हेच आपलं नेहमीचंच - ६

Submitted by पाचपाटील on 20 March, 2022 - 14:14

( विजुभाऊंच्या डायरीतली लिहायची राह्यलेली
समजा चावट वगैरे पानं )

१.
हे बग गन्या, त्या आसारामबापूची बंडल पुस्तकं
वाचायचं बंद केलास, त्ये एक बरं केलंस..!
लग्न बी चांगलं झालं तुजं..
आता सगळं देव-देव उरकलं..जागरन गोंधळ झाला...
सत्यनारायनाची पूजा बी झाल्यालं कळलं...
आनी पाठराखीण बी निघून गेली म्हनतोस..
आता काईच आडचन राह्यली नाय बग..
सगळं तुजंच हाय बग आता.‌!
आमी तर म्हण्तो, तू आता ताबडतोब सौंसाराला
सुरूवात करून टाक..
आत्ताच जा बिंधास्स..
काय टेन्शन घ्यायचं काम नाय..
आमी काय खिडकीच्या फटीतनं बगनार नाय..
दार बिर वाजवनार नाय...!
किंवा समजा दरवाजा तोडून आच्यानक आत
धाड घालनार नाय...
दोस्तीतले हे म्हत्वाचे प्रोटोकॉल आमी कदीच तोडत
नाय..! विश्वास ठेव आमच्यावर..!
असा का बगतोयस?
आमी तुजे एवडे डांगदोस्त असताना तुला
आमचा भरवसा का बरं वाटत नाय? हे बरोबर
नाय गन्या...
आमी काय येवडे बी चाटाळ नाय लगा..!
निसंकोचपनी जा तू..!
रणभूमीची निवड झालेली है..
नियतीनंच ती केलेली है..
आता तुला फक्त चांगली लढाई करायची है..
आनी लढाई ही लढाईच असती..
त्यात चांगली-वाईट, बारकी-मोठी काय नसतंय..
आनी हार-जीत आसलं बी काय नसतंय..‌
सगळा भगवंताचा खेळ समजायचा..!
तो दमसांस राखून खेळायचा..!
समजा मधीच फुस्स झालास तरी बी
काय मनाला लावून घिऊ नये..
ते तसंच आसतंय कदी कदी..!
थोडा ब्रेक घ्यावा..
मग पुन्हा उठावं...
आजमावून बगावं स्वतःला..
येकच एल्गार बोलावा..!
पुन्हा झुंजात उतरावं..!
अशी गॅप गॅपनं मिळनारी झलक सुद्धा रिलॅक्स
करनारीच आसते..
आनी समजा डायरेक्ट जिकलास तर मग काय
इचारूच नगो..!
मग चांगला म्हातारा होईपर्यंत राज्य करशील बग...!
कारन शेवटी ही गोष्टच अशी है की,
मानसाचं किती बी पोट भरलं तरी, वर अजून
थोडी आईस्क्रीमपुरती जागा शिल्लक राह्यतेच..

जा आता... लय ईचार करू नगो.
आनी आसा लाजत लाजत कशासाटी थरथरतोय?
ह्या थरथरीची बी मजा असतेय येड्या.. ती आत्ताच घे..

कारन ही थरथर फक्त पयल्या टायमालाच राह्यते..
येकडाव सगळं ओळखीचं झाल्यावर मग कसली
थरथर न् कसली हुरहूर..!

मग फक्त पिरपिर न् किरकिर राह्यते..!
आता आमाला म्हायतीच है ना सगळं..!
"ओss उरका लौकर.. उगंच लाडात यिऊ
नगा..!"
आसल्याच ऑर्डरी ऐकाय लागतेत आमाला आता..!
आस्तेत दुखनी एकेकाची..!

२.
' एss.. एवढ्या जोरात चावू नकोस नाss '

<< का? काय झालं ?>>

' अरे आईला उगाच डाउट येतो..
विचारत होती सकाळी की, तुझ्या ओठांना
काय झालंय म्हणून..'

<< व्होय काय? मग तू काय सांगितलं ?>>

' मी बोल्ले झोपेत मुंगी चावली..! '

<< हॅ हॅ हॅ.. मुंगळा बोलायचंस ना येडे..! >>

' हॅ हॅ काय? नालायक कुठला..!
नाय नाय म्हण्तो आनी हल्लाच चढवतो नुस्ता..!
मला नै आवडत..! मला हे असे व्रण नकोयत कुठंच..!'

<< बरं बरं.. थांब...आता आपण सगळा पुरावा नष्ट
करून टाकू..! >>

तर झेडब्रीजवर साईड स्टॅण्डवर बाईक लावून,
आडोशाला बसलेल्या कपल्सच्या तोंडातून
असले संवाद असतेलच म्हना..

तर ही शहरी मुलगी स्वतःच्या आईला अशा थापा
मारते, वगैरे नैतिक विचार करत झेड ब्रीजवर
फिरत असतानाच आमच्या गावातल्या
'झंपर घालणाऱ्या प्रेयसी'ची याद येते..!
आणि समजा तिचे ते हरहमेश ठरलेले डायलॉग
आठवून मी ताबडतोब खजिल होतो समजा...!!
उदाहरणार्थ...
"आवो नगो नगो...! आवो नगो...! आवो ही काय
करताय..! काय बया तुमचं बी..!! रात कळंत नाय,
दिस कळत नाय..!"

साधारण अशी सुरुवात करून नंतर मग..

"दमा जरा.. हिकडं नगो....तिकडं चला लिंबाम्हागं..
हितं उगं गडी मान्सं आस्तेत... कुनीतरी यायचं
भस्सकन्..! तिकडंच चला.."

आसलं समजा आठवलं तर मग मानसाला संस्कार
वगैरे शब्दांचा ताकदीने उच्चार करता येत नाय..!
आनी शिवाय ह्याबाबतीत 'गाव' आनी 'शहर' असा फरक करनं बी तसं चुकीचंच है..!

३.
'' ह्या जगात पोरी आहेत ते बरं है..
नायतर पोरांन्ला एकमेकांसोबतच करावं लागलं
असतं.. माझं येकवेळ ठीकाय समजा..!
मला मिळाला आस्ता कुनीतरी..!
पन तुजं काय? कोन करायला तयार होनार
तुज्याबर ? तोंड बघितलायस का?''

<< तू आदी स्वतःकडं बग ना उपट्या..!
च्यायचं नकली शारूक..! आठवड्यात कलर
उडनारं डुप्लीकेट ब्रॅण्डचं शर्ट घिऊन येतं अन्
उगं केस उडवत फिरत राहतं...!
आनी वर मला ही नगो अन् मला ती नगो,
ह्या असल्या थापा मारतं..! लगा मास्ट्रुबेशन कमी
कर आता तू... खप्पड झालाय नुस्ता.. उगं हाडाचा चुरा-बिरा भाईर यील येकाद दिवशी...! >>

''आरे हो हो हो.. सॉरी ना भौ.. सहजच बोल्लो मी..!
किती आब्रू काडता??''

<< सुरूवात कुनी केली?? आं? >>

४.
मुलतान टेस्टमधी सेहवाग २९० च्या घरात पोचला,
तवा मी टमरेल घेऊन मळ्याकडं निगालो...
कारन मॅचमधलं हे असलं प्रेशर मला सहन
होत नाय..
पन अर्ध्या वाटेतंच फटाकड्या वाजाय लागल्या
न् ते ऐकून माघारी आलो..
३०९ रना ठोकलेल्या वाघानं..!
हान्न तिच्याssयला..!
भारताकडनं पयली ट्रीपल सेंच्युरी..!
सेहवाग फुडं मागं कदी भेटला तर सांगायचाय
त्येला हे सगळं..! टमरेल ला हिंदीत काय म्हनतेत, ते
बगायला पायजे येकदा.

५.
आमचा सबंद भाग त्या टायमाला कॉंग्रेसचा.
पवारसायेब बी तवा कांग्रेसमधीच हुतं...
साखर पट्ट्यात कमळाचा तवा काय एवडा
इशय नव्हता.
म्हंजे समजा त्येंच्या तालुका लेवलच्या
फुडाऱ्यांच्या शर्टावर बी वळ्या पडलेल्या
दिसायच्या.. तशे ते आत्ता आत्ता जरा ताजे
दिसाय लागलेत म्हना.. पन लय नाय..!
कारन आता मोहिते-पाटीलच तिकडं गेल्यावर
तिथल्या आदीच्या निष्ठावान दुष्काळ्यान्ला कोन इचारतो?

तर ९५ च्या इलेक्शनमधी तालुक्यात जराजरा
सेनेचा जोर वाडाय लागलेला..
त्यासंबंदानं वर्गात आमची भंकस कम् भांडान
चालल्यालं.
ते चुकून कोळेकर गुर्जींनी ऐकलं.
त्येंनी येऊन पयले आमच्या पाठीत
प्रत्येकी दोन-दोन मजबूत कुथके घातले..
आनी मंग इचारलं...

''आलं गा आता पवारसायेब आडवं?
का बाळासायेब आडवं आलं? आं?
आजून बोटभर न्हाईत आंडुरी, आनी सभा
हेपलाय पायजेत..! लय राजकारान कळाय
लागलं वै?''

तेव्हा समजा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी
किंवा समजा आपल्या राजकीय विचारधारेचा
प्रचार प्रसार करण्याच्या हक्काचे हनन वगैरे
भानगडी म्हाईत नव्हत्या..
पन घरातलं राजकारन शाळेत घिऊन जाणं काय
चांगलं नाय, एवढं समजलं.

आनी शिवाय भारतीय लोकशाहीमध्ये आपल्यावर
जो जो प्रसंग येतो, तो आपल्यालाच
निभावून न्यायला लागतो, हे तर पयल्याच
कुथक्यात समजलं..!
वंदनीय श्री. कोळेकर गुरूजी यांनी हा जो
अत्यंत वास्तववादी धडा दिला, त्याचा सबंध
आयुष्यावर कायमचा प्रभाव पडला.
थॅन्क्स टू कोळेकर गुरूजी..!

६.
"त्येनं जाऊन् तर दी माज्या वाटंला..चौकातच पाडतू
त्येला..!"
आसं नाय बोलायचं भौ.. लोकशाहीमध्ये अशी
भाषा उपयोगाची नाही.. असल्या हिंसक योजनेतून
मी ताबडतोब अंग काढून घेतो..
आपण चर्चेतून मार्ग काढू..
पत्र लिही त्याला..
लिही..

महोदय,

विषय :- वृषण सुजवणेसंबंधी

उपरोक्त विषयास अनुसरून,‌ आम्हास तुमचे
वृषण सुजवण्याचे वेध लागले आहेत..!
त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी तुम्हांस प्रत्यक्ष
भेटावयाची तीव्र आकांक्षा आहे..
तर उद्या सायंकाळी ठीक चार वाजता हनुमानमाळ
येथे, आम्ही तुमची वाट बघणार आहोत..!
तुम्ही तेथे अवश्य येऊन आम्हाकडून पिदवून घ्याल,
अशी माफक अपेक्षा आहे.. परंतु तुम्ही समजा नाही आलात,
तर मग आमचा नाईलाज होईल..!
आणि मग आम्हांस स्वतः येऊन तुम्हास
भर चौकामध्ये पाडण्यासंबंधी कारवाई करावी
लागेल, हे बरे ध्यानात असू द्यावे.'"

कळावे,
सदैव आपलाच हितैषी,
विजुभाऊ परीट
(इन केअर ऑफ बिच्याशेठ रामुशी)

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत 'व्यवस्थित' लिहिलेले आहे. ज्यांना हे अश्लील वगैरे वाटेल त्यांनी निदान 'साहित्यात जीवनाचे प्रतिबिंब दिसत नाही' असे डायलॉग मारण्या आधी आपली क्षमता वाढवावी आणि comfort zone च्या बाहेर यावे..... ट्रोलिंग करणे सोपे आहे पण वास्तवदर्शी लिखाण पीत साहित्य कडे न झुकता लिहिणे हे खूप कठीण आहे.....