झोका

Submitted by स्वरुप on 25 February, 2022 - 03:12

क्षणात उराशी येती क्षणात नभाशी जाती
कधी हाताशी अन कधी निसटुनि जाती
असे कसे लहरी तुम्हा साऱ्यांचे स्वभाव
भारीच चंचल आहे सभोवताली गाव

अश्या साऱ्या अस्थिरात कसे ठरवावे?
किती करावी सलगी किती अंतर राखावे?
असे देतात चकवा सारे अंदाज आडाखे
भलत्याच देशी नेती तुझे आभासी नकाशे

चुकामुकी आयुष्याचे बोल जगाला लावले
याला त्याला भोवताला किती आरसे दावले
चुकलेल्या गणितांचा पुन्हा हिशोब मांडला
राहिलेल्या हातच्यांशी जीव कितीदा भांडला

अवचित माझा झोका झुलायचा थांबला
भोवताल झाला स्थिर सरावाने चांगला
आपापल्या जागी सारे ठाम उभे होते
माझे दोन्ही पाय आता जमिनीशी होते

आयुष्याचा नव्याने हा उलगडा झाला
नभापार पोचलेला अहं भुईवर आला
दुजा बोल देण्याआधी डोकावावे आत
मिळुनिया जातो तिथे मदतीचा हात

स्वरुप कुलकर्णी

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर...