दुर्लक्षित--- (वीक   एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 28 May, 2022 - 10:06

दुर्लक्षित--- (वीक   एंड लिखाण)

आज एक खूपच जुना मित्र अनाचकपणे भेटला. सहाजिकच दोघांनाही खूप आनंद झाला. जुन्या कैक गोष्टी आठवत गेल्या. वर्तमानाकडून भूतकाळाकडे प्रवास केला आणि भूतकाळात जणू दोघेही आज विसरूनच गेलो. बर्‍याच वेळ हा बॅकवर्ड प्रवास झाल्यानंतर आम्ही एकमेकाचा निरोप घेतला. तो गेल्यानंतर रात्री मी अंथरुणावर पाठ टेकली पण झोप येता येत नव्हती. भूतकाळ सारखा दिसत होता. कोणत्या आठवणी केंव्हा याव्यात यास कांही कारण नसते.
मी , हा मित्र आणि अजून कांही मित्र एकदा  एका स्पॉटला सकाळी जाऊन सायंकाळी परत आलो होतो. हा छोटा प्रवास खूप संस्मरणीय होता. आम्ही गेलो होतो औटिंगसाठी एका अ‍ॅग्रोफार्मवर . दिवस मजेत गेला. चार वाजता चहा घेतला आणि परतायचा विचार होता. पण फार्मच्या मालकाने सजेस्ट केले की पाच किलोमिटर अंतरावर एक वृध्दाश्रम आहे. त्याला जरूर भेट द्या. आम्ही गाडीत बसून निघालो सारे. वृध्दाश्रमात पोंचलो आम्ही. पूर्वसूचने शिवाय आम्ही गेलो तरीही आमचे यथोचित स्वागत झाले.  तेथील एक आधिकारी सोबत सर्व आश्रम दाखवून माहिती देण्यासाठी मिळाला. अर्थात या ठिकाणी फक्त दु:खच दिसत असते असा माझा आधीचा अनुभव होता. तरीही प्रत्येक खोलीत आमचा समूह गेला. वृध्दांशी थोड्या गप्पा , सहानभूती दाखवायचा  प्रयत्न असे कांही चालू होते. आम्ही एका खोलीत गेलो असताना त्या खोलीत एक वृध्दा दिसली. वय पंचाहत्तरच्या पुढेच असावे. दिसायला गोरीपान. का माहीत नाही पण या बाईने माझे लक्ष वेधून घेतले. सर्व मित्र दुसर्‍या खोलीत जायला निघाले. मी त्यांना म्हणालो की तुम्ही पुढे निघा. मी अर्ध्या तासात तुम्हा लोकांना जॉईन होईन. इतर मित्र खोलीतून गेल्या नंतर मी त्या वृध्देला बोलते करायचा प्रयत्न केला.

बोलताना कळाले की त्या महिलेचे नाव कमला असे होते. तिला एक मुलगा, सून आणि एक नातू होता. ते परदेशात स्थायिक होते. मी तिला लागलीच विचारले की त्या यथे एकट्या का राहतात?. तिने आवंढा गिळत सांगितले की मी येथे स्वेच्छेने रहाते. याला अनेक कारणे आहेत. मुलांनी आपल्या मर्जीप्रमाणे आपले जीवन जगावे ही माझी मनिषा आहे. मी जीवनाच्या अंतिम पाडावावर आहे. माझे जीवन जगून झाले आहे. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायची संधी मी द्यायला हवी असे मला वाटते.  मलाही एकटेपणाचा त्रास होतो. पण तो माझा प्रश्न आहे आणि मीच सोडवायला हवा. मला दुसर्‍यासाठी प्रश्न बनणे पसंत नाही. हे जरी सत्त्य आहे तरी लोकांचा यावर विश्वास बसत नाही आणि येणारे लोक मला नको असलेली सहानभूती दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण तिच्याशी बोलताना, तिच्याकडे बघताना का मला माहीत नाही ती शल्य आपल्या मनात लपवत आहे असे वाटले. माझी परतायची वेळ झाली. मी निरोप घ्यायला उठलो. नमस्कार करण्यासाठी मी खाली वाकलो आणि पायांना स्पर्श केला, त्यांनी माझ्या पाठीवर हलकेच हात फिरवला. आणि काय आश्चर्य! मला माझ्या आईची आठवण आली आणि मी गदगदून गेलो. मी कंपाऊंडच्या बाहेर निघतांना वळून पाहिले तर त्या स्वतः भावनावेगाने डोळे पुसत होत्या. त्या वेळी मला आईचे वेगळेच दर्शन झाले. खाकरून घसा साफ केला आणि डोळे पुसून मित्रात सामिल झालो.
आठ दिवस मी सुन्न होतो. त्या भावनावेगा नंतर मी एका आठवड्यात आईवर दोन गझला लिहिल्या. त्यातले कांही शेर खाली पेश करा. लक्ष देवून वाचा. कदाचित आपणास आपली आई दिसेल.

गझल पहिली--

समईत देवघरच्या आईच वात होती
ओजास पसरणारी माईच ज्योत होती

निजता कुशीत रात्री गोष्टीस सांगताना
स्वप्ने मला उद्याची ती दाखवीत होती

खडतर प्रपंच सारा, खडबड असून तळवे
पाठीवरी मुलायम फिरवीत हात होती

ना गाईले कधीही भारूड वेदनांचे
अश्रूस लपवणारी ती खास प्रीत होती

गझल दुसरी--

निस्तेज नेत्र, हलके हसले मला बघूनी
नजरेतुनी झिरपते माया अपार आहे

फिरवून हात करते उपदेश आज ही ती
झालो जरी अजोबा तिज मी कुमार आहे

शिस्तीस लावताना भासे कठोर ती पण
हृदयात खोल तिचिया ओली कपार आहे

नंदादिपाप्रमाणे ती तेवली खुशीने
विझण्यास वादळाने देते नकार आहे

अजून एक सहज जिव्हारी लागलेली गोष्ट. एका मैफिलीत मी निमंत्रित शायर होतो. तिथे मी आईवरची पहिली गझल पेश केली. श्रोत्यांनी व्यवस्थित दाद दिली. नंतर चहापानाच्या वेळी एका श्रेष्ठ शायराने गप्पा मारताना मला सल्ला  दिला की देश्पांडे साहेब आपण गझल छान पेश केली. पण मित्र म्हणून एक सांगू का? आई हा विषय मुळातच गझलेसाठी योग्य नाही. मनात लगेच विचार आला की जशी जीवनात तशीच गझल क्षेत्रात पण आई दुर्लक्षीतच असावी हा मोठा दुर्दैविलासच म्हणावा!

निशिकांत देशपांडे,
बालेवाडी, पुणे
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users