नक्षत्रांची शांती ५ - मृत्यु योग आला होता पण....

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 January, 2022 - 18:01

नक्षत्रांची शांती ४ - माझे तीन विवाह (पुर्वार्ध)
https://www.maayboli.com/node/80921

---------------------------------------------------------------

माझा एक मेहुणा आहे. तो फार श्रद्धाळू आहे. तसे आमच्या दोन्ही घरात एक मी सोडले तर सारेच श्रद्धाळू आहेत म्हणा. पण तो एक आहे ज्याच्याशी माझे या विषयावरून कधीतरी वाद होतात. अर्थात मी वयाचा मान ठेवतो आणि वाद टाळतोच. पण कधीतरी समोरच्याने आपली श्रद्धा वा आपले मत माझ्यावर लादायचे ठरवल्यास मग नाईलाज होतो. तर या वादाचा शेवट नेहमी त्याच्या एका वाक्याने होतो. तो म्हणतो, जेव्हा तुला अनुभव येईल तेव्हा बरोबर विश्वास ठेवशील. तेव्हा तुला माझे पटेल की मी तुझ्या भल्यासाठीच हे अमुकतमुक सांगतोय.

ईथे अनुभव म्हणजे त्याला अडचण अपेक्षित असते. अडचणीत येशील आणि सारे उपाय संपतील, पण अडचण काही सुटणार नाही तेव्हा बरोबर विश्वास ठेवशील असे काहीसे. आणि त्यावर माझे त्याला नेहमी एकच उत्तर असते, अश्या अडचणींच्या काळातच तर आपल्यातील आस्तिकत्व आणि नास्तिकत्व या दोन्हींचा खरा कस लागतो. आणि तुमच्या मनाचा खरा कल कुठे आहे हे कळतो. तेव्हा तो फक्त प्रामाणिकपणे स्विकारावा. वेळ आलीच तर मी सुद्धा स्विकारेन..

तर अशीच एक घटना त्या मधुचंद्राच्या सफरीत घडली जेव्हा माझ्या नास्तिकत्वाची परीक्षा झाली.

चलो, तो फिर से थोडा शुरू से शुरू करते है...

तर माझी रजिस्टर लग्नाची सौ. तेव्हा एका फार्मसी कॉलेजमध्ये शिकवत होती. त्यांच्याच कॉलेजची गोवा ट्रिप होती. ज्यात टिचींग स्टाफसोबत फॅमिलीसुद्धा अलाऊड होती. अर्थात पैसे भरून. फुकट नाही. पण जागोजागी स्टुडंट कन्सेशन मिळत असल्याने ट्रिप कमालीची स्वस्त पडायची. हो, अगदी कॉलेज दिवसांत ब्रह्मचारी असताना जी एकमेव गोवा ट्रिप झाली त्यापेक्षाही ही ट्रिप स्वस्त होती. ज्यात एका दिवसासाठी एखाद्या फार्मसी कंपनीला विजिट देणे अपेक्षित होते. तर उरलेले हवे तितके दिवस, हवी तितकी मौजमजा तुम्ही तिथे करू शकणार होता. याच कारणासाठी गोवा हे स्थळ निवडण्यात आले होते.

बर्र, आता मी ऑफिशिअली तिची फॅमिली झालो असलो तरी आमचे लग्न जगापासून लपवलेले होते. त्यामुळे मग साखरपुडा झाला आहे सांगून गोव्याच्या बसमध्ये प्रवेश मिळवला. ऑफिशिअली नवरा बायको असूनही जगासाठी प्रेमी युगुल बनून हिंडण्यातही एक वेगळीच मजा असते. ती त्या पिकनिकला अनुभवत होतो.

मुंबई ते गोवा बसचा प्रवास कॉलेजच्या मुलामुलींसोबत हसतखेळत, गाणी गात, पत्ते कुटत झाला. पहिल्याच दिवशी संध्याकाळी क्रूझ पार्टी आणि डिनर ठेवले होते. तिथे त्यांच्यासोबत नाचूनही झाले. थोड्याच काळात सर्वांसोबत छान खुलून रमलो. म्हटले तर त्यांच्या आणि माझ्या वयात फारसा फरकही नव्हता. सोबत रजिस्टर लग्नाची बायको नसती तर कदाचित त्यांच्यातल्याच एखाद्या कॉलेजसुंदरीच्या मागेही लागलो असतो. ती सर्व मुलेही आम्हाला जणू काही आम्ही अँजेलिना ज्योली आणि ब्रॅड पिट असल्यासारखे भाव देत होते. चिडवाचिडवी करत होते. दुसर्‍या दिवशीच साईट विजिट होती. तिला आम्ही सर्वांच्या परवानगीने टाटा बाय बाय करून दोघेच जीवाचा गोवा करायला बाहेर पडलो.

हातात हात घालून गोव्याच्या मार्केटमध्ये फिरणे, अतरंगी कपडे आणि सतरंगी दागिन्यांची फसवले जातोय याची पर्वा न करता, फारसे भावताव न करता खरेदी करणे, कुठून तळलेल्या माश्यांचा वास येता तिथे डोकावणे, वेगळा प्रकार आहे म्हणत थोडासा चाखून बघणे, तिथल्या छोटेखानी बारमध्ये एकेक काजू चघळत आपल्यालाही मद्यपान जमतेय का हे आजमावणे, एखाद्या वाईनला गोव्याचे सांस्कृतिक पेय घोषित करून तिचा मान राखणे, नास्तिक असूनही गोव्याला आलोय तर शास्त्र म्हणून तिथल्या चर्चमध्ये मेणबत्त्या जाळत डोके टेकवणे, संध्याकाळच्या समुद्रात लाटांशी हुतूतू खेळणे आणि मावळणार्‍या सुर्याच्या साक्षीने वाळूच्या पाटीवर एकमेकांचे नाव कोरणे.. एवढी मजा तर कधी विद्यार्थीदशेत क्लास बंक करतानाही आली नाही जी या चोरीच्या मामल्यात येत होती.

पण पिक्चर अभी बाकी था मेरे दोस्त...
पुढचा दिवस वॉटरस्पोर्ट्सचा होता.

गरागरा फिरले की मळमळणे आणि ऊंचावर गेले की चक्कर येणे यामुळे कधी जत्रेतल्या आकाशपाळण्यातही मी बसलो नव्हतो. बायकोलाही पाण्याची भिती ईतकी की याआधी कधी वॉटरपार्कच्या गुडघाभर पाण्यात शिरली नव्हती. त्यामुळे एकूणच आम्ही दोघे लांबूनच हा सोहळा बघणार असे वाटत होते. पण प्रत्यक्षात जेव्हा ती वेळ आली तेव्हा सर्वांसोबत आम्हालाही पाण्यात ऊतरायचा मोह आवरला नाही. सोबतीला लाईफ जॅकेट होतेच. सर्व खेळांचे एकच पॅकेज ठरवले गेले. त्यामुळे कश्यालाही नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. तर सर्वप्रथम एका छोट्याश्या सुपरफास्ट मोटरबोटीतून समुद्रात सुसाट फेरी मारून झाली. ज्यात पाण्याची आणि वेगाची भिती एकत्रच निघून गेली. आणि आम्ही पुढच्या राईडसाठी तयार झालो.

बनाना राईड. एक केळ्याच्या आकारासारखी लांबसडक बोट. ज्यात बोटीच्या आत नाही तर बोटीच्या वर बसायचे होते. बाईकवर बसल्यासारखे एक पाय ईकडे तर एक पाय तिकडे टाकून. चार-पाच जण आम्ही त्या केळ्यावर एका रांगेत बसलो होतो. आम्ही दोघे सर्वात मागे होतो आणि सर्वात पुढे त्या बोटीचा नावाडी होता. पण बोटीचा वेग मात्र मोटरबोटच्या तुलनेत जास्त नव्हता. त्यामुळे तितकीशी भिती वाटत नव्हती. ऊलट उघड्यावर बसल्याची आणखी मजा येत होती. अगदी समुद्राच्या मध्यावर पोहोचलो तेव्हाही ती भिती तितकीशी जाणवली नाही. ईतक्यात पुढून त्या नावाड्याचा आवाज आला. ऐसेही राऊंड मारके रिटर्न जाना है, के गिराना है?

गिराना है? क्या गिराना है? किसको गिराना है? ... आमच्या डोक्यात त्याचा अर्थ शिरायच्या आधीच आमच्या पुढची मुले एकसुरात ओरडली.. हा हा भैय्या, गिराना है.... आणि पुढच्याच क्षणी आम्ही समुद्राच्या पोटात कोसळलो होतो. पडत्या फळाची आज्ञा घेत त्या नावाड्याने बोटीला जोरदार हिसका देत एका बाजूला झुकवले होते आणि काही कळायच्या आधीच आम्ही बोटीपासून दूर फेकले गेलो होतो. त्या पुढच्या मुलांना याची कल्पना तरी होती पण आम्ही अगदीच बेसावध होतो. भानावर आलो तेव्हा डोळ्यासमोर, वरखाली, चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते. गटांगळ्या खात होतो. पाणी नाकातोंडात जात होते. पण खरे तर अजूनही ते गिराना है क्या डोक्यात शिरले नव्हते. आपली बोट कलंडली आणि आपण अपघातानेच पडलो आहोत. आता आपले नशीब बलवत्तर असेल तरच आपण यातून वाचू अन्यथा जलसमाधी असेच अजूनही वाटत होते. ईतक्या निर्दयीपणे कोणी कोणाला समुद्रात भिरकावू शकतो हे त्यावेळी माश्यासारखे समुद्राखाली तरंगत असताना पटणे अशक्यच होते.

दोनचार गटांगळ्या खात भौतिकशास्त्राच्या नियमानुसार आणि लाईफजॅकेटच्या कृपेने मी पाण्याच्या वर आलो. सर्वप्रथम नजर बायकोला शोधू लागली. ती कुठेच दिसत नव्हती. आजूबाजुला नुसता गोंधळ. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याच्या धडपडीत. सोबतची मुले माझ्या आधी सावरली होती आणि बोटीवर चढायच्या प्रयत्नात होती. पण ती कुठे होती...

थोड्याच वेळात पाण्याच्या खालून एखादे प्रेत तरंगत यावे तशी ती वर आली. पाण्यावर शवासन करावे तशी आडवी, जराही हालचाल नाही. आणि त्याहून भितीदायक ते पांढरेफटक पडलेले निष्प्राण भासणारे डोळे. त्याही अवस्थेत माझ्यातील त्राण गेले. कसाबसा मी त्या नावाड्याला ओरडलो, तिला पहिले त्या बोटीवर घ्यायला सांगितले.

जीव होता अजून शिल्लक. आणि त्या नावाड्याला याची कल्पना होती. त्यासाठी ते रोजचेच असावे. सवयीनेच त्याने आधी तिला आणि मग मला वर बोटीवर घेतले. आणि बोट वळवली.

परतीच्या प्रवासात सगळी मजा हरवली होती. नजरेसमोर तेच होते. पाण्यावर तरंगणारी ती आणि तिचे ते निष्प्राण डोळे. किनारा जवळ येताच पुन्हा एकदा त्याने बेसावधपणे हिसका देत पाण्यात पाडले. उभे राहिल्यास कंबरेपर्यंत पाणी होते हे न कळल्याने पुन्हा मी मुर्खासारखे जीवाच्या आकांताने ओरडू लागलो.

आम्हा दोघांसाठी त्या दिवशीचे वॉटरस्पोर्ट संपले होते. पॅरासेलिंग करायला म्हणून मोठ्या बोटीतून पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात गेलो. पण हिंमत न दाखवता आल्याने सुकेच परत आलो. रूमवर परतताना दोघांच्याही डोक्यात एकच विचार घोळत होता. मृत्युयोग मृत्युयोग म्हणतात तो हाच का???

क्रमश:
- ऋन्मेष:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नास्तिकत्व ऐवजी नास्तिकता असे जास्त ऐकले आहे. नास्तिकत्व मध्ये काय चूक माहिती नाही पण म्हणत नाहीत तसं. शास्त्र असतं ते.

ज्यात टिचींग स्टाफसोबत >> मी हे चिटिंग स्टाफसोबत असं वाचलं Proud

बाय द वे ती बनाना राईड नसती केली तर काय खाक गोवा फिरलात असं म्हटलं असतं.. त्या बनाना राईडवरून खाली पाडल्यावर ती लोकं आपली मजा बघत, हसत मजा घेत असतात ते बघून येत असतील तितक्या शिव्या द्याव्याश्या वाटतात.. पण गोवा म्हटलं की बनाना राईडच सर्वप्रथम आठवते

ह्मम..
बाकी एकत्त्व चालतं तर नास्तिकत्तव कॉइन करायला हरकत नाही. नास्तिकता हेच तत्व.

>अश्या अडचणींच्या काळातच तर आपल्यातील आस्तिकत्व आणि नास्तिकत्व या दोन्हींचा खरा कस लागतो. <<
क्या बात है, ऋन्म्या! इंटेंशनली ऑर अनइंटेंशनली खूप मोठी गोष्ट बोलुन गेलास. पण इथे ती किती जणांच्या (इंन्क्लुडिंग योर हेटर्स) पल्ल्यात पडेल, हा प्रश्न उरतोच...

साला, किस मिट्टिके बने हो यार? युज योर टॅलंट वाइजली, युविल गो फार...

राज +1
मला पण हेच वाटते. Runmesh, think about it.

बापरे डेंजर अनुभव.मला बनाना राईड आवडत नाही(मी अडव्हेंचर स्पोर्ट च्या बाबत प्रचंड किलजॉय आहे.शक्यतो अश्या ट्रिप टाळून बरोबरच्यांचा विरस होणार नाही असा प्रयत्न करते.)

बनाना राईडमध्ये मजा येते, पण असे सर्रास कोणालाही काहीही कल्पना नसताना बेसावधपणे पाडणे बरोबर नाही. आम्ही गेलो होतो तेव्हा आधी सांगतीले होते, ज्यांना नाही पाण्यात उतरायचे ते वेगळ्या बोटीत गेले. नक्की केव्हा पाडणार हा तेवढा सस्पेन्स होता.

बापरे! डेंजर!
ह्या अशा अघोरी पाण्यातल्या स्पोर्ट्सची चिड आणि भिती दोन्ही आहे. कधीच करणार नाही.
एकदा अस्मिताला भेटायचं आहे.

राज, मनमोहन .. धन्यवाद Happy

@ नास्तिकता कि नास्तिकत्व हे आता संधी समास जाणनारे भाषा जाणकारच सांगू शकतील.

@ मानव हो, काहीही कल्पना नसताना बेसावधपणे पाडणे >> यानेच जास्त धसका घेतला गेला. बुडून मेलो नसतो तरी त्या धसक्याने मेलो असतो असे झाले. पण आमच्याबरोबरच्या मुलांना याची कल्पना होती. आम्हालाच नव्हती.

@ अनु,. तसे बुडून नाकातोंडात पाणी जात बेशुद्ध पडतात वगैरे त्रास झाला नव्हता. पण हादरून गेली होती. सुन्न झाली होती.

@ सस्मित हो, भेटा की..
हा प्रसंग आजही आम्हाला काल घडल्यासारखे आठवतो. आमच्यासोबतच्या मुलीनेही तिला तरंगताना आणि स्पेशली ते डोळे पाहिले होते. ती सुद्धा त्याप्रसंगानंतर तेच सांगत होती..

बाकी अघोरी वगैरे नसावे, बरेच जण एंजॉय करतात. अर्थात आपल्याकडे सुरक्षितता किती पाळली जाते हा कळीचा प्रश्न आहे. कोणाकडे याबाबत घडणार्‍या अपघातांचे आकडे आहेत का?

हायला केक... मलाही बायको तुमच्याबद्दल हेच सांगत असते. केकची चौकशी करणारी मैत्रीण Proud

भयंकर अनुभव आहे लाईफ जॅकेट घालून पाण्यात पडायचं म्हणजे.
मी राणीच्या बागेत फिरत असताना समोर अचानक वाघ आला तो प्रसंग आठवला. साक्षात मृत्युयोग म्हणतात तसा. सुदैवाने तो पिंजऱ्यात होता म्हणून वाचलो.

धन्यवाद मोरोबा...

भयंकर अनुभव आहे लाईफ जॅकेट घालून पाण्यात पडायचं म्हणजे.
>>>>
अचानक समुद्राच्या तळाशी फेकले गेल्यावर आणि पाण्यात गटांगळ्या खाल्यावर आणि जिथून बाह्रेरील दुनियेचे दर्शनही होत नाही अश्या जागी एका बेसावध क्षणी ते देखील क्षणार्धात पोहोचल्यावर आपण लाईफ जॅकेट घातलेय आणि आज ना उद्या पुन्हा समुद्राच्या पृष्ठ्भागावर येऊ हे कोणाला सुचतेय ओ Happy

राणीबागेवरून मला अजून एक मृत्युचा अनुभव आठवला. मध्यंतरी मी एका धाग्यात उल्लेख केलेला. पण डिटेल नव्हते दिले. लिहितो लवकरच... पण त्या आधी ही मालिका संपवतोय. कदाचित एकच वा झाल्यास जास्तीत जास्त दोन भाग उरलेत आता.

भयंकर अनुभव आहे लाईफ जॅकेट घालून पाण्यात पडायचं म्हणजे
,>>>

आहेच मुळी. तुम्हाला अनपेक्षित असताना कोणताही असा प्रकार घडणे ज्याने तुम्हाला वाटेल की मेलोच मी आता हा भयंकर अनुभवच आहे. ते खतरोंके खिलाडी वाले स्टंट करतात त्यांना अशीच संपूर्ण सेफ्टी आणि काय होऊ शकतं त्याची कल्पना जते तरी ते बघायला भयंकर वाटतं च ना?

आम्हाला अभिषेक च्या लेखनातली ताकद माहीत आहे म्हणूनच आम्ही रुन्मेष हेटर होत आहोत. त्याने हे सगळे किडे करण्यापेक्षा खरंच चांगलं लिखाण करावं हे आम्हाला नेहमी वाटतं म्हणून वैतागायला होतं. ते असो!

हर्पेन Lol

खायचे किडे नाही ओ.. करायचे किडे
जसे काड्याही दोन प्रकारच्या असतात ना तसेच हे...

आम्हाला अभिषेक च्या लेखनातली ताकद माहीत आहे म्हणूनच आम्ही रुन्मेष हेटर होत आहोत.
>>> ऑ ??? अभिषेक म्हणजेच ऋन्मेष ना??

मोरोबा Happy
बेसावधपणे पाण्यात पडणे आणि तेव्हा मरतो की काय वाटणे साहजिक आहे आणि प्रिय व्यक्तीबद्दल जास्त धसका घेणे सुद्धा.

पण ते सगळ्यांना पाडलं असताना, जमिनीवर परतल्यावर हाच का तो मृत्यूयोग वाटणे याबद्दल तुमच्याशी सहमत.
पण जर मृत्यूयोगाची धास्ती घेतली असेल त्यांना रस्त्यात साप दिसला तरी मृत्यूयोग आठवू शकतो किंवा ईस्त्रीला हात लावल्यावर झिणझिण्या आल्या तरीही.

दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
१. मृत्युयोगाची धास्ती घेतल्याने छोट्या छोट्या गोष्टीत मरण दिसणे
२. मृत्युयोग ध्यानीमनी नसताना अचानक एक मरणाच्या दारात जाऊन परतावे असा अनुभव घेतल्यानंतर मृत्युयोगाची आठवण होणे.

आता या केसमध्ये लाईफ जॅकेट होते तर लगेच काही मेला वगैरे नसता हा तर्क बरोबर असला तरी तो धसक्यातून सावरल्यानंतर दुसर्‍या दिवशी पटतो Happy

छे हो एक्स्प्लेनेशन नाही. चर्चा वाद विवाद संवाद... छंद आहे माझा Happy
पुढचे आता विकेंडला लिहितो. सलग वेळ हवा तास दिड तास. आणि महत्वाचे म्हणजे डोक्यात कामाचे विचार नको. एखाद्या निवांत रात्रीच जमते हे..

अहो छान नॉनस्टॉप बायकोला हेवा वाटावे असे रूटीन झाले होते. पण मध्यंतरी घरात शिरलेला कोरोना, बंद पडलेले गार्डन्स, आणि मुंबईत आलेली थंडीची लाट या सर्वांमुळे बंदच झालेय पहाटेचे मॉर्निंग वॉल्क. नाही म्हणायला गेल्या रविवारी आलो हिंडून. पण ते वॉल्क कमी, मुलीसोबतचे भटकणे जास्त होते. पण ईन्शाल्लाह आता उद्या शनिवारपासून पुन्हा रेग्युलर व्हायचे आहे.

शनिवारपासुन सुरुवात?
आम्हीनैबैकरत.
सोमवारपासुन, 1 तारखेपासुन असं करतो. ते जे काही करतो ते भले पुढच्या सोमवारपर्यंत टिकणार नाही. किंवा परत पुढच्या 1 तारखेची वाट बघु. पण अशी मधेच सुरुवात नाहीच.

Pages