या मनात थोडा घाबरला.

“तुम बायो से प्यार करता है क्या “ आंटीने तडक मुद्द्यालाच हात घातला.

“नाही, म्हणजे हो , म्हणजे आमच्यात तसं काही “ बाबू शब्द शोधू लागला.

“ये लडका, सीधे सीधे जवाब दे , प्यार करता है या नही”

“होय, आमच आहे एकमेकांवर प्रेम , पण तुम्हाला हे कस कळल आंटी, बायडा काही बोलली का तुम्हाला”

“ये बाल है ना , धूप मी सफेद नही हुवा मेरा , तू कल इधर आया था ना , तभी मी समज गयी”

बाबू ने खाली मान घातली .

“ये लडकी के तऱ्हा क्या शरमाता है, देख बायो को मे पाच साल से जानती, उसके घर के वो कामचोर मर्द सिर्फ उनको पाल रही है वो , तू सच मे प्यार करता है ना, शादी करेगा ना”

“आंटी अजून मी खूप लहान आहे , मला नोकरी पण कमी पगाराची आहे पण मी खूप मेहनत करीन , आणखीन चांगली नोकरी शोधीन”

“कितना है तेरा पगार”

“६०० महिना “

“मेरे दारू का गल्ला संभालेगा १५०० दूंगी महिनेका “

“दारू चा गल्ला , नको नको माझ्या आईला ते आवडणार नाही”

“अरे व्वा , मा का इतना खयाल राखता है , अच्छा लडका है तू , एक बात मेरी सून ले , बायो को अगर तु छोड के गया ना , तो देख लेना मुझसे बुरा कोई नही होगा”

“आंटी ,अस नका बोलू आम्ही दोघे हि आयुष्यभर राहू एकमेकांसोबत “

“बाते तो बडी अच्छी करता है , पढा लिखा लागता है “

“हो मला पुढे शिकायचं देखील आहे अजून “

“तो कब सिखेगा , कभी नोकरी धुन्डेगा, उसके बाप ने उसकी शादी तय करने के बाद”

“तसं नाही आंटी , माझे प्रयत्न चालू आहे “

“सिनेमा दिखाने लेके जाता होगा ना, उसमे टाइम खोटी करता होगा”

“नाही आंटी, देवा शप्पत अजून एकदा पण गेलो नाही आम्ही सिनेमाला “

“ क्या बात कर रहा है , उसको एक बार भी नही लेके गया सिनेमा दिखाने”

बाबू ने फक्त नाही म्हणून मान हलवली , आणि खाली जमिनी कडे पाहू लागला .

“तुझे सीधासाधा कहु, या लंगुर कहु, देख भाई राम, मुझे तो तेरा कुछ भी समझ नाही आ रहा है , प्यार करता है , तो जताना भी जरूरी होता है , नही तो उसको लगेगा कि तुझे उसकी पर्वा हि नही है, उसको कही घुमने लेके जा , उसके साथ थोडा वक्त बिता , उसकी भी कुछ जरूरते होंगी, वो तुझे सब नही बतायेगी, लडकी है वो, तुझे हि पेहेल करनी होगी”

बाबू ला पुढे काय बोलाव हे सुचेना , कळत तर होत त्याला पण आता त्याला ह्या विषयावर बायडाशी स्पष्ट पणे बोलायचं होत.

आंटी कडून निघाल्या नंतर आधी त्याने सिनेमा ची आजच्याच संध्याकाळच्या शो शी तिकीट काढली.

आंटीनेच परमिश दिल्यामुळे दोघे बिन्दास्त सिनेमाला गेले , आप आपली जागा शोधून खुर्च्यांवर बसले , आधी अंधार झाला आणि सिनेमा मग सुरु झाला , बायडाची तिथे येण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे ती फक्त इकडे तिकडे पाहू लागली , आणि बाबूच्या डोक्यात मात्र आंटीने सांगितल्याप्रमाणे प्रमाणे विचारचक्र सुरु होत , “प्यार करता है , तो जताना भी जरूरी होता है , नही तो उसको लगेगा कि तुझे उसकी पर्वा हि नही है” तिचे शब्द त्याच्या कानात फिरत होते , पण काय करू मी नक्की त्याला त्याने सिनेमात पाहिलेली चुंबन दृश्य आठवत होती पण सुरु कस करायचं हे माहितीच न्हवत ,आणि संध्याकाळचा शो असल्यामुळे जास्त नसली तरी थोडी फार माणस त्याच्या आसपास होतीच , त्यांची देखील त्याला प्रचंड भीती वाटत होती , कोणी पाहिलं तर , बाबू अचानक उठला आणि जायला निघाला.

“आर, कुठ जातुयास आता ”

बाबू ने करंगळी दाखवली आणि आलोच असा इशारा केला , थोड पुढे जाऊन खाली पायऱ्या उतरणार तेवढ्यात त्याच लक्ष कोपर्यातला एका जोडप्याकडे गेल , तो दोघ एकमेकांच चुंबन घेत होत , अगदी हरवून गेल्यासारखे, तो पटापट पायऱ्या उतरून खाली आला , पोटातली टाकी रिकामी करून वर येताना काहीतरी मनाशी ठरवून तो पायऱ्या चढून तिच्या पाशी येऊन बसला.

दोन तीन मिनिट जाऊ दिली आणि अचानक तिचा चेहरा स्वता: कडे ओढून त्याने तीच चुंबन घेतलं.

दोन सेकेंद देखील झाली नसतील आणि “थू थू थू.थू “ तो खाली थुंकू लागला .

बायडा तोंड बारीक करून त्याच्या कडे पाहू लागली आणि त्याला म्हणाली.

“बोलायचं तरी आधी, नसती खाल्ली मी तंबाखू “

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त
थोड़े मोठे भाग येउद्या की

अरेरे आयुष्यातील पहिला अनुभव आणि असा विचका, पण कथेतील पात्रांच्या स्वभावाला अनुसरूनच प्रसंग आहे
आशा आहे की एवढ्याशा प्रसंगावरून त्यांच्यात दुरावा येणार नाही
कथा खूप छान चालू आहे
पुढे ह्या मुलांचं काय होणार ही उत्कंठा अजूनही कायम आहे