कृतकृत्य

Submitted by सामो on 7 June, 2022 - 01:45

तरुणाई होय तरुणाईच्च , तारुण्य म्हणायचं नाहीये मला. तर तरुणाई आणि थेरडेशाहीतला फरक काय? तरुणाईत कानशिलं सणसणुन तापतात. थेरडेशाहीत कान फक्त चष्म्याच्या काड्या सांभाळण्याकरता असतात. माणुस भयंकर दुरगामी वगैरे विचार करु लागला आणि वर्तमानाची वाट लावु लागला की समजावं म्हातारपण जवळ येऊ घातले आहे.
नाही होतं ना दबक्या चोरपावलांनी म्हातारपण आयुष्यात शिरकाव करते. पहील्यंदा तर पत्ताच लागत नाही भेंडी! माणसाला वाटतं वयानुरुप शहाणपण येतय. आपण आयुष्य आखतोय. पगार हाती पडला की मित्रांबरोबर सुसाट बाईकवर, गोव्याला निघण्याऐवजी, घराचे हप्ते भरण्याची स्वप्नं पडू लागली की समजावं येणार स्थैर्य येणार.
पण खरं सांगा - जगलात का हो तुम्ही आयुष्य? कधी आवर्जुन, अविचाराने, भिजलात तुम्ही मुसळधार पावसात? गच्चीवर आवेगाने , जगाचे भान विसरून रंगवलात कधी प्रणय? पायांना वाट फुटेल तिकडे मैलोनमैल भटकलात मैत्रिणीबरोबर, मित्राबरोबर? गप्पांकरता पडले तुम्हाला दिवसचे दिवस कमी? बरं एखाद्या मोर्च्यात , चळवळीत सक्रिय सहभाग तरी?

मानलं तुम्हाला - तुम्ही पैल्यांदा गब्बर पदवी मिळवलीत आणि आयुष्यातल्या महत्त्वाच्या जोमदार वर्षांची आहुती टाकुन आईवडीलांना खूष केलत. नंतर मग ईमानेतबारे नोकरी हापिसात बॅासची आणि घरात बायकामुलांची ताबेदारी. हां मधेमधे सोशल ड्रिंकिंग, क्वचित भीतभीत माफक फ्लर्टिंग केलत नाही म्हणायला. पण अगदी किरकोळ, झेपेल इतकच. अहो मध्यमवर्गीय तुमच्या तोंडात करकचून शिवीपण आली तर घाबरुन ‘भेंडी’ आणि ‘आईची जय’ झाली. बाकी मुलाबाळांना मार्गी लावलत तुम्ही. अहो तुमच्या संदीपला ईंटर्नशिपकरता तुमचाच तगडा वशिला नाही का कामात आला! आता इतकी वरषं मानेवर खडा ठेऊन काम केलत, वट आहे तुमची. बाकी भविष्याची तजविज उत्तम केलीत हो. पावसाळयात मान्सून येण्यापूर्वीच , माळ्यावरुन छत्री काढुन तयारी नेहमीच असायची तुमची. अरे हो तोंडी लावण्यापुरतं अध्यात्मही ठेवलत कडोसरीला हो उगाच स्वर्गात लोकांन खरच पाठवत असतील तर आपलीच पंचाईत नको. तसे दूरदर्शी तुम्ही अगदी अगोदरपासूनच.
कृतकृत्य वाटत असेल नाही तुम्हाला. पण खरच जगलात का तुम्ही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो तुमच्या संदीपला ईंटर्नशिपकरता तुमचाच तगडा वशिला नाही का कामात आला!>> आता संदीपला पण तेच करायला लावतोय..

छान लिहिले आहे.
असे विचार वाचून जर आपण स्वत:शीच हा यांर म्हणून भूतकाळात रमू लागलो की समजावे प्रौढत्व आले आहे Happy
काल की परवाच मी एका मैत्रीणीशी चॅटवर गप्पा मारताना तिला माझे जुने किस्से सांगत होतो तेव्हा हेच तिला म्हणालेलो. फर्स्ट जॉबपर्यंत मी कसले वेड्यासारखे जगत होतो. त्यानंतर सेकंड जॉब पासून कॉर्पोरेट लाईफ आणि लगेचच झालेले लग्न, संसाराची जबाबदारी यांनी बदलूनच टाकले.
आता काही जगाची पर्वा न करता वेडेपणा करावासा वाटतो ते सोशलमिडीयाच्या अनोळखी जगात..
हि दोन्ही आपलीच रुपे असतात. एकावर दुसरा मुखवटा नसतो. पण कश्या प्रकारे जगावे हे निवडता यायला हवे. जेणेकरून पुढे जाऊन कसला पश्चाताप करायची वेळ येऊ नये.

बेधुंद, बेफाट, पुढचा मागचा विचार न करता भावनेच्या क्षणिक मोहाने कृती करणे..म्हणजे "चांगले" असे कोणी कवीने/लेखकाने म्हणाल्यामुळे "ते भारी" ही फॅशन झाली आहे !

हि दोन्ही आपलीच रुपे असतात. एकावर दुसरा मुखवटा नसतो. पण कश्या प्रकारे जगावे हे निवडता यायला हवे. जेणेकरून पुढे जाऊन कसला पश्चाताप करायची वेळ येऊ नये. >> +११

ज्या वयात जे करायचं, ते केलं/करता आलं की कसलेच रीग्रेट्स रहात नाही. थोडं मुलांच्या जबाबदारीतून सुटवंग (काहींसाठी हे मुलं शाळेत जायला लागली तर होतं तर काहींसाठी मुलांचे लग्न झाले तरी होत नाही) झाल्यावर तर प्रत्येकाने स्वतःच्या नोकरीशिवाय/घराशिवाय स्वतःला गुंतवणं आवश्यक आहे.

भारी लिहिलयं सामो..
तुझ्या नेहमीच्या लेखांपेक्षा वेगळा लेख
आवडला लेख...!

नक्की कसे जगले म्हणजे जगलो म्हणता येते? आणि कसे जगलो म्हणजे जगलोच नाही असे म्हणता येते?
जगलो म्हणता येण्याची अशी कोणती परिमाणे आहेत? आणि ती कुणी ठरवली? त्याला जगन्मान्यता कशी मिळाली?

नाही बुवा, कधी आवर्जुन, अविचाराने मुसळधार पावसात भिजलो नाही, जगाचं भान विसरून प्रणय रंगवला नाही, पायाना वाट फुटेल तिकडे मैलोनमैल भटकलो नाही मित्र-मैत्रिणींबरोबर, अहोरात्र गप्पाष्टकं काही नाही रंगवली आणि मोर्चा / चळवळ वगैरे तर विसरूनच जा. पण
आयुष्य जगलो का विचाराल तर YESSS... ABSOLUTELY!!