कविता की अंगार ...

Submitted by काव्यधुंद on 19 May, 2022 - 00:40

उगाच स्फुरले, मनी न उरले, उलगडले ओठांवरती
हे शब्द नव्हे तर भास मनीचे श्वासा मधून बहरती

ही ओढ नवी का अंतरातली तगमग सांगू पाही
ती ओळ नव्हे कल्लोळ जीवाचा आर्त उसासे देई

पानांवर उठले पूर शाईचे उर भरून मग आला
आतुर जीवाला आठवणींचा नूर सांगुनी गेला

एकेक शब्द मग स्तब्ध होऊनी अवतरला त्यावेळी
नवरंग उमटले रीते कराया अंतरंग या ओळी

विस्फोट जाहला जाळून गेला अंतःकरणा पार
सर्वस्व अर्पिता तेजोमय ती कविता की अंगार

Group content visibility: 
Use group defaults