कल्पनेत का उडावयाचे?

Submitted by निशिकांत on 3 May, 2022 - 22:37

कॅन्व्हासावर नकात उधळू रंग उद्याचे
वास्तव सोडुन कल्पनेत का उडावयाचे?

माय मुलांनी फक्त ईंग्रजी बोलायाचे
आणि ठरवले माय मराठी टाळायाचे

मी न पाहिला कुठे कुंचला चितारणारा
ना दिसणारे, पण असणारे रंग मनाचे

दु:ख कालचे मनास देते आज उभारी
अवघड जाते आठवताना दिवस सुखाचे

कशास देता उगाच सल्ले तरुणाईला?
ज्येष्ठांनो का आज ऐकते कुणी कुणाचे?

अंधारातिल कुकर्म त्याने कसे करावे?
बिन डागाचे रूप म्हणोनी रविराजाचे

विचार येता मृत्यूचा का धडकी भरते?
मावळायचे पुन्हा नव्याने उगवायाचे

भुकेस कोंडा, निजेस धोंडा असून सुध्दा
गाढ झोपतो, दिवास्वप्न जे श्रीमंताचे

एक स्वप्न "निशिकांत" अधूरे तुझे राहिले
परंपरांचे जोखड तोडुन जगावयाचे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त---अनलज्वाला
मात्रा- ८ X 3 = २४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>.मी न पाहिला कुठे कुंचला चितारणारा
ना दिसणारे, पण असणारे रंग मनाचे
क्या बात है!

>>>>>>अंधारातिल कुकर्म त्याने कसे करावे?
बिन डागाचे रूप म्हणोनी रविराजाचे
करेक्ट!!! सही है.

>>>>एक स्वप्न "निशिकांत" अधूरे तुझे राहिले
परंपरांचे जोखड तोडुन जगावयाचे
वाह!!!

पुस्तक काढा निशिकांतजी. छान असतात एकेक शेर.