सुखाच्या शोधात

Submitted by shabdamitra on 22 April, 2022 - 00:07

किती हा पसारा! कसा झाला,कुणी केला समजत नाही.शिस्त म्हणून काही नाहीच कुणाला. असे मी किती वेळा स्वत:शी म्हणालो.असेन सांगता येणार नाही. हिंमत धरून कधी आवरायला घेतला पसारा की जसा आवरावा तसा तो वाढतोच आहे हे पाहिल्यावर प्रथम दुसऱ्यावर, मग स्वत:वर चिडचिड सुरू ! लक्षात येऊ लागते, अरे हा मीच जमा केलेला पसारा आहे. आवरू आवरू म्हणत डोंगर झाल्यावर नाईलाज म्हणून सुरवात होते.

प्रत्येक वस्तु पाहात,ती लावून ठेवताना 'हे केव्हा घेतले?' 'अरे इथे पडले होते का? किती हुडकत होतो!' 'आणि ह्या वह्या सापडल्या की! इथे सांदीत कुणी टाकल्या इकडे? किंमत नाहीमाझ्या लिखाणाची.' मग ते वाचत बसतो. एक फोटो हाताला लागतो. खाडकन जागा होतो! कुणाचा हा? माझाच? बरं झाले ह्या अडगळीत होता.पोरांनी पाहिला तर हसून हसून मला वेडे केले असते. लपवून ठेवू? का फाडून टाकू? हॅम्लेटचे हे स्वगत पंधरा मिनिटे म्हणत बसतो. त्यामुळे निश्चित काहीच ठरवता येत नाही. तो फोटो मी तिथेच आणखी खोल खाली खाली खुपसून ठेवतो.

दुसरे काही एखादे टाकायचे म्हणून बाजूला भिरकावतो. पुन्हा आणखी दुसरे काही सापडले की ते अगोदर टाकलेले लागेल त्यासाठी म्हणत पुन्हा आणून ठेवतो. हळूहळू टाकून द्यायचा ढीग आणि इकडे पसाऱ्याचा ढीग पुन्हा वाढतच आहे ! पुन्हा चिडचिड! पुन्हा लक्षात येते की ह्यातला जास्त पसारा माझाच आहे. मग तो नीट लावायला परत सुरुवात. एखादे पुस्तक पाहिले की अरे हे आपल्याकडे आहे?! असे म्हणत स्वत:च्या आणि त्या पुस्तकाच्या कौतुकातच वेळ घालवतो.

होते काय तर पसारा आवरणे आणखी काही दिवस पुढे ढकलले जाते !

एकदम हा पसारा कशासाठी काढला? हे सर्व डोक्यात आणि डोळ्यासमोर येण्याचे कारण म्हणजे मी Paula Poundstone चे The Totally Unscientific Study of the Search for Human Happiness( घ्या, थोडेपाणी प्या; नाव वाचून झाले ना?) हे पुस्तक वाचत होतो. त्यातले To Get Organized for Happiness Experiment हे प्रकरण वाचत होतो. वाचताना हसत होतोच. कारण आपल्या प्रत्येकाचे ते प्रकरण आहे!

लेखिका गेली तीस वर्षे एकपात्री विनोदी कार्यक्रम करत आहे. NPR रेडिओवर काही वर्षे Wait, Wait... Don't Tell Me ह्या लोकप्रिय कार्यक्रमात मुख्य भाग सांभाळत आहे. तिला तीन मुले आणि तिची १६ मांजरे ३ कुत्री आहेत !तिला एकदा विचारले ," की तुमच्याकडे सोळा मांजरे कशी झाली?" ती म्हणाली, “ अगोदर पंधरा होतीच आणखी एक आणल्यावर सोळा झाली!" हल्लीची लहान मुलेच नाही तर तिची कुत्र्यांची पिलेही किती पटकन शिकतात ते सांगताना,"आम्ही नुकतेच एक पिलू आणले. काही दिवसातच तो बरेच शब्द शिकला. त्याला बरेच समजूही लागले." खाली", "बस", " चल आता", "थांब"...., "मायक्रोसॅाफ्ट वर्ड्स" !!.…. “एक्सेल “ ..!!

गेली काही वर्षे, माणसाने आनंदी कसे राहावे, आनंद कसा मिळवावा, आपल्यापाशीच आहे तो कसा शोधावा, 'साध्या गोष्टीतही आनंद किती आढळे', ह्यातून 'आनंद मिळवा सुखीआयुष्य जगा,'अशी एक ना दोन भाराभर पुस्तके, शिवाय जगभरचे मानसशास्त्रज्ञ आनंद,सुख यावर संशोधन करत आहेतच. त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध होत असतात. अनेक विद्यापीठात “ सुखाच्या शोधाचे” अभ्यासक्रम चालू झाले आहेत. त्यासाठी परीक्षा नाहीत. चर्चा, व्याख्याने , परिसंवाद अशा गोष्टींचा त्या अभ्यासक्रमात समावेश असतो. असा मोका ,विनोदी लेखक आणि कलावंत हा विषय सोडतील का?

आनंद, पाऱ्यासारखी निसटतीच नाही तर,वाफेसारखी लगेच उडून जाणारी भावना आहे. आनंद मिळतो. पण फार काळ राहात नाही. आईन्स्टाईनने दिलेले काळाच्या सापेक्षतेचे उदाहरण समर्पक आणि बरोबर असले तरी आनंद टिकाऊ नाही हे खरे. तसा तो असता तर तुकाराम महाराज ,” सुख पाहता जवा एव्हढे” म्हणाले असते का? आणि “ शंभर धागे सुखाचेच” झाले असते की !

पॅाला पॅाऊंडस्टोनही म्हणते की दीर्घकाळ टिकाऊ सुख कुणाला मिळाल्याचे अजून तरी कानावर आले नाही. पुढचा षटकार ठोकताना म्हणते," टिकाऊ सुखानंदासाठी viagra चा शोध अजून कसा नाही लावला कुणी ?!” पण पुढची दोन वाक्ये वाचल्यावर लेखिकेचे मन समजू लागते. "मी खरीच सुखी झाले तर मला गाडी ठेवण्याची जागा मिळायला किती वेळ लागला असता कोण जाणे !” पुढे ती म्हणते, “ आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की गाडी लांबवर दूर ठेवून चालतच जावे असे वाटते.”

तिने आपला आनंद कोणकोणत्या गोष्टीतून मिळवण्यासाठी किती प्रयोग केले त्याचे प्रकरणवार, खुमासदार वर्णन विनोदी शैलीत लिहिले आहे. शास्त्रीय प्रयोगाप्रमाणेच तिनेप्रकरणांची सुरवातही उद्देश, मध्ये-मध्ये निरीक्षण -१ , -२ , असे नोंदवत ती अखेर निष्कर्ष लिहिते. ती निरीक्षणे आणि निष्कर्ष वाचण्यासारखी आहेत. काही तर वचने वाटावीत अशी वैचारिक तर काही हृदयस्पर्शी आहेत.

सुख मोजण्याचे तिने तिचे मापही शोधले आहे. त्याला ती hep म्हणते. Hep म्हणजे चमचाभर , चिमूटभर किंवा एक लिटर, किंवा किलो काहीही समजा. अखेर आपण आपले सुख कसे मोजतो त्यावर ते अवलंबून आहे.

"आपण ज्यांना ओळखत नसतो इतकेच काय जे आपल्या सारखे दिसत नसतात, आपल्यासारखे राहात नसतात त्यांच्या सुखाशी,आनंदाशी आपला आनंद अतिशय निगडीत असतो असे सत्य लिहून जाते.

मुलांच्या सहवासात राहून आनंद मिळवण्याच्या ह्या प्रयोगात ती आणि मुले ठरवतात की एक संपू्र्ण दिवस-२४ तास-आपण सगळ्यांनी मिळून सिनेमा पाहायचे. ठरले. मग एक दोन सिनेमा झाल्यावर एक मुलगा, हा पाहू या म्हणतो त्यावर बहिण हा नको तो बघू या म्हणते. दुसरी बहिण लगेच तिसरा सुचवते. हे अधून मधून चालतच होते.पण लेखिकेने “हा पाहू या “ म्हटले की मात्र तिघेही एकासुरात कडाडून विरोध करायचे. हेही बरेच वेळा होते. ह्यावर लिहिताना पॅाला पाउंडस्टोन निरीक्षण लिहिते:- "आईबापांना जेआवडते ते आपल्याला आवडत नाहीच, त्याची कधी मजा घ्यायचीच नाही हे मुलांनी किती कायमचे ठामपणे ठरवले असते!" पण त्यानंतर,तीच पॅाला, “आपण इतकी वर्षे ज्या मुलांना रोज दोन मैल तर एकाला पाच मैलावरच्या शाळेत सोडायचो, पुन्हा निरनिराळ्या वेळी जाऊन त्यांना घरी आणायचो,” ती मुले शिकण्यासाठी दूर गेल्यावर, “ मला स्वैपाक करता येत नाही.पण घरात मुले नसली की जसा करते तो स्वैपाक करण्यातह अर्थ उरत नाही .” ही सर्व आयांची खंत करण्यातही काही अर्थ उरत नाही" ही सर्व आयांची खंत पॅाला सुद्धा व्यक्त करते.

लेखिका काही वेळा अशी शब्दयोजना करते की ती वाक्ये वाचताना जास्तच चटकदार लागतात. हेच वाचा ना- दरवर्षी आपल्या मुलाचे प्रगती-पुस्तक पाहताना,जबरदस्त फी उकळणाऱ्या खाजगी शाळेविषयी ती, it's an "Expensive Disappointment म्हणते. तसेच ती सकारात्मक वृत्तीतून आनंद मिळतो हे ऐकल्यावर तो प्रयोग करण्यापूर्वी ,"Although negativity is my "native language...." असा शब्दप्रयोग करते!

घरातला पसारा आवरणे, तो पुन्हा नीट शिस्तीने व्यवस्थित लावणे ह्यामधून आनंद मिळवण्याच्या प्रयोगात तिची तीन चार दिवस चाललेली धडपड आणि दमछाक आणि त्या प्रयोगाचा बोजवारा उडाल्यावर; आणि मांजरांनाही शिस्त लावण्याचा प्रकार पाहून शेवटी तिची मुले तिला ऐकवतात, “ आई, तू अगदी त्यांच्या नावांची अंगाई गात बसलीस तरी ही मांजरं त्यांच्या आद्याक्षरांप्रमाणे रांगेत झोपणार ना- ही- त.” हे ऐकल्यावरच ह्या प्रयोगाच्या अखेर तिने असा निष्कर्ष काढला असावा:- “EXPERIMENTAL ERROR ! “

Get Over Here and Help for Happiness Experiment प्रकरण सुरवातीला जितके विनोदी आहे तितकेच ते नंतर हृदयस्पर्शी होत जाते.

लेखिका लोकांसाठी काही करावे या उद्देशाने आपले platelets दान करण्यासाठी, म्हाताऱ्यांसाठी असलेल्या काळजीवाहू संस्थेत जाते. हा तिचा पहिलाच अनुभव असतो. तिथल्या परिचारिकांचा विक्षिप्तपणाचे वर्णन करते. त्यानंतर तिला एक अर्ज भरायला देतात. त्या अर्जातील काही प्रश्नांनी ती चक्रावून जाते. एका प्रश्नात, काही देशांची नावे दिली होती आणि या देशात “तुम्ही कधी संभोग केला होता का “ असे विचारले होते ! बाई तीन तड उडालीच ! अर्ज भरून झाला. प्लॅटलेटसही दिले. काही महिन्यांनी बोलावले. पुन्हा अर्ज भरणे, पुन्हा तोच प्रश्न ; पण देश निराळे! तिसऱ्यांदा ती गेली. पुन्हा अर्ज भरणे आले. ‘तो’ प्रश्नही होताच. पण ह्या खेपेसही त्याहून निराळ्याच देशांची नावे !ह्यावर ती म्हणते, “ १२७ देशामध्ये माझा शरीरसंबंध नाही ही माहिती मला आताच मिळाली! किती हायसं वाटलं !

पण जेव्हा "तुमच्या platelets मुळे पेशंट बरा झाला,त्या बद्दल आमची संस्था आणि पेशंट तिची मुले, नातेवाईक, आभारी आहेत." हे पत्र वाचल्यावर तिला झालेला आनंद पाहून आपल्यालाही बरे वाटते. त्याच संस्थेत ती काही महिने त्या म्हाताऱ्या लोकांसाठी स्ययंसेविका म्हणून काम करते. त्यांच्याशी ती फुगा हवेत उडता ठेवायचा खेळ खेळते. त्यांना ती लहानपणीची गाणी गाणी म्हणायला लावते. ती सांगते, “ विस्मरणाचा आजार झालेल्यांनांही ती बालगीते आठवत होती!” लहानपणी तरुणपणी ऐकलेली,आवडलेली गाणी, कविता डिमेन्शियाच्या रुग्णालाही आठवतात हे गीत संगीताचे अदभुत वैशिष्ठ्य म्हणावे लागेल! "Home On The Range” हे गाणे झाल्यावर कधीही न बोलणारी फिलीस हळू कुजबुजत्या आवाजात म्हणाली. "I am from the Range." (युटाहची) आणि बाळपणीच्या काही आठवणी सांगू लागली.ह्या विषयीच्या 'मौलिक निरिक्षणा” समोर लेखिका लिहिते,” फिलीसशी त्याचा कमीत कमी तीन “ हेप्स” आनंद झाला. "

पुस्तक वाचताना थंडीतील सकाळच्या उबदार उन्हात, किंवा उन्हाळ्याच्या दिवसात वाऱ्याची हलकीशी झुळुक झेलत समुद्राच्या किंवा नदीच्या काठी आपण फिरत आहोत असे वाटते. मंगला गोडबोले यांचे झुळुक किंवा पद्मजा फाटक यांचे गर्भश्रीमंतीचे झाड, या पुस्तकांची आठवण होते. हे पुस्तक वाचताना मलाही 'काही heps आनंद झाला! '

विज्ञानात संशोधन करताना किती वर्षे संशोधन चालले होते; प्रयोगासाठी गिनिपिग्स किंवा इतर प्राण्यांचा वापर केला नाही असे जाहीर केलेले असते. तसेच लेखिकेने इथे गमतीने लिहिले आहे की संशोधनात एकाही डॅाल्फिनचा वापर केला नाही.! डॅाल्फिन सगळ्या माशांत आनंदी आहे हे लक्षात घ्यावे.

योगायोग पहा,येव्हढ्यात लक्षात आले होते की तिने प्रस्तावनेत किंवा शेवटी "माझा कार्यक्रम तिकडे आहे तिथे जरूर या" असे गमतीने लिहिले आहे. तर आज वर्तमानपत्रात, ३१डिसेंबरला सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये पॅाला पाउंडस्टोनचा एकपात्री कार्यक्रम आहे हे आताच वाचले!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users