ओळख

Submitted by nimita on 28 February, 2022 - 11:26

*ओळख*

माझा बाबा कसा होता माहीत नाही मला

आजपर्यंत फक्त फोटोमध्येच पाहिलंय ना त्याला...

पण तरीही एक बंध आहे नाजूक रेशमाचा

आईच्या गोष्टींमधून कळलाय मला 'बाबा' थोडासा....

काही जण म्हणतात-'मुलीनी बापाला खाल्लं'

पण आई म्हणते-'माझी काळजी घ्यायला बाबानीच तुला धाडलं'....

आईच्या डोळ्यांत त्याच्यासाठी नेहेमीच अभिमान दिसतो

पण मग त्याची मेडल्स बघताना तिचा पदर का बरं भिजतो ?

ती शौर्य पदकं, त्याचे युनिफॉर्मस् - हाच माझा ठेवा

आई म्हणते-' त्याचा देशसेवेचा वारसा पुढे न्यायला हवा'...

बाबा जरी माझा- तरी ते स्टार्स, ती मेडल्स मात्र नाहीत माझी

आई म्हणते - 'तू स्वतःच निर्माण कर ओळख तुझी' ...

हो... हो.... आता एकच ध्येय ; एकच ध्यास

माझी स्वतःची मेडल्स....माझे हक्काचे स्टार्स !!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users