वेगळेच गाव त्याची वेगळीच तऱ्हा

Submitted by द्वैत on 31 January, 2022 - 01:45

वेगळेच गाव त्याची
वेगळीच तऱ्हा
ओळखीच्या घराआधी
अनोळखी झरा

अनोळखी झऱ्यातले
अदभुत पाणी
ओंजळीत घेता येते
दारापुढे कुणी

दारापुढे आला त्याने
मागितले दान
पडे त्याच्या झोळीमध्ये
पिंपळाचे पान

पिंपळाच्या पानावर
आठवांची जाळी
चांदणीची निळी खूण
गोंदली कपाळी

कपाळीचे भोग सारे
भोगले मुक्याने
चार पावलांची वाट
गिळली धुक्याने

धुक्यातल्या वाटेवरी
शोधसी आसरा
वेगळेच गाव त्याची
वेगळीच तऱ्हा

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कविता. अंत्य शब्दांवरून पुढचं कडवं चालू करणे - ह्या प्रयोगावरून 'आरंभी वंदीन अयोध्येचा राजा' ही रामदास स्वामींची रचना आठवली.

कपाळीचे भोग सारे
भोगले मुक्याने
चार पावलांची वाट
गिळली धुक्याने

धुक्यातल्या वाटेवरी
शोधसी आसरा
वेगळेच गाव त्याची
वेगळीच तऱ्हा....

फार सुंदर...