पुन्हा वाटते

Submitted by Rajkumar Jadhav on 16 April, 2022 - 22:54

पुन्हा वाटते

वार्‍या संगे राना मध्ये
पुन्हा वाटते धावत जावे
आणि तरूच्या अंगावरती
मजेत अलगद झोके घ्यावे

भर दुपारी डोहा मध्ये
पाठशिवणी खेळत डुंबावे
उन्हे घेऊनी पाठीवरती
सावलीत अर्ध्या पहुडावे

कुठे मधाचे पोळे दिसता
वरून झटकून मोडून घ्यावे
या फांदिहून त्या फांदीवर
सरसर जाऊन मस्त चुपावे

सायंकाळी खेळ खेळुनी
पारावरती पैस बसावे
मित्रांसंगे गप्पा मारत
आयुष्यावर खूप हसावे

कानावरती हाक आईची
घराकडे झेपावत जावे
मायेचा तो घास खाऊनी
कुशीत तीच्या झोपी जावे

राजकुमार जाधव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा.बो.वर स्वागत...
छान, नोस्टालजिक...
शुभेच्छा...