गाठ

Submitted by द्वैत on 19 February, 2022 - 23:14

गाठ

तसा सारा जन्म बये,
गेला पोळत जळत
राख होण्या जाई देह
आली पुन्हा का हळद?

हळद ही भुलविते
फसविती रितीभात
आता निघताना तिथे
नको पुन्हा तिचा हात

आत जागीच मी बये,
जरी डोळे मिटलेले
सांग हळूच कानात
मनी तुझ्या दाटलेले

सुटलीस एकदाची!
असं बोलू नको बये,
सातजन्म बांधलेली
गाठ म्हणे सोडू नये

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users