समुद्र

Submitted by nimita on 14 March, 2022 - 00:05

रोज येऊन उभी राहतेस माझ्या किनाऱ्यावर

तास न् तास पाहात असतेस माझ्यातल्या भरती ओहोटी ला ....

पण मी जाणून आहे तुझ्या येण्यामागचं खरं कारण

मनातल्या मनात मोजून मापून बघत असतेस

तुझ्या आणि माझ्यात सामावलेली वादळं ....

जगापासून लपवलीस तरी मला दिसते तुझ्या मनातली वावटळ

तुझ्या त्या अबोल पण पाणीदार डोळ्यांत .....

मग मीही पाठवतो माझ्या लाटांना किनाऱ्यावर

त्याही घुटमळत राहतात तुझ्या पायांशी

त्यांच्या अवखळ स्पर्शानी तुझं सांत्वन करत....

आणि परत फिरून माघारी येताना

तुला जाणीव करून देत असतात

भरती आणि ओहोटीच्या निसर्गनियमाची

या विश्वातल्या प्रत्येक क्षणाच्या अशाश्वत असण्याची.....

तुलाही कळते ना त्यांची ती खळाळती कुजबुज

दिसते ना काळ्या ढगांमागून डोकावणारी सोनेरी पहाट

म्हणूनच तर निघून जातेस माझ्याकडे पाठ फिरवून

हलक्या मनानी आणि हसऱ्या डोळ्यांनी ...…

पण माझ्यात सामावणाऱ्या त्या प्रत्येक लाटे बरोबर

तुझ्यातली ती वादळं माझ्या उरात उतरतात

आणि मी....

मी मात्र तुला किनाऱ्यावर शोधत बसतो

तुझ्या अश्रूंची खारट चव पचवत राहतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users