इथून निघून जाताना.....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 May, 2022 - 02:03

इथून निघून जाताना...

होतील पाय जड, का जाईन तरंगत
धरुन ठेवीन सारे, का निघेन वार्‍यागत !

आठवतील का क्षण सुखद आणि स्वर्गवत
राहील काही मनात दुःख तेच खदखदत !

तोच द्वेष, तीच माया तीच ती साथसंगत
ठेवीन सारे ह्रदयात का वाटेल विसंगत !

साखळ्यांचे ओझे मनात खळखळत
निघेन का मी तेव्हा जरा अडखळत ?

कोडेच सारे काही, का वाटेल स्वप्नवत
क्षणात होईन पार, का जरा थांबत थांबत !

दृष्य सारे मावळेल, विचार सारे अस्तंगत
अदृष्यही असेल का ते असेच काही क्षणासोबत !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या क्षणान्च्या भावना चपखळ उतरल्यात कवितेत.

सम्पुर्ण कवितेत 'का' च्या जागी 'की' हवाय का?

आठवतील का क्षण सुखद आणि स्वर्गवत
राहील काही मनात दुःख तेच खदखदत !

साखळ्यांचे ओझे मनात खळखळत
निघेन का मी तेव्हा जरा अडखळत ?

ही कडवी सोडुन

खुप छान लिहिले आहे. गेले काही महिने हाच विचार मनात येतोय की जाणारे जाताना विचार करतात की नाही? त्याना आपण जातोय हे कळते की नाही? जायची वेळ झालीय तरी मन इथेच अडकले असेल तर काय द्विधा अवस्था होत असेल… Sad